सुरेश सावंत यांना प.बा.सामंत पुरस्कार जाहीर

सांगण्यास आनंद होत आहे की, सम्यक संवाद च्या संपादक मंडळाचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते ऊर्फ त्यांच्या समवस्कांमध्ये `सर’ म्हणून ओळखले जाणारे सुरेश सावंत यांना यंदाचा “प.बा.सामंत संघर्ष पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्याबद्दल सम्यक संवाद परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन!

या पुरस्काराचे वितरण रविवार, 27 ऑक्टोबर ला सायंकाळी 6.30 वाजता अ.भि.गोरेगावकर इंग्लिश स्कुलचे सभागृह, गोरेगाव(प), मुंबई येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांना या आनंदात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत. ज्या कामाविषयी हा पुररस्कार दिला जातो, त्याविषयीचे सत्राचे आयोजन आयोजकांकडून केले जाते. यावर्षी रेशनिंग आणि अन्न सुरक्षेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सुरेश सावंत यांना हा पुरस्कार दिला जात असल्याने `रेशनिंग आणि अन्न सुरक्षा’ या विषयावर मिलिंद मुरुगकर यांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.

विद्यार्थीदशेपासून समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील प्रवास, विचारमंथन आणि रेशनिंग कृती समिती चळवळ व अन्न अधिकाराचा व्यापक प्रश्न यातील सहभागाची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे निवड समितीने त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हा पुरस्कार केशव गोरे स्मारक ट्रस्टकडून दिला जातो. याच्या अध्यक्षा लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे या आहेत.

ज्या कार्यकर्त्यांच्या कामाची आजवर पुरस्काराद्वारे दखल घेतली नाही, त्यांना पुरस्कार मिळाले पाहीजे. असा आग्रह सुरेश सावंत यांचा असतो. परंतु आयोजकांचा सन्मान ठेवण्यासाठी आणि आपले विचार मांडण्याची मिळणारी संधी या कारणास्तव त्यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे.स त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन…

बाबुराव सामंत यांचा थोडक्यात परिचय

सार्वजनिक संसाधनांचा उपयोग समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे असा आग्रह धरणारे आणि यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेचे हत्यार सर्वप्रथम वापरणारे बाबुराव सामंत हे प्रथम व्यक्ती. यांच्या स्मृतीला सलाम करण्यासाठी हा पुरस्कार केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्याकडून देण्यात

सुरेश सावंत यांच्याविषयी

रेशनिंग आणि जातीव्यवस्थेच्या प्रश्नावर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यातून आपले मत मांडणाऱ्या सुरेश सावंत यांची ही थोडक्यात ओळख.
आंबेडकर चळवळीचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर पी.एल.लोखंडे मारग् येथील वस्तीत जन्म झाला आणि बालपणही तेथेच गेले. त्यामुळे त्याकाळातील चळवळींमध्ये सक्रीय सहभाग असलेले. फुले-आंबडकरी प्रेरणांचे लहान वयातच संस्कार झाले. दहावीला असताना समवयीन आणि एकूणच वस्तीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `प्रागतिक विद्यार्थी संघ’ या संस्थेच्या स्थापनेत आणि जोपासनेत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली.
मुळच्या कोकणातील असलेल्या सुरेश यांनी गावी बौद्ध युवकांना एकत्र आणून `बौद्ध युवा मंच’ या संस्थेची स्थापना केली. जातिभेद आणि अंधश्रद्धा विरोधी उपक्रम त्यांनी राबविले. बंडाचे संस्कार असलेया सुरेश यांनी कोकणातील बौद्धांच्या पारंपारिक संस्थांतील साचलेपणाविरोधात बंद पुकारले. तसेच बुद्ध धम्म आणि आंबेडकरी विचारांवर त्यांनी पंचक्रोशीत प्रवचवेही दिली आहेत.

दलितांची मुक्ती स्त्रिया व अन्य सर्व शोषित घटकांच्या मुक्तीशी जोडलेली आहे, या व्यापक जाणिवेतून स्त्री-मुक्ती संघटनेसारख्या पुरोगामी संघटनांत त्यांचा सहभाग आहे.

समग्र बदलाच्या प्रयत्नांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या राजकीय केंद्राची अपरिहार्यता उमगल्यानंतर `लाल निशाण पक्षा’त ते सहभागी झाले आणि पुढे नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. पक्षाच्या विविध आघाड्यांवर त्यांनी काम केले.

त्यानंतर त्यांनी रेशनिंगच्या प्रश्नावरील कामावर भर दिला. लोकशाही अधिकार मिळविण्यासाठी गोरगरीब, कष्टकरी जनतेला सिद्ध करुन लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या भूमिकेतून रेंशनिंग कृती समिती आणि पुढे अन्न अधिकार अभियानात ते सहभागी झाले. या प्रश्नावर अनेक आंदोलने आणि संघर्ष त्यांनी केला आणि आजही हा संघर्ष सुरु आहे.

फुले-आंबेडकर चळवळ, रेशन-अन्न अधिकार, संघटना बांधणी इत्यादी विषयांवर त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. वृत्तपत्रे, ब्लॉग आणि आता बेवसाईटवर प्रासंगिक लेखाद्वारे ते विषयांची मांडणी करतात.

त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल घेवून त्यांना कॉ. दत्ता देशमुख, एस.एम.जोशी कार्यकर्ता आदि पुरस्कार मिळाले आहेत.