कथा एका मेहजबीनची…

श्रीवर्धन तालुक्यातील एका स्थानिक पत्रकाराचा फोन आला, एका गंभीर प्रकरणाबद्दल बोलायचंय. त्यांना बोलावून घेतलं. पत्रकार मकसूदभाई आपल्यासोबत एका मध्यमवयीन गृहस्थांना घेऊन आले. प्रश्न त्यांच्या भाचीचा होता.

१६-१७ वर्षांची मेहजबीन (नाव बदललं आहे) श्रीवर्धन जवळच्या आरावी गावातील. तिच्यावर श्रीवर्धनमधील काही मुलांनी तिला ब्लॅकमेल करत अत्याचार केले होते आणि नंतर तिला फूस लावून मुंबईत नेऊन विकलं होतं. दोन महिने मुलगी गायब होती. त्यानंतर ती योगायोगाने सापडली. पण सापडल्यानंतरही पोलीस स्टेशनला हा सर्व प्रकार कळल्यावरदेखील पोलिसांनी गुन्हाही नोंदवला नव्हता, वा या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा केला नव्हता. थोडक्यात ही कहाणी ऐकल्यावर माझा खरं तर विश्वास बसला नाही. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश महिला अत्याचारविरोधी चर्चेने ढवळून निघाला असताना श्रीवर्धन पोलीस स्टेशन इतक्या गंभीर प्रकरणाची दखलही घेणार नाही यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्या मुलीशी बोलणं आवश्यक होतं.

आम्ही, त्याच दिवशी संध्याकाळी आरावीमध्ये जाऊन त्या मुलीला भेटायचं ठरवलं. चारच्या सुमारास आम्ही आरावीत पोचलो. मुश्ताक अलींचं (नाव बदललं आहे) घर सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाचं. मी, चंद्रकांत गायकवाड, राजेश खैरे, लक्ष्मण जाधव, तिवारी भाभी, शांताताई असे सर्वच एकत्र तिथे पोचलो. त्या मुलीशी बोलण्याच्या दृष्टीने पुरुष कार्यकर्त्यांनी बाहेर थांबावं असं ठरलं.

मेहजबीनला बाहेर आणण्यात आलं. मुश्ताक अली हे तिचे मामा, मेहजबीनला तिच्या आईने बाहेर आणून बसवलं. डोक्याला ओढणी गुंडाळलेली मेहजबीन अगदीच कोवळी, निरागस दिसत होती, खूप बावरलेली, चेहरा जवळपास थिजलेला, डोक्यात शून्य भाव… खूप सोसल्याने आलेला बधीरपणा जाणवत होता. तिला हाताला धरून जवळ बसवलं. पाठीवर हात ठेवला. तिला विचारलं सगळं सांगशील ना? घाबरू नको, बराच वेळ धीर दिल्यानंतर ती बोलती झाली. पण तेही तुकड्या-तुकड्यात. मध्येच ती पुन्हा बधीर होऊन जायची. आमच्याकडे बघणार्या तिच्या नजरेत खूप अविश्वास होता. ती अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेली नव्हती. पण तिने जवळपास दोन तासांच्या कालावधित सांगितलेली तिची कहाणी अशी…

ती नऊवीत असताना आरावीतून श्रीवर्धनला सहा आसनी रिक्षातून जायची. तिच्या गावातून या शाळेत जाणारी ती एकटीच. तिचे आईवडील शेखाडी गावात रहातात. ती मात्र लहानपणापासून मामाकडेच वाढली. या शेखाडी गावातील एका मुलीने तिला मोबाईल आणून दिला आणि या फोनवरून एक नंबर फिरवून दुसर्या मैत्रिणीशी बोलण्यास सांगितलं. मेहजबीनने आधी नकार दिला. पण तिने अनेकदा मागे लागल्यावर एकदा बोलायचं धाडस केलं. फोनवर पुरुषाचा आवाज होता. जुजबी बोलून तिने फोन ठेवला. पण हे पुन्हा एक दोनदा झालं. मग तो पुरुष तिच्याशी सहा आसनी रिक्षा स्टँडवर येऊन बोलू लागला. सुरुवातीला गोड गोड बोलून त्याने तिच्याशी ओळख वाढवली. तिला खाऊ घेऊन देऊ लागला. मग समुद्रावर न्यायचं निमित्त करून त्याने तिला एकदा हॉटेलमध्ये नेलं, कोल्ड्रिंक पाजलं. आणि मग हळूहळू पुढचं पाऊल उचललं. तिला रूममध्ये नेऊन तिच्यावर लागोपाठ दोघांनी बलात्कार केला. आणि मग तिला अनेक मार्गांनी ब्लॅकमेल करत हा प्रकार चालू राहिला. त्यांच्या इतर मित्रांनाही ही माहिती मिळाली. ६-७ जणांनी तिला धमकावून मारण्याची भीती घालून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. मेहजबीन भीतीपोटी गप्प राहिली. कुणाशी बोलावं, हे सांगावं, तक्रार करावी एवढंही धाडस अंगात राहिलं नाही. आई, वडील परिस्थितीने गांजलेले. मामाची परिस्थिती चांगली. पण बोलण्यासाठी तिला कोणाचाही आधार पुरेसा वाटला नाही. ती पुन्हा पुन्हा या टोळक्याच्या अत्याचाराचा बळी होत गेली. मग तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा तो फसला.

तिला मुलं त्रास देतात ही बातमी पुसटशा स्वरूपात मामापर्यंत पोचली. त्यामुळे शाळा बंद झाली. मात्र घरी निरोप येणं थांबलं नाही. त्याच मैत्रिणीद्वारे मोबाईल पाठवून तिला बोलावणं, धमकावणं सुरू राहिलं. एकदा तिला बाहेर बोलावून रोडवरून तिला मोटरसायकलवरून पळवण्यात आलं. म्हसळ्यात नेऊन तिला एसटीमध्ये बसवण्यात आलं. यावेळी एसटीमध्ये चार महिलांच्या ताब्यात तिला देण्यात आलं. ती रडत असताना एसटीतील अन्य प्रवाशांनी चौकशी केली. पण काहीतरी कारण देऊन त्या महिलांनी त्यांना गप्प बसवलं. एसटीमध्ये या विभागातील एक गुंड प्रवृत्तीचा तरुणही होता. त्यानेच हा प्लॅन रचला होता. त्या एसटीने मुंबईला नेऊन त्याने मेहजबीनला एका माणसाला विकलं. तारीख होती ११ जून २०१३. तिच्या मामांनी श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार नोंदवली.

दुसर्याच दिवशी तिला विकणारा तरुण श्रीवर्धनमध्ये परत आला. आणि त्याच्या दारू पिणार्या टोळक्यात याबाबत बढाईने सांगत असताना योगायोगाने त्या ग्रूपमध्ये मेहजबीनचा चुलत भाऊ पण होता. त्याने हे ऐकताच मुश्ताक अलींना ताबडतोब कळवलं. त्यांनीही पोलीस स्टेशनला धाव घेतली. याबाबत तक्रार दिली. पण पोलिसांनी त्याला बोलावून जुजबी चौकशी करून सोडून दिलं. मेहजबीनला ज्या मोबाईलवर निरोप येत, जो ती घरीच ठेवून बाहेर पडली होती. त्या मोबाईलसह सर्व कॉलसचे रेकॉर्ड मुश्ताक अलींनी पोलिसांना दिले. मात्र पोलिसांची सुस्ती चालूच राहिली.

मेहजबीनला मुंबईच्या रेड लाइट एरियात नेण्यात आलं. तिथून १५ दिवस म्हैसूर, मग पुन्हा मुंबई, पनवेल, गोवंडी इथे शरीरविक्रय करण्यास भाग पाडण्यात आलं. १७ वर्षांची कोवळी मेहजबीन क्रूर पद्धतीने फसवण्यात आली. तिला पट्ट्याने मारहाण करण्यात येई. जबरदस्तीने दारू पाजण्यात येई.

परंतु एकदा तिला पनवेलहून सँडहर्स्ट रोडला ट्रेनने नेण्यात आलं असता त्याच स्टेशनवर तिचे मामेभाऊ होते. त्यांनी तिला पाहिलं आणि तिचा हात धरून ठेवला. त्यांनी आरडाओरड करताच तिच्याबरोबरच्या स्त्रिया पळाल्या.

तिला श्रीवर्धनला परत आणलं तेव्हा ती प्रचंड दबावाखाली होती, घाबरलेली होती. त्यामुळे त्याच दिवशी ती काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिला कोर्टासमोर आणि त्यानंतर बालकांसाठी असलेल्या कृती समितीच्या महिला सदस्यांसमोर नेण्यात आलं. पण श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये तिचा जबाब त्रोटक पद्धतीने नोंदण्यात आला. त्यावेळी फक्त इन्स्पेक्टर आणि एक हवालदारच हजर होते. तिच्या आईला नि अन्य कुटुंबीयांना तिच्याबरोबर थांबू देण्यात आलं नाही. मेडिकल तपासणीदेखील अत्यंत जुजबी करून तिला घरी पाठवण्यात आलं. ही घटना ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यातली. मात्र त्यानंतर आम्ही तिथे जाईपर्यंत म्हणजे २४ सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी जवळपास महिनाभर कोणतीही कारवाई केली नाही. सर्व गुन्हेगार मोकाट राहिले.

या सर्व प्रकारात पोलिसांऌची भूमिका अत्यंत शंकास्पद आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारीच राहिली. मेहजबीनचे मामा मुश्ताक अली यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पोलिसांची उदासीन भूमिका पाहिल्यानंतर त्यांची निराशा वाढत गेली. त्यांनी पोलिसांचा नाद सोडला. पण इतर मार्गांनी प्रयत्न चालू ठेवले. आमच्यापर्यंत ते याच प्रयत्नांतून पोचले.

पोलीस मात्र त्यांना आता तुमची मुलगी मिळाली ना? मग आता काय? याच भाषेत बोलत होते. श्रीवर्धन पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जागा रिकामीच आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हेच सध्या इथे जबाबदार अधिकारी आहेत. त्यांची या प्रकरणातील भूमिका दिरंगाईची आणि शंकास्पद राहिली हे निश्चित. मुलगी सापडल्यानंतर महिना उलटून गेल्यावरही तिचा जबाब घेण्यासाठी वा सदर केससंबंधी तपास करण्यासाठी पोलिसांनी कोणताही पुढाकार घेतला नाही. एवढंच नव्हे तर मेहजबीनच्या म्हणण्यानुसार तिचा जबाब श्रीवर्धन पोलीस स्टेशनने घेताना दुपारी दोन ते रात्री उशिरापर्यंत तिला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं. त्यापैकी फार तर तासभर महिला दक्षता समितीच्या सदस्या तिथे हजर होत्या. उरलेला सर्व वेळ इन्स्पेक्टर गायकवाड आणि कॉन्स्टेबल ठमके हे दोघंच तिचा जबाब घेत होते. आणि ती जे सांगत होती, त्यापैकी काहीही पोलिसांनी नोंदवून घेतलं नाही. फक्त तिने एक विनंती पोलिसांनी केली की, मामांना सांगा मला मारू नका. यावरून पोलिसांनी मामा, मामी मारतात म्हणून ती पळाली असा निष्कर्ष काढला. हे सर्व अत्यंत संतापजनक होतं. तिचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब श्रीवर्धन पोलीस स्टेशन गाठलं.

इन्स्पेक्टर गायकवाड यांच्याशी पहिलीच झकापक झाली. पोलिसांनी एवढा वेळ काय केलं? तपास का केला नाही या प्रश्नावर ते म्हणाले, ’मुलगी बोलेल तेव्हा आम्हाला सांगा असं आम्ही मुश्ताक अलींना सांगितलं होतं. तेच आले नाहीत.‘ प्रत्यक्षात मुश्ताक अलींना अनेक वेळा टोलवण्यात आलं होतं. ताब्यात घेतलेल्या मोबाईलवरून नंबर काढून त्याचाही तपास पोलिसांनी केला नव्हता.

त्या दिवशी रात्र झालेली असल्याने मुलीचा जबाब ताबडतोब घेण्याचा आम्ही आग्रह धरला नाही. दोन दिवसानंतर तिचा जबाब घ्यावा आणि गुन्हा नोंदवावा असं आम्ही मांडलं. तोपर्यंत मुलीशी बोलून आम्ही तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये निर्माण झालेला तणाव निवळावा यासाठी मुलीची आई, मामा, मामी, तिची भावंडं, शेजारीपाजारी या सार्यांशी संवाद साधला.

दुसर्या दिवशी प्रसारमाध्यमांनी या प्रश्नाला प्रसिद्धी दिल्यानंतर मात्र जिल्हा पोलीस अधिक्षक जागे झाले आणि त्वरित महिला पोलीस इन्स्पेक्टर तिचा जबाब घेण्यासाठी पाठवण्यात आल्या.

दोन तीन दिवसानंतर आमच्या अपेक्षेनुसार घरातील वातावरण निवळलं. मग आम्ही तिथे पोचलो तेव्हा संपूर्ण आरावी गाव त्या मुलीच्या आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यासाठी जमा झालं. आसपासच्या गावातील ग्रामस्थही येऊ लागले. मुलीचा जबाब तिच्या घरीच घेतला जावा असा आमचा आग्रह होता. त्याप्रमाणे महिला इन्स्पेक्टर आणि महिला दक्षता समिती सदस्य लेखनिकासह गावात आले. सर्व ग्रामस्थ बाहेर थांबवण्यात आले. बंद खोलीत या तिघांसह मी, मुलीची आई आणि मुलगी एवढेच तिथे थांबलो. हा जबाब इन कॅमेरा घेण्यात आला.

या दिवशी मात्र मुलगी खरोखर धीट झाली होती. तरतरीत झाली होती. दोन दिवस आधी आम्ही साधलेल्या संवादाचा उपयोग झाला होता. तिची भीती चेपली होती. ती अधिक सुसंगत आणि तपशिलवार बोलत होती. तरीही तिचा जबाब नोंदवण्यास चार तास लागले. तो जबाब तिला वाचून दाखवून त्यावर तिची आणि आम्हा सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. हे पूर्ण झाल्यावर आम्ही सर्व जमलेल्या ग्रामस्थांशी बोललो. त्या मुलीला आधार देऊन पुन्हा पायावर उभं करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. आणि सर्वांनीच पोलीस स्टेशन गाठलं.

या दिवशी इन्स्पेक्टर बरेच नरमलेले होते. त्यांनी एफआयआर दाखल करण्याचं काम सुरू केलं. तरी फक्त कलमं निश्चित करून गुन्हा नोंदवायला तीन तास पोलीस स्टेशनमध्ये गेले. गुन्हा दाखल होताहोताच अटकसत्र सुरू झालं. आमच्या समोरच दोन आरोपींना अटक करून आणण्यात आलं. शेवटी सर्वांच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल झाला. १४ आरोपींची नावं पुढे आली. प्रसारमाध्यमं, सामाजिक संघटना एकत्र आल्यानंतरही गुन्हा दाखल होण्यास एवढा वेळ लागला. सामान्य माणसाच्या तर आवाक्यातीलच ही गोष्ट नाही. म्हणूनच तक्रार करायला सामान्य एकटा माणूस सहजासहजी धजावत नाही. पोलीस दखल घेतच नाहीत हाच सार्वत्रिक अनुभव आहे.

या प्रकरणातून पुढे आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने मेहजबीनला जाळ्यात ओढून तिला विकण्यात आलं. त्या घटनेला एकच स्वतंत्र घटना म्हणून पाहता येणार नाही. हे रॅकेटच असण्याची शक्यता आहे. आणि तपासातून ते रॅकेट उजेडात आणून गुन्हेगारांना गजाआड करण्याची गरज आहे. हे रॅकेट पोलिसांना माहीत नसणं कठीण आहे. तरीही ते चालू आहे. याचा अर्थच ते उघडकीला आणण्यासाठी जनतेचा, संघटनांचा, प्रसारमाध्यमांचा दबाव निर्माण करणं आवश्यक आहे. तसंच अल्यवयीन आणि तरुण मुलींना वेळेवर मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी तसंच अशा रॅकेटमधून वाचण्यासाठी समाजामध्ये आधार देणारी यंत्रणा उभारणं आवश्यक आहे.

एका मेहजबीनला आम्ही वाचवू शकलो. पण अशा हजारो मेहजबीन अडकल्या आहेत. त्यांचं काय हा प्रश्न खिन्न आणि अस्वस्थ करणारा आहे.

– उल्का महाजन

(सौजन्यः कलमनामा, ऑक्टोबर, २०१३)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *