Connect with us

राष्ट्रवाद व राज्यकर्त्यांची विचारसरणी

राजकीय

राष्ट्रवाद व राज्यकर्त्यांची विचारसरणी

राष्ट्रवाद व राज्यकर्त्यांची विचारसरणी

राष्ट्रवादाचा, राष्ट्रभावनेचा जाणीवपूर्वक आपल्या फॅसिस्ट सांस्कृतिक राष्ट्रवादाला पूरक अर्थ लावण्याचे प्रयत्न संघपरिवार आधीपासूनच करतो आहे. आता त्याच्या विचारसरणीचे सरकार आले आहे. ते सरकार म्हणून आपल्या यंत्रणा या कामी वापरत आहे. पोलीस, विद्यापीठ, शिक्षण, इतिहास लेखन, संसद सगळ्या आघाड्यांवर त्याने बेमुर्वत मोर्चे उघडले आहेत.
एकाच संविधानाचा आधार घेऊन आलेली सरकारे व्यवहार वेगळा करतात. त्यामागे त्यांची विचारसरणी असते. याचा प्रत्यय देणाऱ्या माझ्या लहानपणीच्या एक-दोन घटना सांगतो. तो दलित पँथरचा वादळी काळ होता. आमच्या वस्त्या या पँथरच्या डरकाळ्यांनी गाजत होत्या. दलित अत्याचारांच्या विरोधातील आवाज टीपेला जात होता. राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्हे यांना आव्हान दिले जात होते. १९७२ चा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता. यावेळच्या एका कवितेत नामदेव ढसाळ म्हणतात –
‘पंधरा ऑॅगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे
…कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा’
राजा ढालेंनी साधनेच्या स्वातंत्र्यदिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्तच्या विशेषांकात ‘काळा स्वातंत्र्य दिन’ असा लेख लिहिला. त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दल अत्यंत निरर्गल भाषा वापरली.
या दोन्ही नेत्यांचा आम्हा वस्तीतल्या मुलांवर विलक्षण प्रभाव होता. त्यांच्या भाषणांनी, लेख-कवितांनी आम्ही भारले जात असू. पुढची किमान १० वर्षे मी या भारलेपणातून बाहेर आलो नाही. या काळातला कुठला तरी एक १५ ऑॅगस्ट (बहुधा १९७६) आम्हीही काळा दिन म्हणून पाळला. मी शाळेत झेंडावंदनाला काळी फीत लावून गेलो. पुढे बराच काळ राष्ट्रगीताला उभा राही पण राष्ट्रगीत म्हणत नसे. त्याचे कारणही शिक्षकांना सांगे. ते ऐकून घेत. कोणी माझ्यावर कारवाई केली नाही की शाळेतून काढले नाही.
पँथरच्या त्या काळात अकोल्याची सवर्णांनी गवई बंधूंचे डोळे काढल्याची घटना खूप गाजली. आमच्या गल्लीसमोर गवई बंधूंना आणून एक आक्रमक निषेधाची सभा झाली. पँथरकरवी इंदिरा गांधींच्या गाडीला आडवे जाण्याचेही आंदोलन झाले.
या काळात राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतच नव्हे, तर एकूण संसद वगैरेबद्दल खूप असंसदीय, अवमानकारक बोलले जायचे. तथापि, या कार्यकर्त्यांवर, अगदी नामदेव-राजा यांच्या कविता-लेखाचे छापील पुरावे असतानाही त्यांच्यावर सरकारने काही कारवाई केल्याचे किंवा त्यांना राष्ट्रद्रोही म्हटल्याचे स्मरत नाही. एकूण वातावरणात, या मंडळींचा हा आक्रोश सामाजिक विषमतेने जन्मास घातलेल्या एका तीव्रतर वेदनेपोटी आहे, याविषयी बरीचशी सहानुभूती होती, किमान ती समजून घ्यायला हवी अशी भावना होती. समाजाची तसेच सरकारचीही.
– सुरेश सावंत

More in राजकीय

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top