एका मुख्‍याध्‍यापकाच्‍या जाणिवांची मशागत करणा-या आठवणी

शिक्षणविषयक चिंतक, लेखक व कार्यकर्ते हा अ‍रविंद वैद्य यांचा परिचय महाराष्‍ट्राला आहेच. ते मुख्‍याध्‍यापक होते, हेही ठाऊक आहे. तथापि, त्‍यांच्‍या या चिंतन-लेखनाला त्‍यांच्‍या व्‍यासंगाबरोबरच बिघडलेली शाळा सरळ करण्‍यासाठी स्‍वतःहून स्‍वीकारलेले आव्‍हान व तिथे रुतून-रुजून केलेले प्रयोग या अवलियेपणाचा भक्‍कम आधार आहे, हे जवळचे संबंधित सोडले तर इतरांना फारसे ठाऊक नाही. आता नंदादीप-आठवणीतल्‍या साठवणीहे त्‍यांचे पुस्‍तकच आल्‍याने हे अवलियेपण कळणे सोपे झाले आहे.  ज्‍या शाळेत वैद्यसर मुख्‍याध्‍यापक होते त्‍या नंदादीप विद्यालयाचे २०१३ हे सुवर्णमहोत्‍सवी वर्ष. त्‍या निमित्‍ताने या शाळेच्‍या नंदादीपीयया माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संघटनेने ते प्रकाशित केले आहे.  प्रसिद्ध मानसोपचारतज्‍ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्‍याची प्रस्‍तावना लिहिली आहे.

नंदादीप विद्यालय ही मुंबईच्‍या गोरेगाव या उपनगरातील शाळा. या शाळेतील आपल्‍या प्रवेशाचे कारण सांगताना वैद्यसर नमूद करतात- १९७१ ते १९७४ या काळात शिक्षकांच्‍या सेवासमाप्‍तीच्‍या प्रश्‍नावरुन असे काही राजकारण घडत होते की त्‍याची परिणती विद्यार्थी पूर्णपणे बेशिस्‍त बनण्‍यात झाली होती.तरुण शिक्षिकेला शाळेतील १०वी-११वीच्‍या मुलांनी शाळेबाहेर घेरुन भलभलते प्रश्‍न विचारुन त्‍या रडायला लागल्‍यावरच सोडणे, शाळातपासणीला अधिकारी आले असता शाळेत फटाके लावणे, शाळेत सिगारेटी पिणे, मुख्‍याध्‍यापकांना मारणे अशी काही उदाहरणे या बेशिस्‍तीची कल्‍पना यावी म्‍हणून त्‍यांनी दिली आहेत. अशा या शाळेत मुख्‍याध्‍यापक टिकत नव्‍हते. विद्यमान शिक्षकांपैकी कोणी मुख्‍याध्‍यापक व्‍हायला राजी नव्‍हते. दादरच्‍या छबिलदास हायस्‍कूलमध्‍ये शिक्षक असलेल्‍या अरविंद वैद्यांनी नंदादीपच्‍या संस्‍थाचालकांच्‍या विनंतीला मान देऊन हे आव्‍हान स्‍वीकारले. १९७४ च्‍या जूनमध्‍ये ते नंदादीपचे मुख्‍याध्‍यापक झाले. त्‍यावेळी त्‍यांचे वय होते २७ वर्षे. १५ वर्षे मुख्‍याध्‍यापक म्‍हणून काम करुन १९८९ ला त्‍यांनी स्‍वेच्‍छानिवृत्‍ती घेतली. त्‍यावेळी त्‍यांचे वय होते ४२ वर्षे. पुढचा सर्व काळ पूर्णवेळ कार्यकर्ते म्‍हणून ते काम करत आहेत.

Photo-of-front-page---Nandapeep-Athavanitalya-Sathavaniमुख्‍याध्‍यापक म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्‍वीकारणे वेगळे आणि ख-या अर्थाने शाळेचा ताबा घेणे वेगळे. शाळेची पार्श्‍वभूमी ध्‍यानी घेता तर यास विशेषच महत्‍व होते. पहिलाच प्रसंग वर्गात शिक्षिकेला बाण मारण्‍याचा. फळ्यावर लिहिण्‍यासाठी मुलांकडे पाठ फिरवली की मुले बाण मारायची.  बाण कोणी मारले, या प्रश्‍नावर सगळे लोकमान्‍यझाल्‍यावर वैद्यसरांनी अख्‍ख्‍या वर्गाला शाळेबाहेर मैदानात आणले. पाऊस पडत होता. सर्वत्र गवत व चिखल होता. सरांनी मुलांना वर हात करुन उड्या मारायला लावल्‍या. ज्‍याचे पाय एक फूट उंच उठणार नाहीत, त्‍याला मी मारीन, अशी हातात छडी घेऊन हिंडणा-या सरांनी तंबी दिली. सगळी मुले व शिक्षक व्‍हरांड्यातून हा प्रकार बघत होते. १५ मिनिटांनी अखेरीस एक मुलगा पोटात दुखायला लागून खाली बसला. त्‍याचे बकोट धरुन सरांनी त्‍याला उभे केले व बाण मारणा-याचे नाव सांग नाहीतर उड्या मार, असे दरडावले. युक्‍ती कामी आली. त्‍याने पटापट नावे सांगितली. वैद्यसरांनी या मुलांना शाळेतून आठ दिवसांसाठी रस्टिकेट केले व पत्रे पाठवून पालकांना भेटायला बोलावले. नंतर सर्व वर्गांत नोटीस फिरवली – झाला प्रकार तुम्‍ही पाहिला आहेच. त्‍यातून योग्‍य तो बोध घ्‍यावा.    या घटनेने वैद्यसरांनी शाळेचा ताबा घेतला, हे वेगळे सांगायला नको. पुढे वर्षानंतर या मुलांना शाळेतून त्‍यांनी काढून टाकले. मात्र त्‍याचवेळी दुस-या शाळेतील मुख्‍याध्‍यापकांना सांगून त्‍यांच्‍या प्रवेशाचीही व्‍यवस्‍था केली. ही मुले त्‍या शाळेतून एस.एस.सी झाली. या मुलांची भावंडे याच शाळेत होती. सर नमूद करतात या सर्वांचे संबंध आजही माझ्याशी अत्‍यंत चांगले आहेत.

या आठवणीच्‍या शेवटी ते बालमानसशास्‍त्राची चिकित्‍सा करतात. बालमानसशास्‍त्रात गृहीत धरलेल्‍या १६ वर्षाच्‍या मर्यादेहून अधिक वयाची मुले १०वी-११वीच्‍या वर्गात अनेक असतात. त्‍यांना हे बालमानसशास्‍त्र लागू होत नाही. काही झाले तरी अजिबात मारायचे नाही, ही भूमिका योग्‍य नव्‍हे. शारीरिक शिक्षेलाही काही स्‍थान आहे. अर्थात कोणत्‍याही शिक्षेचा हेतू व्‍यक्‍तीला सुधारणे हा असायला हवा. बदला अथवा अद्दल घडवण्‍याचा असता कामा नये, असे वैद्यसरांचे मत आहे.

वैद्यसरांची शाळेवर मुख्‍याध्‍यापक म्‍हणून अधिकार तयार करण्‍यासाठीची प्रक्रिया व भूमिका नीट कळावी, म्‍हणून हा प्रसंग काहीशा विस्‍ताराने दिला आहे. पुढच्‍या प्रत्‍येक आठवणीत वैद्यसरांनी घटना व चिंतन असाच क्रम ठेवला आहे.

नारळी पौर्णिमेची सुटी हवी म्‍हणून मुले संप करतात. संप केलेल्‍या मुलांवर ते चिडत-रागावत नाहीत. त्‍यांच्‍या संपाचा आदर करतात. त्‍यांना विश्‍वासात घेऊन शाळेच्‍या सर्व सुट्यांचे गणित त्‍यांना समजावून सांगतात. ज्‍या शाळांनी आज सुटी दिलेली आहे, त्‍या शाळा चालू असताना आपण कसे सुटीवर असू, वैकल्पिक सुट्यांची आखणी आपण नव्‍याने केली तर पुढच्‍या वर्षी आपल्‍यालाही नारळी पौर्णिमेची सुटी घेता येऊ शकते…इत्‍यादी. मुलांना हे पटते. मुलांच्‍या आणि मुख्‍याध्‍यापकांच्‍या दोहोंच्‍या बाजूने संप यशस्‍वीकरण्‍याची किमया वैद्य सर येथे साधतात. आपली टिप्‍पणी करताना सर पुढे लिहितात – सर्वच प्रश्‍न धाकाने अथवा शिक्षा करुन सोडवायची गरज नसते/नव्‍हे तसे करणे हिताचेही नसते आणि शक्‍यही नसते.

किशोरवयीन मुलांत असलेल्‍या प्रचंड ऊर्जेचे योग्‍य रीतीने विरेचन झाले नाही, तर ती गैरवर्तनात रुपांतरित होते. माथेरानची सहल हा असा सकारात्‍मक विरेचनाचा नमुना आहे. सर शनिवारी रात्री मुलांना सहलीला नेतात. नेरळ ते माथेरान रात्री पायी चालत जातात. रविवारचा सबंध दिवस पॉइंट्स पाहून रात्री उशीरा परततात. या दमछाक करणा-या सहलीत मुलांना इतरउद्योग करण्‍याची उसंतच मिळत नाही. शिवाय आपले सर आपल्‍याबरोबर चालण्‍यात कमी पडत नाहीत;उलट आपल्‍या पुढे असतात, याचा साक्षात्‍कार सरांबद्दल आदर निर्माण करणारा ठरतो. सहलीच्‍या दरम्‍यान मुले व शिक्षक यांची एक नवी ओळख परस्‍परांना होते, हीही अशा उपक्रमांची मोठी मिळकत असते. सहली-शिबिरांचे असे अनेक उपक्रम नियमितपणे वैद्यसरांनी शाळेत सुरु केले. श्रमदान हा असाच मुलांना घडवणारा उपक्रम होता. शिक्षक, संस्‍थाचालक व मुले एकत्र श्रमदानाने शाळेच्‍या सुविधा तयार करतात, हे दृश्‍य कोणत्‍याही पुस्‍तकातील पाठापेक्षा अधिक शिक्षण करणारे असते. एकमेकांशी कायमचे जोडणारे असते. वैद्यसर याबाबत म्‍हणतात- शिक्षणाची व्‍याख्‍या करताना हँड, हार्ट व हेडयांचा उल्‍लेख नेहमी केला जातो. पण शाळेतील उपक्रम राबविताना, त्‍यांचे मूल्‍यमापन करताना आणि शाळा व विद्यार्थी यांचा दर्जा ठरविताना मात्र हेडचाच प्रामुख्‍याने विचार केला जातो. श्रमप्रतिष्‍ठा, ज्ञानाचे उपयोजन इ. गोष्‍टी भाषणात आणि पाठ्यक्रमातच राहतात. त्‍यामुळे शिक्षणातील आत्‍माच हरवतो असे मला वाटते.

वैद्यसरांच्‍या शाळेतील सर्व हस्‍तक्षेपाचे हा आत्‍मा  हेच लक्ष्‍य होते. मुलांची तसेच तरुण शिक्षकांची प्रेमप्रकरणे हा शाळांतील तसे पाहिले तर नेहमीचा विषय. पण तो कुजबुज, पाप, अब्रम्‍हण्‍यं अशांनी अवगुंठीत होणारा. वैद्य सरांची या प्रकरणांची हाताळणी कौशल्‍यपूर्ण आहेच;पण मुख्‍य म्‍हणजे मानव्‍यपूर्ण आहे. म्‍हणूनच ही उमलती मने अपराधी गंडाच्‍या गर्तेत जात नाहीत. ती सावरतात.  पालकांचेही यात शिक्षण होते. सरांनी हाताळलेल्‍या या प्रकरणांच्‍या आलेखात यशाचा स्‍तंभ खूपच उंच आहे. तथापि, हॉटेलात सापडलेल्‍या व सुधारगृहात पाठवणी झालेल्‍या एखाद्या राणीची समस्‍या आपण सोडवू शकलो नाही, हे वैयक्तिक अपयश त्‍यांना वाटते. ते शल्‍य ते आजही विसरु शकत नाहीत.

असे शल्‍य, चूक सर मोकळेपणाने व्‍यक्‍त करताना दिसतात. उंच, बांधेसूद, बेडर वृत्‍तीचा व उत्‍तम खेळाडू असलेला रवी सरांचा लाडका विद्यार्थी. पण तो प्रश्‍नपत्रिका चोरीच्‍या प्रकरणात सापडतो तेव्‍हा सर त्‍याला बेदम, मांड्यातून रक्‍त फुटेपर्यंत मारतात. ज्‍येष्‍ठ शिक्षिका कामतबाई मध्‍ये पडतात व सरांना आवरतात. सर रवीच्‍या घरी जाऊन आपण त्‍याला कसे मारले ते सांगतात. रवीने सरांनी मारल्‍याचे सांगितलेले नसते. दुसरेच कुठलेतरी कुंपणाच्‍या तारा लागल्‍याचे कारण सांगतो. रवीचे वडील चिडत नाहीत. उलट सर आपुलकीने घरी आल्‍याबद्दल आभारच मानतात. पुढे रवीचा भाऊ व सर त्‍याला सुधारण्‍याचा प्रयत्‍न करतात. त्‍यात त्‍यांना यश येते. रवी मोठा होतो. नोकरीला लागतो. मात्र पहिला पगार घेऊन घरी येत असतानाच चालत्‍या ट्रेनमधून पडून त्‍याचा मृत्‍यू होतो. ही घटना कळल्‍यावर सर त्‍याच्‍या घरी जातात. हा प्रसंग खूपच हृदयद्रावक आहे.  सरांनी त्‍याला मारण्‍याची घटना सगळे विसरलेले आहेत. कोणीच अढी ठेवलेली नाही. संबंध मोकळे झालेले होते. तरीही सरांना मारण्‍याची ती घटना अस्‍वस्‍थ करत राहते. ते लिहितात- रवीला मारताना मी अतिरेक केला होता. शिक्षकाला राग येणे क्षम्‍य आहे. पण रागाने अंधत्‍व येणे क्षम्‍य नाही. रवी आज जगात नाही. पण आज एवढ्या वर्षांनंतर त्‍याच्‍या स्‍मृतींना साक्षी ठेवून मी म्‍हटलेच पाहिजे मी चुकलो‘.’ या ओघात ते कामतबाईंचेही आभार मानतात- माझ्या अशा सहका-यांनी वेळोवेळी मला सावरले आहे. ..मी खरेच त्‍यांचा ऋणी आहे.

या पुस्‍तकात सरांना भेटलेल्‍या अधिका-यांचे वर्णन आहे. त्‍यात सिद्दीकींसारखे तपासणी ही मार्गदर्शन होऊन सुधारणा व्‍हावी म्‍हणून करायची असते.अशी भूमिका असणारे चांगले अधिकारी आहेत. तसेच त्रास देणारे अधिकारीही आहेत. सरांना भेटलेल्‍या पालकांतही चांगले वाईट आहेत. पण सर म्‍हणतात त्‍याप्रमाणे त्रासदायक पालक हे १ टक्‍केही नसतात. परंतु उरलेला ९९ टक्‍के विभाग एवढा अलिप्‍त असतो की पालकांच्‍या कार्याचे क्षेत्र या १ टक्‍केवाल्‍यांना आंदण दिल्‍यासारखे होते.सर मात्र यातला चांगुलपणा जपत राहिले. चांगले अधिकारी, चांगले पालक यांच्‍याशी त्‍यांचे संबंध दीर्घकाळ राहिले. शिक्षकेतर कर्मचारी, शाळेच्‍या संस्‍थापक आशाताई व संस्‍थाचालक अप्‍पा नाईक, परिसरातील विविध संस्‍था, मदतीला उभे राहणारे लोक या सर्वांमधल्‍या चांगुलपणाची नोंद या पुस्‍तकात सरांनी आवर्जून  घेतली आहे.

व्‍याख्‍यानमाला, फिल्‍म फेस्टिवल, रशियन भाषा वर्ग असे अनेक उपक्रम सरांनी राबवले. शाळेचे मैदान, इमारत तसेच आतील सुविधा यांत लक्षणीय सुधारणा घडवल्‍या. शाळेतील तसेच शाळेच्‍या बाहेरील अनेकविध घटकांच्‍या सहाय्यानेच हे शक्‍य झाले.  अर्थात, या सगळ्याचा सुयोग्‍य मेळ घालणारे ते कुशल सूत्रधार होते. यामुळेच त्‍यांची शाळा विद्यार्थ्‍यांपुरती न राहता ती समाजाची झाली. पुस्‍तकाच्‍या अखेरीस शाळेच्‍या स्‍वरुपाविषयी ते म्‍हणतात – शाळेवर, तेथील मैदानादि साधन संपत्‍तीवर पहिला हक्‍क आजी विद्यार्थ्‍यांचा. त्‍यानंतर शाळा व परिसर समाजासाठी मोकळा हवा. शाळा हे सामाजिक उपक्रमांचे केंद्र असावे.  सकाळी ६ ते रात्री किमान ९-१० पर्यंत शाळेला कुलूप असणे अनैतिक आहे.

आजच्‍या शिक्षणक्षेत्रातील (खरे म्‍हणजे एकूण समाजातील) बाजारु, व्‍यक्तिवादी वातावरणात नव्‍या पिढीला अरविंद वैद्यांच्‍या या आठवणी कपोलकल्पित वाटण्‍याचीच शक्‍यता दाट आहे. तर ज्‍यांना या जुन्‍या काळाचे संदर्भ आहेत, त्‍यांच्‍यासाठी तो नॉस्‍टॅल्जियाआहे. या दोन स्थितींत अडकायचे नसेल, तर वैद्यसरांनी त्‍यांच्‍या मनोगतात मांडलेल्‍या पुढील भूमिकेचा स्‍वीकार करणे आवश्‍यक ठरते –

मी ज्‍या काळात शाळेत होतो, तेव्‍हाच्‍या शाळांमध्‍ये, विद्यार्थी वर्गात, शिक्षक, सेवकांमध्‍ये, पालक वर्गात आणि शिक्षण संस्‍थांमध्‍ये गुणात्‍मक फरक झालेला आहे. काळाबरोबर तो होणे साहजिकही आहे. पण हा सारा बदल जसा पूर्ण नकारात्‍मक नाही तसा सकारात्‍मकही नाही; आणि इथेच माणसाच्‍या हस्‍तक्षेपाची गरज तयार होते. नव्‍या काळाशी सुसंगत असे नवे उभे करताना जुन्‍यातून जे चांगले आहे ते घेऊन पुढे जायचे असते. माणूस हे जाणीवपूर्वक करु शकतो.

आपल्‍या जाणिवांची मशागत करणारे हे पुस्‍तक सर्वांनी जरुर वाचावे.

सुरेश सावंत 9892865937 / sawant.suresh@gmail.com

 

 

नंदादीप – आठवणीतल्‍या साठवणी

अरविंद वैद्य

प्रकाशकः नंदादीपीय – माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संघटना,

द्वारा-सिग्‍मा एज्‍युकेशन, गुलमोहर कॉम्‍लेक्‍स, अनुपम सिनेमासमोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई.

मोबाईल – 9702036019  ईमेल- nandadeepiy@gmail.com

देणगी मूल्‍यः रु. १००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *