Connect with us

सार्वजनिक संस्थांच्या निधीविषयी महात्मा गांधींचे विचारः

अवतरणे

सार्वजनिक संस्थांच्या निधीविषयी महात्मा गांधींचे विचारः

अनेक सार्वजनिक संस्था सुरु करुन त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो, की कोणत्याही सार्वजनिक संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करु नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे.

सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱया संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमताविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव हिंदुस्थानात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱया कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे व्यवस्थापक त्यांचे मालक होऊन बसले आहेत, आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करुन रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी लोकवर्गणीतून मिळणारा फंड ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या व्यवस्थापकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे; आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, असा माझा अभिप्राय आहे.

या माझ्या लिहिण्याविषयी गैरसमज होऊ नये. ज्या संस्थांना इमल्याची वगैरे जरुर लागते, अशा संस्थांना वरील टीका लागू पडत नाही. सार्वजनिक संस्थांच्या दैनंदिन खर्चाचा आधार स्वेच्छेने मिळालेली वार्षिक लोकवर्गणी हाच असला पाहिजे.

हे विचार दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या वेळी दृढ झाले. ह्या सहा वर्षांच्या महान झगड्यासाठी लाखो रुपयांची जरुर पडली, पण तो कायमनिधीशिवाय चालला. अशीही वेळ आठवते, की जेव्हा उद्याचा खर्च कोठून मिळेल याची मला कल्पनाही नव्हती.

(स्रोतः सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा, महात्मा गांधी, पान 187-188)

Continue Reading
You may also like...

More in अवतरणे

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top