व्हेनेझुएलातील आरोग्य-सेवा: क्रांतिकारक वाटचाल

खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा)या धोरणामुळे १९९० पासून भांडवली जगात सर्वच ठिकाणी विषमता, वंचितता प्रचंड वाढली आहे. दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला हा पावणे-तीन कोटी लोकसंख्या असलेल्या व्हेनेझुएलामध्ये सुद्धा हेच होत होते. पण १९९८ पासून तिथे समाजवादी विचाराचे सरकार आल्यावर ‘खाउजा’ धोरणापासून फारकत घेऊन तसेच काही अभिनव, कल्पक जनवादी कार्यक्रम राबवून त्यांनी काही क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल केले. या स्फूर्तीदायी व बोधप्रत प्रयोगांपैकी आरोग्य-सेवेबाबत केलेला क्रांतीकारी प्रयोग समजावून घेऊया.
व्हेनेझुएलामध्ये शावेझ याच्या स्फूर्तिदायी नेतृत्वाखालील ‘मूव्हमेंटो क्विंटा रिपब्लिका’ने 1998 मध्ये निवडणूका जिंकल्या. १९९९ मध्ये नव्या समाजवादी सरकारने जनवादी, पुरोगामी अशी नवी राज्य-घटना सार्वमत घेऊन आणली. पण त्यानंतर ३-४ वर्षे अतिशय राजकीय अस्थिरतेत, धामधुमीत गेली. पण २००३ पासून शावेझ-सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. व्हेनेझुएलाला मिळालेल्या खनिज-तेलाचे ख-या अर्थाने राष्ट्रीयकरण करून, त्याचे उत्पादन वाढवून त्याच्या विक्रीतून पुरेसा नफा मिळवून राष्ट्रीय उत्पन्न २००३ पासून ६ वर्षात ७८% वाढवले तर सरासरी दर डोई उत्पन्न ५०% वाढले. श्रमिकांना सन्मानाने जगण्यासाठी त्याचा उपयोग करून द्यायला शावेझ सरकारने सुरुवात केली. रोजगाराच्या संधी वाढवणे, किमान वेतनात घसघशीत वाढ करणे अशा पाउलांसोबत सामाजिक सेवा मोफत पुरवण्यासाठीही या वाढीव उत्पनाचा वापर करायला शावेझ-सरकारने सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रावरील सार्वजनिक खर्च राष्ट्रीय उत्पादनाच्या १९९८ मध्ये ८.२% होता तो २००६ पर्यंत १३.६% झाला. या निरनिराळ्या पाउलांमुळे दारिद्र्याचे प्रमाण २००३ पासून ६ वर्षात निम्म्यावर आले.
दारिद्य्र व विषमता निर्मूलन करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये सरकारने त्यासाठी वेगवेगळी ‘मिशन्स’ सुरु केली. त्यापैकी आरोग्य-सेवेबाबतचे मिशन म्हणजे मिशन ‘बॅरिओ अदेंत्रो’. १९९८ मध्ये व्हेनेझुएलातही आरोग्य-सेवेबाबत परिस्थिती फार वाईट होती. बहुतांश जनता झोपडपट्टयांमध्ये वा दूरस्थ ग्रामीण भागात राहणारी. प्रस्थापित डॉक्टर्स तिथे दवाखाना काढायला तयार नव्हते. ते मध्यमवर्ग व श्रीमंतांसाठी खाजगी प्रॅक्टिस करीत. १९८०-९० पासूनच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे सरकारी सेवा तुटपुंज्या, सुमार दर्जाच्या होत्या. त्यामुळे सामान्य कष्टकरी नागरिक आरोग्य-सेवेपासून वंचित होते. उदा. 1998 मध्ये तळच्या 20% लोकसंख्येपैकी 35% लोक पैसे नसल्याने उपचार घेऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर नव्या समाजवादी सरकारने २००३ पासून ‘कष्टक-यांच्या वस्त्यांमधील आरोग्य केंद्रे’ (‘बॅरिओ अदेंत्रो’) काढायला सुरुवात केली व या केंद्रांमध्ये काम करायचे डॉक्टरांना आवाहन केले. पण फक्त 50 डॉक्टरांनी तयारी दाखवली. कारण व्हेनेझुएलामधील बहुसंख्य डॉक्टर्स हे प्रस्थापिताचा भाग होते. त्यामुळे ‘घाणेरडया’ ‘असुरक्षित’ वस्त्यांमध्ये काम करायला त्यांनी नकार दिला! डॉक्टरांच्या मते ‘वस्तीतील दवाखान्या’त (‘बॅरिओ अदेंत्रो’) देऊ केलेला पगार फारच कमी होता. (तो नंतर 35% नी वाढवला तरी डॉक्टरांच्या भूमिकेत फारसा फरक पडला नाही.) व्हेनेझुएलात किमान वेतन 160 डॉलर्स आहे, तर डॉक्टरांना मासिक 600 डॉलर्स मिळतात. पण ते त्यांना फार अपुरे वाटले. मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय डॉक्टर मंडळी ‘वस्तीतील दवाखान्यात’ काम करायला तयार नव्हते. खासगी डॉक्टर तर मिशन ‘बॅरिओ अदेंत्रो’ च्या विरोधातच होते.
डॉक्टरांच्या या ‘असहकारावर’ शावेझ सरकारने उपाय शोधला. समाजवादी क्युबाची मदत घ्यायचे ठरवले. फिडेल कॅस्ट्रोंच्या नेतृत्वाखाली समाजवादी क्युबाने आपले डॉक्टर्स काही विकसनशील देशांना पाठवण्याचा खूप वर्षांपासून कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा उपयोग शावेझ सरकारने मोठया प्रमाणावर केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाची किंमत गेल्या काही वर्षात फार वेगाने वाढत गेली. त्यामुळे व्हेनेझुएला सरकारचे निर्यात उत्पन्नही वेगाने वाढले. व्हेनेझुएलाने खनिज तेलाच्या निर्यातीतून मिळणा-या उत्पन्नातून क्युबन डॉक्टरांना व्हेनेझुएलात निमंत्रित केले. 15000 क्युबन डॉक्टर्स व 15000-20000आरोग्य सेवक (नर्सेस, डेंटिस्ट, क्रिडा-तज्ञ/व्यायाम-शिक्षक इ.)यांनी व्हेनेझुएलात काम करून 2004 ते 2010 या सहा वर्षात तेथील ओरोग्य-सेवेचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. क्युबन डॉक्टरांच्या जनवादी पद्धतीच्या कामामुळे ते लोकप्रिय झाले. ते या वस्त्यांमध्येच राहतात, रात्री-बेरात्री गरज पडली तर ते त्यामुळे उपलब्ध असतात. शिवाय एक शेजारी म्हणूनही हे डॉक्टर वस्तीशी नाते जोडतात. ते रोज एका घरी भेट देतात व प्रत्येक घराचे आरोग्य कार्डही बनवतात. वस्तीतील सर्व कुंटुंबाना भेटी देऊन एकूण वस्तीचे आरोग्य-कार्ड बनवून त्या प्रमाणे या डॉक्टरांकडून आरोग्य सेवेचे नियोजन केले जाते! या क्युबन डॉक्टरांच्या सहकार्याने दर 250-300 घरांमागे एक, म्हणजे सुमारे 1000 लोकांमागे एक या पध्दतीने ‘वस्तीतील दवाखान्यांची’ (‘बॅरिओ अदेंत्रो’) संख्या 2004 ते 2007 या काळात 4803 वरून 11373 पर्यंत वाढली. २००९ पासून १६०० च्या वर नव्याने तयार ‘आरोग्य सेवा’ हा लोकांचा हक्क आहे अशी भूमिका व्हेनेझुएलन सरकारची आहे व या भूमिकेतून ‘बॅरिओ अदेंत्रो’ मार्फत दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा सर्व जनतेला मोफत द्यायची व्यवस्था उभारण्यात आली तसेच. सुमारे ३००० क्युबन व २००० व्हेनेझुएलाचे दंत-वैद्य यांच्या आधारे प्रत्येक वस्तीत एक दंत-वैद्यक केंद्र उघडण्यात आले.
‘बॅरिओ अदेंत्रो’ नीट चालण्यासाठी प्रत्येक वस्तीत आरोग्य-समिती तयार झाली. ‘बॅरिओ अदेंत्रो’ साठी सुरुवातीला स्वत:ची अशी वेगळी इमारत नव्हती. त्यामुळे ‘बॅरिओ अदेंत्रो’ साठी त्यातल्या त्यात चांगली व लोकांनाही सोयीची अशी जागा मोकळी करणे, त्यात किमान सोयी करणे, या क्युबन डॉक्टरला राहण्यासाठी वस्तीत नीट सोय करणे, क्युबन डॉक्टर घर-भेटी देत असताना त्यांच्या सोबत जाणे, लोकांना ‘बॅरिओ अदेंत्रो’ बद्दल सांगून तिथे सेवा घेण्याबद्दल उद्युक्त करणे अशी कामे या आरोग्य-समित्या करायला लागल्या. आतापर्यंत आजारपणे अंगावर काढणारे लाखो लोक आता या मोफत प्राथमिक आरोग्य सेवेचा लाभ घेऊ लागले. ही सेवा काही वर्षातच व्हेनेझुएलातील 70 टक्के लोकांपर्यंत पोचली. आता ब-याच ठिकाणी तळ-मजल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र व पहिल्या मजल्यावर क्युबन डॉक्टरचे निवास-स्थान अशी ‘बॅरिओ अदेंत्रो’ची स्वत:ची दोन मजली इमारत उभी राहिली आहे.
‘प्राथमिक आरोग्य सेवा’ पुरवणे एवढेच शावेझ सरकारचे धोरण नाहीय. हे काम ‘बॅरिओ अदेंत्रो-१’ मार्फत मार्गी लागल्यावर‘बॅरिओ अदेंत्रो-२’ असे मिशन सुरु झाले. दर दहा-वीस ‘बॅरिओ अदेंत्रो-१’ मागे एक छोटे रोग-निदान व तातडीचे उपचार केंद्र अशा स्वरूपाची नव्या प्रकारची 300 नवीन ‘हॉस्पिटल्स’ पहिल्या पाच वर्षात उभारली. २०११ पर्यंत त्यांची संख्या 533 झाली. ‘क्लीनिकास डायग्नोस्टिकास इंटिग्रेल्स’ (सी.आय.डी) या नावाच्या या प्रत्येक नवीन हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर करवी तपासण्या, मार्गदर्शन, उपचार, तसेच नेहेमी लागणा-या सर्व आधुनिक तपासण्या याची सोय आहे. मोठया हॉस्पिटल मध्ये पाठवण्याआधी रुग्णावर तातडीचे उपचार करण्यासाठी १०-१२ खाटांची सोय आहे. तसेच त्याला जोडून स्वतंत्र इमारतीमध्ये एक ‘वैद्यकीय पुनर्वसन केंद्र’ आहे. त्यात जल-उपचार, अॅक्युप्रेशर, मसाज इ. विविध उपचार मिळतात.
‘बॅरिओ अदेंत्रो-२’ चाच भाग म्हणून सी.टी.स्कॅन व एम्, आर आय. स्कॅन सकट सर्व अत्याधुनिक रोग-निदान उपकरणे असलेली ३५ केंद्रे काढण्याचे नियोजन २००४ मध्ये केले गेले व २०११ पर्यंत अशी ३१ नवी केंद्रे सुरु झाली.
‘खाउजा’ धोरणामुळे सार्वजनिक इस्पितळांची पडझड झाली होती. त्यावर मात करून या हॉस्पिटल्सचे आधुनिकीकरण करणे, त्यातील कामकाज सुधारणे, त्यात लोकांचा सहभाग मिळवणे हा कार्यक्रम ‘बॅरिओ अदेंत्रो-३’ मार्फत राबवण्यात आला. प्राथमिक आरोग्य-सेवेचे काम मार्गी लागू लागल्यावर २००६ पासून हे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी बराच निधी, बरेच नियोजन व निरनिराळ्या अडचणींवर मात करणे याची आवश्यकता होती. पण मोठया जिद्दीने हे अवघड काम पार पाडण्यात आले. त्या पुढचा टप्पा म्हणून ‘बॅरिओ अदेंत्रो-३’ मार्फत १५ अत्याधुनिक नवी इस्पितळे बांधण्यात आली.
वरील आरोग्य-विषयक सुधारणांमुळे सार्वजनिक आरोग्य-सेवेचा लाभ घेणा-या लोकांची संख्या प्रचंड वाढली. १९९८ मध्ये ३५ लाख लोकांनी या सेवेचा लाभ घेतला होता. तर २००४ ते २०१० या काळात सरासरी दरवर्षी ६ कोटी लोकांनी या सेवेचा लाभ घेतला! २०११ पर्यंत ही सेवा ८३% लोकांपर्यंत पोचली होती असे एका पाहणीमध्ये आढळले.
वरील प्रकारच्या निरनिराळया सुधारणा करण्यासाठी शावेझ सरकारने आरोग्यावरील खर्च 1998 ते 2007 या काळात एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.6 टक्के वरून 6 टक्के पर्यंत वाढवला. (भारतात तो 1% आहे!) एकूण आरोग्य-खर्चात सरकारी खर्चाचे प्रमाण आता विकसित देशांप्रमाणे व्हेनेझुएलात 80 टक्क्यांच्या वर गेले आहे. (भारताचे ते 20 टक्के आहे.) ‘मिशन मरकाळ’नावाच्या अभियाना मार्फत प्रत्येक ‘गरीब’ वस्ती मध्ये एक दुकान काढले आहे. जिथे उत्तम प्रतीचे धान्य, खाद्यपदार्थ बाजार भावाच्या 60 टक्के भावाने मिळते. एका वेळेस एका व्यक्तीला दोन किलो किराणा माल नेता येतो. कोणतेही कार्ड दाखवावे लागत नाही. ज्यांना अन्नाची ददात आहे अशा लोकांची ओळख वस्तीतील लोकांद्वारे करवून त्यांना मोफत जेवण देण्यात येते!
या सामाजिक सुधारणा व आरोग्य सुधारणा यामुळे लोकांचे आरोग्य सुधारले आहे. दर हजार जन्मलेल्या बाळांमागे बाल मृत्यूदर १९९९ मध्ये १९ होता, तो २००८ पर्यंत 13.9 पर्यंत उतरला. (भारतात तो दर हजारी 58 आहे.) पाच वर्षाखालील मुले दगावण्याचे प्रमाण याच काळात २६.५ वरून १६. ७ वर घसरले तर माता मृत्यूदर दर लाख बाळंतपणामागे 67 वरून 33 वर उतरला. (भारतात तो २०० आहे!) सरासरी आयुर्मान 71 वरून 73 वर गेले. लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण 4 टक्के पर्यंत उतरले. भारतात ते 50 टक्के च्या वर आहे!
जगात इतर बहुसंख्य देशांमध्ये, विशेषतः विकसनशील देशांमध्ये खासगीकरणाच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेची आरोग्याबाबतची आबाळ वाढली असतांना व्हेनेझुएलात मात्र समाजवादी सरकारने आरोग्य-सेवा हा मूलभूत अधिकार मानून त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे आहे. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण-खाउजा- धोरणाला पर्याय नाही हा समज शावेझ सरकारने खोटा ठरवला आहे. तेलाच्या निर्यातीतून मिळणारे मोठे उत्पन्न व क्युबाचे सहकार्य हे मदतकारक घटक आहेत. पण आरोग्य-सेवा ही विक्रीची वस्तू नसून मानवी अधिकार आहे ही शावेझ सरकारची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

वैद्यकीय शिक्षणातील क्रांतीकारक प्रयोग
व्हेनेझुएलाने वैद्यकीय शिक्षणात केलेला क्रांतीकारी प्रयोग हा तितकाच महत्वाचा व आपल्या दृष्टीने खूपच बोधप्रद आहे. १९९८ पर्यंत व्हेनेझुएलात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणारे बहुतेक जण खाजगी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले मध्यम व श्रीमंत थरातून येणारे होते. सार्वजनिक शाळांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या ५० लाख मुला-मुलींना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त होते. १९९८ मध्ये निवडणुकीतून समाजवादी सरकार आल्यावर त्यांनी आरोग्य-सेवा पुरवण्यासाठी ‘बॅरिओ अदेंत्रो’ हे मिशन हाती घेतले ते आपण वर पाहिले. हे ‘बॅरिओ अदेंत्रो’ मिशन त्यांनी मुख्यत: ज्या 15000 क्युबन डॉक्टर्स च्या मदतीने पार पाडले त्यांची जागा व्हेनेझुएलन डॉक्टर्सनी घ्यायची गरज होती. पण पारंपारिक वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणारे डॉक्टर्स वेगवेगळ्या कारणामुळे त्यासाठी सुयोग्य नव्हते. म्हणून अगदी वेगळ्या प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये व शिक्षण-पद्धती विकसित करायची त्यांनी ठरवले. क्युबा मध्ये त्याबाबत झालेल्या प्रयोगाचा व त्याबाबतच्या क्युबन तज्ञ मंडळींचा त्यांना त्यासाठी फार उपयोग झाला.
या नवीन प्रकारच्या डॉक्टरी-शिक्षणाची वर्तमान-पत्रामार्फत लोकांना २००५ मध्ये माहिती देऊन ज्याला कोणाला असे शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी अर्ज करावा असे सरकारने आवाहन केले. अर्ज करताना एक अट पाळायची होती. ती म्हणजे डॉक्टर झाल्यावर मी माझ्या वस्तीत जाऊन काम करीन असे प्रतिज्ञा-पत्र प्रत्येक अर्जदाराने द्यायचे व त्याबाबत आपल्या वस्तीतील नागरी संघटनेची शिफारस आणायची. असे ३५००० अर्ज आले! त्यापैकी २४,००० अर्जदारांची निवड होऊन त्यांना वैद्यकीय शिक्षणाला आवश्यक अशा काही वैज्ञानिक विषयांचे ४ महिने शिक्षण देण्यात आले. सुमारे ८००० जणांना तो पूर्ण करता आला नाही. ज्या १६,००० विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला. यातील अनेक विद्यार्थी कमकुवत आर्थिक थरातील होते. त्यामुळे या विद्यार्थ्याना किमान वेतनाच्या निम्मी शिष्यवृत्ती देण्यात आली. शिवाय वैद्यकीय शिक्षण मोफत होते. सामान्य, कष्टकरी कुटुंबातील मुलांना वैद्यकीय शिक्षण देण्याची अशी व्यवस्था क्युबा वगळता जगात कुठेच नाही. या नव्या व्यवस्थेमुळे व्हेनेझुएलात वैद्यकीय शिक्षण घेणा-या अनेक कष्टकरी कुटुंबातील संसारी स्त्रियाही आहेत. आपल्या मुलांना आजी-आजोबा, आपला नवरा यांच्याकडे सोपवून त्या जिद्दीने डॉक्टर बनत आहेत! वैद्यकीय शिक्षण घ्यायला वयाची अट नाही. त्यामुळे चाळीशीतील विद्यार्थीही आहेत. एक तर ७१ वर्षाचे आजोबा डॉक्टरी-शिक्षणासाठी आले!
वैद्यकीय शिक्षण देण्याची पद्धतही प्रस्थापित डॉक्टरी-शिक्षणाच्या पद्धतीपेक्षा व्हेनेझुएलात वेगळी अवलंबिली जात आहे. क्युबामध्ये या बाबत आधीच काही प्रयोग झाले आहेत, त्यात भर घालून एक नवी पद्धती विकसित केली जात आहे. वस्तीपासून, समाजापासून तुटलेल्या इस्पितळामध्ये शिक्षण देण्यापेक्षा, काही वस्तींमधील ‘बॅरिओ अदेंत्रो’ हे दवाखाने व या वस्त्या हीच शिक्षणाची केंद्रे बनली. या ‘बॅरिओ अदेंत्रो’ मध्ये काम करणा-या अनेक क्युबन डॉक्टर्सनी वैद्यकीय शिक्षक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण घेतले व मुख्यत: तेच वैद्यकीय शिक्षक बनले. वस्तीमध्येच प्राथमिक आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स हे वैद्यकीय शिक्षक बनणे हा धाडसी प्रयोग होता.
प्रस्थापित डॉक्टरी-शिक्षणाच्या पद्धतीमध्ये पहिली दोन-तीन वर्षे विद्यार्थ्याचा रुग्ण, समाज यांच्याशी काहीच संबंध येत नाही. हा साचा बदलण्यात आला. अगदी पहिल्या वर्षापासून ‘बॅरिओ अदेंत्रो’ मध्ये विध्यार्थ्यांनी जायचे व तिथे रुग्णाशी, त्या वस्तीतल्या कुटुंबियांशी संवाद साधायचा, त्यांची परिस्थिती समजावून घ्यायची, त्यांना काही बाबतीत आरोग्य-सल्ला द्यायचा अशी पद्धत सुरु झाली. तसेच वैद्यकीय विषयांसोबत समाज-शास्त्र, वैद्यकीय नीतिशास्त्र हेही विषय पहिल्या वर्षी शिकवले जातात. मानवतावादी मूल्ये, रुग्णांशी सहवेदना यावर जोर दिला जातो. शरीरशास्त्र, शरीर-क्रियाशास्त्र, वैद्यकीय-सूक्ष्म जीवशास्त्र हे विषय सुटे-सुटे न शिकवता एकमेकांशी सांगड घालून नव्या एकात्मिक पद्धतीने शिकवले जातात. हे सर्व विषय शिकवण्यासाठी खास विडीओ बनवले आहेत. त्याचा भरपूर उपयोग केला जातो. कष्टकरी कुटुंबातील काही विद्यार्थ्यांना हे सोपे व रसरशीत नवे वैद्यकीय शिक्षणही झेपेना. सुरुवातीच्या बॅच मधील सुमारे २५% विद्यार्थ्यानी हे शिक्षण सोडून दिले. पण बहुसंख्य विद्यार्थी चांगली प्रगती करून चांगले डॉक्टर्स बनत आहेत असे एका छोट्याशा संशोधनातून पुढे आले आहे. दक्षिण अमेरिकेतील राजकीय, क्रांतीकारक परंपरा याचाही या डॉक्टर्सना त्यांच्या शिक्षणात परिचय करून दिला असतो. त्यामुळे व्हेनेझुएलात चाललेल्या सामाजिक, राजकीय परिवर्तनाबाबत एक सुयोग्य समज असलेला नवा डॉक्टर तिथे तयार होत आहे!
व्हेनेझुएलातील प्रयोगापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. व्हेनेझुएलातील दर डोई उत्पन्न भारतापेक्षा खूप जास्त आहे. शिवाय तिथे उपलब्ध असलेल्या खनिज तेलाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर वाढले, त्याना क्युबन डॉक्टर्सचे एव्हढे सहकार्य मिळाले असे काही खास घटक आहेत. दर ५०० लोकांमागे १ डॉक्टर हे प्रमाण आपण गाठू शकणार नाही व आरोग्य सेवक, आरोग्य-कार्यकर्ते यांचा नेटाने नीट उपयोग केला तर भारतात एव्हढे डॉक्टर्स लागणारही नाहीत. हे सर्व लक्षात घेऊनही आपण निश्चित म्हणू शकतो की राजकीय इच्छा-शक्ती व दृष्टी असेल तर थोड्याच काळात चांगल्या दिशेने आरोग्य-सेवेबाबत खूप व योग्य दिशेने प्रगती होऊ शकते हे आपण व्हेनेझुएलाच्या स्फूर्तीदायी प्रयोगावरून निश्चित शिकू शकतो.

– डॉ. अनंत फडके

(सौजन्यः युगांतर, दिवाळी २०१३)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *