सावित्रीच्या ओव्या

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला
स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला
अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली
मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली
दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला
दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा
घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले
धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला
तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला
फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला
अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन
यशवंत बाळाला, दत्तक घेतला
चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला
माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला
जोतिबांची सावली, नाही तू राहिली
सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली
दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला
स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला
भगिनींना जागवीन, संघटीत करीन
ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन

– वसुधा सरदार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *