Connect with us

‘स्त्रीमुक्ती’च्या आकलनासाठी असाही एक प्रयोगः उताऱ्यावरील प्रश्न आणि सारांश लेखन

लिंगभाव

‘स्त्रीमुक्ती’च्या आकलनासाठी असाही एक प्रयोगः उताऱ्यावरील प्रश्न आणि सारांश लेखन

कोणताही विषय नीट समजावून घ्यायचा असेल तर तो विविध सिद्धान्त आणि त्या सिद्धान्तांचा रोजच्या जीवनाशी संबंध अशा पद्धतीने एके काळी मांडला जात असे. पण सध्या आपल्याकडे भाषेपासून अर्थकारणापर्यंत सगळेच विषय एकेक उतारा, त्याचे आकलन, त्यावरचे प्रश्न आणि शेवटी एखादा सारांशलेखनाचा उतारा अशा रीतीने शिकवण्याची पद्धत रूढ होते आहे. त्या नवीन रूढीला धरून काही उतारे व सारांश लेखनाचा प्रयत्न.
उतारे वाचण्यापूर्वी काही सूचना…..

(१) कृपया प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा.
(२) उताऱ्याचे पूर्ण आकलन झाल्यावर त्याखालील दोन-दोन प्रश्नांची उत्तरे द्या. (काही वेळेस प्रश्न वाचल्यानंतर उताऱ्याचे नव्याने आकलन होते आहे असे वाटेल).
(३) नमुन्यादाखल एक सारांश लेखनाचा उतारा दिला आहे. पण फक्त तोच या लेखाचा सारांश नाही. वाचणारा प्रत्येक जण आपला स्वतंत्र सारांश तयार करू शकतो.

उतारा पहिला

अठराव्या व एकोणिसाव्या शतकाच्या काळात युरोपात जी वैचारिक घुसळण सुरु होती, त्यातला एक बिनीचा शिलेदार होता, जॉन स्टुअर्ट मिल. सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समता या विचारांना धरून मिलने काही ग्रंथ लिहिले. त्यापैकी एका ग्रंथात मिल असे म्हणतो की, ‘स्त्रियांची स्थिती अशी आहे की त्या आपल्या सर्व क्षमता किंवा गुण हे स्वत:च्या सुखासाठी वापरण्यापेक्षा समाजातल्या भिन्नलिंगी व्यक्तींचे प्रेम आणि कृपादृष्टी मिळवण्यासाठीच सदासर्वकाळ वापरतात. आणि तरीही हे प्रेम आणि कृपादृष्टी स्त्रियांना कधी मिळते तर त्या विनाअट पुरुषावर अवलंबून राहायला तयार असतील तर…’ याच ग्रंथात पुढे स्त्री-पुरुष समानतेचा विशेष पुरस्कार केला आहे आणि शारीरिक बलाचा मुद्दा सोडला तर स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत असे म्हटले आहे.

प्रश्न १ : एकविसाव्या शतकातसुद्धा (या विधानाला जवळजवळ २०० वर्षे झाल्यानंतर) स्त्रियांनी आपले सगळे गुण हे पुरुषांच्या कृपादृष्टीसाठी राखून ठेवावेत अशीच आपली इच्छा नाही का?
प्रश्न २ : विनाअट किंवा काही अटींसकट स्त्रिया पुरुषांवर अवलंबून राहायला तयार नसतील तर पुरुषांनी स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शारीरिक बलाचा सरसकट वापर करावा का?

उतारा दुसरा

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे १८५३ साली जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात ‘अडलेल्या विधवांसाठी’ एक विधवा-अनाथालय काढले. अनाथालयात येणाऱ्या विधवा बऱ्याचदा घरातल्याच एखाद्या पुरुषाच्या वासनेच्या शिकार असायच्या. या स्त्रियांचा वेष म्हणजे अंगभर नेसलेले फिक्या किंवा अनाकर्षक रंगाचे सुती लुगडे. त्यात काही केशवपन केलेल्या स्त्रियाही असायच्या. क्वचितप्रसंगी एखादी स्वत: चुकलेली किंवा भावनेची शिकार झालेली विधवाही अनाथालयात येत असे. पण ते प्रमाण एकूण विधवांच्या तुलनेत फारच कमी.

प्रश्न १ : जेव्हा आपण मुलींचे उत्तान कपडे किंवा आकर्षक वेशभूषा यामुळेच बलात्कार वाढले आहेत, असे विधान सहज करतो, तेव्हा आपण आपलाच इतिहास विसरलेले असतो का?
प्रश्न २ : पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरात जर ही परिस्थिती असेल तर देशाच्या इतर भागात त्या वेळेस स्त्री-अत्याचारांचे प्रमाण आणि स्वरूप काय असेल?

उतारा तिसरा

दिनांक १५ जुलै १९२७ च्या ‘बहिष्कृत भारत’ या वर्तमानपत्रात ‘आजकालचे प्रश्न’ या सदरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘हिंदू लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तू आहे, असा सर्वसाधारण समज आहे आणि पुरुषाच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावे, अशी सर्वांची समजून असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तू समजली गेल्यामुळे तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनी व दागदागिन्यांनी शृंगारण्यात बऱ्याच धनाचा व प्रेमाचा व्यय होतो हे खरे, तथापि माणूस म्हणून तिला कोणत्याच प्रकारचे हक्क हिंदू धर्मात देण्यात आलेले नाहीत. जड जीवाची जोपासना करण्यास संपत्तीचा वारसा तिला नाही तो नाहीच, पण शिक्षण घेऊन मन सुसंस्कृत करण्याचा अधिकारही तिला नाही. आमच्या शास्त्रात गाईला आत्मा आहे, असे सांगून ख्रिस्ती लोकांना लाजवू पाहणारे हिंदू लोक स्त्रीला आत्मा आहे, असे जरी मानीत असले तरी कृतीने तसे दाखवीत नाहीत, हे खरे.’

प्रश्न १ : बाजारीकरणाच्या आक्रमणामुळे स्त्रीचे एका वस्तूत रुपांतर झाले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून लैंगिक अत्याचार वाढले आहेत की स्त्रीला वस्तू समजणे हीच आपली पूर्वापार परंपरा आहे?
प्रश्न २ : स्त्रीचा शृंगार किंवा तिचे नटणे-मुरडणे स्वत:च्या नवऱ्यासाठी असेल तर क्षम्य आणि तिच्या स्वत:च्या आनंदासाठी असेल तर मात्र अक्षम्य गुन्हा समजायचा का?

उतारा चौथा

१९८५ साली स्त्री-मुक्ती संघटनेच्या ‘मुलगी झाली हो’ नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात आणि बाहेर सुरु होते. नाटकाच्या शेवटी असे आवाहन केले जाई की स्त्रियांनी येऊन आमच्याशी बोलावे, संवाद साधावा. त्याला प्रतिसाद म्हणून एका मुलीचे पत्र आले होते…..`माझे वय १५ वर्षे आहे. आम्ही मुंबईत बँकेच्या कर्मचारी निवासात राहतो. घरी मी, आई, भाऊ आणि वडील असे चौघे जण आहोत. माझा मोठा भाऊ माझ्याकडे नेहमी शरीर-सुखाची मागणी करत असतो. परंतु वडील आणि भावाची घरात इतकी दहशत आहे की मी कोणाला हे सांगू शकत नाही. हल्ली तर तो आईलासुद्धा अशा प्रकारचा त्रास देतो. तो माझ्यावर कधीही बलात्कार करेल अशी मला सारखी भीती वाटते…..तुम्ही या बाबतीत मला काही मदत करू शकाल काय?’

प्रश्न १ : अशा प्रकारच्या ‘चार भिंतीच्या आतल्या’ लैंगिक अत्याचाराला रोखणारी एखादी भक्कम यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे का?
प्रश्न २ : ज्याप्रकारे भावाने बहिणीवर शारीरिक बळजबरी करणे हा लैंगिक अत्याचार आहे, तसेच व्यसनाधीन/ रोगी नवऱ्याने किंवा अगदी निर्व्यसनी, निरोगी नवऱ्याने बायकोची इच्छा नसताना तिच्यावर शारीरिक बळजबरी केली तर त्याला लैंगिक अत्याचार म्हणायचे का?

उतारा पाचवा

राजस्थानमधील भतेरा गावात ‘भंवरी देवी’ ही साथीन म्हणजे ग्रामसेविका नोकरी करत होती. गावातील स्त्रियांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे, बालविवाह रोखणे ही तिची कागदोपत्री कामे होती. भंवरी देवी समाजसुधारक वगैरे नव्हती, तर एक साधी सरळ सरकारी नोकर होती. कामाचा भाग म्हणून सप्टेंबर १९९२ मध्ये तिने गावातील एका नऊ महिन्याच्या बालिकेच्या लग्नाला विरोध केला. ज्या दिवशी लग्न होते, त्या दिवशी लग्नघरातल्या लोकांनी तिचे ऐकल्यासारखे दाखवले, परंतु प्रत्यक्षात त्याच रात्री सुमारे एक वाजता आपल्या लहानग्या मुलीचा विवाह उरकून टाकला. काही काळाने भंवरी देवी आणि तिच्यासारख्या अतिशहाण्या स्त्रियांना अद्दल घडावी या हेतूने भंवरी देवीवर पाच जणांनी दिवसा-ढवळ्या सामूहिक बलात्कार केला (२२ सप्टेंबर १९९२ रोजी). घटनेच्या वेळेस तिचा नवरा तिच्याबरोबर होता, पण गावातील लोकांनी त्याला मारून-मारून बेशुद्ध करून टाकले. आपल्या जमातीतल्या (गुर्जर समाज) सर्व लोकांसमक्ष गुन्हेगारांनी हे निर्लज्ज कृत्य केले.

प्रश्न १ : भंवरी देवी ‘कुंभार’ समाजातील होती आणि तिने आपल्यापेक्षा वरच्या जातीतल्या बालविवाहाला विरोध केला होता, त्याची शिक्षा तिला मिळाली असे या घटनेचे वर्णन करता येईल का?
प्रश्न २ : इतर सर्व बाबतीत काटेकोर शिवाशिव पाळणाऱ्या उच्चवर्णीय समाजातील पुरुषांना लैंगिक अत्याचार सुलभतेने करता यावेत म्हणून काही विशेष सवलती दिल्या जातात का?

उतारा सहावा

२००४ साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावातील भय्यालाल भोतमांगे याच्या कुटुंबाने आपल्या मालकीच्या जमिनीवर पक्के घर बांधायला सुरुवात केली. सर्व व्यवहार कागदोपत्री आणि कायद्याच्या दृष्टीने स्वच्छ होता. परंतु एका दलित कुटुंबाने पक्क्या घरात राहण्याची आगाऊगिरी ग्रामस्थांना सहन झाली नाही. २९ सप्टेंबर २००४ रोजी गावातील सवर्णांनी भोतमांगे याच्या कुटुंबावर हल्ला चढवला. भय्यालाल याचे दोन्ही मुलगे, मुलगी व बायको अशा चौघांची गावातील लोकांनी खुलेआम हत्या केली. हत्या करण्याआधी अर्थात भय्यालालची बायको आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करायला गावातील सवर्ण विसरले नाहीत. भय्यालाल तिथून पळून गेल्यामुळे वाचला, पोलिसांकडे गेला आणि हे प्रकरण उजेडात आले.

प्रश्न १ : आजपर्यंतचा बलात्काराचा इतिहास बघता भारतातील सर्वात जास्त बलात्कार दलित समाजातील स्त्रियांवर झाले आहेत, याची सामाजिक कारणे कोणती?
प्रश्न २ : ज्या बाईला जिवानिशी मारायचेच आहे, तिचा मरता-मरता पूर्ण उपयोग तरी करून घ्यावा, अशी काही मानसिकता आपल्याला बलात्कार आणि त्यानंतरच्या स्त्रियांच्या हत्यांच्या संदर्भात दिसते का?

उतारा आठवा

मुंबईतल्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या एका सरकारी बँकेत एक तरुणी नेहमी बँकेच्या कामासाठी येत असे. तिचे कपडे अर्थातच तिच्या आजूबाजूच्या परिसराला आणि तिच्या आर्थिक परिस्थितीला अनुरूप असत. सरकारी बँकेत येताना आपण अंगभर कपडे घालून येण्याची गरज आहे, असे तिला कधीही वाटत नसे. परंतु यामुळे बँकेतील सर्व पुरुष कर्मचाऱ्यांची मात्र पंचाईत होत असे. ती बँकेत असतानाच्या दहा मिनिटाच्या काळात शिपायापासून ते अगदी ब्रांच अधिकाऱ्यापर्यंत यच्चयावत पुरुषवर्ग तिच्या बाजूने सहजच गेल्याचा आव आणून एक-एक चक्कर आवर्जून मारत असे. मात्र तिला हात लावण्याची हिम्मत कोणाचीही होत नसे. (घटनेचा काल २००८-०९)

प्रश्न १ : बँकेच्या बाहेर थांबलेला त्या तरुणीच्या गाडीचा ड्रायव्हर आणि गाडीत न चुकता असणारा त्यांचा कुत्रा याची बँकेतील पुरुष कर्मचाऱ्यांना भीती वाटत असेल का?
प्रश्न २ : कोणत्या स्त्रीला आपण सहज हात लावू शकतो आणि कोणत्या स्त्रीला नाही, याचे पक्के आडाखे पुरुषवर्गाकडे असतात का?

उतारा नववा

देशभरात अनेक ठिकाणी आपल्याला तृतीयपंथीयांच्या वस्त्या दिसतात. जन्मत:च पुरुष असूनही स्त्रीसारख्या भावना असणे आणि स्त्रीसारखे वागणे हे या तृतीयपंथीयांचे एक लक्षण. पण जन्मत:च पुरुष असून, पुरुषासारखे वागायची इच्छा असून केवळ न कळत्या वयात दुसऱ्या कोणी पुरुषाने केलेल्या लैंगिक अत्याचाराची शिकार झाल्यामुळे किंवा या तृतीयपंथीयांच्या जाळ्यात पद्धतशीर ओढले गेल्यामुळे अनेकजण नाईलाजाने हे जीवन जगत असतात. त्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न अनेक पुस्तकांनी, चित्रपटांनी केला आहे, पण तो कलेच्या पातळीवर. समाजसुधारणेच्या पातळीवर असा व्यापक प्रयत्न झालेला दिसत नाही.

प्रश्न १ : पुरुषानेच पुरुषावर केलेल्या लैंगिक अत्याचाराला आपण वेगळे निकष लावणार का?
प्रश्न २ : जर वेगळे निकष लावायचे नसतील तर बलात्काराची उपलब्ध आकडेवारी उलटीपालटी होऊन जाईल आणि परिणामी बलात्काराच्या शिक्षेबद्दल फेरविचार होईल का?

वरील सर्व उताऱ्यांचे वाचन केल्यावर आणि त्या-खालील प्रश्नांची माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरे शोधल्यावर पुढील सारांशलेखनाचा प्रयत्न केला आहे….

स्त्रियांकडे माणूस म्हणून बघण्यापेक्षा एक मालकीची वस्तू किंवा उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची परंपरा जगभर अगदी पूर्वापार आहे. आताच्या माध्यम-क्रांतीच्या आणि बाजारीकरणाच्या जमान्यात या परंपरेला फक्त खतपाणी मिळालेले आहे. परंतु खतपाणी घालण्यासाठी जे बीज किंवा रोप लागते, ते आपल्याकडे होतेच. हे रोपटे कोणत्या संस्कृतीने कोणत्या संस्कृतीला दिले याची चर्चा आजच्या घडीला करणे निरर्थक आहे. (बाजारीकरणाने केवळ स्त्रियांचेच नाही तर समाजातील सर्व घटकांचे, अगदी नातेसंबंधांचेसुद्धा ‘वस्तूकरण’केले आहे आणि त्याविरुद्ध एकत्रित आवाज उठवणे गरजेचे आहे, यात दुमत नाही, पण लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत हा एकमेव मुद्दा होऊ शकत नाही.)

बलात्कार किंवा स्त्रियांवर/स्त्रियांच्या शरीरावर होणारे लैंगिक अत्याचार हे स्त्रिया पुढारल्यामुळे किंवा जास्त वेळ घराबाहेर राहत असल्यामुळे वाढलेले नाहीत, तर स्त्रिया घराबाहेर पडल्यामुळे एकूणच पुरुषवर्गाच्या उच्च स्थानाला आणि पर्यायाने सत्तेला आता त्यांचा उघड-उघड धोका वाटू लागला आहे आणि तो धोका कमी करण्याचा हा एक मार्ग आहे, असे पुरुषवर्गाला वाटते. आपल्याकडे गेली अनेक वर्षे टेलिफोन कंपनीतील स्त्रिया किंवा इस्पितळात काम करणाऱ्या नर्सेस रात्रपाळी करताना, उशिरा घरी जाताना आपण पाहिले आहे, मग आताच स्त्रियांनी अंधार पडल्यावर घराबाहेर पडू नये, असे फतवे काढायची गरज काय? ‘स्त्रियांनी आपल्याजवळ मिरचीची पूड बाळगावी’, असा प्रतिबंधक उपाय सुचवण्यामागे हीच मानसिकता आहे की स्त्रियांची परंपरागत कामेच स्त्रियांना शोभून दिसतात आणि त्या मार्गानेच स्त्रियांनी आपला विकास, आपले संरक्षण करायचे आहे. थोडक्यात स्त्रियांनी शांतपणे पुरुषांच्या तथाकथित राखीव क्षेत्रातून काढता पाय घ्यावा, हे बरे!

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि जातीपातीची समीकरणे तसेच सत्ता आणि सत्तेचा माज याचा थेट संबंध आहे. शारीरिकदृष्ट्या स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी सक्षम असल्या तरी उच्च वर्णातील स्त्रिया किंवा पैशाच्या आणि सत्तेच्या वरच्या पायरीवर असलेल्या स्त्रिया यांवर होणारे लैंगिक अत्याचार तुलनेने कमी आहेत. शिवाय वाढलेल्या अत्याचारांची आकडेवारी ही नक्की अत्याचार वाढल्याचे निदर्शक आहे की स्त्रिया निर्भयपणे हे अत्याचार सांगू लागले आहेत, याचे निदर्शक आहे, हे ही पाहायला हवे.

– योगिनी राऊळ

More in लिंगभाव

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top