‘धादांत खैरलांजी’ रंगभूमीवर

प्रसिद्ध कवयित्री, कथाकार प्रज्ञा दया पवार यांचं ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले आहे. त्याचा मुकुंद कुळे यांनी १४ सप्टेंबर २०१३ च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये करुन दिलेला हा परिचय.

बॉम्बस्फोट-१९९३, कोठेवाडी, खैरलांजी, २६/११… अशा समाजाला-देशाला हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या की, अचानक साऱ्यांना जाग येते. मोर्चे निघतात, आंदोलनं होतात. नाटक-सिनेमावाल्यांच्या प्रतिभेलाही बहर येतो. अनेकदा हे सारं म्हणजे वरवरचा फेस असतो. आतून कुणीच हललेलं-हादरलेलं नसतं. त्यामुळे थोड्या वेळात फेस जसा मातीत जिरतो, तसंच चळवळी-आंदोलनाचं होतं. अनेकदा नाटक-सिनेमावाल्यांना एखाद्या घटनेतील मुद्द्यापेक्षा-विचारापेक्षा त्यातलं नाट्य तेवढंच आकर्षित करतं. परिणामी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्या घटनेचं ते बटबटीतपणे प्रदर्शन करून मोकळे होतात. पण एखादंच ‘ धादांत खैरलांजी ‘ सारखं नाटक लिहिलं जातं, जे घडून गेलेल्या घटनेचा मागोवा घेतानाच; त्या घटनेमागच्या प्रवृत्तीचाही वेध घेऊ मागतं. येत्या २९ सप्टेंबरला खैरलांजी प्रकरणाला सात वर्षं पूर्ण होत असतानाच मराठी रंगभूमीवर ‘ धादांत खैरलांजी ‘ अवतरत आहे. खैरलांजी प्रकरणातील भोतमांगे कुटुंबाला सामाजिक न्याय मिळाला का, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.

प्रसिद्ध कवयित्री, कथाकार प्रज्ञा दया पवार यांचं ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक तीनेक वर्षांपूर्वीच ‘ प्रतिशब्द प्रकाशन ‘ तर्फे प्रसिद्ध झालं होतं आणि तेव्हाच या नाटकाची चर्चा झाली होती. कारण हे नाटक खैरलांजीच्या पार्श्वभूमीवरचं असलं, तरी त्यात मुंबईसारख्या महानगरांतही जातीयवाद कसा जोपासला जातो, याची मांडणी करण्यात आली आहे. तसंच दलित मध्यमवर्गाच्या मानसिकतेचा वेध या नाटकात घेण्यात आला आहे. केवळ दलित या परिप्रेक्ष्यातून ‘ खैरलांजी ‘ घटनेकडे न बघता प्रज्ञा दया पवार यांनी या नाटकातील मूळ घटनेला वैचारिक संघर्षाचा आयाम दिला आहे आणि तो समकालीन प्रश्नांपर्यंत आणून भिडवला आहे.

या नाटकाच्या संहितेचं प्रकाशन आणि आता रंगभूमीवरील प्रयोग या कामी पुढाकार घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे म्हणतात, ‘ आपल्याकडे फक्त घटना-प्रसंग बघितले जातात, त्यामागे वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या विचाराकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ‘ धादांत खैरलांजी ‘ त प्रज्ञा दया पवार यांनी विशिष्ट मानसिकतेचा, वैचरिकतेचा शोध घेतलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात घडलेल्या या अमानुष घटनेचा संदर्भ त्यांनी नाटकाच्या नायिकेच्या संदर्भातही उपस्थित केलाय, तो मला महत्त्वाचा वाटला. ‘ मराठी रंगभूमीवर अलीकडच्या काळात आलेल्या स्फोटक विषयांवरच्या नाटकांत आता ‘ धादांत खैरलांजी ‘ ही दाखल होतंय. प्रसिद्ध दिग्दर्शक शिवदास घोडके यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. येत्या १५ सप्टेंबरला या नाटकाचा पडदा उघडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *