स्वातंत्र्यानंतर विजेच्या सोबतीतली ही पहिली दिवाळी

‘भारतीय माणसे सणांचे इतके वेडे आहेत की, यंदाच्या दिवाळीत खरेखुरे रॉकेट उडवले, ते मंगळावर पोहोचणार आहे.’ असा एक विनोद वॉटस् अपवर फिरत आहे. परंतु याच भारतातील पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील तीन आदिवासी पाड्यांनी यंदा पहिल्यांदाच विजेच्या प्रकाशात दिवाळी साजरी केली. आणखी बरेच पाडे अंधारात असतीलही. हे आदिवासी पाडे कोणत्याही कोपऱ्यातील नसून मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर या आदिवासी पाड्यांनी यावर्षी प्रथमच विजेच्या सोबतीने प्रकाशमय दिवाळी साजरी केली आहे. होंडावाडी आणि त्याला लागून असलेले अजून दोन लहान आदिवासी पाडे सत्यावाडी आणि धनगर वाडी. लोकसंख्या साधारण ९०० च्या आसपास. हे आदिवासी पाडे मेळघाटात किवा नंदुरबारसारख्या दूरवरच्या ठिकाणी नव्हे, तर ते मुंबई पासून शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावरील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आहेत.

अलिबाग पासून ३५ किलोमीटर वर असणाऱ्या होंडा वाडीत वीज पिढ्यानपिढ्या आदिवासींना माहीतच नाही. आजवर ते तेलांच्या दिव्या सोबतच संसार करत आले आहेत. याच दिव्यांबरोबर अनेक दिवाळी सण साजरे केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याने आमच्या पाड्यावर वीज आल्याचे हे आदिवासी सांगतात.

“आमच्या अनेक पिढ्यांनी लाईट पहिली नव्हती. तेलाचा दिवा हाच आमचा प्रकाशाचा आधार ……..आजपर्यंतच्या सर्व दिवाळ्या आम्ही त्याच्या सोबतच साजऱ्या केल्या आमच्यापर्यंत वीज यायला अनेक अडचणी होत्या. वन विभागासोबत अनेक परवानग्या आणि किती काही……. पण शेकापच्या जयंत पाटलानी पाठपुरावा केल्याने या वर्षी प्रथमच गेल्या महिन्यात आमच्या पाड्यावर वीज आली आणि आता या वर्षीच्या दिवाळीत पाडा विजेसोबत उजळून निघाला.’’ -पाड्याचे रहिवाशी सत्तर वर्षाचे ग्रामपंचायत सदस्य आम्बाजी भिकू पारधी

“अनेक वर्ष संध्याकाळचा स्वयंपाक दिव्याच्या प्रकाशात केला. यावर्षी वीज आल्याने दिवाळी साजरी करताना त्रास होणार नाही.” – मधी पारधी

“वाड्यातली मुलं सुद्धा अंधारात अभ्यास करायची. यावर्षीचा त्यांचा दिवाळीचा अभ्यास विजेसोबत लख्ख प्रकाशात होईल.’- अशोक पारधी

“स्वातंत्र्यानंतर अजुनही लोकांना वीज, पाणी यांसारख्या गोष्टी सरकारी विभागांशी लढूनच मिळवाव्या लागत असतील तर त्या स्वातंत्र्याला अर्थ काय ? ….मात्र अलिबाग आणि रायगड जिल्यातील सर्व आदिवासी पाड्यावर वीज जाण्याकरिता शेकाप प्रयत्नशील राहील’’ –शेकापचे विधान परिषद सदस्य जयंत पाटील

या नेत्यांना प्रश्नाची इतकी जाण आहे, तर मग या पाड्यांवर वीज पोहोचण्यासाठी इतकी वर्षं का लागली? असा सवाल माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडतो. परंतु असे असले तरी तेच कुटत बसण्यापेक्षा, त्याबद्दल रडत बसण्यापेक्षा आता विजेच्या वापराने त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग अधिक सुकर होईल, असा सकारात्मक विचार करणे अधिक उचित ठरेल असे मला वाटते. या विजेच्या वापराने त्यांच्या आयुष्यातील काय काय कष्ट सुकर होतील, यामध्ये मला अधिक रस असायला हवा.

अनेक वर्षाचा अंधार संपवणारी ही दिवाळी आदिवासीच्या पुढील पिढ्यांच्या जीवनात प्रकाश घेवून येयील अशी आशा होंडावाडी, सत्यावाडी आणि धनगरवाडीच्या आदिवासींना आहे.

– सोनाली शिंदे