Connect with us

निळ्या पहाटेची शक्यता

सामाजिक

निळ्या पहाटेची शक्यता

निळ्या पहाटेची शक्यता

लेखाला शीर्षक काय द्यावे याचा विचार करत होतो. आधी मनात विचार आला ‘निळ्या पहाटेची चिन्हे’ असे लिहावे. पण त्यातून अशी पहाट आता होणार आहे, क्षितीजावर तशा खुणा उमटू लागल्या आहेत, अशी एकप्रकारची खात्री व्यक्त होते. तथापि, तशी खात्री देता येत नाही. मग विचार आला ‘निळ्या पहाटेची चाहूल’ असे लिहावे. पण ‘चाहूल’ मध्येही ती घटना काही काळाने का होईना घडण्याची निश्चिती असते. चिन्हांइतका स्पष्ट अंदाज सगळ्यांना याक्षणी नसतो एवढेच. मला अशी निश्चिती नाही. अशी पहाट उगवायला परिस्थितीचे आज दिसणारे घटक अनुकूल आहेत, एवढे मला नक्की म्हणायचे आहे. पण उद्या काय होईल, प्रतिकूल घटक उदयाला येणारच नाहीत हे सांगता येत नाही. तसे ते आले नाहीत तर ‘निळी पहाट’ उदयाला येण्याची शक्यता-संभाव्यता आहे, असे विधान करणे उचित ठरेल. इथे अजून एक बाब अधोरेखित करणे गरजेचे आहे. ते म्हणजे अशी पहाट आणण्याचे प्रयत्न, खटपट. अनुकूल घटकांचे योग्य आकलन व वापर करत मानवी प्रयत्नांनी ही पहाट उगवू शकते. म्हणूनच लेखाचे शीर्षक काहीसे कमी काव्यात्म होण्याची तडजोड करत ठेवले- ‘निळ्या पहाटेची शक्यता’.

लाल, भगवा, हिरवा हे रंग एकेका विचारसरणीचे, चळवळीचे प्रतीक झाले आहेत; तसा हा निळा रंग आंबेडकरी संस्कृती, विचार, चळवळ सूचित करणारा. ‘निळी पहाट’ हे आंबेडकरी चळवळीचे रुपक. मराठा आंदोलनाचा जो काही भला-बुरा परिणाम अनेकविध घटकांवर (खुद्द मराठा समाजावरही) होत आहे, होणार आहे, त्याचा एक चांगला परिणाम आंबेडकरी चळवळीची कोंडी फुटण्याची शक्यता हाही आहे. या शक्यतेचे मला दिसणारे काही पैलू निदर्शनास आणणे हा या लेखाचा हेतू आहे.

मराठा आंदोलनाच्या मागण्या सरकारकडे असल्या, मोर्चा मूक असला तरी त्याच्या अंतस्थ बौद्धांविषयी एकप्रकारची तीव्रता आहे, हे नाकारता येत नाही. ही तीव्रता सर्व दलितांविषयी नाही. महाराष्ट्रातल्या दलितांत बहुसंख्य व पुढाकाराने असलेल्या बौद्धांविषयी आहे; म्हणून दलित शब्द वापरण्यात फारसे हशील नाही. नाशिकमधील अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार करण्याच्या आरोपात बौद्ध मुलगा पकडला गेल्यानंतर झालेल्या उद्रेकात दोहोंकडच्यांना फटका बसला तरी मुख्य नुकसान झाले ते बौद्धांचे. उद्रेकाच्या प्रारंभकर्त्यांचे मुख्य लक्ष्य होते बौद्ध समाजच. हे कोणी घडवले वगैरे चर्चा चालू राहतील. पण मराठा मोर्च्यांच्या मूकपणामागचा संताप एकवटून इथे व्यक्त झाला हे खरे. तूर्त, किरकोळ उदाहरणे वगळता उद्रेकाचे हे लोण नाशिकबाहेर पसरले नाही, हे चांगले झाले. पण ते पसरवण्याच्या खटपटी होणारच नाहीत असे नाही. नवे निमित्त शोधण्याचे वा निर्माण करण्याचे प्रयत्न हितसंबंधीयांकडून होऊ शकतात.

जी भीती समोर दिसत होती, ती यावेळी खरी ठरली. दोन्हीकडे या उद्रेकात प्रभावी हस्तक्षेप करायला नेतृत्व नव्हते. प्रकाश आंबेडकर व अन्य काहींनी शांततेचे आवाहन केले तेवढेच. यापलीकडे या घटनेचा आपापल्या समुदायांना अर्थ उलगडून पुढील मार्गदर्शन करणारे राजकीय विधान यांपैकी कोणीही केले नाही. त्यामुळे नाशिकमधल्या कार्यकर्त्यांशी बोलताना तो एकाकीपणा जाणवत होता. बौद्ध तरुणांचा व्यवहार निर्नायकी होता, हे ही कानावर येत होते.

प्रतिमोर्चे काढू नयेत; ते पाऊल घातक ठरेल, असे आम्ही कार्यकर्ते तसेच डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रकाश आंबेडकर यांसारखे मोठे नेते सांगत होतो. तथापि, लातूर, परभणीला असे मोर्चे काढले गेले. परभणीचा मोर्चा तर मोठ्या संख्येचा होता. अन्य ठिकाणीही असे मोर्चे काढण्याची तयारी सुरु आहे. यामागे कोण (भाजप तर नव्हे?) ही चर्चा चालू आहे. चालू राहिलही. हे मोर्चे मराठा मोर्च्यांच्या धरतीवर शांत व शिस्तशीर निघाले ही जमेची बाजू. पण त्यामुळे प्रतिमोर्च्यांच्या परिणामांची भीती कमी होत नाही.

समाज त्याच्या आत्मगतीने उठतो हे अनेकदा खरे असले तरी त्याच्या संचालनासाठी नेतृत्व लागते. ते नसेल तर समाजाला नवे नेतृत्व तयार करावे लागते. त्याशिवाय चळवळीचा पुढचा टप्पा गाठणे, त्याचे नियमन, नियंत्रण व दिशादिग्दर्शन करणे शक्य होणार नाही. तसा जगात अनुभव नाही. मराठा आंदोलन व आंबेडकरी चळवळ या दोहोंनाही ते करावे लागेल. नाही केल्यास चळवळ भरकटेल, थकून, निराश होऊन थंड होईल किंवा संतापापोटी अराजकाकडे जाईल.

आंबेडकरी चळवळीत नव्या नेतृत्वाची गरज तयार झाली आहे. रामदास आठवले भाजपच्या सोबत गेल्याने, त्यांची संघटनात्मक ताकद तुलनेने मोठी असली तरी, त्यांनी नेतृत्वाचा नैतिक अधिकार गमावला आहे. प्रकाश आंबेडकरांचा भूतकाळ काहीही असला तरी तो अधिकार आज त्यांना आहे. पुरोगामी, डाव्या शक्तींशी सोबत व व्यापक मांडणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना त्या अर्थाने रान मोकळे आहे. पण हा अधिकार ठळकपणे बजावताना ते दिसत नाहीत. त्यामागची कारणेही कळत नाहीत. अन्य नेते शांत, निष्क्रिय किंवा प्रभावहिन झालेत. अशाच स्थितीत एकेकाळी रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात तरुण पँथर्सनी उठाव केला व नवे नेतृत्व स्थापित केले. आज ज्येष्ठ नेतृत्वाचा जवळपास अभाव असताना आंबेडकरी चळवळीत मात्र नवे नेतृत्व उभे राहताना अजूनतरी दिसत नाही. खळबळ खूप चालू आहे. नवे नेतृत्व जन्माला घालण्याच्या त्या वेणा आहेत का? सांगता येत नाही. तथापि, तरुणांचे फेसबुक-व्हॉट्सअपवर व्यक्त होण्याबरोबरच भेटी-बैठका आदिंमार्फत कार्यक्रमांच्या आखणीचेही प्रयत्न जोरात चालू झाल्याचे दिसते आहे. पण हे प्रयत्न स्वैर व फुटकळ आहेत.

यांतल्या अनेक तरुणांशी माझा संबंध येतो. मराठा आंदोलनानंतर तो वाढला आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चा होत असते. राज्यातल्या विविध भागांतल्या या तरुणांनी राज्यस्तरीय बैठक घेऊन आजच्या परिस्थितीविषयी एक निवेदन काढणे गरजेचे आहे. तरुणांच्या या निवेदनाला खूप महत्व आहे. एकतर त्यात ताजेपणा असेल. या तरुणांवर जुन्या नेत्यांवर असलेले छाप नसतील. ही मंडळी त्या अर्थाने कोरी, ताजी असतील. त्यामुळे लोकही त्यांच्याकडे आश्वासकपणे पाहतील. जेएनयूच्या आंदोलनातून पुढे आलेला कन्हैया, हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाचे संघर्षरत सहकारी किंवा उना प्रकरणातून गुजरातच्या दलितांतून उदयाला आलेला जिग्नेश मेवानी यांच्याबाबत हे अनुभवाला आले आहे.

या तरुणांना जी नवी बांधाबांध करावी लागेल, तिचा आशय, शैली व चारित्र्य पारंपरिक असून चालणार नाही. पँथरने दलित अत्याचाराविरोधात जी चित्त्यासारखी झेप घेतली त्यामुळे दोन पिढ्यांना (पँथर्सचे समवयीन व आमच्यासारखे त्यांच्या लगोलग नंतरच्या पिढीतले) विलक्षण अस्मिताभान दिले. चैतन्याने आमची मने लकाकली. या विजिगीषु पँथर्सनी प्रस्थापित गढ्या उध्वस्त केल्या. पण नवे काही रचले, निर्माण केले नाही. वैचारिक मतभेदांच्या पोटात अहंतांचे सुरुंग तयार झाले व त्यांच्या स्फोटात चळवळ नेस्तनाबूत झाली. वैचारिक, नैतिक अधःपतनाच्या गर्तेत ती अडकली ती अडकलीच. नामांतर-रिडल्स आदि अस्मितांच्या लढाया काही प्रमाणात जनतेच्या एकजुटीच्या रेट्याखाली जिंकल्या हे खरे. पण त्यापलीकडे आंबेडकरी चळवळ जाऊ शकली नाही. उलट सत्ताधारी होणे म्हणजे व्यक्तिगत सत्तापदे उपभोगणे व त्यासाठी वाटेल त्या तडजोडी-सोयरीकी प्रस्थापित राजकारण्यांशी करणे सुरु झाले. हा रोग वस्त्यांतील तळच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेला. हे मुळासकट बदलावे लागेल. रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेसंबंधीच्या बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील अपेक्षांना प्रामाणिक प्रतिसाद द्यावा लागेल. बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन पक्ष एकजातीय नाही. तो सर्व पीडितांचा आहे. त्यात संविधानातील मूल्यांच्या परिपूर्तीचे ध्येय आहे. बाबासाहेबांनी या पत्राद्वारे अपेक्षिलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील.

मराठा आंदोलनांनी सनदशीर आंदोलनांची घालून दिलेली चौकट आज अनेक जण अनुसरताना दिसत आहेत. हे चांगले लक्षण आहे. पण ही चौकट मूळ संविधानातली आहे. संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेबांनी सत्याग्रहादी मार्गांबाबतही प्रश्नचिन्ह उभे केलेले होते; इतके ते संसदीय लोकशाही व्यवहाराला महत्व देत होते. अशावेळी अराजकी आंदोलनांपासून आंबेडकरी चळवळीला बाजूला काढणे हे मोठे काम आहे. सिद्धार्थ कॉलनी व रमाबाई कॉलनीतील पोलीसी हत्याकांड, खैरलांजी अशा अनेक जिव्हारी घाव घालणाऱ्या घटनांना आंबेडकरी जनतेने दिलेल्या प्रतिक्रिया स्वतःचे अस्तित्व दाखवून देणाऱ्या होत्या हे खरे. पण त्या अराजकी व निर्नायकी आंदोलनांत मूळ घटनांपेक्षा अधिक नुकसान आंबेडकरी चळवळीने स्वतःचे करुन घेतले हे ही वास्तव आहे. आंदोलनांची ही आत्मघातकी रीत बदलण्याची गरज आहे. योग्य नियोजन व सर्व समाजाच्या विवेकाला आवाहन करणारी बुद्धाच्या मैत्री व करुणेवर आधारित नवी रीत स्थापित करावी लागणार आहे.

एकाकी न पडता मित्रांचे संकलन करणे हा या रीतीचा महत्वाचा भाग आहे. नव्या संघटनात प्रारंभी आंबेडकरी समुदाय हा गाभ्याचा घटक राहणे स्वाभाविक आहे. पण त्याभोवती बौद्धेतर दलित, आदिवासी, सवर्णांतले पुरोगामी अशी मित्रवर्तुळे जाणीवपूर्वक तयार करत जावी लागतील. यथावकाश ही वर्तुळे गळून भूमिका व कार्यक्रमाच्या आधारावर एकमय संघटन उभे राहायला हवे. या प्रक्रियेत मतभेद हे अडसर होता कामा नयेत. मतभेदांची चर्चा चालू ठेवून पटणाऱ्या मुद्द्यांवर एकत्र काम हाच लोकशाही व्यवहार संघटन बांधणीत हवा. ध्येय निश्चित असले, मतभिन्नतांविषयी प्रामाणिकता-पारदर्शकता ठेवली व अहंतांची बाधा आड येऊ दिली नाही तर संशयाची भूते झपाटत नाहीत. राजा-नामदेव या पँथर्संचा वाद या संदर्भात आठवून पहा. त्या वादाचा निरास न झाल्याने आंबेडकरी चळवळीचे घोर नुकसान झाले.

अलिकडच्या वातावरणाचा व्यक्तिगत अनुभव सांगायचा तर हल्ली लोक ऐकायला खूप उत्सुक आहेत, असे दिसते. विविध पक्ष-संघटनांतल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या चेंबूर-ट्रॉम्बे परिसरात काही वर्षांपूर्वी ‘संविधान संवर्धन समिती’ या सामायिक मंचाची उभारणी केली होती. सहमतीचे आंदोलन वा उपक्रम करताना आपापल्या पक्ष-संघटनांतले मतभेद, कार्यकक्षा व प्राधान्य आडवे येऊ न देता व्यापक एकजूट साधली जावी यासाठीचा हा मंच आहे. प्रसंगाप्रंसगाने या मंचाद्वारे कार्यक्रम घेतले जात. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तो अधिक क्रियाशील करण्यात आला. मराठा आंदोलनाने उभे केलेल्या अत्याचारविरोधी कायदा, आरक्षण याबाबतच्या प्रश्नांचा आढावा, मराठा आंदोलनाचा अर्थ, भोवतालची सामाजिक-राजकीय स्थिती व आपल्या हस्तक्षेपाचे मार्ग यांची चर्चा करण्यासाठी या मंचाद्वारे जागोजाग परिषदा व वस्तीसभा चालू आहेत. या परिषदा, बैठकांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. रात्री ११-१२ वाजेपर्यंत पाच-सहा तास लोक न कंटाळता ऐकत असतात. त्यात महिला, तरुण मुली, मुलगे लक्षणीय संख्येने असतात. त्यांना खूप प्रश्नही असतात. त्यांवर चर्चाही होते. या परिषदा-सभांमध्ये मी लेखात याआधी जे मांडले ती भूमिका सर्वसाधारणपणे असते. हे काहीतरी नवीन आपण ऐकतो आहोत व असे काहीतरी व्हायला हवे, असे त्यांना वाटत असते. सभांनंतर भेटणाऱ्यांच्यात महिला, मुलीही असतात. आम्हाला हे अजून समजून घ्यायचे आहे. पुन्हा अशी बैठक घ्या, असे त्या सांगतात. तसेच तिथेच नव्या सभांची निमंत्रणेही येतात. वक्त्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे ही सर्व निमंत्रणे स्वीकारणे आम्हाला कठीण जात आहे. या सभा-परिषदा संघटित करणाऱ्या कार्यकर्त्यांतही नव्या प्रकारचा उत्साह व उमेद दिसते आहे. खूप फिरावे लागते, वैयक्तिक प्रवासखर्चाचा ताण येतो, जागरणे होतात, दमायलाही खूप होते; पण आंबेडकरी समूहातील हे नवे वातावरण सुखद, हुरुप वाढवणारे व नवी ताकद देणारेही आहे.

काही बैठका आंबेडकरी तरुण, मराठा वा अन्य सवर्ण अशा मिश्रही होतात. तिथे होणारी चर्चाही उत्साहित करणारी असते. त्यांत सगळ्यांनाच काही नवीन कळते आहे असे जाणवते. व्यक्तिशः मला आंबेडकरी तसेच मराठा तरुणांकडूनही फोन येत असतात. त्यात माझ्या मांडणीविषयी स्वागत, आश्वासकता तसेच काही शंका असतात. पण या सर्वांना मोकळेपणाने ते बोलावेसे वाटते हा मला प्रफुल्लित करणारा अनुभव असतो.

आज आंबेडकरी समुदायात प्राध्यापक, वकील, अधिकारी यांचा एक प्रभावशाली मध्यमवर्ग आहे. काही परिषदांमध्ये, बैठकांमध्ये त्यांची भेट होते. मांडणीची जुनी पद्धत, एकारलेपणा, आत्ममश्गुलता अशा काही बाबी अजूनही असल्या तरी नव्याने या सगळ्याचा विचार करायला हवा, हे त्यांनाही जाणवते आहे. या वर्गातून वस्त्यांतील सभांसाठी, तरुणांच्या कार्यशाळांसाठी लोक यावेत, असा प्रयत्न आम्ही करत आहोत.

‘कोपर्डी’च्या दुर्दैवी घटनेने ‘मराठा आंदोलनां’ना जन्म दिला. मराठा आंदोलनांच्या परिणामी आंबेडकरी समूहात हालचाल सुरु झाली. या हालचालीतून या दोन्ही समूहांतील तसेच अन्य सर्व समूहांतील पीडित म्हणून, शोषित म्हणून एकवटावे ही भावना वाढीस लागायला हवी. आम्ही घेत असलेल्या सभांतून तरी त्यास प्रतिसाद मिळतो आहे. याचा अर्थ त्यारीतीने मांडण्याची गरज आहे. अशी मांडणी करत गेल्यास व्यवस्था बदलाच्या, न्याय्य समाजनिर्मितीच्या लढ्याला एक नवा मजबूत आधार तयार होऊ शकतो, असे दिसते. पण काही जुन्या चाकोरीचे, संकुचित, अहंता फुलविणारे गटही आज अस्तित्वात आहेत. त्यांचेही प्रयत्न समांतर चालू आहेत, असे आढळते. हा संघर्ष राहणार. अन्य पुरोगामी शक्ती तसेच (सरकारातला व विरोधातला) राज्यकर्ता वर्ग, अन्य जात-वर्ग समूह काय हालचाली करणार आहेत, करत आहेत यावरही ही प्रक्रिया कशी पुढे जाणार हे ठरणार आहे.

एक खरे की काहीतरी हलते आहे. खळबळते आहे. अनुकूल घटक जमून येत आहेत. त्यातून एकूण परिवर्तनवादी चळवळीला गती देणारी निळी पहाट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात ती होईल, न होईल की मध्येच अंधारुन येईल हे भविष्य सर्वस्वी आपल्या हाती नाही. पण आपले प्रयत्न निळ्या पहाटेचे उद्दिष्ट व शक्यता धरून चालायला हवेत. हे प्रयत्न करणे निश्चित आपल्या हाती आहे.

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
____________________________
आंदोलन, नोव्हेंबर २०१६

More in सामाजिक

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top