‘अखंड’ जगू पाहणारेः प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले

म. फुले यांच्या ‘अखंडां’मधून ‘कौटुंबिक लोकशाही’चा पाया रचला गेला. आपल्या संसारात ही लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि किशोर मनापासून करत आहेत. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ती, लेखिका आणि चांगली अभ्यासक आणि मासिक ‘सत्यशोधक जागर’ची संपादक असणारी प्रतिमा प्राध्यापकी करत पुण्यात घराची आणि चळवळीच्या कार्यालयाची आघाडी सांभाळत आहे. तर ऊसतोडणी कामगारांच्या हक्कासाठी, आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी, पाणी-नैसर्गिक संसाधनं वाचवण्यासाठी किशोर अक्षरशः जीवाचं रान करत नंदुरबार-धुळे या भागात पाय घट्ट रोवून काम करत आहे. दोघंही पर्यायी संस्कृतीचा आग्रह धरतात. बलिप्रतिपदेला बळीराजाची मिरवणूक काढतात, भारतीय स्त्रीमुक्तीदिन, २८ नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हा शिक्षक दिन तसंच सावित्रीबाईंचा जन्मदिवस स्त्रीशौर्यदिवस म्हणून साजरा करत असतात. मराठा, वडार, मातंग, रामोशी अशा विविध जातीतील तसंच आदिवासी मुला-मुलींची सत्यशोधक पद्धतीनं अनेक लग्नं त्यांनी लावून दिली आहेत. या दोघांच्याही जगण्याची ओळख करून देणार्‍या या गप्पा खास आपल्यासाठी…

मुलाखत व शब्दांकनः डॉ. गीताली वि. मं.

गीताली: प्रतिमा आणि किशोर तुम्ही दोघंही अगदी विद्यार्थीदशेपासून चळवळीशी जोडलेले आहात. गेली २०-२५ वर्षं तुम्ही सातत्यानं एकमेकांच्या साथीनं आणि स्वतंत्रपणेही आंदोलनं, मोर्चे, लोकसंघटन, प्रबोधन-संघर्ष अशी हरतर्‍हेची कामं करताहात. सार्‍याजणीच्या वाचकांपुढे आपल्या गप्पांमधून तुमचा कामाचा आणि सहजीवनाचा पट उलगडून दाखवावा असं मला वाटतं. किशोर, तुझ्या बालपणीविषयी थोडं विस्तारानं सांगतोस?

किशोर:  माझा जन्म पुण्याजवळच्या मुंंढव्यातला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्या वडिलांचे वडील लवकर वारले. त्यामुळे शिकण्याची जिद्द आणि क्षमता असणार्‍या माझ्या वडिलांना इंजिनिअर होण्याऐवजी आयटीआय होण्यावर समाधान मानावं लागलं. ते स्वतः कामगार असताना पुण्याच्या समाजवादी चळवळीचे कामगार नेते प्रभाकर मानकर यांच्याबरोबर काम करायचे. माझ्या लहानपणी तशी आर्थिक परिस्थिती वाईटच. माझ्या आजारपणासाठी पैसे खर्चायला नव्हते. अगदी गणपती मंडळांकडून मदत घेतली होती. बजाजच्या नोकरीत असताना स्वतःचं युनिट सुरू करून उद्योजक बनायचं त्यांनी ठरवलं होतं. आपल्या जातीव्यवस्थेमुळे जे काही प्रश्न निर्माण होतात ते त्यांच्यासमोर होतेच. शेतकरी जातींना उद्योजक बनण्याची ङ्गारशी संधी नसते. पण त्या काळात एमआयडीसीत लघुउद्योजकांना काही संधी होती. त्याचा थोडाङ्गार उपयोग वडिलांना झाला. ते कपॅसिटर्स बनवायचे. कामगार असतानाच्या काळात त्यांच्यावर जॉर्ज ङ्गर्नांडिसांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या अनेक हकीकती वडील मला सांगायचे. त्यावेळी मी चौथीत होतो. आणीबाणीच्या काळात जनता पक्षाच्या विजयानंतर आम्ही मिरवणूक काढली होती. मी माझी पहिली राजकीय कृती. त्याला माझ्या घरून पाठिंबा होता. माझे वडील समाजवादी धारणांचे होते. त्याचा एक व्यवस्थित परिणाम माझ्यावर झाला. आमच्या घराजवळच्या संघाच्या शाखेत जायला त्यांनी मला विरोध केला नाही. फक्त ते नेहमी म्हणायचे ‘‘जा त्यांना विचारा, इथे मुसलमानांना, मुलींना प्रवेश का नाही?’’ अशारितीने मला चिकित्सक बनण्यास प्रोत्साहन दिले. वडिलांच्या लग्नाच्यावेळेस माझ्या आईची दहावीची परीक्षा द्यायची राहिली होती. तेव्हा घरातल्या विरोधाला न जुमानता आईला त्यांनी परीक्षेला बसू दिलं. पुढंही एक वर्ष शिकवलं, प्रोत्साहन दिलं. वडिलांचा ङ्गिरस्तीचा संसार असूनही आई पास झाली. आपल्याला जास्त शिकता आलं नाही तरी आपल्या मुलांना शिकवायचंच अशी धारणा बहुजन समाजात असते. ती माझ्या आईवडिलांमध्येही भरपूर होती. माझे दोघेही भाऊ वडिलांच्या व्यवसायात आहेत. ते सामाजिक चळवळीत नसले तरी भरपूर वाचतात. निरनिराळ्या संकल्पना समजून घेत असतात.

गीतालीः तुझं शिक्षण किती आणि कसं झालं? कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी चळवळ सुरू केलीस का?

किशोर – लहानपणापासून मी निबंध, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. आई माझी तयारी करून घ्यायची. ऑगस्ट महिन्यात टिळकांवरची भाषणे- शेंगाची टरङ्गलेवाली तीच तीच भाषणं पाठ करण्यापेक्षा आई म्हणाली केसरी वाड्यात जाऊन सर्व माहिती करून घे. मी गेलोही. पण त्याचबरोबर तिनं मला दुसरी बाजूही सांगितली. म. ङ्गुले कसे बरोबर होते हेही सांगितलं. आम्ही चिंचवडमध्ये शिकत असताना मी विचार केला, वाचन वगैरे ठीक आहे पण प्रत्यक्ष काही करायचं असेल तर संघटनात्मक कृती करायला हवी. १९८४ साली मी ‘युवा संघर्ष दल’ नावाची संघटना सुरू केली. त्यात चिंचवडमध्ये विविध जाती-जमातींचे दीड-दोनशे युवक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या-युवकांच्या प्रश्नावर आम्ही तेव्हा काम करायचो. तेव्हा मी दलित पँथरचा विशेष चाहता होतो. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्यामुळे आम्ही ढसाळवादीच होतो. मार्क्स-आंबेडकर समन्वयवाद त्यांच्या कवितांमध्ये होता. पण पुढे नाशिकच्या ढसाळांच्या अधिवेशनाच्यावेळी त्यांचं प्रस्थापितांशी संगनमत झाल्याचं लक्षात आलं. शेतकरी संघटनेचं आकर्षणही मला होतं. शेतकरी पार्श्वभूमी असणारी एक-दोनच मुलं असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. संघटित कामगार चळवळ ही ङ्गार काही करू शकणार नाही, अशी एक धारणा निर्माण झाली होती. त्याचवेळेस १९८५ साली अजित/वसुधा सरदार मोलकरणींचं एक सर्वेक्षण लोणावळ्यात करत होते. त्यांच्या प्रश्नावल्या घेऊन आम्ही चिंचवडमध्ये वस्त्यावस्त्यांमध्ये दीड-पावणे दोनशे महिलांचं सर्वेक्षण केलं. याकाळात मध्यमवर्गीय मुलं आमच्यापासून लांब गेली. ८८ पर्यंत त्यांच्याबरोबर काम करत होतो.

गीताली: युवा संघर्ष दलात काम करता करता तुझा राजकीय विचारसरणीचा प्रवास कसा झाला?

किशोर:  मोलकरणींचं संघटन करत असताना अजित/वसुधा, शांताराम पंदेटे, अमिता देशमुख, दत्ता देसाई, जयदेव गायकवाड इ. बरोबर चर्चा होत असत. सर्वांनी मिळून एकत्र काम करावं असं मला तेव्हा वाटायचं. वैचारिक बारकावे लक्षात यायचं वय नव्हतं.
आंबेडकर आणि मार्क्स एकत्र आले पाहिजेत, भारतात नव्या पद्धतीची क्रांती झाली पाहिजे असं मानणारी एक नुसती विचारधाराच नाही तर त्यावर आधारीत एक पक्षसुद्धा आहे हे सत्यशोधक मार्क्सवादीचे अंक वाचून मला कळलं. त्याचं आकर्षण वाटून मी शरद पाटील यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. याच काळात मी चळवळी करायच्या म्हणून सायन्स सोडून आर्टस्ला ऍडमिशन घेतली. या काळात मी घरच्यांच्या मनाची तयारी करत आणली आणि १९८८ मध्ये मी पूर्णवेळ सामाजिक काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. शरद पाटील, प्रा. गं. बा. सरदार यांच्या पुस्तकांचा माझ्यावर ङ्गार प्रभाव होता. सरदार विचारसरणीच्या दृष्टीनं मार्क्सवादी पण गांधीवादाचा ङ्गार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. त्या दोघांची व्याख्यानं मी पुण्यात आयोजित केली. सरदार म्हणायचे की जातीव्यवस्थेच्या प्रश्नांचा संदर्भ बरोबर आहे. पण संसदीय लोकशाहीबद्दल पण आपण साकल्यानं विचार केला पाहिजे. शरद पाटीलांसारख्या बहुश्रूत-अभ्यासू आणि समकालीन प्रश्नांविषयी जाण असणार्‍या माणसासोबत आम्ही काम सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं.

गीताली :  प्रतिमा, आता तुझ्या बालपणाविषयी सांगतेस?

प्रतिमा: खरं तर मला असं ङ्गार व्यक्तिगत बोलायला आवडत नाही. मुलाखत वगैरे कशाला असंच मला वाटतं. म्हटलं तर ज्या परिस्थितीत वाढलो ती परिस्थिती तेव्हा स्वाभाविक, विचार करून सजगपणे काही केलेलं नसतं अशा काळाविषयी का आठवायचं असं मला वाटतं. पण आपल्या विकासाची मूळं सामाजिक परिस्थितीत असतात म्हणून थोडं आठवावं असं आता वाटतं.

गीताली: शिवाय स्त्रीचळवळीत तर आपण हे म्हणत आलो ना की जे जे व्यक्तिगत ते ते राजकीयच! म्हणून तर सामाजिक कार्यकर्त्यांचं व्यक्तिगत आयुष्य, अनुभव समजून घेणं महत्त्वाचं असं आम्हाला वाटतं. आता बोल.

प्रतिमा: आम्ही कसबापेठेत राहायचो. आजोबा लवकर वारल्यामुळे आजी आणि माझे वडील यांची परिस्थिती खूप बिकट म्हणजे उद्या खायला काय? असा प्रश्न असायचा. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर वडील कामाला लागले. आजीनं एक छोटसं गोळ्या-बिस्किटं, सिगारेटचं दुकान चालवलं. आई-वडिलांचं लग्न लहानपणीच झालं. आम्ही चार भावंडं. दोन भाऊ एक बहीण. वडील दवाखान्यात कंपाऊंडर होते. आजीच्या दुकानावर भागत नव्हतं. म्हणून मग आईनं ‘सीझन’ करायला सुरुवात केली. म्हणजे श्रावणी शुक्रवारी ङ्गुटाणे, दिवाळीत किल्ल्यावरची चित्रं, बोळकी, चिंचा-बोरं अशा गोष्टी आणून विकायच्या. भांडवल नाही त्यामुळे थोडं थोडं आणायचं त्यामुळे माल आणायला खूप चकरा माराव्या लागायच्या. प्रचंड शारीरिक श्रम करावे लागायचे. आई माझी मुळातच बंडखोर- अन्यायाविरुद्ध चीड असणारी. लहानपणीच एका शिक्षकाबरोबर भांडण झालं कारण ते एका मुलीची छेड काढताना आईनं पाहिलं होतं. शिक्षकांशी ती भांडली तर तिलाच मारलं आणि तिच्या वडिलांना सांगितलं की ती दंगा करत होती. त्यानंतर तिची शाळा बंद झाली आणि लगेच लग्न झालं. पुढे कसबापेठेत तिला ब्राह्मणांकडून कमीपणाची वागणूक मिळाली. नळावर पाणी ब्राह्मणांचं सर्व झाल्यावर इतरांनी भरावं हे तिनं धुडकावून लावलं आणि बंड केलं. ती म्हणायची आमचा विटाळ होत असेल तर मी पाणी भरायला आल्यावर तुम्ही बाजूला व्हा. विद्रोहाची भावना आईकडून माझ्या मनात आली असं मला वाटतं. तिसरी-चौथीत असताना ती दुकानात बसायला उत्सुक असायचे. पान टपरीचं वेगळं कल्चर होतं. भाऊ वर्तमानपत्र वाचून चर्चा करायचे. श्रम करण्याची लाज वाटायची नाही. दुकानातल्या शेजारच्या खोलीत बालसाहित्य वाचनालय आम्ही सुरू केलं. वाड्यातल्या काम करणार्‍या काशीबाईंना नवर्‍यानं खूप मारलं तेव्हा मी खूप रडायला लागले आणि ७-८ दिवस त्यांना या वाचनालयात राहायला दिलं. कसब्यातल्या एकूण अस्पृश्यता आणि विषमतेच्या अन्याय सामाजिक वास्तवामुळे व्यवस्थेबद्दलची चीड माझ्या मनात निर्माण झाली. एका टप्प्यावर बाबा जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षात ओढले गेले. जनसंघाच्या एका बैठकीला त्यांनी मला बोलावलं. मी तेव्हा कन्याशाळेत ८-९ वीत शिकत होते. अश्‍लील पोस्टर टराटरा ङ्गाडण्याचा उपक्रम आवडला. सुशीलाताई आठवलेंच्या मनुस्मृती समर्थनाची यात्रा होती त्यात मी जावं असं त्यांना वाटलं. पण मी मनुस्मृतीत बायकांविषयी वाईट लिहिलंय असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या लक्षात आलं की इकडे काही आपलं जमायचं नाही. नंतर मॉडर्न कॉलेजमध्ये नवलगुंदकरांनी शिकवल्यावर हिंसाचारी लोकांचा प्रतिनिधी म्हणजे मार्क्स असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. नंतर सुमंत सर, सत्यशोधक विद्याथी संघटनेचं काम यातून मार्क्स नीट कळत गेला. मग एङ्ग. वायला असताना किशोरशी ओळख सुमंतसरांमुळेच झाली. तो वर्गात खूप प्रश्न विचारायचा. माझी मैत्रीण म्हणायची हा शिकायला येतो की शिकवायला? तेव्हा त्याचा आम्हाला त्याचा खूप राग यायचा. नंतर पुण्यात सुहास कुलकर्णी, राजेश्वरी, उमेश बगाडे, संगीता कांबळे, सुलभा पाटोळे अशी मंडळी एकत्र जमून चर्चा करायचे. किशोरच्या सांगण्यावरून मी तिथेही जायला लागले. १९८९ मध्ये पुण्यात आम्ही ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटने’ची शाखा स्थापन केली. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्या, मंडल आयोगानुसार ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, किशोर आमची शिबिरं घ्यायचा. गेट मीटिंग कशी घ्यायची, आपले मुद्दे काय, मोबिलायझेशन कसं करायचं अशी तयारी करायचो. कॉलेजा-कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना मोबिलाइझ करून आम्ही मुंबईला मंत्रालयावर मोर्चा काढला. तेव्हा पुण्यातून आम्ही ३०० मुली गेलो होतो. तिकीट न काढता जाऊन अशा अन्यायाविरुद्ध लढता येणं हे आम्हाला नवीन होतं. हॉस्टेलवरच्या अनेक मुली सहभागी झाल्या होत्या. माझा कामाचा अनुभव, जबाबदारी वाढली. नाशिक जिल्ह्यातल्या काही महाविद्यालयांमध्येही मी जायला लागले. तिथे किशोर जाधवनं मोठं संघटन केलेलं होतं. नाशिकात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं मोठ्ठं अधिवेशनही झालं. विद्यार्थी संघटनेचा एक विशिष्ट कालखंड असतो तसं आमचंही झालं. मग आम्ही क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी सुरू केली.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कामातून मी राजकीय कार्याला सुरुवात केली. पुण्यात १९८९ मध्ये स.वि.स. सुरू झाली. तिचं नेतृत्व अंजली इंगवले, ज्योती साळुंखे, सुलभा पाटोळे, संगीता कांबळे, छाया वाहिंजे, मी, शुभांगी अशा मुली होतो. मुलींना जिल्हा पातळीवर शासकीय वसतिगृह द्या, शिक्षणातील मुलींची गळती थांबवा इ. मागण्याही आम्ही घेतल्या. पुण्यात निता हेंद्रे या मुलीचा ‘एकतर्फी प्रेमातून’ खून झाला आणि आम्ही ‘स्त्री-पुरुष समता रॅली’ काढून प्रबोधनाची आघाडी घेतली होती. अलका टॉकीज चौक ते म. फुले वाडा अशी ५००-६०० मुलींचा सहभाग असणारी रॅली निघाली होती. त्यात शर्मिला रेगे, डॉ. विद्युत भागवत आणि बाबा आढाव सहभागी झाले होते. यानंतर आम्ही स.वि.स.तर्फे शर्मिलाला या प्रश्नावर लिहिण्याची विनंती केली. ‘पे्रमाचा अधिकार’ आणि हिंसेचा प्रश्न पुस्तिका छापली. कोकण व मराठवाड्यात याच पुस्तिकेवर आधारित समता मेळावे घेतले होते.
किशोर -ः मला आठवतंय की जेव्हा मी पूर्णवेळ कार्यकर्ता होऊन धुळ्याला गेलो तेव्हा माझ्यासह कैलास शेळके, महादेव खुडे, राजा जाधव आणि सिकंदर सय्यद हे वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक होते. पुरोगामी चळवळ ओसरण्याचा तो काळ होता. सगळ्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता. क्रांती झाल्याशिवाय आता भारतीय समाजाचं काही खरं नाही अशी माझी धारणा होती. आणि क्रांती करण्याचा एकमेव मार्ग हा मार्क्सवाद ङ्गुले-आंबेडकरवाद (माङ्गुआ) आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेबरोबरच भांडवली आणि स्त्री-पुरुष विषमतेविरोधातही लढायला पाहिजे हे लक्षात आलं होतं. जात, वर्ग, स्त्री दास्यत्व या तीन शोषण शासनाच्या संस्था हे शरद पाटीलांचं म्हणणं होतं. त्याचं आम्हाला अपील होतं. नाशिक-धुळे-जळगाव-पुणे जिल्ह्यात आमचं काम जोरात चालू होतं. आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरही मोठ्ठं आंदोलन केलं. कांद्याचे भाव कोसळले, दुष्काळ पडला तर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना ङ्गी माङ्ग केली पाहिजे. कारण पहिल्यांदा मुलींचं शिक्षण बंद होतं मग मुलांचं म्हणून कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे. १९९२ मध्ये हे आंदोलन घेतल्यावर शरद जोशीही आश्चर्यचकित झाले. शिक्षण, सामाजिक परिसराविषयी जाणीव, मुलींचा सहभाग हे आमचं वैशिष्ट्य होतं. ज्योती साळुंखे, संगीता कांबळे, सुलभा पाटील, अंजली इंगोले, प्रतिमा या अगदी धडाडीच्या कार्यकर्त्या आमच्यासोबत होत्या. त्यातल्या प्रत्येकीच्या घरातून प्रचंड विरोध होता. अगदी वडिलांची मारहाणही या सहन करत होत्या. महाराष्ट्रातल्या ७-८ जिल्ह्यातल्या किमान तीस हजार विद्यार्थ्यांशी संपर्क असणारं संघटन आम्ही उभं केलं. १९९२ नंंतर सत्यशोधक संघटनेत एक वाईट गोष्ट घडली. शदर पाटील यांच्या एकूण स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी संघटनेवर कारवाई केली. पक्षात आणि संघटनेत ङ्गूट पडली. राज्यकारिणी सदस्य असणार्‍या माझ्यासकट अनेकांना कुठलीही संधी न देता पक्षातून काढून टाकलं. आम्ही याचा प्रतिवाद करण्याचा निर्णय घेतला कारण सार्वजनिक जीवनात लोकशाही आणि समतेचा व्यवहार असावा असा आग्रह आपण धरत असलो तर पक्षातही तसंच असायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. नंतर शरद पाटील एकटे पडले. त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली. मग आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात सहा महिन्याच्या आत परत आलो. त्यानंतर अनेक आंदोलनं आम्ही उभी केली. पक्षाचा जनतळ असणार्‍या भागात कॉंग्रेस आणि इतरांनी कार्यकर्त्यांवर हल्ले करणं, पीक जाळून टाकणं आदी अनेक दडपणुकीचे मार्ग अवलंबले होते. त्याविरुद्ध आम्ही ठामपणे उभे राहून संघर्ष केला. आमच्या आंदोलनामुळे आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी सक्षम अशी आदिवासींची जमिनीच्या प्रश्नांवरची चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देत आम्ही उभी केली आहे.

गीताली: एस एङ्ग आय किंवा अन्य विद्यार्थी संघटनेबरोबर तुमचं नातं कसं होतं?

किशोर: आम्ही एकत्रित असे कधी नव्हतो. जातीय विषमता आणि स्त्रीदास्याचे प्रश्न घेतले तर वर्गीय लढ्यात ङ्गूट पडेल म्हणून आमच्या मागण्यांबाबत अन्य डाव्या संघटनांमध्ये उदासीनता होती पण आम्ही आमचा लढा चालूच ठेवला. आम्ही नंतर नाशिकमध्ये वसतिगृहांचा प्रश्न हाती घेतला. भ्रष्टाचारी वॉर्डनच्या घरावर छापे घातले. यातही विद्यार्थीनींचा मोठा सहभाग होता. ङ्गी वाढीविरुद्धचा सर्वात मोठा मोर्चा आम्ही पुणे विद्यापिठावर काढला. त्यात गावोगावचे हजारो विद्यार्थी सामील झाले होते. आश्रम शाळांबाबतही आम्ही काम केलं. स्थानिक लढ्यापासून ते मोठ्या पातळीवर आम्ही लढे केले.

प्रतिमा: मला आठवतंय. आम्ही गरीब कुटुंबातल्या मुली. बैठकीला जायला पण जवळ पैसे नसायचे. घरचे काम सांगून अडवायचा प्रयत्न करायचे. पण मी बहाद्दर पहाटे उठून स्वयंपाक पाणी करून, अगदी पूजा करायला सांगितली तर ती पण झटपट उरकून बाहेर पडायचे. एका सायकलवर डबलसीट, तिबलसीट जायचो. ऑङ्गिस भांबुर्ड्यातल्या बुद्धविहारात! तिथं पोस्टर तयार करायला पैसे नाहीत मग आम्ही वर्तमानपत्रांवर काव लावून पोस्टर तयार करायचो. रात्री १२-१ पर्यंत खूप कष्ट करायचो. पण त्यात निर्मितीचा आनंद होता. विचारासोबत कार्य याची संगती असल्यामुळे कामाचं समाधान वाटायचं.

गीताली: आणि मग तुम्ही लग्न कधी केलंत? त्याची स्टोरी सांग ना.

प्रतिमा: लग्न आम्ही खूप उशिरा केलं. पण ठरवलं १९९० मध्ये यानेच मला विचारलं.

किशोर: एकतर आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. नंतर ती चळवळीतही असल्यामुळे मी तिची कामाची धडपड, लगन बघत होतो. शरद पाटीलांचा प्रभाव आमच्यावर होताच. ते म्हणायचे कुठल्याही कामासाठी नियोजन महत्त्वाचं. त्यामुळे लग्न करताना नियोजन करा. तसा सहा महिने मी तिच्या प्रेमात होतो. ते विचारचक्र चालू होते. पण ती ङ्गटकळ आहे. शेवटी धीर धरून १९९० मध्ये विचारलंच.

प्रतिमा: हा कामामुळे कॉलेजला यायचा नाही. परीक्षा जवळ आली की अभ्यास घ्यायला मला बोलवायचा. त्यावेळी त्याच्या मनात असं काही असेल याची मला कल्पना नव्हती. घरी बहिणीच्या लग्नाचे ‘दाखवण्याचे’ प्रकार बघत होते. तो सर्व बाजार वाटायचा. त्यामुळे असलं दाखवणं वगैरे करायचं नाही हे मनात होतं. बहिणीच्या लग्नाच्या कर्जाचा बोजा वडिलांवर होता. तेही माझ्या लग्नाच्या भानगड पडले नाहीत. त्यानं विचारल्यावर तपशीलात नंतर बोलू असं मी त्याला सांगितलं. लग्न मात्र आम्ही ९९ मध्ये केलं.

किशोर: त्या काळात सेटल होणं महत्त्वाचं होतं. कारण अन्य कार्यकर्त्यांचं पूर्णवेळ काम करण्याची क्षमता असूनही नियोजना अभावी ना चळवळ ना धड संसार अशी ङ्गरङ्गट आम्ही पाहात होतो. दोघांपैकी एकाने नोकरी करायची हे नक्की असं मी तिला सांगितलं. प्रतिमाचं म्हणणं होतं तू आधीपासूनच चांगलं काम करतो आहेस तर तू काम कर. मी नोकरी करून चळवळ करते. मग त्यादृष्टीनं सगळी आखणी केली.

प्रतिमा: कुठलंही भांडण पाच मिनिटांच्यावर टिकवायचं नाही, असं आम्ही त्याचवेळी ठरवलं होतं. तसंच मुलं होऊ न देण्याचा निर्णयही घेतला होता. ९२ साली मी राज्यशास्त्रात एम.ए. झाल्यावर लगेच इगतपुरी येथे नोकरी केली. मग राजगुरूनगर आणि त्यानंतर ९६ मध्ये पुण्याच्या जेधे कॉलेजमध्ये पूर्णवेळ नोकरी मिळाली आणि स्थिरतेच्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू झाली. दरम्यान माझ्या भावानं एक छोटा फ्लॅट मला साततोटीला घेऊन दिला. ते आमचं आजही ऑङ्गिस आणि चळवळीचं केंद्रच बनलं आहे.

गीताली: तुम्ही लग्न करणार आहात ते घरी कळलं होतं का? घरच्यांची काय प्रतिक्रिया? जातीवरून काही विरोध वगैरे?

प्रतिमा: माझ्या घरी मी आधीच सांगितलं होतं. तेव्हा हिटलरी खाक्या असणार्‍या माझ्या वडिलांना उशिरा सांगितलं. मुलगी आपलं आपणच लग्न कसं काय ठरवते याचा त्यांना राग आला. त्यांचा थोडा विरोध होता. तो कमवत नाही असं कसं वगैरे. पण ते हे सर्व आईशी बोलायचे. जातीचा प्रश्न काही आमच्या घरी आला नाही.

किशोर: घरचे ९६ कुळी. शिवाय वडिलांचं आता ब्राह्मणी मध्यमवर्गात स्थलांतर झालं होतं. त्यांचे स्वतःचे कामगार वर्गाचे हलाखीचे दिवस, शेतकरी पार्श्वभूमी, शिक्षणासाठीचा संघर्ष हे सर्व विसरून त्यांनी लग्नाला विरोध केला. पण मी पत्रिकाच छापून घेऊन गेलो होतो. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. आमचं सत्यशोधक पद्धतीनं लग्न झालं.
दरम्यानच्या काळात नवापूरचा संघर्ष एका टप्प्यावर आल्यानंतर आदिवासींचा पुन्हा एकदा त्यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित झाल्यानंतर आम्ही क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी या नावानं प्रबोधन आघाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रा. रणजित परदेशी, प्रा. उमेश बगाडे, एफ. एच. बेन्नूर, प्रा. यशवंत सुमंत इ. आमच्या बरोबर होते. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या पर्यायी अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा घेणं, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं, पुस्तकं तयार करणं हे काम केलं. म. ङ्गुले, सावित्रीबाई, डॉ. बाबासाहेब, शिक्षण, शेती अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहून घेतली. या काळातला आमचा सर्वात मोठा सांस्कृतिक हस्तक्षेप झाला तो सत्यशोधकांचा, मार्क्सवाद-ङ्गुले वादाचा. तो म्हणजे २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करण्याचा.

प्रतिमा : २५ डिसेंबरबद्दल सांगायचं तर भारतीय महिला दिनाचा कार्यक्रम चंद्रपूरमध्ये डॉ. प्रमिला लीला संपत यांनी आयोजित केला होता. त्याला मी व डॉ. सुलभा पाटोळे, चंद्रकांता सोनकांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून गेलो होतो. या कार्यक्रमात तिनं २५ डिसेंबर हा भारतीय महिला दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली. नंतर आमच्या साप्ताहिक बैठकीत हा विषय माडला. ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे आणि तिचा महाराष्ट्रभर प्रचार करायला पाहिजे असं ठरलं. पुढे ऍड. प्रकाश आंबेडकरांबरोबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन संयोजन समिती या नावानं बैठक बोलावली. अनेक महिला संघटनांच्या प्रतिनिधी या बैठकीला आल्या होत्या. पाच वर्षं परिषदा घ्यायचं ठरलं. पहिली मोठी परिषद नागपूरला झाली. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वेळेस मी महाराष्ट्रात मोबिलायझेशन केलं होतं. तितक्याच मोठ्या प्रमाणात यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी महाराष्ट्रभर भारिप बहुजन महासंघ बाबासाहेब आंबेडकर केलं. पूर्ण विदर्भ पिंजून काढला. अनेक मेळावे घेतले.त्या मेळाव्यांना मी संयोजक समितीची निमंत्रक होते. वेगवेगळ्या स्तरावरून महिला येऊन बोलत होतया. त्या खूप सक्रिय झाल्या होत्या. आदिवासी भागातही २५ डिसेंबर साजरा केला जातो.

गीताली: प्रतिमा, तुला या सगळ्या संघटनांमध्ये स्त्री-पुरुष समतेच्या मुद्द्यावर पुरुष कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा वाटला? काही संघर्ष जाणवला का? तसंच व्यक्तिगत नात्यात लग्नानंतर तुझं किशोरचं नातं बदललं का?

प्रतिमा: पहिल्यांदा व्यक्तिगत नात्याविषयी सांगते. आमच्या एकमेकांकडून पारंपरिक पती-पत्नीच्या अपेक्षा नसल्यानं ङ्गार ङ्गरक पडला नाही. कौटुंबिक लोकशाही हा आमच्या सहजीवनाचा मध्यवर्ती भाग आहे. कधी कधी आमच्यात मतभेद होतात मग चिडचिड होते पण आधी सांगितलं तसं भांडण जास्तवेळ चालू ठेवत नाही. मुख्यतः आमच्या पक्षाचं काम आदिवासी भागात आहे. तिथं स्त्री-पुरुषांनी एकत्र काम करणं, एकमेकांना मदत करणं दिसतं. पण तिथेही मागण्यांच्या स्वरूपात प्रबोधन होत होतंच. याचा अर्थ तेथे स्त्रीशोषण नाही असं मात्र नाही.

किशोर: अनेक ठिकाणी लोक माझ्यापेक्षा प्रतिमालाच जास्त ओळखतात. ‘प्रतिमाताईंचे मिस्टर’ या ओळखीचा मला अभिमान आहे. ती मनस्वी आणि स्पष्टवक्ती आहे. ती जेव्हा लिहीत असते तेव्हा घरात स्वयंपाक केला की नाही अशा कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. तिची ही एकाग्रता स्त्रीच्या बौद्धिक भूकेचं प्रतिक आहे असं मला वाटतं. गेल्या तीन वर्षांपासून तिनं कामं कमी केली आणि ती पूर्णपणे गाथाला वाढवण्यात, शिकवण्यात रमून गेली आहे. आदिवासी स्त्री-पुरुषांमध्ये पूर्ण समता आहे असंं नाही. तिथंही जातीव्यवस्था आणि पुरुषसत्ताकता काम करतेय. जात पंचायतीमध्ये स्त्रिया नाहीत. पुरुष अनेक विवाह करतात. आमच्या पक्षात पुरुषसत्ताकतेला विरोध पहिल्यापासून होता. विद्यार्थी संघटनेत चांगलं वातावरण होतं. नेतृत्त्वही मुलींकडे होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून पुढे आणलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे २८ नोव्हेंबर म.ङ्गुले स्मृतीदिन हा ‘शिक्षक दिन’ करण्याचा. तसंच सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा ‘स्त्रीशौर्यदिन’ म्हणून घेण्याचा. आदिवासी स्वायत्त राज्याची भूमिकाही आम्ही हिरीरीनं मांडली. ती भूमिका अजूनही आहे. आम्ही ‘एकतर्फी प्रेमातून’ झालेल्या हिंसांना विरोध करताना कोकणात अनेक समता मेळावे घेतले. पुस्तकांवर चर्चा, व्याख्यानं आयोजित केली. दरम्यानच्या काळात सावित्री प्रकाशन, दिग्नात प्रकाशन यांच्यातर्ङ्गे अनेकानेक छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या. त्याला जबरदस्त प्रतिसादही मिळाला. आंबेडकर आणि मनुस्मृती; स्त्रिया आणि स्त्रीमुक्ती या प्रतिमा व सरोज कांबळे यांच्या पुस्तकाची दरवर्षी आवृत्ती निघते. त्याचे इंग्रजी, कानडीत अनुवादही झाले. आम्ही छोट्या पुस्तिकांचा ट्रेंड महाराष्ट्रात सुरू केला. आम्ही आमचे आदर्श आणि प्रेरणास्थान असणारे बाबूराव बागूल यांचा सत्कार आयोजित केला. बाबूराव आणि रावसाहेब कसबे प्रतिमाला लेक मानायचे. त्यांना माझ्याबद्दलही कमालीचं प्रेम!

१९९९ पासून आम्ही प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जायचो आणि त्याविरोधात अंक काढायचो आणि तो अंक-सत्यशोधक दिशा- ओरडून संमेलनात विकायचो. नंतर ही नकारात्मक कृती थांबवून ध्रुवीकरणाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रस्थापितांना डावलून विद्रोही साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं. धारावीसारख्या ठिकाणी यावर्षी दादरच्या शिवसेनाप्रणीत साहित्य संमेलनाला तोंड देणारं संमेलन घेणं ही खूप महत्त्वाची घटना होती. पुन्हा यातही मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विद्रोहीचा दबाव मराठी साहित्य संस्कृतीवर होता. आम्ही प्रश्न उपस्थित केला की साहित्य संमेलनात स्त्रियांना कुठं सन्मानानं बोलावलं?

प्रतिमा: किशोरचे दोन मुद्दे ठरलेले असायचे. ते म्हणजे प्रस्थापित साहित्य संमेलनाला आमचा विरोध का आणि अ.भा.म. संमेलनाच्या विचारांची चिरङ्गाड. खूप अभ्यास करून तो ती मांडणी करायचा.

किशोर: विद्रोही साहित्य संमेलन आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ हे अलीकडच्या काळातील एक मोठा महाराष्ट्रातला सांस्कृतिक हस्तक्षेप असं म्हणावं लागेल.

गीताली: पण यात ङ्गूट पडली याचं कारण तू काय सांगशील?

किशोर: ही ङ्गूट वैचारिक नव्हतीच. मीच एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, विद्रोहातली वैचारिक ङ्गूट दाखवा आणि हजार रु. मिळवा. कारण अनेक संघटना एकत्र येऊन ‘विद्रोही’ बनलं होतं. त्यातील अंतर्गत भांडणांमध्ये निरनिराळे प्रश्न निर्माण व्हायचे. या प्रश्नांचे पडसाद हे विद्रोहीत उमटायचे. त्यामुळे विद्रोहीत अस्थिरता निर्माण झाली आणि ङ्गूट पडली. या दरम्यानच्या काळात आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी चळवळीकडे वळलो. विद्यार्थ्यांचे आर्थिक लढे आणि आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय स्त्री मुक्ती दिन, शाक्तराज्याभिषेक दिन इ. सांस्कृतिक पातळीवरचे प्रश्नही समोर आणले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, शेतकरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढे दिले. पुणे विद्यापीठात स्वायत्ततेला विरोध करणारं पहिलं आंदोलन आम्ही केलं. आम्ही सिनेटची बैठक उधळून लावली. त्यावरून आम्हाला हिंसाचारी म्हटलं. परंतु एका ठराविक पातळीपर्यंत आम्ही अत्यंत संयमी मार्गानं, अहिंसक मार्गानं लढाई लढवली होती. २०११ मध्ये दहा हजार लोकांना घेऊन ङ्गेब्रुवारी महिन्यामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९६ तास सत्याग्रह केला. घेतली. पुण्यात आम्ही पाच हजार ऊसतोडणी कामगारांचा साखर भवनावर मोर्चा काढला. इतक्या संख्येने लढे करताना अत्यंत शांततेनं आणि संयमानं आम्ही काम केलं. यात आमचा खूप कस लागला. २००२ मध्ये दादासाहेब गायकवाड भूमी हक्क कृती समिती स्थापण्यात आमच्या संघटनेने पुढाकार घेतला. मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे यांना आम्ही यात येण्याची विनंती केली. अलीकडच्या काळात पवनऊर्जा कंपन्यांच्या आक्रमणातून आदिवासींच्या जमिनी वाचवणं, पुण्यातल्या विमानतळासाठी जमिनी लाटण्याच्या डावाविरुद्ध आंदोलन करणं अशी कामं आम्ही केली. भारतात जमीन वाचवणं, पाणी वाचवणं, नैसर्गिक संसाधन वाचवणं ही मूलभूत लढाई, ती वेगवेगळ्या पातळ्यांवर चालते. ही लढाई आम्हीही लढत आहोत. जातीय अत्याचारासाठी ज्या गायरान जमिनींचा वापर केला गेला त्याच जमिनीवर आता शेतकर्‍यांचा काय अधिकार? असे विचारले जात आहे. म्हणजे उलट्या बाजूनं त्याचा वापर केला जातो आहे. हे भीषण प्रश्न आहेत. ऊसतोडणी कामगारांच्या स्त्रियांचे प्रश्न आहेत. दरवर्षी अपघातात अनेक कामगार जखमी होतात, मरण पावतात. पण प्रत्यक्ष सामाजिक सुरक्षेचं काय? आदिवासींच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत! मोठमोठ्या सेलिब्रिटींचे हितसंबंध जपताना आमच्या जीवनाची हमी सरकार देत नाही असं का? हा आमचा सवाल आहे. जगण्याची प्रेरणाच शेतकर्‍यांमध्ये राहिली नाही. शिवाजीमहाराजांच्या जयघोषासोबतच खरं तर या इतिहासाचा वापर शेतकरी-आदिवासी समूहाला जगण्याची प्रेरणा देण्यासाठी व्हायला पाहिजे. त्या पद्धतीत इतिहासाची ङ्गेरमांडणी व्हायला हवी. केवळ ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत स्वार्थी राजकारणासाठी नको. हे भारतीय प्रबोधनाचं काम ङ्गुले-आंबेडकरांनी केलं. अलीकडच्या काळात कॉ. शरद पाटीलांनी केलं ते पुढं नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि तसा आमचा प्रयत्न असतो. शोषितवर्ग एकतर वैङ्गल्यग्रस्त होतो किंवा हिंसेकडे वळतो. मध्यमवर्गाकडे कालची संवेदना उरलेली नाही. या वर्गाकडून चळवळीला पूर्वीसारखी मदत केली जात नाही. दलितांपासून ते वरपर्यंत हा सर्व मध्यमवर्ग संवेदनाहिन झाला आहे. खर्‍या अर्थानं क्रांतीकारी मार्गाकडे जाण्यासाठी शोषितांना मध्यमवर्गाकडून जी भावनिक आणि आर्थिक ऊर्जा मिळायला पाहिजे ती मिळत नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होत आहेत. त्या दृष्टीनं आमचं काम सुरू आहे. भारतातल्या शोषणाच्या विरोधात काम करण्याची दिशा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे आहे यावर आमचा विश्वास आहे. जागतिकीकरणाच्या काळातसुद्धा महाराष्ट्रातले सर्वात मोठे लढे व सर्वात खोलवरचे हस्तक्षेप हे मार्क्सवाद-ङ्गुले-आंबेडकरवादाच्या छावणीतूनच झालेले आहेत याची दखल सत्ताधार्‍यांना घ्यावी लागली. तसंच प्रस्थापितांना आणि सनातन्यांनाही घ्यावी लागली. आमच्या कामात अनेक कष्टकरी शेतकरी कार्यकर्त्यांचा नेत्यांचा खूप मोठा, मोलाचा सहभाग आहे. रामसिंगभाऊ, करणसिंग भाऊ, साजूबाई, होमाबाई, जेकाभाऊ, आर. टी. गावीत, एम. टी. गावीत, हिलाल महाजन, लालाबाई, यशवंत माळचे, वजीभाऊ, मन्साराम, जगन गावीत, दिपक जगताप असे खूप जण कार्यकर्ते म्हणून सोबत आहेत.

गीताली: आत्ताचा जो राजकीय माहोल दिसतोय. एकूण जनतेपासून सगळे राजकीय पक्ष तुटल्यासारखे झाले आहेत याचं काय होईल असं तुला वाटतं?

किशोर: जातीव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले स्त्रीदास्य हे आता त्याच्या शेवटच्या अवस्थेत आहे. पण प्रस्थापित व्यवस्थेत बनिया भांडवलशाही, ब्राह्मणी बुद्धिजीवी आणि मध्यम जातींमधले उच्चभ्रू या तिघांचे हितसंबंध एकवटलेले आहेत. त्यांना असं वैचारिक आव्हान उभं राहतं आहे असं दिसतंं नी ते आव्हान तोडून टाकण्यासाठी वैचारिक वगैरे काही नसतं असं म्हणून संसदीय तडजोड्या करतात. सत्ता हीच सर्वस्व असते आणि सत्तेसाठी सर्व क्षम्य असतं असं म्हणत त्यासाठी ते मलिकांमध्ये लोकांना गुंतवून टाकतील, क्रिकेटला, बातम्यांना मनोरंजनात आणतील, लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करतील, स्वतःचेच खोटे विरोधकही ते तयार करतील अशा पद्धतीचे भ्रामक विचार उभे करणे हे सत्ताधार्‍यांचंच एक काम असतं. कारण त्यांना व्यवस्था दाबायची असते. त्यात अमेरिकेपासून सगळ्यांचे हितसंबंध आहेत. मात्र लोक पर्यायाच्या शोधात आहेत. यातल्या एकेका गोष्टीला सुटासुटा विरोध करून भागणार नाही असं आम्हाला वाटतं. या व्यवस्थेत किमान सुधारणा करण्याचे प्रयत्न अण्णा हजारे आणि इतर करताहेत त्यांना म्हणूनच आपण प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांचे अचूक आकलन केले पाहिजे. त्यांच्या भूमिकांच्या मर्यादाही पुढे मांडल्या पाहिजेत.

भांडवली पद्धतीत का होईना पण स्त्रीला एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मिळणं, सार्वजनिक जीवनात स्थान मिळणं हे भांडवलशाही देते. पण भांडवलवादी स्त्रीमुक्ती सुद्धा आज अस्तित्वात नाही. उलट स्त्रीच्या शोषणात आज वाढ झालेली दिसून येते. यात ऑनर (?) किलिंग, एकतर्ङ्गी आकर्षणातून हिंसा अशा अनेक गोष्टी आहेत.

गीताली: प्रतिमा आणि किशोर, शेवटी आपल्या मध्यम व उच्च मध्यमवर्गीय वाचकांना काय सांगाल?

किशोर: या वर्गाला शिक्षणाचं बाळकडू मिळालेलं आहे. याला नवं जग माहिती आहे. युरोप-अमेरिकेतले लोक आपल्याशी कशा पद्धतीनं वागतात हे याला माहिती आहे. इतिहासात आजवर या वर्चस्ववादी-साम्राज्यवादी शक्तींनी भारतात कशा पद्धतीनं शोषण केलं त्याबद्दलही या वर्गाला अनुभव आहे. म्हणून मध्यम व उच्च मध्यमवर्गात भांडवलशाहीच्या या चंगळवादी, माणसाला अधिकाधिक यंत्रवत बनवणार्‍या, त्याला समूहजीवनापासून दूर नेणार्‍या, जैसे थे वादी व्यवस्थेचं हत्यार बनवणार्‍या या षडयंत्रापासून सावध राहिलं पाहिजे. आपल्या संस्कृतीतील लोकशाहीवादी, समतावादी, बंधुतावादी आशय पुढे नेणार्‍या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना, वैङ्गल्यग्रस्त होत जाणार्‍या दलित-आदिवासी समूहाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करायला हवं. त्याची ही इतिहासदत्त जबाबदारी आहे.

प्रतिमा: सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचा खरा अर्थ हाच आहे. बुद्धीजीवी वर्गात त्याची बुद्धी, वेळ, पैसा याचा थोडातरी वापर इथल्या जनतेसाठी केला पाहिजे. या वर्गाचं आत्मभान-सामाजिक भान वाढलं पाहिजे. ज्यांना मदत करतो त्यांचे हितसंबंध कुणाशी जोडलेले आहेत याचं सतत भान बाळगलं पाहिजे म्हणजे त्यांच्याकडून धर्मांध-जातीवाल्यांना मदत होणार नाही.

पुरुषसत्ता, भांडवलशाही आणि जातीव्यवस्था हे हातात हात घालून स्त्रीशोषणात सहभागी झालेले दिसतात. सरोगेट मदर सारखी प्रथा हा स्त्री शोषणाचा नवा आविष्कार आहे. असंघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात ढकलल्या जाताहेत. शिवाय समान कामाला समान वेतन नाही. श्रम लिंगाधारित राहिलेले दिसतात. याच्या विरोधात आपल्याला जाती स्त्रीदास्य अंताची क्रांती केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.

डॉ. गीताली वि. मं.
(सहाय्य – स्मिता पाटील)
मिळून सार्‍याजणी
संपर्क – satyashodhakjagar@gmail.com

(सौजन्यः मिळून साऱ्याजणी, ऑगस्ट २०११)

संघटना/कार्यकर्ते

 

अखंड’ जगू पाहणारेः प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले

म. फुले यांच्या ‘अखंडां’मधून ‘कौटुंबिक लोकशाही’चा पाया रचला गेला. आपल्या संसारात ही लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि किशोर मनापासून करत आहेत. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ती, लेखिका आणि चांगली अभ्यासक आणि मासिक ‘सत्यशोधक जागर’ची संपादक असणारी प्रतिमा प्राध्यापकी करत पुण्यात घराची आणि चळवळीच्या कार्यालयाची आघाडी सांभाळत आहे. तर ऊसतोडणी कामगारांच्या हक्कासाठी, आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी, पाणी-नैसर्गिक संसाधनं वाचवण्यासाठी किशोर अक्षरशः जीवाचं रान करत नंदुरबार-धुळे या भागात पाय घट्ट रोवून काम करत आहे. दोघंही पर्यायी संस्कृतीचा आग्रह धरतात. बलिप्रतिपदेला बळीराजाची मिरवणूक काढतात, भारतीय स्त्रीमुक्तीदिन, २८ नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हा शिक्षक दिन तसंच सावित्रीबाईंचा जन्मदिवस स्त्रीशौर्यदिवस म्हणून साजरा करत असतात. मराठा, वडार, मातंग, रामोशी अशा विविध जातीतील तसंच आदिवासी मुला-मुलींची सत्यशोधक पद्धतीनं अनेक लग्नं त्यांनी लावून दिली आहेत. या दोघांच्याही जगण्याची ओळख करून देणार्‍या या गप्पा खास आपल्यासाठी…

मुलाखत व शब्दांकनः डॉ. गीताली वि. मं.

गीताली-ः प्रतिमा आणि किशोर तुम्ही दोघंही अगदी विद्यार्थीदशेपासून चळवळीशी जोडलेले आहात. गेली २०-२५ वर्षं तुम्ही सातत्यानं एकमेकांच्या साथीनं आणि स्वतंत्रपणेही आंदोलनं, मोर्चे, लोकसंघटन, प्रबोधन-संघर्ष अशी हरतर्‍हेची कामं करताहात. सार्‍याजणीच्या वाचकांपुढे आपल्या गप्पांमधून तुमचा कामाचा आणि सहजीवनाचा पट उलगडून दाखवावा असं मला वाटतं. किशोर, तुझ्या बालपणीविषयी थोडं विस्तारानं सांगतोस?
किशोर-ः माझा जन्म पुण्याजवळच्या मुंंढव्यातला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्या वडिलांचे वडील लवकर वारले. त्यामुळे शिकण्याची जिद्द आणि क्षमता असणार्‍या माझ्या वडिलांना इंजिनिअर होण्याऐवजी आयटीआय होण्यावर समाधान मानावं लागलं. ते स्वतः कामगार असताना पुण्याच्या समाजवादी चळवळीचे कामगार नेते प्रभाकर मानकर यांच्याबरोबर काम करायचे. माझ्या लहानपणी तशी आर्थिक परिस्थिती वाईटच. माझ्या आजारपणासाठी पैसे खर्चायला नव्हते. अगदी गणपती मंडळांकडून मदत घेतली होती. बजाजच्या नोकरीत असताना स्वतःचं युनिट सुरू करून उद्योजक बनायचं त्यांनी ठरवलं होतं. आपल्या जातीव्यवस्थेमुळे जे काही प्रश्न निर्माण होतात ते त्यांच्यासमोर होतेच. शेतकरी जातींना उद्योजक बनण्याची ङ्गारशी संधी नसते. पण त्या काळात एमआयडीसीत लघुउद्योजकांना काही संधी होती. त्याचा थोडाङ्गार उपयोग वडिलांना झाला. ते कपॅसिटर्स बनवायचे. कामगार असतानाच्या काळात त्यांच्यावर जॉर्ज ङ्गर्नांडिसांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या अनेक हकीकती वडील मला सांगायचे. त्यावेळी मी चौथीत होतो. आणीबाणीच्या काळात जनता पक्षाच्या विजयानंतर आम्ही मिरवणूक काढली होती. मी माझी पहिली राजकीय कृती. त्याला माझ्या घरून पाठिंबा होता. माझे वडील समाजवादी धारणांचे होते. त्याचा एक व्यवस्थित परिणाम माझ्यावर झाला. आमच्या घराजवळच्या संघाच्या शाखेत जायला त्यांनी मला विरोध केला नाही. फक्त ते नेहमी म्हणायचे ‘‘जा त्यांना विचारा, इथे मुसलमानांना, मुलींना प्रवेश का नाही?’’ अशारितीने मला चिकित्सक बनण्यास प्रोत्साहन दिले. वडिलांच्या लग्नाच्यावेळेस माझ्या आईची दहावीची परीक्षा द्यायची राहिली होती. तेव्हा घरातल्या विरोधाला न जुमानता आईला त्यांनी परीक्षेला बसू दिलं. पुढंही एक वर्ष शिकवलं, प्रोत्साहन दिलं. वडिलांचा ङ्गिरस्तीचा संसार असूनही आई पास झाली. आपल्याला जास्त शिकता आलं नाही तरी आपल्या मुलांना शिकवायचंच अशी धारणा बहुजन समाजात असते. ती माझ्या आईवडिलांमध्येही भरपूर होती. माझे दोघेही भाऊ वडिलांच्या व्यवसायात आहेत. ते सामाजिक चळवळीत नसले तरी भरपूर वाचतात. निरनिराळ्या संकल्पना समजून घेत असतात.
गीतालीः तुझं शिक्षण किती आणि कसं झालं? कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी चळवळ सुरू केलीस का?
किशोर – लहानपणापासून मी निबंध, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. आई माझी तयारी करून घ्यायची. ऑगस्ट महिन्यात टिळकांवरची भाषणे- शेंगाची टरङ्गलेवाली तीच तीच भाषणं पाठ करण्यापेक्षा आई म्हणाली केसरी वाड्यात जाऊन सर्व माहिती करून घे. मी गेलोही. पण त्याचबरोबर तिनं मला दुसरी बाजूही सांगितली. म. ङ्गुले कसे बरोबर होते हेही सांगितलं. आम्ही चिंचवडमध्ये शिकत असताना मी विचार केला, वाचन वगैरे ठीक आहे पण प्रत्यक्ष काही करायचं असेल तर संघटनात्मक कृती करायला हवी. १९८४ साली मी ‘युवा संघर्ष दल’ नावाची संघटना सुरू केली. त्यात चिंचवडमध्ये विविध जाती-जमातींचे दीड-दोनशे युवक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या-युवकांच्या प्रश्नावर आम्ही तेव्हा काम करायचो. तेव्हा मी दलित पँथरचा विशेष चाहता होतो. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्यामुळे आम्ही ढसाळवादीच होतो. मार्क्स-आंबेडकर समन्वयवाद त्यांच्या कवितांमध्ये होता. पण पुढे नाशिकच्या ढसाळांच्या अधिवेशनाच्यावेळी त्यांचं प्रस्थापितांशी संगनमत झाल्याचं लक्षात आलं. शेतकरी संघटनेचं आकर्षणही मला होतं. शेतकरी पार्श्वभूमी असणारी एक-दोनच मुलं असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. संघटित कामगार चळवळ ही ङ्गार काही करू शकणार नाही, अशी एक धारणा निर्माण झाली होती. त्याचवेळेस १९८५ साली अजित/वसुधा सरदार मोलकरणींचं एक सर्वेक्षण लोणावळ्यात करत होते. त्यांच्या प्रश्नावल्या घेऊन आम्ही चिंचवडमध्ये वस्त्यावस्त्यांमध्ये दीड-पावणे दोनशे महिलांचं सर्वेक्षण केलं. याकाळात मध्यमवर्गीय मुलं आमच्यापासून लांब गेली. ८८ पर्यंत त्यांच्याबरोबर काम करत होतो.
गीताली-ः युवा संघर्ष दलात काम करता करता तुझा राजकीय विचारसरणीचा प्रवास कसा झाला?
किशोर -ः मोलकरणींचं संघटन करत असताना अजित/वसुधा, शांताराम पंदेटे, अमिता देशमुख, दत्ता देसाई, जयदेव गायकवाड इ. बरोबर चर्चा होत असत. सर्वांनी मिळून एकत्र काम करावं असं मला तेव्हा वाटायचं. वैचारिक बारकावे लक्षात यायचं वय नव्हतं.
आंबेडकर आणि मार्क्स एकत्र आले पाहिजेत, भारतात नव्या पद्धतीची क्रांती झाली पाहिजे असं मानणारी एक नुसती विचारधाराच नाही तर त्यावर आधारीत एक पक्षसुद्धा आहे हे सत्यशोधक मार्क्सवादीचे अंक वाचून मला कळलं. त्याचं आकर्षण वाटून मी शरद पाटील यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. याच काळात मी चळवळी करायच्या म्हणून सायन्स सोडून आर्टस्ला ऍडमिशन घेतली. या काळात मी घरच्यांच्या मनाची तयारी करत आणली आणि १९८८ मध्ये मी पूर्णवेळ सामाजिक काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. शरद पाटील, प्रा. गं. बा. सरदार यांच्या पुस्तकांचा माझ्यावर ङ्गार प्रभाव होता. सरदार विचारसरणीच्या दृष्टीनं मार्क्सवादी पण गांधीवादाचा ङ्गार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. त्या दोघांची व्याख्यानं मी पुण्यात आयोजित केली. सरदार म्हणायचे की जातीव्यवस्थेच्या प्रश्नांचा संदर्भ बरोबर आहे. पण संसदीय लोकशाहीबद्दल पण आपण साकल्यानं विचार केला पाहिजे. शरद पाटीलांसारख्या बहुश्रूत-अभ्यासू आणि समकालीन प्रश्नांविषयी जाण असणार्‍या माणसासोबत आम्ही काम सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं.
गीताली -ः प्रतिमा, आता तुझ्या बालपणाविषयी सांगतेस?
प्रतिमा-ः खरं तर मला असं ङ्गार व्यक्तिगत बोलायला आवडत नाही. मुलाखत वगैरे कशाला असंच मला वाटतं. म्हटलं तर ज्या परिस्थितीत वाढलो ती परिस्थिती तेव्हा स्वाभाविक, विचार करून सजगपणे काही केलेलं नसतं अशा काळाविषयी का आठवायचं असं मला वाटतं. पण आपल्या विकासाची मूळं सामाजिक परिस्थितीत असतात म्हणून थोडं आठवावं असं आता वाटतं.
गीताली-ः शिवाय स्त्रीचळवळीत तर आपण हे म्हणत आलो ना की जे जे व्यक्तिगत ते ते राजकीयच! म्हणून तर सामाजिक कार्यकर्त्यांचं व्यक्तिगत आयुष्य, अनुभव समजून घेणं महत्त्वाचं असं आम्हाला वाटतं. आता बोल.
प्रतिमा-ः आम्ही कसबापेठेत राहायचो. आजोबा लवकर वारल्यामुळे आजी आणि माझे वडील यांची परिस्थिती खूप बिकट म्हणजे उद्या खायला काय? असा प्रश्न असायचा. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर वडील कामाला लागले. आजीनं एक छोटसं गोळ्या-बिस्किटं, सिगारेटचं दुकान चालवलं. आई-वडिलांचं लग्न लहानपणीच झालं. आम्ही चार भावंडं. दोन भाऊ एक बहीण. वडील दवाखान्यात कंपाऊंडर होते. आजीच्या दुकानावर भागत नव्हतं. म्हणून मग आईनं ‘सीझन’ करायला सुरुवात केली. म्हणजे श्रावणी शुक्रवारी ङ्गुटाणे, दिवाळीत किल्ल्यावरची चित्रं, बोळकी, चिंचा-बोरं अशा गोष्टी आणून विकायच्या. भांडवल नाही त्यामुळे थोडं थोडं आणायचं त्यामुळे माल आणायला खूप चकरा माराव्या लागायच्या. प्रचंड शारीरिक श्रम करावे लागायचे. आई माझी मुळातच बंडखोर- अन्यायाविरुद्ध चीड असणारी. लहानपणीच एका शिक्षकाबरोबर भांडण झालं कारण ते एका मुलीची छेड काढताना आईनं पाहिलं होतं. शिक्षकांशी ती भांडली तर तिलाच मारलं आणि तिच्या वडिलांना सांगितलं की ती दंगा करत होती. त्यानंतर तिची शाळा बंद झाली आणि लगेच लग्न झालं. पुढे कसबापेठेत तिला ब्राह्मणांकडून कमीपणाची वागणूक मिळाली. नळावर पाणी ब्राह्मणांचं सर्व झाल्यावर इतरांनी भरावं हे तिनं धुडकावून लावलं आणि बंड केलं. ती म्हणायची आमचा विटाळ होत असेल तर मी पाणी भरायला आल्यावर तुम्ही बाजूला व्हा. विद्रोहाची भावना आईकडून माझ्या मनात आली असं मला वाटतं. तिसरी-चौथीत असताना ती दुकानात बसायला उत्सुक असायचे. पान टपरीचं वेगळं कल्चर होतं. भाऊ वर्तमानपत्र वाचून चर्चा करायचे. श्रम करण्याची लाज वाटायची नाही. दुकानातल्या शेजारच्या खोलीत बालसाहित्य वाचनालय आम्ही सुरू केलं. वाड्यातल्या काम करणार्‍या काशीबाईंना नवर्‍यानं खूप मारलं तेव्हा मी खूप रडायला लागले आणि ७-८ दिवस त्यांना या वाचनालयात राहायला दिलं. कसब्यातल्या एकूण अस्पृश्यता आणि विषमतेच्या अन्याय सामाजिक वास्तवामुळे व्यवस्थेबद्दलची चीड माझ्या मनात निर्माण झाली. एका टप्प्यावर बाबा जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षात ओढले गेले. जनसंघाच्या एका बैठकीला त्यांनी मला बोलावलं. मी तेव्हा कन्याशाळेत ८-९ वीत शिकत होते. अश्‍लील पोस्टर टराटरा ङ्गाडण्याचा उपक्रम आवडला. सुशीलाताई आठवलेंच्या मनुस्मृती समर्थनाची यात्रा होती त्यात मी जावं असं त्यांना वाटलं. पण मी मनुस्मृतीत बायकांविषयी वाईट लिहिलंय असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या लक्षात आलं की इकडे काही आपलं जमायचं नाही. नंतर मॉडर्न कॉलेजमध्ये नवलगुंदकरांनी शिकवल्यावर हिंसाचारी लोकांचा प्रतिनिधी म्हणजे मार्क्स असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. नंतर सुमंत सर, सत्यशोधक विद्याथी संघटनेचं काम यातून मार्क्स नीट कळत गेला. मग एङ्ग. वायला असताना किशोरशी ओळख सुमंतसरांमुळेच झाली. तो वर्गात खूप प्रश्न विचारायचा. माझी मैत्रीण म्हणायची हा शिकायला येतो की शिकवायला? तेव्हा त्याचा आम्हाला त्याचा खूप राग यायचा. नंतर पुण्यात सुहास कुलकर्णी, राजेश्वरी, उमेश बगाडे, संगीता कांबळे, सुलभा पाटोळे अशी मंडळी एकत्र जमून चर्चा करायचे. किशोरच्या सांगण्यावरून मी तिथेही जायला लागले. १९८९ मध्ये पुण्यात आम्ही ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटने’ची शाखा स्थापन केली. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्या, मंडल आयोगानुसार ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, किशोर आमची शिबिरं घ्यायचा. गेट मीटिंग कशी घ्यायची, आपले मुद्दे काय, मोबिलायझेशन कसं करायचं अशी तयारी करायचो. कॉलेजा-कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना मोबिलाइझ करून आम्ही मुंबईला मंत्रालयावर मोर्चा काढला. तेव्हा पुण्यातून आम्ही ३०० मुली गेलो होतो. तिकीट न काढता जाऊन अशा अन्यायाविरुद्ध लढता येणं हे आम्हाला नवीन होतं. हॉस्टेलवरच्या अनेक मुली सहभागी झाल्या होत्या. माझा कामाचा अनुभव, जबाबदारी वाढली. नाशिक जिल्ह्यातल्या काही महाविद्यालयांमध्येही मी जायला लागले. तिथे किशोर जाधवनं मोठं संघटन केलेलं होतं. नाशिकात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं मोठ्ठं अधिवेशनही झालं. विद्यार्थी संघटनेचा एक विशिष्ट कालखंड असतो तसं आमचंही झालं. मग आम्ही क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी सुरू केली.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कामातून मी राजकीय कार्याला सुरुवात केली. पुण्यात १९८९ मध्ये स.वि.स. सुरू झाली. तिचं नेतृत्व अंजली इंगवले, ज्योती साळुंखे, सुलभा पाटोळे, संगीता कांबळे, छाया वाहिंजे, मी, शुभांगी अशा मुली होतो. मुलींना जिल्हा पातळीवर शासकीय वसतिगृह द्या, शिक्षणातील मुलींची गळती थांबवा इ. मागण्याही आम्ही घेतल्या. पुण्यात निता हेंद्रे या मुलीचा ‘एकतर्फी प्रेमातून’ खून झाला आणि आम्ही ‘स्त्री-पुरुष समता रॅली’ काढून प्रबोधनाची आघाडी घेतली होती. अलका टॉकीज चौक ते म. फुले वाडा अशी ५००-६०० मुलींचा सहभाग असणारी रॅली निघाली होती. त्यात शर्मिला रेगे, डॉ. विद्युत भागवत आणि बाबा आढाव सहभागी झाले होते. यानंतर आम्ही स.वि.स.तर्फे शर्मिलाला या प्रश्नावर लिहिण्याची विनंती केली. ‘पे्रमाचा अधिकार’ आणि हिंसेचा प्रश्न पुस्तिका छापली. कोकण व मराठवाड्यात याच पुस्तिकेवर आधारित समता मेळावे घेतले होते.
किशोर -ः मला आठवतंय की जेव्हा मी पूर्णवेळ कार्यकर्ता होऊन धुळ्याला गेलो तेव्हा माझ्यासह कैलास शेळके, महादेव खुडे, राजा जाधव आणि सिकंदर सय्यद हे वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक होते. पुरोगामी चळवळ ओसरण्याचा तो काळ होता. सगळ्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता. क्रांती झाल्याशिवाय आता भारतीय समाजाचं काही खरं नाही अशी माझी धारणा होती. आणि क्रांती करण्याचा एकमेव मार्ग हा मार्क्सवाद ङ्गुले-आंबेडकरवाद (माङ्गुआ) आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेबरोबरच भांडवली आणि स्त्री-पुरुष विषमतेविरोधातही लढायला पाहिजे हे लक्षात आलं होतं. जात, वर्ग, स्त्री दास्यत्व या तीन शोषण शासनाच्या संस्था हे शरद पाटीलांचं म्हणणं होतं. त्याचं आम्हाला अपील होतं. नाशिक-धुळे-जळगाव-पुणे जिल्ह्यात आमचं काम जोरात चालू होतं. आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरही मोठ्ठं आंदोलन केलं. कांद्याचे भाव कोसळले, दुष्काळ पडला तर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना ङ्गी माङ्ग केली पाहिजे. कारण पहिल्यांदा मुलींचं शिक्षण बंद होतं मग मुलांचं म्हणून कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे. १९९२ मध्ये हे आंदोलन घेतल्यावर शरद जोशीही आश्चर्यचकित झाले. शिक्षण, सामाजिक परिसराविषयी जाणीव, मुलींचा सहभाग हे आमचं वैशिष्ट्य होतं. ज्योती साळुंखे, संगीता कांबळे, सुलभा पाटील, अंजली इंगोले, प्रतिमा या अगदी धडाडीच्या कार्यकर्त्या आमच्यासोबत होत्या. त्यातल्या प्रत्येकीच्या घरातून प्रचंड विरोध होता. अगदी वडिलांची मारहाणही या सहन करत होत्या. महाराष्ट्रातल्या ७-८ जिल्ह्यातल्या किमान तीस हजार विद्यार्थ्यांशी संपर्क असणारं संघटन आम्ही उभं केलं. १९९२ नंंतर सत्यशोधक संघटनेत एक वाईट गोष्ट घडली. शदर पाटील यांच्या एकूण स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी संघटनेवर कारवाई केली. पक्षात आणि संघटनेत ङ्गूट पडली. राज्यकारिणी सदस्य असणार्‍या माझ्यासकट अनेकांना कुठलीही संधी न देता पक्षातून काढून टाकलं. आम्ही याचा प्रतिवाद करण्याचा निर्णय घेतला कारण सार्वजनिक जीवनात लोकशाही आणि समतेचा व्यवहार असावा असा आग्रह आपण धरत असलो तर पक्षातही तसंच असायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. नंतर शरद पाटील एकटे पडले. त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली. मग आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात सहा महिन्याच्या आत परत आलो. त्यानंतर अनेक आंदोलनं आम्ही उभी केली. पक्षाचा जनतळ असणार्‍या भागात कॉंग्रेस आणि इतरांनी कार्यकर्त्यांवर हल्ले करणं, पीक जाळून टाकणं आदी अनेक दडपणुकीचे मार्ग अवलंबले होते. त्याविरुद्ध आम्ही ठामपणे उभे राहून संघर्ष केला. आमच्या आंदोलनामुळे आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी सक्षम अशी आदिवासींची जमिनीच्या प्रश्नांवरची चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देत आम्ही उभी केली आहे.
गीताली-ः एस एङ्ग आय किंवा अन्य विद्यार्थी संघटनेबरोबर तुमचं नातं कसं होतं?
किशोर -ः आम्ही एकत्रित असे कधी नव्हतो. जातीय विषमता आणि स्त्रीदास्याचे प्रश्न घेतले तर वर्गीय लढ्यात ङ्गूट पडेल म्हणून आमच्या मागण्यांबाबत अन्य डाव्या संघटनांमध्ये उदासीनता होती पण आम्ही आमचा लढा चालूच ठेवला. आम्ही नंतर नाशिकमध्ये वसतिगृहांचा प्रश्न हाती घेतला. भ्रष्टाचारी वॉर्डनच्या घरावर छापे घातले. यातही विद्यार्थीनींचा मोठा सहभाग होता. ङ्गी वाढीविरुद्धचा सर्वात मोठा मोर्चा आम्ही पुणे विद्यापिठावर काढला. त्यात गावोगावचे हजारो विद्यार्थी सामील झाले होते. आश्रम शाळांबाबतही आम्ही काम केलं. स्थानिक लढ्यापासून ते मोठ्या पातळीवर आम्ही लढे केले.
प्रतिमा -ः मला आठवतंय. आम्ही गरीब कुटुंबातल्या मुली. बैठकीला जायला पण जवळ पैसे नसायचे. घरचे काम सांगून अडवायचा प्रयत्न करायचे. पण मी बहाद्दर पहाटे उठून स्वयंपाक पाणी करून, अगदी पूजा करायला सांगितली तर ती पण झटपट उरकून बाहेर पडायचे. एका सायकलवर डबलसीट, तिबलसीट जायचो. ऑङ्गिस भांबुर्ड्यातल्या बुद्धविहारात! तिथं पोस्टर तयार करायला पैसे नाहीत मग आम्ही वर्तमानपत्रांवर काव लावून पोस्टर तयार करायचो. रात्री १२-१ पर्यंत खूप कष्ट करायचो. पण त्यात निर्मितीचा आनंद होता. विचारासोबत कार्य याची संगती असल्यामुळे कामाचं समाधान वाटायचं.
गीताली-ः आणि मग तुम्ही लग्न कधी केलंत? त्याची स्टोरी सांग ना.
प्रतिमा -ः लग्न आम्ही खूप उशिरा केलं. पण ठरवलं १९९० मध्ये यानेच मला विचारलं.
किशोर -ः एकतर आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. नंतर ती चळवळीतही असल्यामुळे मी तिची कामाची धडपड, लगन बघत होतो. शरद पाटीलांचा प्रभाव आमच्यावर होताच. ते म्हणायचे कुठल्याही कामासाठी नियोजन महत्त्वाचं. त्यामुळे लग्न करताना नियोजन करा. तसा सहा महिने मी तिच्या प्रेमात होतो. ते विचारचक्र चालू होते. पण ती ङ्गटकळ आहे. शेवटी धीर धरून १९९० मध्ये विचारलंच.
प्रतिमा -ः हा कामामुळे कॉलेजला यायचा नाही. परीक्षा जवळ आली की अभ्यास घ्यायला मला बोलवायचा. त्यावेळी त्याच्या मनात असं काही असेल याची मला कल्पना नव्हती. घरी बहिणीच्या लग्नाचे ‘दाखवण्याचे’ प्रकार बघत होते. तो सर्व बाजार वाटायचा. त्यामुळे असलं दाखवणं वगैरे करायचं नाही हे मनात होतं. बहिणीच्या लग्नाच्या कर्जाचा बोजा वडिलांवर होता. तेही माझ्या लग्नाच्या भानगड पडले नाहीत. त्यानं विचारल्यावर तपशीलात नंतर बोलू असं मी त्याला सांगितलं. लग्न मात्र आम्ही ९९ मध्ये केलं.
किशोर -ः त्या काळात सेटल होणं महत्त्वाचं होतं. कारण अन्य कार्यकर्त्यांचं पूर्णवेळ काम करण्याची क्षमता असूनही नियोजना अभावी ना चळवळ ना धड संसार अशी ङ्गरङ्गट आम्ही पाहात होतो. दोघांपैकी एकाने नोकरी करायची हे नक्की असं मी तिला सांगितलं. प्रतिमाचं म्हणणं होतं तू आधीपासूनच चांगलं काम करतो आहेस तर तू काम कर. मी नोकरी करून चळवळ करते. मग त्यादृष्टीनं सगळी आखणी केली.
प्रतिमा -ः कुठलंही भांडण पाच मिनिटांच्यावर टिकवायचं नाही, असं आम्ही त्याचवेळी ठरवलं होतं. तसंच मुलं होऊ न देण्याचा निर्णयही घेतला होता. ९२ साली मी राज्यशास्त्रात एम.ए. झाल्यावर लगेच इगतपुरी येथे नोकरी केली. मग राजगुरूनगर आणि त्यानंतर ९६ मध्ये पुण्याच्या जेधे कॉलेजमध्ये पूर्णवेळ नोकरी मिळाली आणि स्थिरतेच्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू झाली. दरम्यान माझ्या भावानं एक छोटा फ्लॅट मला साततोटीला घेऊन दिला. ते आमचं आजही ऑङ्गिस आणि चळवळीचं केंद्रच बनलं आहे.
गीताली-ः तुम्ही लग्न करणार आहात ते घरी कळलं होतं का? घरच्यांची काय प्रतिक्रिया? जातीवरून काही विरोध वगैरे?
प्रतिमा-ः माझ्या घरी मी आधीच सांगितलं होतं. तेव्हा हिटलरी खाक्या असणार्‍या माझ्या वडिलांना उशिरा सांगितलं. मुलगी आपलं आपणच लग्न कसं काय ठरवते याचा त्यांना राग आला. त्यांचा थोडा विरोध होता. तो कमवत नाही असं कसं वगैरे. पण ते हे सर्व आईशी बोलायचे. जातीचा प्रश्न काही आमच्या घरी आला नाही.
किशोर -ः घरचे ९६ कुळी. शिवाय वडिलांचं आता ब्राह्मणी मध्यमवर्गात स्थलांतर झालं होतं. त्यांचे स्वतःचे कामगार वर्गाचे हलाखीचे दिवस, शेतकरी पार्श्वभूमी, शिक्षणासाठीचा संघर्ष हे सर्व विसरून त्यांनी लग्नाला विरोध केला. पण मी पत्रिकाच छापून घेऊन गेलो होतो. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. आमचं सत्यशोधक पद्धतीनं लग्न झालं.
दरम्यानच्या काळात नवापूरचा संघर्ष एका टप्प्यावर आल्यानंतर आदिवासींचा पुन्हा एकदा त्यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित झाल्यानंतर आम्ही क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी या नावानं प्रबोधन आघाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रा. रणजित परदेशी, प्रा. उमेश बगाडे, एफ. एच. बेन्नूर, प्रा. यशवंत सुमंत इ. आमच्या बरोबर होते. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या पर्यायी अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा घेणं, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं, पुस्तकं तयार करणं हे काम केलं. म. ङ्गुले, सावित्रीबाई, डॉ. बाबासाहेब, शिक्षण, शेती अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहून घेतली. या काळातला आमचा सर्वात मोठा सांस्कृतिक हस्तक्षेप झाला तो सत्यशोधकांचा, मार्क्सवाद-ङ्गुले वादाचा. तो म्हणजे २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करण्याचा.
प्रतिमा -ः २५ डिसेंबरबद्दल सांगायचं तर भारतीय महिला दिनाचा कार्यक्रम चंद्रपूरमध्ये डॉ. प्रमिला लीला संपत यांनी आयोजित केला होता. त्याला मी व डॉ. सुलभा पाटोळे, चंद्रकांता सोनकांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून गेलो होतो. या कार्यक्रमात तिनं २५ डिसेंबर हा भारतीय महिला दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली. नंतर आमच्या साप्ताहिक बैठकीत हा विषय माडला. ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे आणि तिचा महाराष्ट्रभर प्रचार करायला पाहिजे असं ठरलं. पुढे ऍड. प्रकाश आंबेडकरांबरोबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन संयोजन समिती या नावानं बैठक बोलावली. अनेक महिला संघटनांच्या प्रतिनिधी या बैठकीला आल्या होत्या. पाच वर्षं परिषदा घ्यायचं ठरलं. पहिली मोठी परिषद नागपूरला झाली. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वेळेस मी महाराष्ट्रात मोबिलायझेशन केलं होतं. तितक्याच मोठ्या प्रमाणात यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी महाराष्ट्रभर भारिप बहुजन महासंघ बाबासाहेब आंबेडकर केलं. पूर्ण विदर्भ पिंजून काढला. अनेक मेळावे घेतले.त्या मेळाव्यांना मी संयोजक समितीची निमंत्रक होते. वेगवेगळ्या स्तरावरून महिला येऊन बोलत होतया. त्या खूप सक्रिय झाल्या होत्या. आदिवासी भागातही २५ डिसेंबर साजरा केला जातो.
गीताली -ः प्रतिमा, तुला या सगळ्या संघटनांमध्ये स्त्री-पुरुष समतेच्या मुद्द्यावर पुरुष कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा वाटला? काही संघर्ष जाणवला का? तसंच व्यक्तिगत नात्यात लग्नानंतर तुझं किशोरचं नातं बदललं का?
प्रतिमा -ः पहिल्यांदा व्यक्तिगत नात्याविषयी सांगते. आमच्या एकमेकांकडून पारंपरिक पती-पत्नीच्या अपेक्षा नसल्यानं ङ्गार ङ्गरक पडला नाही. कौटुंबिक लोकशाही हा आमच्या सहजीवनाचा मध्यवर्ती भाग आहे. कधी कधी आमच्यात मतभेद होतात मग चिडचिड होते पण आधी सांगितलं तसं भांडण जास्तवेळ चालू ठेवत नाही. मुख्यतः आमच्या पक्षाचं काम आदिवासी भागात आहे. तिथं स्त्री-पुरुषांनी एकत्र काम करणं, एकमेकांना मदत करणं दिसतं. पण तिथेही मागण्यांच्या स्वरूपात प्रबोधन होत होतंच. याचा अर्थ तेथे स्त्रीशोषण नाही असं मात्र नाही.
किशोर -ः अनेक ठिकाणी लोक माझ्यापेक्षा प्रतिमालाच जास्त ओळखतात. ‘प्रतिमाताईंचे मिस्टर’ या ओळखीचा मला अभिमान आहे. ती मनस्वी आणि स्पष्टवक्ती आहे. ती जेव्हा लिहीत असते तेव्हा घरात स्वयंपाक केला की नाही अशा कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. तिची ही एकाग्रता स्त्रीच्या बौद्धिक भूकेचं प्रतिक आहे असं मला वाटतं. गेल्या तीन वर्षांपासून तिनं कामं कमी केली आणि ती पूर्णपणे गाथाला वाढवण्यात, शिकवण्यात रमून गेली आहे. आदिवासी स्त्री-पुरुषांमध्ये पूर्ण समता आहे असंं नाही. तिथंही जातीव्यवस्था आणि पुरुषसत्ताकता काम करतेय. जात पंचायतीमध्ये स्त्रिया नाहीत. पुरुष अनेक विवाह करतात. आमच्या पक्षात पुरुषसत्ताकतेला विरोध पहिल्यापासून होता. विद्यार्थी संघटनेत चांगलं वातावरण होतं. नेतृत्त्वही मुलींकडे होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून पुढे आणलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे २८ नोव्हेंबर म.ङ्गुले स्मृतीदिन हा ‘शिक्षक दिन’ करण्याचा. तसंच सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा ‘स्त्रीशौर्यदिन’ म्हणून घेण्याचा. आदिवासी स्वायत्त राज्याची भूमिकाही आम्ही हिरीरीनं मांडली. ती भूमिका अजूनही आहे. आम्ही ‘एकतर्फी प्रेमातून’ झालेल्या हिंसांना विरोध करताना कोकणात अनेक समता मेळावे घेतले. पुस्तकांवर चर्चा, व्याख्यानं आयोजित केली. दरम्यानच्या काळात सावित्री प्रकाशन, दिग्नात प्रकाशन यांच्यातर्ङ्गे अनेकानेक छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या. त्याला जबरदस्त प्रतिसादही मिळाला. आंबेडकर आणि मनुस्मृती; स्त्रिया आणि स्त्रीमुक्ती या प्रतिमा व सरोज कांबळे यांच्या पुस्तकाची दरवर्षी आवृत्ती निघते. त्याचे इंग्रजी, कानडीत अनुवादही झाले. आम्ही छोट्या पुस्तिकांचा ट्रेंड महाराष्ट्रात सुरू केला. आम्ही आमचे आदर्श आणि प्रेरणास्थान असणारे बाबूराव बागूल यांचा सत्कार आयोजित केला. बाबूराव आणि रावसाहेब कसबे प्रतिमाला लेक मानायचे. त्यांना माझ्याबद्दलही कमालीचं प्रेम!
१९९९ पासून आम्ही प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जायचो आणि त्याविरोधात अंक काढायचो आणि तो अंक-सत्यशोधक दिशा- ओरडून संमेलनात विकायचो. नंतर ही नकारात्मक कृती थांबवून ध्रुवीकरणाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रस्थापितांना डावलून विद्रोही साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं. धारावीसारख्या ठिकाणी यावर्षी दादरच्या शिवसेनाप्रणीत साहित्य संमेलनाला तोंड देणारं संमेलन घेणं ही खूप महत्त्वाची घटना होती. पुन्हा यातही मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विद्रोहीचा दबाव मराठी साहित्य संस्कृतीवर होता. आम्ही प्रश्न उपस्थित केला की साहित्य संमेलनात स्त्रियांना कुठं सन्मानानं बोलावलं?
प्रतिमा -ः किशोरचे दोन मुद्दे ठरलेले असायचे. ते म्हणजे प्रस्थापित साहित्य संमेलनाला आमचा विरोध का आणि अ.भा.म. संमेलनाच्या विचारांची चिरङ्गाड. खूप अभ्यास करून तो ती मांडणी करायचा.
किशोर -ः विद्रोही साहित्य संमेलन आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ हे अलीकडच्या काळातील एक मोठा महाराष्ट्रातला सांस्कृतिक हस्तक्षेप असं म्हणावं लागेल.
गीताली -ः पण यात ङ्गूट पडली याचं कारण तू काय सांगशील?
किशोर-ः ही ङ्गूट वैचारिक नव्हतीच. मीच एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, विद्रोहातली वैचारिक ङ्गूट दाखवा आणि हजार रु. मिळवा. कारण अनेक संघटना एकत्र येऊन ‘विद्रोही’ बनलं होतं. त्यातील अंतर्गत भांडणांमध्ये निरनिराळे प्रश्न निर्माण व्हायचे. या प्रश्नांचे पडसाद हे विद्रोहीत उमटायचे. त्यामुळे विद्रोहीत अस्थिरता निर्माण झाली आणि ङ्गूट पडली. या दरम्यानच्या काळात आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी चळवळीकडे वळलो. विद्यार्थ्यांचे आर्थिक लढे आणि आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय स्त्री मुक्ती दिन, शाक्तराज्याभिषेक दिन इ. सांस्कृतिक पातळीवरचे प्रश्नही समोर आणले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, शेतकरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढे दिले. पुणे विद्यापीठात स्वायत्ततेला विरोध करणारं पहिलं आंदोलन आम्ही केलं. आम्ही सिनेटची बैठक उधळून लावली. त्यावरून आम्हाला हिंसाचारी म्हटलं. परंतु एका ठराविक पातळीपर्यंत आम्ही अत्यंत संयमी मार्गानं, अहिंसक मार्गानं लढाई लढवली होती. २०११ मध्ये दहा हजार लोकांना घेऊन ङ्गेब्रुवारी महिन्यामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९६ तास सत्याग्रह केला. घेतली. पुण्यात आम्ही पाच हजार ऊसतोडणी कामगारांचा साखर भवनावर मोर्चा काढला. इतक्या संख्येने लढे करताना अत्यंत शांततेनं आणि संयमानं आम्ही काम केलं. यात आमचा खूप कस लागला. २००२ मध्ये दादासाहेब गायकवाड भूमी हक्क कृती समिती स्थापण्यात आमच्या संघटनेने पुढाकार घेतला. मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे यांना आम्ही यात येण्याची विनंती केली. अलीकडच्या काळात पवनऊर्जा कंपन्यांच्या आक्रमणातून आदिवासींच्या जमिनी वाचवणं, पुण्यातल्या विमानतळासाठी जमिनी लाटण्याच्या डावाविरुद्ध आंदोलन करणं अशी कामं आम्ही केली. भारतात जमीन वाचवणं, पाणी वाचवणं, नैसर्गिक संसाधन वाचवणं ही मूलभूत लढाई, ती वेगवेगळ्या पातळ्यांवर चालते. ही लढाई आम्हीही लढत आहोत. जातीय अत्याचारासाठी ज्या गायरान जमिनींचा वापर केला गेला त्याच जमिनीवर आता शेतकर्‍यांचा काय अधिकार? असे विचारले जात आहे. म्हणजे उलट्या बाजूनं त्याचा वापर केला जातो आहे. हे भीषण प्रश्न आहेत. ऊसतोडणी कामगारांच्या स्त्रियांचे प्रश्न आहेत. दरवर्षी अपघातात अनेक कामगार जखमी होतात, मरण पावतात. पण प्रत्यक्ष सामाजिक सुरक्षेचं काय? आदिवासींच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत! मोठमोठ्या सेलिब्रिटींचे हितसंबंध जपताना आमच्या जीवनाची हमी सरकार देत नाही असं का? हा आमचा सवाल आहे. जगण्याची प्रेरणाच शेतकर्‍यांमध्ये राहिली नाही. शिवाजीमहाराजांच्या जयघोषासोबतच खरं तर या इतिहासाचा वापर शेतकरी-आदिवासी समूहाला जगण्याची प्रेरणा देण्यासाठी व्हायला पाहिजे. त्या पद्धतीत इतिहासाची ङ्गेरमांडणी व्हायला हवी. केवळ ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत स्वार्थी राजकारणासाठी नको. हे भारतीय प्रबोधनाचं काम ङ्गुले-आंबेडकरांनी केलं. अलीकडच्या काळात कॉ. शरद पाटीलांनी केलं ते पुढं नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि तसा आमचा प्रयत्न असतो. शोषितवर्ग एकतर वैङ्गल्यग्रस्त होतो किंवा हिंसेकडे वळतो. मध्यमवर्गाकडे कालची संवेदना उरलेली नाही. या वर्गाकडून चळवळीला पूर्वीसारखी मदत केली जात नाही. दलितांपासून ते वरपर्यंत हा सर्व मध्यमवर्ग संवेदनाहिन झाला आहे. खर्‍या अर्थानं क्रांतीकारी मार्गाकडे जाण्यासाठी शोषितांना मध्यमवर्गाकडून जी भावनिक आणि आर्थिक ऊर्जा मिळायला पाहिजे ती मिळत नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होत आहेत. त्या दृष्टीनं आमचं काम सुरू आहे. भारतातल्या शोषणाच्या विरोधात काम करण्याची दिशा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे आहे यावर आमचा विश्वास आहे. जागतिकीकरणाच्या काळातसुद्धा महाराष्ट्रातले सर्वात मोठे लढे व सर्वात खोलवरचे हस्तक्षेप हे मार्क्सवाद-ङ्गुले-आंबेडकरवादाच्या छावणीतूनच झालेले आहेत याची दखल सत्ताधार्‍यांना घ्यावी लागली. तसंच प्रस्थापितांना आणि सनातन्यांनाही घ्यावी लागली. आमच्या कामात अनेक कष्टकरी शेतकरी कार्यकर्त्यांचा नेत्यांचा खूप मोठा, मोलाचा सहभाग आहे. रामसिंगभाऊ, करणसिंग भाऊ, साजूबाई, होमाबाई, जेकाभाऊ, आर. टी. गावीत, एम. टी. गावीत, हिलाल महाजन, लालाबाई, यशवंत माळचे, वजीभाऊ, मन्साराम, जगन गावीत, दिपक जगताप असे खूप जण कार्यकर्ते म्हणून सोबत आहेत.
गीताली -ः आत्ताचा जो राजकीय माहोल दिसतोय. एकूण जनतेपासून सगळे राजकीय पक्ष तुटल्यासारखे झाले आहेत याचं काय होईल असं तुला वाटतं?
किशोर -ः जातीव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले स्त्रीदास्य हे आता त्याच्या शेवटच्या अवस्थेत आहे. पण प्रस्थापित व्यवस्थेत बनिया भांडवलशाही, ब्राह्मणी बुद्धिजीवी आणि मध्यम जातींमधले उच्चभ्रू या तिघांचे हितसंबंध एकवटलेले आहेत. त्यांना असं वैचारिक आव्हान उभं राहतं आहे असं दिसतंं नी ते आव्हान तोडून टाकण्यासाठी वैचारिक वगैरे काही नसतं असं म्हणून संसदीय तडजोड्या करतात. सत्ता हीच सर्वस्व असते आणि सत्तेसाठी सर्व क्षम्य असतं असं म्हणत त्यासाठी ते मलिकांमध्ये लोकांना गंुंतवून टाकतील, क्रिकेटला, बातम्यांना मनोरंजनात आणतील, लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करतील, स्वतःचेच खोटे विरोधकही ते तयार करतील अशा पद्धतीचे भ्रामक विचार उभे करणे हे सत्ताधार्‍यांचंच एक काम असतं. कारण त्यांना व्यवस्था दाबायची असते. त्यात अमेरिकेपासून सगळ्यांचे हितसंबंध आहेत. मात्र लोक पर्यायाच्या शोधात आहेत. यातल्या एकेका गोष्टीला सुटासुटा विरोध करून भागणार नाही असं आम्हाला वाटतं. या व्यवस्थेत किमान सुधारणा करण्याचे प्रयत्न अण्णा हजारे आणि इतर करताहेत त्यांना म्हणूनच आपण प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांचे अचूक आकलन केले पाहिजे. त्यांच्या भूमिकांच्या मर्यादाही पुढे मांडल्या पाहिजेत.
भांडवली पद्धतीत का होईना पण स्त्रीला एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मिळणं, सार्वजनिक जीवनात स्थान मिळणं हे भांडवलशाही देते. पण भांडवलवादी स्त्रीमुक्ती सुद्धा आज अस्तित्वात नाही. उलट स्त्रीच्या शोषणात आज वाढ झालेली दिसून येते. यात ऑनर (?) किलिंग, एकतर्ङ्गी आकर्षणातून हिंसा अशा अनेक गोष्टी आहेत.
गीताली -ः प्रतिमा आणि किशोर, शेवटी आपल्या मध्यम व उच्च मध्यमवर्गीय वाचकांना काय सांगाल?
किशोर -ः या वर्गाला शिक्षणाचं बाळकडू मिळालेलं आहे. याला नवं जग माहिती आहे. युरोप-अमेरिकेतले लोक आपल्याशी कशा पद्धतीनं वागतात हे याला माहिती आहे. इतिहासात आजवर या वर्चस्ववादी-साम्राज्यवादी शक्तींनी भारतात कशा पद्धतीनं शोषण केलं त्याबद्दलही या वर्गाला अनुभव आहे. म्हणून मध्यम व उच्च मध्यमवर्गात भांडवलशाहीच्या या चंगळवादी, माणसाला अधिकाधिक यंत्रवत बनवणार्‍या, त्याला समूहजीवनापासून दूर नेणार्‍या, जैसे थे वादी व्यवस्थेचं हत्यार बनवणार्‍या या षडयंत्रापासून सावध राहिलं पाहिजे. आपल्या संस्कृतीतील लोकशाहीवादी, समतावादी, बंधुतावादी आशय पुढे नेणार्‍या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना, वैङ्गल्यग्रस्त होत जाणार्‍या दलित-आदिवासी समूहाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करायला हवं. त्याची ही इतिहासदत्त जबाबदारी आहे.
प्रतिमा -ः सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचा खरा अर्थ हाच आहे. बुद्धीजीवी वर्गात त्याची बुद्धी, वेळ, पैसा याचा थोडातरी वापर इथल्या जनतेसाठी केला पाहिजे. या वर्गाचं आत्मभान-सामाजिक भान वाढलं पाहिजे. ज्यांना मदत करतो त्यांचे हितसंबंध कुणाशी जोडलेले आहेत याचं सतत भान बाळगलं पाहिजे म्हणजे त्यांच्याकडून धर्मांध-जातीवाल्यांना मदत होणार नाही.
पुरुषसत्ता, भांडवलशाही आणि जातीव्यवस्था हे हातात हात घालून स्त्रीशोषणात सहभागी झालेले दिसतात. सरोगेट मदर सारखी प्रथा हा स्त्री शोषणाचा नवा आविष्कार आहे. असंघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात ढकलल्या जाताहेत. शिवाय समान कामाला समान वेतन नाही. श्रम लिंगाधारित राहिलेले दिसतात. याच्या विरोधात आपल्याला जाती स्त्रीदास्य अंताची क्रांती केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.

डॉ. गीताली वि. मं.
(सहाय्य – स्मिता पाटील)
मिळून सार्‍याजणी
संपर्क – satyashodhakjagar@gmail.com 

(सौजन्यः मिळून साऱ्याजणी, ऑगस्ट २०११)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *