Connect with us

महामानवाला निळा सलाम!

साहित्य व कला

महामानवाला निळा सलाम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरची नामदेव ढसाळांची ही सुप्रसिद्ध कविता.

अहं ब्रह्माास्मि।
अस्मिन सस्ति इदं भवति।
सतत चालले आहे महायुद्ध
आत्मवादी-अनात्मवादी यांत।
– म्हणे बीजातून फुटतो अंकूर
म्हणे बीज होते म्हणून अंकूर फुटला
अविनाशी दव्याचे पाठीराखे कुणी
कुणी सर्व काही क्षणिकमचे पाठीराखे
महाप्रतिभावंता
मी शिकलो आहे तुझ्याकडून
दु:खाचे व्याकरण जाणून घ्यायला
सर्व दु:खाचे मूळ तृष्णा
कुठून जन्मास येते,
केव्हा तिचा क्षय होतो ते.
सरकतो आहे माझ्या डोळ्यांसमोरून
मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रागैतिहास.
दृष्टांत देणारी उत्क्रांत माणसांची रांग
विहंगम-
आणि एक बुटका केसाळ माकडसदृश्य
त्याच्यानंतर दुसरा
त्याच्यानंतर तिसरा-
शून्ययुगापासून आण्विकयुगापर्यंत
चालत बदलत आलेली माकडं की माणसं?
करून जातायत माझं मनोरंजन.
प्रतीत्य समुदायाच्या पक्षधरा,
– आता कळतो मला अष्टोदिकांचा अर्थ
काय असतात दहा अव्याकृते
आणि बारा निदाने
काय असते निर्वाण-
निर्वाण तृष्णेचा क्षय : दु:खाचा क्षय
क्षणिकम आहे दु:ख; क्षणिकम आहे सुख
दोन्ही अनुभव अखेर विनाशीच.
बीज आधी की अंकूर
बीज होते म्हणून अंकूर निर्माण झाला
या गहनचर्चा माझ्या
जिज्ञासेला डिवचतात
धावती ट्रेन माझ्या सामान्य आयुष्याची
मला प्रेषितासारखं बोलता येत नाही
फक्त दिसतं पुढचं
भविष्यातलं नाही, वास्तवातलं
स्वप्नातलं नाही, वर्तमानातलं
माणसाची प्रतिमा अधिक उजळ करणाऱ्या
महापरिनिर्वाणोत्तर तुझं अस्तित्व
जागृत ज्वालामुखी होऊन बरसते आहे
आमच्यावर झिमझिम पावसासारखे
उत्स्फूर्त लाव्हाचं उसळतं कारंजं
ठिणगी ठिणगी फूल झालेलं
काळाच्या महालाटेवर बसून
कलिंगचं युद्ध हरलेला येतो आहे
आमच्यापर्यंत.
त्याच्या अंगावरली काषायवस्त्रे
सूर्यकिरणांनी अधिक गडद केलेली.
काळ किती विरोधी होता आमुच्या
काळाचे किरमिजी जावळ पकडून
तू बांधून टाकलेस त्याला
आमच्या उन्नयनाला
अंतर्यामी कल्लोळाला साक्षी ठेवून
तुझे उतराई होणे हीच आमची
जगण्याची शक्ती
* * *
फुलांचे ताटवे झुलताहेत नजरेसमोर
बहरून आलीयेत फुलाफळांची शेतं
या फुलांवरून त्या फुलांवर विहरत
राहणारी फुलपाखरं
चतुर उडते -पारदशीर् पंखांचे- फुलाफांदीवर
लँडिंग करणारे-
काय त्यांची निर्भर ऐट- झुलत्या फुलांवर अलग थांबण्याची-
रंगांची पंचमी फुलपाखरांच्या पंखांवर चितारलेली
अमूर्ताची चिरंजीव शैली- डोळ्यांना रिझवणारी
किती किती प्रयोग चित्रविचित्र रंगमिश्रणाचे
चतुर हवेला खजिल करत अधांतरी तरंगणारे
आम्ही -मी झालो आहे धनी – या गडगंज ऐश्वर्याचे
अहाहा -झिंग चढली आहे ऐहिकाला
नेमका हाच आनंद भोगता आला नाही-
माझ्या बापजाद्यांना
संस्कृतीच्या मिरासदारांनी केला त्यांच्यावर अत्याचार
– आणि केला अनन्वित छळ
छळाच्या इतिहासाची सहस्त्रावधी वर्षं
माझ्याही पिढीने यातले सोसले पुष्कळसे
आमचे नारकीय आयुष्य संपवून टाकणाऱ्या
आकाशातील स्वर्ग तू आणलास
आमच्यासाठी ओढून पृथ्वीवर
किती आरपार बदलून गेलं माझं माझ्या लोकांचं साक्षात जीवन.
आमच्या चंदमौळी घरातील मडकी गाडगी गेलीयत- माणिक मोत्यांनी भरून
रांजण- भरून गेलेयत पाण्याने
कणग्या भरून गेल्यायेत
अन्नधान्यांनी ओतप्रोत.
दारिद्याचे आमचे शेतही गेले आहे
कसदार पिकाने फुलून
गोठ्यातील जनावरेसुद्धा आता नाही उपाशी मरत
श्वान आमच्या दारातले इमानी
भाकरीसाठी नाही विव्हळत.
बळ आले तुझ्यामुळे आमच्या शिंक्यातील भाकरीला
आता भूकेचा दावानल नाही आम्हाला सतावीत.
चिमण्यांचा गोतावळा वेचीत राहतो
विश्वासाने दारात टाकलेले दाणे.
धीट चिमण्यांनी बांधले आहे आमच्या
घराच्या आढ्याला घरटे
खाली घरकारभारीण शिजवते आहे
चुलीवर रोजचे अन्न.
जळत्या ओल्या सुक्या लाकडांना
घालते आहे फुंकर फुंकणीने
तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यातले सुखीप्रंपचाचे अश्रू
घरट्यात जन्म घेऊ लागलीत रोज नवी पिल्ले
मांसाचा चिंब चिंब आंधळा गोळा
पुकारतो आहे आपल्या आईला.
अगं, चिमणीबाई बघ गं आपल्या पोराला
घरातील म्हातारी पाहते आहे संसार चिमण्यांचा
घरट्याबाहेर तरंगत लटकलेली
चिमणी नावाची आई
बाळाच्या चोचीत देते आहे चोच.
किती अवर्णनीय आनंदाचे धनी आम्हाला केलेस हे महामानवा-
कुठल्या उपमेने तुला संबोधू-
प्रेषित म्हणू – महापुरुष कालपुरुष!
किती उंच ठिकाणी आणून ठेवलेस आम्हाला
आम्ही आता नाही उकरत इतिहासाची मढी
सनातन शत्रूला आता सारे विसरून आम्ही लावले आहे गळ्याला-
वैरात वैर संपत नाही हे सांगणाऱ्या आधुनिक बोधीसत्ता-
ज्याला आदी नाही, अंत नाही अशा अंतरिक्षाला
जाऊन भिडणारे तुझे कर्तृत्व
कोण मोजणार उंची तुझी?
मी -आम्ही जगतो आहोत या संक्रमण काळात
तुझा सिद्धांत उराशी बाळगून
प्रागैतिहासिक माणसांच्या अवस्था मनात ठेवून
हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा माणूस.
विध्वंस करायला निघालाय आपल्याच निमिर्तीचा-
हे आधुनिक बोधीसत्त्वा-
शक्ती दे मला या विध्वंसक्याला
वठणीवर आणायला.
कोणी काहीही समजो मला
तुझ्याविषयीची माझ्या मनातली श्रद्धा आहे अपार-
कोणी घेऊ देत शंका
अखेर माणूस शंकासूरच ना?
मी गुडघे टेकून तुझ्या चैतासमोर
या छोट्याशा विहारात
कबुली देतो आहे माझ्या सर्व गुन्ह्यांची
किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू?
पश्चिमेचा विश्रब्ध समुद वाहतो आहे शांत
मावळत्या सूर्याची काषाय किरणं-
ललामभूत करून सोडताहेत चराचराला-
हे माझ्या चैतन्या-
बोल एखादा तरी शब्द माझ्याशी-
मी शरण तुला …

 — नामदेव ढसाळ

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in साहित्य व कला

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top