रिहाई: आगळीवेगळी मुक्ती

“रिहाई” ही पाकिस्तानी मालिका. पाकिस्तानी समाजातील पुरुषप्रधान रचनेवर टीका करणाऱ्या या मालिकेचा उमा रानडे यांनी घेतलेला हा वेध…

reehai 2

रंजकता हा कोणत्याही कथेचा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या कथेतील घडामोडींचा प्रवास चित्ररुपात मांडला असता तो अनेक चढ-उतार असलेल्या आलेखासारखा दिसतो. ह्याच चढ उतरांमध्ये त्या कथेची रंजकता आणि नाट्य दडलेले असते. जर लेखणीत अथवा सादरीकरणात ताकद असेल तर आपण त्या नाट्याशी एकरूप होऊन जातो, त्या पात्रांशी संवाद साधू लागतो आणि त्या काल्पनिक प्रवासात सहभागी होतो. मात्र आपल्याला उत्सुकता असते ती “पण शेवटी…” काय होणार ह्याची.
ह्या “पण शेवटी…” मध्ये बरेच काही दडलेले असते. ह्याच “पण शेवटी…” मध्ये कधी नायक-नायिका जगाची तमा न बाळगता एकत्र येतात, कधी एखाद्या खुनाचे रहस्य उलगडते, कधी मनातल्या मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात, कधी २० वर्षांपूर्वी हरवलेले भाऊ एकमेकांना भेटतात, सासू सुनेतील गैरसमज मिटतात वगैरे… वगैरे. थोडक्यात त्या कथेला पूर्णविराम मिळतो.
इंग्रजीत “climax” म्हटला जाणारा हा भाग खूप महत्वाचा असतो कारण अनेकदा कथेतील सुरुवातीचा अथवा मधला भाग प्रेक्षकांच्या/ वाचकांच्या कितपत आणि कश्या प्रकारे लक्षात राहील हे ह्या “पण शेवटी”वर अवलंबून असते. बहुतांशी हा शेवट अगदी गोड-गोड आणि सुखद असतो आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तो प्रस्थापित वर्गाचे, विचारसरणीचे, चालीरीतींचे समर्थन करतांना दिसतो. विशेषतः कथांमधील स्त्री पात्रांचा विचार केला तर हे प्रकर्षाने जाणवते. सुरुवातीला धाडसी वाटणारी, स्वतःचे वेगळे विचार, वेगळे अस्तित्व असणारी, (कधी कधी इतरांना उर्मट वा उद्धट वाटणारी) कर्तबगार स्त्री कथेच्या शेवटी मात्र अतिशय पारंपरिक, चाकोरीबध्द भूमिकेत शिरताना दिसते. कधी स्वेच्छेने तर कधी नाईलाजाने तडजोड करणाऱ्या ह्या “त्यागमूर्ती” स्त्रीमुळेच बऱ्याच कथांचा शेवट गोड होताना दिसतो, पण कथेच्या प्रवाहात ते आपल्या लक्षात येत नाही. काही-काही मालिका मात्र या stereotypical “पण शेवटी…”ला छेद देतात, त्यातलीच एक “रिहाई” ही पाकिस्तानी मालिका. फरहत इश्तियाक़ लिखित, मेहरीन जब्बार दिग्दर्शित, हम tv वरची हि मालिका पाकिस्तानी समाजातील पुरुषप्रधान रचनेवर, बुरसटलेल्या विचारसरणीवर, रूढी परंपरांवर टीका करतांना आढळते.
ही कथा आहे एका गरीब कुटुंबातील तीन स्त्रियांची. वसीम हा त्या कुटुंबातला एकमेव, कमावता पुरुष. अतिशय अहंकारी, संतापी, पुरुषी असा हा वसीम घराण्याला वारस मिळावा म्हणून दुसरे लग्न करतो ते आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीशी. आई व पहिल्या बायकोचा, शहनाझचा विरोध असतानाही १२ वर्षीय ‘कुलसुम’ला बायको म्हणून वसीम घरी आणतो. लग्नाचा अर्थही न कळणारी ती भाबडी मात्र अजूनही त्याला “भाई” म्हणूनच हाक मारत असते. सुरुवातीला लहान बहिण मानून कुलसुमचे सगळे लाड पुरवणाऱ्या शहनाझला हळूहळू तिच्यात स्वतःची सवत दिसू लागते. पण चूक आपल्या नवऱ्याची आहे आणि आपल्याप्रमाणेच तो ह्या बिचाऱ्या मुलीवरही अन्याय करत आहे हे तिला पटलेले असते. कुलसुमवर होणारे अन्याय हळूहळू वाढत जातात कारण ती एकामागून एक ३ मुलींना जन्म देते. आता तर वसीमची अरेरावी, दांडगाई वाढतच जाते आणि तो तिसरे लग्न करतो. एकीकडे तिसऱ्या बायकोवर पैसे उधळत असतांना दुसरीकडे त्याची आई, दोन बायका आणि तीन मुली ह्यांवर फार हलाखीची परिस्थिती उद्भवते. ह्या सगळ्या प्रकाराला त्याची आई व शहनाझ आपापल्या परीने सतत विरोध करत असतात पण सर्वदृष्टीने वसीमवर अवलंबून असल्याने त्याही अखेरीस हतबल होतात. शेवटी सगळी हिम्मत एकवटून आणि आपल्या पहिल्या दोन सुनांना बरोबर घेऊन वसीमची आई त्याला घराबाहेर काढते आणि त्याच्याशी सर्व संबंध तोडते. त्यानंतर आलेल्या आर्थिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी त्या तिघी “कशफ़ फौंडेशन” ची मदत घेतात व घराच्या घरी शिवण कामाचा व्यवसाय सुरु करतात.
“कशफ़ फौंडेशन” ही १९९६ साली स्थापन झालेली पाकिस्तानमधील पहिली बचत गट संस्था. देशभरात दीडशेहून अधिक शाखा असणारी व आजपर्यंत पाच लाख कुटुंबांपर्यंत पोहोचलेली ही संस्था पाकिस्तानातील दुर्बल घटकांना, विशेषतः महिलांना लघु उद्योगाची संधी देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते. गेल्या सतरा वर्षात पाकिस्तानातील विविध भागात काम करताना भेटलेल्या स्त्रियांच्या व्यथा, प्रश्न, हालअपेष्टा ह्या खऱ्या कहाण्यांवर `रिहाई’ बेतलेली आहे.
`कशफ़’च्या सहाय्याने सुरु झालेल्या लघु उद्योगामुळे येणाऱ्या स्वावलंबनातून त्या तिघींमधला आत्मविश्वास वाढत जातो आणि आजूबाजूच्या वस्तीत त्यांना मानही मिळतो. आई शमीमने कुटुंबप्रमुखाची कामगिरी बजावायची, शहनाझने व्यवसाय करता करता कुलसुमच्या तीन मुलींची जबाबदारी घ्यायची तर धाकट्या कुलसुमने शालेय शिक्षण पूर्ण करत हिशेबाचे काम सांभाळायचे अश्या प्रकारे ह्या तीन बायकांचे व त्यांच्या तीन मुलींचे कुटुंब चालते. ह्या सर्व प्रवासात त्यांना साथ असते ती वसीमच्या दुकानात काम करणाऱ्या अक्मलची. मात्र त्याची साथ असली तरी त्या तिघी अक्मलवर अवलंबून नसतात हे विशेष.
रिहाई ह्या मालिकेत केवळ स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण केलेले नसून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या विविध मार्गांवरही प्रकाश टाकला आहे. अन्यायाचा प्रतिकार करणे कठीण असले तरी आवश्यक आहे आणि अनेक परिश्रमांनंतर का होईना पण त्यातून “रिहाई” म्हणजेच मुक्ती मिळू शकते हे ह्या कथानकातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. ह्या खडतर प्रवासात स्त्री व पुरुष दोघांचाही सहभाग असल्यास समाजात समानता प्रस्थापित होऊ शकते हे देखील सांगण्यात आले आहे. शिक्षण व आर्थिक स्वावलंबनाचा महिलांच्या सक्षमीकरणामध्ये असणारा महत्वाचा वाटाही येथे अधोरेखित करण्यात आला आहे. बालविवाह, मुलग-मुलगी यात केला जाणारा भेदाभेद, पुरुषप्रधान विचारसरणी आणि महिला सक्षमीकरण अश्या महत्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर हि मालिका भाष्य करते व प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्तही करते.
ह्या प्रभावी संहितेला उत्तम साथ लाभली आहे ती मेहरीन जब्बार ह्या प्रसिद्ध दिग्दर्शिकेची. मालिकेत सतत वापरलेले खिडक्यांचे गज, अंधाऱ्या खोल्या, खुराड्यात कैद असणाऱ्या कोंबड्यांची तडफड इत्यादी प्रतीकात्मक दृश्ये वापरून तिने त्या कुटुंबात आणि तशा प्रकारच्या समाज रचनेत अडकलेल्या तमाम स्त्रियांची घुसमट दर्शवली आहे. लिखाण व दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही रिहाईने बाजी मारली आहे. पण ह्या मालिकेचे खरे यश, त्या कथेची खरी ताकद दडली आहे ती त्याच्या शेवटात. १५ भागांची ही मालिका अनेक चढ उतारांनी भरलेली आहे. “पण शेवटी…”
शमीम, शेहनाझ आणि कुलसुम ह्या तिघींचे कुटुंब सुखासमाधानाचे दिवस अनुभवत असताना अचानक त्यांना वसीमचा ठावठिकाणा लागतो व पोलिसांबरोबर झालेल्या एका चकमकीत त्याचा पाय कापल्याची वार्ता कळते. ह्या बातमीने अस्वस्थ झालेली आई त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते आणि आपल्या अहंकारी मुलाला लहान बाळाप्रमाणे रडताना बघते. केवळ मायेपोटी आणि कर्तव्यापोटी ती वसीमला पुन्हा घरात घेते. वसीम मनासून आपल्या आईची माफी मागतो. पण तशा अपंग अवस्थेतसुद्धा आपल्या बायकांवर हुकुमत गाजवायची त्याची खुमखुमी काही जात नाही. आपल्याविना ह्यांचे फार काही अडलेले नाही हे त्याला कळून चुकते. उलट आपणच “बायकांच्या पैश्यावर जगतो” ह्या भावनेतून आणि स्वतःच्या अपंगत्वातून त्याचा पुरुषार्थ दुखावतो आणि आपल्या बायका-मुलांवर याचा राग काढायचा तो प्रयत्न करतो.
त्यावेळी आई त्याला त्याच्या सर्व जुलमांची, अन्यायांची आठवण करून देते. “दुसरे लग्न करणे हा इस्लाम धर्माने मला दिलेला अधिकार आहे” ह्या त्याने लावलेल्या धर्माच्या सोयीस्कर अर्थावर टीका करते आणि आपल्या सुनांनी केलेल्या कष्टाची त्याला जाणीव करून देते. “तुला अल्लाने वाचवले आहे ते ह्या दोन निष्पाप बायकांची हात जोडून माफी मागण्यासाठी, त्यांच्या अंगावर हात उगारण्यासाठी नाही. तुला माझा मुलगा म्हणायची देखील मला लाज वाटते, पण आई म्हणून माझा नाईलाज आहे…” अश्या शब्दात ती वसीमला सुनावते व त्याला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते.
मानत उठलेल्या विचारांच्या, आठवणींच्या वादळाने अस्वस्थ होऊन शेवटी वसीमला आपल्या गुन्ह्यांची जाणीव होते. तो हात जोडून शहनाझ व कुलसुमची माफी मागतो. वसीमशी कोणतेही भावनिक नाते नसलेली कुलसुम त्याला माफ करते पण मोठी शेहनाझ “इतना बडा दिल नहीं है मेरा…” म्हणत त्याच्यावर अविश्वास दर्शवते. त्यामुळे आपल्या गुन्ह्यांचे प्रायश्चित्त केवळ माफी मागून होणार नाही हे त्याला कळून चुकते.
वसीम आपल्या तीनही मुलींचा स्वीकार करून शहनाझशी संसार करायचा निर्णय घेतो. तरुण कुलसुमला तो कायदेशीर घटस्फोट देतो व तिच्यावर प्रेम करणाऱ्या तरुण अक्मलशी तिचे लग्न लावून द्यायचे आश्वासन देतो. अनेक महिने दोघींच्या मनात घोळत असणाऱ्या कुलसुम-अक्मलच्या विवाहाला वसीमनेच संमती दिल्यामुळे शमीम व शहनाझ दोघी खूष होतात आणि ह्या निर्णयाने भांबावलेल्या कुलसुमची समजूत काढतात.
एकीकडे धर्माचा चुकीचा आधार घेऊन दुसरे लग्न करणाऱ्या पुरुषांवर स्पष्टपणे टीका करताना दुसरीकडे ही मालिका “तलाक” म्हणजेच घटस्फोटाकडे देखील वेगळ्या नजरेने पाहताना दिसते. “ये तलाक, तलाक नहीं है, रिहाई है तेरी..” असे म्हणत जुना नावापुरताच असलेला संसार मोडला याचे दु:ख न करता घटस्फोटामुळे तुझी “रिहाई” होते आहे, तुला मुक्ती मिळाली आहे आणि तुझे आयुष्य पुन्हा वेगळ्या प्रकारे (स्वेच्छेने) जगण्याची एक संधी मिळाली आहे असा स्पष्ट संदेश शहनाझ व कुलसुम ह्यांच्यातील संवादातून लोकांपर्यंत पोहोचतो. कुलसुमचे अक्मलशी लग्न लावल्यानंतर शहनाझही वसीमला माफ करते व दोघे कुलसुमच्या तीनही मुलींचा प्रेमाने स्वीकार करतात.
वसीमच्या स्वभावातील ह्या सकारात्मक बदलाच्या मुळाशी जरी अपराधीपणाची भावना असली तरी कथेच्या शेवटापर्यंत त्याचे प्रामाणिक मतपरिवर्तन होताना दिसते. १२ वर्षीय मुलीशी लग्न करणारा वसीम आता मात्र आपल्या मुलीच्या शिक्षणाला पूर्ण पाठींबा देतो. एकेकाळी आई व बायकोवर हात उचलणारा तो आता त्यांना शिवण कामाच्या व्यवसायात मदत करू लागतो.
“All is well that ends well” म्हणताना आपण त्या “well” ची व्याख्या काय करतो ते खूप महत्वाचे आहे. अनेकदा ही व्याख्या अतिशय पारंपरिक चौकटीतच केली जाते. पण रिहाई ह्या कथेचा शेवट सुखद होतो तो वसीम ह्या अत्यंत अहंकारी, पुरुषी, जुलमी पात्राच्या मत व स्वभाव परिवर्तनामुळे.
उत्तम संहिता, स्पष्ट विचार आणि प्रभावी सादरीकरणाने ह्या मालिकेने “रिहाई” ह्या शब्दाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले आहेत. आणि दु:ख, दारिद्र्य, लाचारी, भीती, अन्याय, पुरुषी दादागिरी आणि मुख्य म्हणजे मानसिक- भावनिक कुचंबणा ह्या सर्वातून कुलसुम, शहनाझ, शमीम आणि कुटुंबातल्या लहान तीन मुली या सगळ्यांचीच रिहाई होताना दाखवली आहे. स्त्री पुरुष समानतेचा विचार ठळकपणे मांडत ह्या मालिकेने पारंपारिक “पण शेवटी…” पासून प्रेक्षकांचीसुद्धा रिहाई केली आहे.
मालिका बघत असताना आपल्याकडील स्त्री मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या शहनाझ शेख आणि गीता महाजन लिखित एका गाण्यातील खालील ओळी आठवतात.
“तू चूप रह कर जो सहती रही, तो क्या ये जमाना बदला है,
तू बोलेगी, मुह खोलेगी, तब ही तो जमाना बदलेगा,
तू खुदको बदल, तू खुदको बदल तबही तो जमाना बदलेगा…”

-उमा रानडे

(‘प्रेरक ललकारी, ऑगस्ट २०१३’च्या सौजन्याने)

1 thought on “रिहाई: आगळीवेगळी मुक्ती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *