कसाब, कोदनानी आणि जल्लोष!

ज्यांनी कसाबच्या फाशीनंतर जल्लोष केला, त्यांनी माया कोदनानी आणि इतरांना झालेल्या शिक्षेनंतर जल्लोष केला होता का? नसल्यास का? कोदनानी यांचं कृत्य हा “मानवतेविरुद्धचा गुन्हा’ नव्हता? तो देशाच्या लोकशाहीवर आणि धर्मनिरपेक्षतेवर, म्हणजे एका अर्थानं देशावरच नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला हल्ला नव्हता? कसाब तर पाकिस्तानातून आलेला होता; पण गुजरात दंगलीतल्या अनेक सामूहिक हत्याकांडांपैकी एक हत्याकांड घडवून आणलेल्या कोदनानी केवळ भारतीयच नव्हत्या, तर आमदारही होत्या. कसाब केवळ चौथी शिकलेला; तर कोदनानी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतितज्ज्ञ डॉक्‍टर!

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला महिन्याभरापूर्वी फासावर लटकवलं गेलं आणि देशभर जल्लोष झाला. फटाके वाजवून, ढोल-ताशे वाजवून, नाचून आणि मिठाई वाटून हा आनंद व्यक्त केला गेला. भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी तर मुंबईत चक्क फुगडी घालून या फाशीचं “सेलिब्रेशन’ केले! “हल्ल्यानंतर चार वर्षांच्या आत कसाबला फासावर चढवलं गेलं आणि हीच दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली आहे,’ अशी भावना व्यक्त केली गेली. बहुतेक सर्वच वर्तमानपत्रांनी आठ कॉलमचा मथळा केला; तर काहींनी त्याबद्दल विशेष पानंही प्रसिद्ध केली.

दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांनीही ठिकठिकाणच्या जल्लोषाच्या वार्ता सातत्यानं दाखवल्या. दहशतवाद्यांचा हल्ला हा “मानवतेविरुद्धचा गुन्हा’ होता, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मात्र, तरीही फाशीनंतरचा जल्लोष अनेक प्रश्‍न उपस्थित करतो. फाशीनंतर इतका जल्लोष, ज्याचं खरं तर “उन्माद’ असं वर्णन करणं योग्य होईल – का केला गेला? कारण कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेला हल्ला हा देशावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला क्रूर हल्ला होता आणि त्यात 166 व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते तर 304 जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी मुंबई शहराला 60 तास वेठीस धरलं होतं. हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला होता आणि “देशाविरूद्ध युद्ध पुकारण्याचा’ आरोप कसाबवर होता. त्यामुळेच इतका आनंद व्यक्त केला गेला, अशी त्याची कारणमीमांसा दिली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी – म्हणजे 29 ऑगस्ट 2012 रोजी कसाबची फाशीची शिक्षा कायम केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुजरातमधल्या विशेष न्यायालयानं 2002 च्या तिथल्या दंगलीतल्या आरोपी असलेल्या भाजप आमदार माया कोदनानी, बजरंग दलाचे बाबू बजरंगी आणि इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोदनानींना 28 वर्षं, तर बजरंगींना आजन्म कारावास ठोठावला गेला. दंगलखोरांना माहिती दिल्याचा, तलवारी व इंधन पुरवल्याचा आणि पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचाही आरोप लोकप्रतिनिधी असलेल्या कोदनानींवर होता. या सामूहिक हत्याकांडामध्ये 35 मुलं, 32 महिला आणि 30 पुरुषांना ठार मारलं गेलं. 97 माणसं ठार मारण्यात कोदनानींची सक्रिय भूमिका होती, हे 11 साक्षीदारांनी त्यांच्याविरुद्ध दिलेल्या साक्षीमुळे आणि मोबाईलच्या नोंदींमुळं न्यायालयात सिद्ध झाले. ज्यांनी कसाबच्या फाशीनंतर जल्लोष केला, त्यांनी कोदनानी आणि इतरांना झालेल्या शिक्षेनंतर जल्लोष केला होता का? नसल्यास का? कोदनानींचं कृत्य हा “मानवतेविरुद्धचा गुन्हा’ नव्हता?

तो देशाच्या लोकशाहीवर आणि धर्मनिरपेक्षतेवर म्हणजे एका अर्थानं देशावर नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला हल्ला नव्हता? कसाब तर पाकिस्तानातून आलेला होता; पण गुजरात दंगलीतल्या अनेक सामूहिक हत्याकांडांपैकी एक हत्याकांड घडवून आणलेल्या कोदनानी केवळ भारतीयच नव्हत्या, तर आमदारही होत्या. कसाब केवळ चौथी शिकलेला; तर कोदनानी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतितज्ज्ञ डॉक्‍टर! पण दोघांचीही प्रेरणा “धर्मवाद’ हीच होती. त्यात धर्माच्या प्रेम, अहिंसा, त्याग, सहिष्णुता आदी शिकवणुकीकडं जाणूनबुजून दुर्लक्ष करून दुसऱ्या धर्माविरुद्ध द्वेष निर्माण केला जातो आणि त्याचा हेतू केवळ सत्ता हस्तगत करणं हाच असतो. मग त्यासाठी देशाचं, त्यातल्या लोकशाहीचं आणि हाडा-मांसाच्या जिवंत माणसांचं काही का होईना!

कसाबने हल्ला केला तेव्हा त्याचं वय अवघं 21 होतं. त्याआधी काही काळ त्याचं “ब्रेनवॉशिंग’ सुरू होतं आणि त्यात गुजरातमध्ये आणि भारतात इतरत्र कशा दंगली घडवल्या गेल्या, त्यात अल्पसंख्याकांवर कसे अत्याचार झाले, याबाबतच्या चित्रफितींचा मोठा वाटा होता. त्यातूनच धार्मिक द्वेष त्याच्या नसानसात भिनला होता, हे विसरून चालणार नाही. कोदनानींचं कृत्यही धार्मिक द्वेषानंच प्रेरित होतं; पण तरीही ते “आपलं’ आणि कसाब पाकिस्तानी असल्यामुळं त्यानं केलेलं हत्याकांड मात्र निषेधार्ह आणि त्याला फासावर लटकवणं योग्य अशी जल्लोष करणाऱ्यांची भूमिका आहे का? खरंतर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतला नागरिक या नात्यानं या दोन्ही घटनांचा सारखाच निषेध केला जाणं आवश्‍यक नाही का? कसाबनं “आपल्यां’ना मारले आणि ज्यांनी आपले सुहृद गमावले, त्यांचं दु:ख तर कधी भरून येणारं नाही, हे तर खरंच; पण मग गुजरात दंगलीत मारले गेलेले “आपले’ नव्हते का?
नसल्यास का नव्हते? त्यात ज्यांनी आपले सुहृद गमावले, त्यांचं दु:ख तरी कधी भरून येणारं आहे? मुळात “आपले’ आणि “परके’ हे ठरवायचं कशाच्या आधारावर आणि कुणी? कसाबचे भाईबंद पाकिस्तानात रोज अनेकांना मारत आहेत. तिथं मारणारे आणि बहुतांश मरणारे एकाच धर्माचे आहेत. जल्लोष करणाऱ्यांना त्याबद्दल दुःख वाटतं का आणि राग येतो का? नसल्यास का? भारतातल्या मालेगाव, अजमेर इत्यादी ठिकाणी घडवल्या गेलेल्या स्फोटांमध्ये कोदनानींचे भाईबंद आरोपी आहेत. त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाल्यावरही मिठाई वाटली जाणार आहे का?

कसाबला प्रत्यक्ष फासावर चढवण्यासाठी माजी जल्लादापासून ते काही पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत जसे अनेक जण उत्सुक होते, तसे गुजरात दंगलीतल्या आरोपींना उद्या मृत्युदंडाची शिक्षा झालीच तर त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठीही ते उत्सुक असतील? आणि तसं जाहीरपणे सांगायला ते तयार होतील? नसल्यास का? भाजपच्या महिला कार्यकर्त्या तेव्हाही फुगडी घालतील? दहशवाद्यांविरुद्ध वकीलपत्र घेतलेले प्रसिद्ध वकील गुजरात दंगलखोरांविरुद्धही वकीलपत्र मिळण्याची मागणी करतील? ज्यांना फाशी होईल, त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी उच्चरवात केली जाईल? खरं तर जगातल्या शंभरहूनही अधिक देशांनी मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी आणली आहे; पण भारतानं ती अद्याप आणलेली नाही. त्यामुळे गुजरातमधल्या दंगलखोरांना कदाचित ती होऊही शकेल. ती व्हावी असं सुचवण्याचा अजिबात उद्देश नसून, दहशतवाद्यांबद्दलच्या आपल्या भावना व मते आणि दंगलखोरांबद्दलच्या भावना व मते या दोन्हींमध्ये कसं जमीन-अस्मानाचं अंतर असतं आणि कसा दुहेरी न्याय असतो, याकडं इथं लक्ष वेधायचं आहे. राहिला प्रश्‍न प्रसारमाध्यमांचा. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमं “टीआरपी’ वाढवण्यासाठी वाट्टेल ते करत असतात आणि त्यावर चर्चाही होत असते. ती योग्यच आहे; पण या माध्यमांची स्पर्धा सुरू झाल्यापासून वर्तमानपत्रंही आपला सारासारविवेक गमावून बसली आहेत की काय, अशी शंका अलीकडं येऊ लागली आहे. कसाबच्या फाशीच्या घटनेचं ज्या रीतीनं वार्तांकन केलं गेलं, ते पाहता या शंकेला पुष्टीच मिळते. कोदनानी व इतरांना शिक्षा झाल्यानंतर काही वर्तमानपत्रांनी फक्त बातमी दिली; त्यावर कोणतंही भाष्य करण्याची तसदीही घेतली नाही. काहींनी भाष्य केलं; पण त्यावर पानंच्या पानं मात्र भरली नाहीत. गुजरात दंगलीत दहशतवादी हल्ल्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक माणसं मारली गेलेली आहेत, तरीही.

कसाबच्या खटल्यावरील खर्चाचा मुद्दा चवीनं चघळणाऱ्या माध्यमांनी, गेल्या दहा वर्षांत गुजरात दंगलीमुळं न्यायालयीन व्यवस्थेवर झालेल्या खर्चाबद्दल चकार शब्द काढलेला नाही. (मुळात तसा तो काढणे योग्यही नाही. कारण प्रत्येक आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेमार्फत बचावाची पूर्ण संधी मिळणं, हे लोकशाही व्यवस्थेचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यामुळे गुजरात दंगलीतल्या आरोपींसकट सर्वांनाच ती मिळाली पाहिजे). मग दंगल घडवण्याचे आरोप असलेली व्यक्ती इतकी वर्षं मुख्यमंत्रिपदी कशी काय राहू शकते आणि पंतप्रधानपदाची दावेदार कशी असू शकते, याबद्दल अथवा ‘दहशतवादी हल्ला चार वर्षांत निकाली काढण्याची तत्परता दाखवली जाते, ती दंगलींबाबत का दाखवली जात नाही?’ याची चर्चा घडवणं तर दूरच. एखाद्या “माणसा’ला फाशी दिले जाते, तेव्हा त्यावर जल्लोष करायचा की गंभीर होऊन, दहशतवाद मुळात निर्माणच का होतो?, “ते’ आणि “आपण’ हे विभाजन कोण आणि कशाच्या आधारे करतं?, ज्या कृत्रिम विभाजनामुळं निर्माण होणाऱ्या विद्वेषातून कसाब आणि कोदनानी यांनी हत्याकांडं घडवली, त्या विद्वेषाचा अंश आपल्याही मनात आहे का, हे प्रत्येकानंच तपासायची वेळ आता आली आहे. कसाब आणि कोदनानी यांनी धार्मिक विद्वेषातून अनेक बळी घेतले आणि नंतर ते स्वत:ही बळी गेले; कसाब फासावर लटकला, तर कोदनानी कारावास भोगत आहेत. हे लक्षात घेऊन लोकशाहीवादी व्यक्तींनी एकत्र येऊन विद्वेषाचं राजकारण करणाऱ्या सर्वच धर्मांमधल्या व्यक्तींचा मुकाबला केला पाहिजे.

– मिलिंद चव्हाण
(milindc70@gmail.com)

(‘रविवार सकाळ, ३० डिसेंबर २०१२’ च्या सौजन्याने)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *