नवे आवाहन, जुने आव्हान

प्रत्येक नव्या पानाला ताजेपणाचा आशीर्वाद लाभतो, अन् फुलाला आगळे सौंदर्य. नव्या विचारांचेही तसेच असते. उगवणारा दिवस रोज नव्या वेगळ्या आयुष्याचे ताजे स्वप्न मनात फुलवीत असतो. उदास संध्याकाळ माणसाच्या उत्तुंग आशावादाला फार वेळ दडपून टाकू शकत नाही. आशेचा छोटासा किरणही त्याला उष:कालासाठी रात्रभर टिकून रहाण्याचे सामर्थ्य देऊन जातो.

हे तर झाले रोजच्या आयुष्याबद्दल! राजकारणात तर आशानिराशेचा खेळ जगभर सतत चालूच आहे. प्रसारमाध्यमानी राजकारण घराघरात पोहोचविले आहे. आता प्रचाराची राळ उडवून जनमत,आंदोलने आणि नेते तयार करण्यात आणि पुन्हा नष्ट करण्यात टीवी व नेट ने वृत्तपत्रांवर मात केलेली दिसते. तुमच्यापाशी नुसते सत्य असून चालत नाही,त्याला आवेश, ताजगी झळाळी चे पॅकिंग ही असावे लागते. अन्नात सकसता एक वेळ नसेल तर चालेल पण चव तेज तर्रार असावी लागते. माणसापाशी सत्य शोधण्यासाठी टीवी वरची चर्चा (? भांडणे) पाहणे हा साधा सोपा उपाय उरला आहे. ती चर्चा तीत भाग घेणाऱ्यानाही विचार मांडल्याचे समाधान देत नाही. मत आधीच तयार असल्याने ते स्वीकारण्यापलीकडे पर्याय नसतो.

आप पार्टी ची लाट तयार होण्यास अण्णाइतकाच टीवी जबाबदार आहे. ‘आप’ली मंडळी आजूबाजूला फिरून नवी भरती करू लागले आहेत. नयी लहर मे शामिल होनेका आवाहन चालू आहे. तार्किक मुद्द्यापेक्षा आशा उत्साह, संधी चे अपील अधिक आहे. मुद्दे नंतर बोलू, अगोदर आत या, लाटेवर स्वार व्हा, संधी द्या-घ्या, असे सांगणे भरात आले आहे. सर्वहारा मतदारापाशी एकवेळ स्थिर चित्ताने विचार करण्यासाठी वेळ असेल, पण आपपाशी तेवढा वेळ नाही. विचारात संधी व वेळ घालवण्यापेक्षा पुढे सरसावून उतावीळ उडी परवडली, हे नेहमीच आकर्षक आवाहन ठरत आले आहे.

नीट अभ्यास केला तर लक्षात येईल कि आजवर अनेक प्रश्नावर जन आंदोलने निश्चित परिणामकारक ठरली आहेत. लोकांनी प्रथम प्रश्न जाणून घेऊन मग तो सोडवावा हा योग्य मार्ग असतो, त्यातील लोकजागृतीच्या प्रक्रियेसाठी काही काळ देणे जरुरीचे असते. दूरदृष्टीने पाहता ते कालहरण नसते. त्यातून समाजाची वैचारिक उन्नती होत असते. संसदेतील राजकारण त्वरेने निर्णय देते खरे. पण जन आंदोलना शिवाय त्या निर्णयाची पार्श्वभूमी व पूर्ती होत नाही हे जन आंदोलनातून जन्मलेल्या आप ला सांगावे लागू नये. आजवर आंदोलने केलीत. आता अधिक वेळ घालवण्यापेक्षा कृतीशील राजकारणात या हे स्थानिक आप चे आवाहन कृतीशील राजकारणच करीत आलेल्या आंदोलकांचा नकळत असेल पण थोडा अधिक्षेप करते असे मला वाटते. शिवाय आप ची जन आंदोलनाविषयक भूमिका सुस्पष्ट व्हायला हवी. अन्यथा जनता पार्टी व जनसंघ वादाची (ड्युएल मेम्बरशीप) पुनरावृत्ती होऊ शकेल. व्यवस्थेला पर्याय उभा करू पाहणे व्यवस्थापकाना कधीच परवडत नाही. तसेच देश चालविणाऱ्याना आंतरदेशीय संबंध राखण्यासाठी अनेक न मानविणाऱ्या तडजोडी कराव्या लागतात. आप च्या वरिष्ठ वर्तुळाला याची जाणीव असणार. पण सोयीस्कर परस्पर पोषक उत्तर नसेल तर हा मुद्दा उचित वेळ येताच सोडवू असेच त्यांना आता म्हणावे लागेल. दुधाने तोंड पोळलेल्या आंदोलकांना व मतदाराना ताक फुंकून प्यावेच लागेल.कारण राजकीय पक्षांच्या कोलांट उड्यांनी वैतागलेल्या भारतीयांची लोकशाहीवरील निष्ठा व आशा आजवर टिकविण्याचे फार मोठे कार्य जन आंदोलनानीच केले आहे. आम्ही आजही मतदान करतो ते अशा लोक संघर्षाने आजवर दिलेल्या आशावादाने. आप चा प्रयत्न आहे कि हाच आशावाद लोकांमध्ये संसदीय राजकारणाबाबत निर्माण व्हावा. पण त्या साठी लोकप्रिय कृतीसोबत लोकाभिमुख, सर्वस्पर्शी, प्रसंगी कटू पण पुरोगामी निर्णय घेण्याची ताकद आगामी काळात आप ला दाखवावी लागेल.

यासाठी लागणारा वेळ आप पाशी नाही. लाट विरून जाण्याचीही भीती वातावरणात आहे. लाट उसळविणारे मुद्देही सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून सौम्य केले जातील. लोकपाल बिल त्याचे उदाहरण आहे.अशावेळी केवळ आशावाद पुरेसा नाही. दिल्लीतले यश व सत्ता अचानक व अनपेक्षितरित्या पदरात पडल्या मुळे चकित झालेल्या आपपाशी देशव्यापी राजकीय कृतीशील कार्यक्रम पोहोचविण्याची पूर्वतयारी व लोकबळ नसण्याचीच शक्यता जास्त आहे. शामिल हो या आवाहनामागे ही चिंता असावी. ती या तरुण पक्षासाठी योग्यही आहे. तसे पाहता राजकारणात नवी, स्वप्नील, तरुण मंडळी हे आप विषयीच्या आकर्षणाचे एक प्रमुख कारण आहेच. आशा निर्माण होते ती नाविन्यातूनच !

नवा उत्साह ,सळसळती ऊर्जा आप पाशी आहे. कॉंग्रेस ती राहुल मध्ये,तर भाजप ती नमोमध्ये शोधत आहेत. अरविंद, योगेंद्र इतकीच जन आंदोलने देखील उद्याच्या प्रगत भारताच्या आशा आहेत. महाराष्ट्रातील अनुभवी कार्यकर्त्याची जोड आप ला हवी आहे. ती त्यांची गरज आहे. आंदोलकांना मात्र दूर दृष्टीने विचार करून पक्षीय राजकारणातील प्रवेशाबाबत विचार करावा लागेल. आप च्या पुढील पावलांवर नजर ठेवावी लागेल. घाई करण्याची जरूर नाही. घाई करणे जनाधार सांभाळताना त्रासदायक ठरू शकेल. अंकुश म्हणून काम करणाऱ्यानी हत्तीवर स्वार राहावे,पण अंकुश हातात ठेऊन ! आजवरची वाट चालून आल्यावर, दमलेल्या कार्यकर्त्यांना हा शॉर्टकट बरा वाटणे स्वाभाविक आहे.पण लोक त्यांना परत फिरण्याची संधी देत नाहीत. सत्ताकांक्षी राज्यकर्ते एकमेकात पाय अडकलेले असल्यामुळे एकमेकांसाठी परतीच्या वाटा तयार ठेऊन असतात. प्रयोगावर प्रयोग,आशाभंग पुनपुन्हा सहन करणे हे आधीच त्रासलेल्या भारतीयांना कठीण जाईल. जनता पार्टीच्या अपयशानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाई राजकारणापासून फटकून राहिली. त्यामुळे राजकारणात अनिष्ट प्रवृत्तीचा प्रवेश सहजसोपा झाला. पुन्हा तरुणाईला संसदीय राजकारणा कडे वळविण्याचे काम जन आंदोलनांनी केले आहे. नव्या, स्वछ पर्यायाचे दावे करणाऱ्या आप ने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

-डॉ प्रदीप पाटकर
patkar.pradeep@gmail.com