‘ठष्ट’च्या निमित्ताने

`ठष्ट’ म्हणजे ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. गोष्ट आपल्या चांगलीच परिचयाची आहे. पुराणातल्या शूर्पणखा, शकुंतला, कुंती – लग्नाच्या बाबतीत अयशस्वी ठरलेल्या किंवा अव्हेरले गेल्याचा राग उराशी बाळगणाऱ्या स्त्रिया. इतके मागे जायचे नसेल तर सतराव्या शतकात महाराष्ट्रातील जांब गावात शुभमंगल सावधान ऐकताच पळून गेलेले आणि पुढे संत म्हणून नावारुपास आलेले रामदास स्वामी यांच्या लग्नाची गोष्टसुद्धा `ठष्ट’मध्येच मोडते. मोडलेल्या लग्नाची अर्वाचीन महाराष्ट्रातील ही सुपरिचित घटना. नवरामुलगा भर मांडवातून पळून गेल्यावर बोह्ल्यावरच्या मुलीचे पुढे लग्न झाले किंवा नाही याबद्दल प्रवाद असले तरी ठरलेले लग्न मोडल्याबद्दल तिलाच बोलणी खावी लागली असतील, इतके नक्की. त्याहीपेक्षा अलिकडचे उदाहरण हवे असेल तर आपल्या परिचितांत, नातेवाईकांत किंवा किमान ऐकिवात तरी अशी एखादी ठरलेले लग्न मोडलेली व्यक्ति सहज सापडेल. लग्न मोडल्याचे कारण काहीही असले तरी त्याचा त्रास लग्नाळू मुलीला जास्त आणि मुलग्याला कमी होतो, हे मात्र वास्तव आहे.

हेच वास्तव ठाशीव आणि काही वेळेस अंगावर येईल अशा टोकदार पद्धतीने संजय पवार लिखित-दिग्दर्शित `ठष्ट’नाटकात मांडले आहे.अनामिका, अक्षता आणि सुलभा या वेगवेगळया कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या तीन मुलींची गाठ पडते ती एका महिला वसतिगृहात. नोकरी करणाऱ्या महिलांच्या या वसतिगृहात ३०२ क्रमांकाची खोली बदनाम आहे, कारण इथे राहिलेल्या मुलींचे कधीच लग्न होत नाही किंवा ठरलेले लग्न मोडते, असा समज आहे. वसतिगृहाच्या सुपरवायझर शिंदेबाई आणि खोल्यांची साफसफाई करणारी कावेरी या दोघींचा यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे या खोलीतली एखादी जागा रिकामी असली तरी लग्न न झालेल्या मुलीने अजिबात या खोलीत राहू नये असा सल्ला त्या नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींना देतात. अनामिका, अक्षता आणि सुलभा मात्र या खोलीत गेली तीन वर्ष राहत आहेत. त्यांची एकमेकींशी घट्ट मैत्री आहे आणि आपले लग्न होत नाही याची त्या तिघींना फारशी खंत नाही. मूळच्या पुण्याच्या असलेल्या अनामिकेने जाणीवपूर्वक लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे;ती मुंबईत नोकरी करते. सारखं-सारखं दाखवून घेणं, चहा-पोहे करणं आणि आपल्यापेक्षा सर्वार्थाने कमी असलेल्या मुलासमोर केवळ मुलगी म्हणून पडते घेणं याला कंटाळून अक्षता नाशिकहून मुंबईत आली आहे. ती एका दूरदर्शन वाहिनीची उपाध्यक्ष आहे आणि आता लग्न करायचे नाही, असे तिने ठरवले आहे.तर सुलभा ही साताऱ्याजवळच्या एका खेड्यातून नाईलाजास्तव नोकरीसाठी मुंबईत आलेली आहे; तिची खरं तर सरळसाधा संसार करून गावात राहायची इच्छा आहे. पण तिच्या सावळ्या रंगामुळे आणि धाकट्या दोन बहिणींच्या जबाबदारीमुळे तिच्याशी लग्न करायला कोणीही तरुण तयार होत नाही. अनेकदा ठरलं-ठरलं वाटत असताना लग्न मोडल्यामुळे आता सुलभाला लग्न या गोष्टीचा तिटकारा यायला लागला आहे. वसतिगृहात यायच्या आधीच लग्न ठरलेली प्रीती ही खोली क्रमांक ३०२ मधली नवीन सभासद. प्रीतीने ३०२मध्ये राहू नये असा जोरदार प्रयत्न शिंदेबाई आणि कावेरी करतात, पण स्वतंत्र विचारांची प्रीती याच खोलीत राहायचा निर्णय घेते आणि तीन महिन्याच्या आत तिचे ठरलेले लग्न मोडते. प्रीती आपलं लग्न स्वखुशीने मोडते, पण तसं ठामपणे मांडू शकत नाही. खोली क्रमांक ३०२ वरचा ठपका वाढत जातो.

हेमांगी कवी या गुणी अभिनेत्रीचा सुलभा म्हणून सबंध नाटकभर एक आश्वस्त वावर आहे. सुलाभाच्या धाकट्या दोन बहिणी दहावी आणि बारावी पास झाल्यावर गावात त्यांच्या लग्नाची खटपट सुरू होते आणि घाबरून त्या इवल्याशा १५-१६ वर्षाच्या मुली आत्महत्या करतात. धाकट्या दोन्ही बहिणींची प्रेतं बघून सुलभा उन्मळून पडते आणि मुलींच्या मृत्यूचे काही सोयरसुतक नसलेल्या आई-वडिलांचा खून करते. आपल्यापेक्षा आपल्या धाकट्या भावावर आई-वडील केवळ तो मुलगा आहे म्हणून जास्त प्रेम करतात या उद्विग्नतेने ती त्यालाही मारून टाकते आणि अखेरीस स्वत: मृत्यूला कवटाळते. ३०२ वरचे अपयशाचे सावट नाटक संपेपर्यंत गडद होत जाते आणि या सगळ्याचा संबंध मुलींची अयोग्य पद्धतीने होणारी किंवा मोडणारी लग्ने आहेत असा निष्कर्ष काढून नाटक संपते. संजय पवार यांच्या विचारांशी आणि लेखनाशी परिचित असलेल्या प्रेक्षकांना मात्र नाटकात यापेक्षाही ठोस विचारांची अपेक्षा असते आणि थोडा अधिक विचार केला तर नाटककाराला नक्की काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येते.

सुलभा, अक्षता किंवा प्रीती यांनी आपल्या न होणाऱ्या लग्नाचा नाईलाजाने स्वीकार केला आहे तर अनामिकेचा अविवाहित राहण्याचा निर्णय तिचा स्वत:चा आहे आणि तो कोणत्याही जुन्या घटनेचा परिपाक नाही. कोणत्याही स्त्रीने आपल्या आयुष्याचे निर्णय स्वत:च घ्यावेत आणि तिच्या शरीरावर तिचा पूर्ण हक्क आहे, हे अनामिका संपूर्ण नाटकभर मांडत राहते. ही मांडणी करताना ती कधीच आक्रस्ताळी होत नाही किंवा टोकाला जात नाही, पण तरीही तिच्या तोंडातली भाषा अनेकदा प्रेक्षकातील मध्यमवर्गीय जाणीवांना हादरा देत राहते. गेल्या काही वर्षांत मुंबई-पुण्यासारख्या शहरात मुलींना मुलग्यांइतकेच स्वातंत्र्य काही घरात दिले जाते. अशा मुक्त विचारांच्या मुली अशाच बोलतात की काय? किंवा आपलीही मुलगी मित्र-मैत्रिणींशी बोलताना अशीच बोलत असेल का, असे प्रश्न साहजिक तरुण मुलींच्या पालकांच्या मनात नाटक बघताना येतात. पण अनामिकेचे मुद्दे खोडून काढता येणार नाहीत, इतके स्पष्ट व ठाशीव आहेत. अनामिका या पात्राच्या तोंडून अनेकदा लेखक बोलतो आहे, असे वाटते. त्यामुळे `ठष्ट’ म्हणजे केवळ ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट राहत नाही, ती स्त्रियांच्या लैंगिक अधिकाराची गोष्ट होते.

स्त्रियांचा लैंगिक व्यवहार किंवा लैंगिक स्वातंत्र्य आणखी किती काळ आपण लग्नसंस्थेच्या दावणीला बांधणार आहोत, हा महत्त्वाचा प्रश्न नाटक उपस्थित करते. ठरलेले लग्न मोडणे म्हणजे स्त्रीच्या लैंगिक कुचंबणेची नांदी असते. लग्न ठरलेली मुलगी जशी आपल्या नव्या संसाराची स्वप्ने बघते, तशीच ती आपल्या नव्याने फुलणाऱ्या रात्रींची पण स्वप्ने बघत असते. लग्न मोडल्यानंतर आजूबाजूच्या सर्व घटकांची चर्चा होते, पण आपल्या रात्रींच्या मोडलेल्या स्वप्नांचे काय करायचे, आपल्या शरीरातील तारुण्यसुलभ भावनांचे काय करायचे, याबद्दल त्या मुलीला कुठेच मोकळेपणी बोलता येत नाही. आजकाल काही विवाहमंडळे विवाहपूर्व समुपदेशन करतात, पण लग्न ठरतच नसेल किंवा ठरलेले लग्न काही ना काही कारणाने मोडत असेल तर तरुण मुला-मुलींनी काय करायचे हे सांगणारी समुपदेशनकेंद्रे आपल्याकडे नाहीत. आजतरी भारतीय समाजात लग्न न झालेल्या सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियांना आपल्या लैंगिक गरजांची पूर्तता करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. उच्च-अतिउच्च आर्थिक स्तरातील स्त्रियांना असे काही पर्याय हाताशी असतात, पण त्याचे प्रमाण एकूण स्त्रीवर्गाच्या तुलनेत फारच नगण्य आहे. स्त्रीच्या स्वत:च्या म्हणून काही लैंगिक गरजा असतात असे मानायला अजून आपला समाज तयार नाही. स्त्रीने आपल्या लैंगिक गरजांची वाच्यता करणे म्हणजे जणू काही आभाळ कोसळले, मुलगी वाया गेली, असेच अजून आपल्याकडे मानतात. त्यामुळेच जेव्हा `ठष्ट’मधली अनामिका स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार करते, तेव्हा अनेक प्रेक्षक `ही स्त्री-मुक्तीवाली’ किंवा `स्त्री-वादी’ दिसतेय असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सुलभाच्या शोकांतिकेपाशीच घुटमळत राहतात.

स्त्री-पुरुष समानतेला वरवरची मान्यता देणारे सगळेच स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा विषय आला की भारतीय परंपरेचे, सामाजिक स्थितीचे बागुलबुवे उभे करून या प्रश्नापासून पळ काढतात. जे स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात आहेत, त्यांना तर स्त्रियांची लैंगिक गरज अशी काही गोष्ट असते, हेच मुळात मान्य नाही. स्त्रियांच्या सर्व गरजा (त्यात अर्थात लैंगिक गरजेसुद्धा समावेश होतो) या पुरुषवर्गाने ठरवायच्या, असे काहीतरी अजब तर्कट आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या बायकोने किंवा मुलीने बारीक होण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये, कोणता व्यायाम करावा, तो किती वेळ करावा, कोणत्या नव्या कला शिकाव्या, कोणत्या शेजाऱ्यांशी जास्त बोलावे, नोकरी कुठे करावी, कोणाशी मैत्री करावी, कोणापासून चार हात लांब राहावे, तिने कोणते कपडे घालावे, कपड्यांचे गळे किती खोल असावे, कपडे किती तंग असावे,असे सगळे रोजच्या व्यवहारातले निर्णय घरातले पुरुषच घेणार. तिने स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायची हिंमत दाखवली तर ती लगेच अगोचर वगैरे ठरते. शिवाय तिला किती लैंगिक सुखाची गरज आहे, हेसुद्धा पुरुषच ठरवणार. पुन्हा हे लैंगिक सुख तिने कोणापासून मिळवावे याचे नियमसुद्धा अगदी पक्के. म्हणजे तिचा नवरा जास्त शिकलेला हवा, संस्कारी हवा, बऱ्यापैकी पैसेवाला हवा, वगैरे….वगैरे. लैंगिक सुख वगैरेचा विचार नंतर करता येईल, ही लग्नाळू मुलींच्या पालकांची मानसिकता. अशा संस्कारात वाढलेल्या आपल्याकडच्या मुलींना`माझ्याही काही लैंगिक गरजा आहेत’, असे आई-वडिलांना सांगण्याची सोय आहे का? आज अनेक तरुण-तरुणी स्वखुशीने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात, पण त्यांच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी ते काय करत असतील, असा प्रश्न आपण एक जागरूक समाजघटक म्हणून स्वत:ला विचारतो का? `पुरुष करतातच काहीतरी’ अशी आपल्याच मनाची थातुरमातुर समजूत करून घेत असताना, मुली यातून कसा मार्ग काढत असतील, हे जाणून घ्यायची निकड आपल्याला भासते का? की आपलाही स्त्री-पुरुष समानतेचा विचार केवळ आपल्या सोयीपुरता आहे? म्हणूनच तरुण मुला-मुलींच्या पालकांनी आवर्जून बघावे, असे हे नाटक आहे.

संवाद आणि विचार यांना जास्त महत्त्व असल्यामुळे नाटकाचे नेपथ्य अगदी साधे आहे. वसतीगृहातील ३०२ क्रमांकाची थोडीशी अस्ताव्यस्त असलेली खोली हीच सतत प्रेक्षकांच्या नजरेसमोर असते. पण सगळ्याच कलाकारांचा उत्कृष्ट आणि सहज-सुंदर अभिनय ही नाटकाची जमेची बाजू. यातली प्रत्येक व्यक्तिरेखा अस्सल आणि परिचयाची आहे. नाटकाच्या शेवटचे अनामिकेचे एक वाक्य मात्र एक स्त्री-वादी म्हणून खटकले. ते म्हणजे, `सुलभाच्या प्रकरणाने मी खचले नाही, अधिक खंबीर झाले’. अशा प्रकारे खंबीर होण्यासाठी आणखी किती मुलींचे जीव जाण्याची आपण वाट पाहणार आहोत? ही भूमिका स्त्री-चळवळीला घातक आहे. सर्वच पातळीवर मुलींचे जीव वाचण्यासाठी चळवळीने प्रयत्न चालवले आहेत, त्यांच्या गेलेल्या जीवावर चळवळ खंबीर होत नाही. नाटकातल्या स्त्री-स्वातंत्र्याच्या विचाराला या एका वाक्याने गालबोट लावले आहे.

नाटकाचे निर्माते `दि ग्रेट मराठा इंटरटेनमेंट’ यांनी गेल्या वर्षी `काकस्पर्श’ या सिनेमाची निर्मिती केली होती. सर्व माध्यमांमध्ये या सिनेमातल्या अभिनयाची किंवा निरपेक्ष प्रेमाची वगैरे येथेच्छ प्रशंसा झाली, पण विधवांची लैंगिक कुचंबणा या मुख्य विषयाची फारच कमी ठिकाणी चर्चा केली गेली. `ठष्ट’च्या निमित्ताने `दि ग्रेट मराठा इंटरटेनमेंट’ने स्त्रियांच्या लैंगिक कुचंबणेचा आणखी एक कंगोरा प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची लैंगिक कुचंबणा फार मोठी असते आणि अजून तरी त्यावर काही उपाय शोधावा अशी निकड आपल्याला वाटत नाही. लग्नामुळे दोन कुटुंबे एकत्र येतात, दोन जीवांचे मिलन होते वगैरे आपण ऐकतो, पण मुळात लग्नामुळे दोन भिन्नलिंगी शरीरे एकत्र येतात आणि जर लग्नच होत नसेल तर त्यांनी आपापल्या शारीरिक गरजा कशा भागवायच्या? इतका साधा मुलभूत विचार `ठष्ट’ने लोकांसमोर मांडला आहे, त्याला मोकळेपणाने सामोरे जायचे धैर्य आपण दाखवायला हवे.

– योगिनी राऊळ

(‘प्रेरक ललकारी, ऑक्टोबर २०१३’च्या सौजन्याने)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *