सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी…

१५ जानेवारीला पहाटे नामदेव ढसाळ गेले. एक तुफान शांत झाले. त्यांच्याबाबतच्या आठवणी, भावना व्यक्त होऊ लागल्या. सम्यक संवादशी संबंधित सुरेश सावंत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या लता प्र. म. यांची संवेदनांना हलविणारी सविस्तर प्रतिक्रिया आली. ढसाळांच्या कर्तृत्वाचा व लेखिकेवरील-तिच्या पिढीवरील परिणामांचा वेध घेणारी ही प्रतिक्रया म्हणजे एक स्वतंत्र लेखच आहे.
‘सम्यक संवाद’च्या वाचकांसाठी या दोन्ही प्रतिक्रिया येथे देत आहोत.

……………………………………………………………………………
मला आठवते. मी 9-10 वर्षांचा असेन. पँथरची चळवळ भरात होती. आमच्‍या वस्‍तीत राजा ढाले-नामदेव ढसाळांच्‍या जोरदार सभा, मोर्चे व्‍हायच्‍या. हे दोघे आमचे हिरो होते. ‘जयभीम के नारे पे…’ घोषणा सुरु झाल्‍या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्‍या राष्‍ट्रध्‍वजासंबंधीच्‍या ‘साधने’तील लेखातील उल्‍लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्‍या ‘स्‍वातंत्र्य कुठच्‍या गाढविणीचं नाव आहे’ या कवितेचा इतका प्रभाव होता, की मी शाळेत स्‍वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्‍ट्रगीत म्‍हणायला मी नकार देत असे.
…..या घडणीच्या काळातील एक हिरो नामदेव आज काळाआड गेला. त्याला अखेरचा जयभीम!

– सुरेश सावंत
…………………………………………………………………………..

प्रिय सुरेश,

१९८०-८१ चा काळ. पँथरचा जन्म होऊन सुमारे एक दशक झाले होते. पा्ठयक्रमांत दलित साहित्याचा समावेश झाला होता. तरी तथाकथित प्रस्थापित साहित्यिक व साहित्य संमेलनांमध्ये पाडगावकर, बापट, करंदीकर या त्रयीच्या, शंकर वैद्य वगैरेंच्या कवितांवर मध्यमवर्ग व उदारमतवादी पुरोगामी पोसले जात होते. पण आमच्यासारखे काही तरुण दलित पँथरच्या चळवळीतील चित्रे, पोस्टर, घोषणा, भिंती रंगविणे या सगळ्यांतून वेगळेच घडत होतो. आमच्यावरीला पारंपारिक संस्कारांना आम्ही फेकून देऊन नव्या प्रतिमा प्रतीकांचा शोध घेऊ लागलो. माझ्या रेखाटनांवर दलित पँथरचा प्रभाव आहे हे नक्की. पोस्टरवरील अक्षर रेखीव आणि अर्थगर्भ असणे हे दलित बहुजन चळवळीतील कलाकारांचे अविभाज्य लक्षण आहे असे मला वाटते…

तर या ८० च्या दशकात दलित साहित्य संमेलने वेगळी होऊ लागली. तिथे तळागाळातील तरुण-तरुणी गर्दी करत. पँथरच्या चळवळीने विद्रोही स्वराला असा आवाज दिला की रा. ग. जाधवांना साहित्यक्षितिजावर निळी पहाट होतांना दिसली.

नागपूर मध्ये दलित साहित्य चळवळ जोरात होती. ते विद्रोहाचेच झपाटलेले दिवस होते. मला एम.ए. फायनलला प्रा. यशवंत मनोहर शिकवत होते. नामदेव च्या अनेक कविता ते वर्गात ऐकवत. आम्ही थरारून जायचो. अशा प्रतिमा, असे शब्द, अशी भाषा आम्ही पूर्वी ऐकली नव्हती.

लोक विचारतात, चळवळीत येण्यामागे तुमची प्रेरणा कोणती, तर ती दलित बहुजन चळवळीचीच. या साहित्याने माझ्यात जे स्फ़ुल्लिंग पेरले, ते अजूनही माझ्यात कार्यकर्त्याच्या, लेखकाच्या रूपाने तेवत आहे.

त्यावेळी नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीत आमचा अड्डा असायचा. त्यात ज्योती लांजेवार, सुधाकर गायधनी, अरुणा पवार, लोकनाथ यशवंत, विजय इंगळे आणि इतरही अनेक कवी यांच्या सोबत मी दलित साहित्य जगत होते, वाचत होते, झोपच उडाली होती.

हो त्या काळी तुम्ही म्हटले त्याप्रमाणे नामदेव आमचा पण हिरो होता… नामांतराच्या चळवळीच्या वेळी आम्ही नामदेव, अरुण कांबळे, ज.वि. पवार, केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, यशवंत मनोहर,राजा ढालेंच्या कवितांचे वाचन करत होतो. …त्यावेळी एकीकडे बिभत्स शिक्का बसलेले मसण्या उद, गांडू बगिचा सारखे जळजळीत शब्द आम्हाला पण अस्तित्वात असलेले वेगळे जग दाखवित होते.

माझ्या सारख्या बहुजन जातीत जन्माला आलेल्या मुलीला जाती भेदाचे अनुभव आलेले होतेच; ते या चळवळीने बोलण्याचे, लिहिण्याचे धाडस दिले. माझे बालपण ब्राह्मण वस्तीत गेले व शिक्षण आर.एस.एस. प्रणित शाळेत झाल्यावरही त्यांचा माझ्यावर काहीच प्रभाव झाला नाही, उलट माझी नाळ जुळली ती दलित-बहुजन चळवळीशी. कारण पहिल्यांदाच वस्त्या खडबडून जागत होत्या, छावण्या हलत होत्या, अभिजात, जन्म जात वगैरे बकवास आहे सर्व काही ‘जात निहाय’ आहे याचा अहसास होत होता…

फुले आंबेडकरी विद्रोही, दलित, परिवर्तनवादी विचारसरणीने मला स्त्रियांच्या चळवळीत दलित बहुजन स्त्रीवादाची मांडणी करण्यास प्रेरित केले. या पँथरनेच मला black पँथर चा अभ्यास करण्याची, अश्वेतस्त्रीवादी लेखिका एलिस वाकर, झोरा हर्त्सन वाचण्याची, मरियम मकेबा ऐकण्याची दिशा दाखविली.

अनेकदा मी नामदेव ढसाळांना काही संमेलनात, ओबीसीं च्या सभांना भेटले, पण मी स्वत: त्यावेळी नर्मदा बचाव मध्ये इतकीअडकले होते की कधी त्यांच्या सोबत चर्चा झाल्या नाहीत. त्यावेळी त्यांचे शिवसेनेत जाणे, या सत्तेत मन रमत नाही च्या पार्श्वभूमीवर समजू शकत नव्हते. मुम्बैत आल्यानंतर सुरुवातीला मी शोभा बागुल, अरुण कांबळे, अवनी कांबळे यांच्या बरोबर काही कार्यक्रमांना जायचे तेव्हा एक दोनदा मल्लिकाला बघितले होते. तिचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचय’, हे आत्मकथन मनावर चरे उमटवून गेले होते. नामदेव च्या प्रतिमेला तेव्हा तडे गेले होते.

२००४ ते २००६ च्या सुमारास एक चित्रकार तरुण मुलगा आमच्याकडे यायचा. तेव्हा तो नामदेव मल्लिकाच्या घरी पण जात असे. नामदेव आणि मल्लिकाच्या माणुसकीचे, घट्ट नातेसंबंधांचे तो वर्णन करायचा. आपण कसे सगळे काळे पांढरे असेच बघतो, तसे बघायला नको असे वाटले…

नामदेव आपल्या समकालीन असला तरी आपल्यासाठी एक विलक्षण आख्यायिका बनून राहिला असे आता समजतेय.

तो गेल्यावर त्याच्या बद्दल लिहितेय याचे वाईट वाटतेय, पण तो इतिहास आहे आमच्या सारख्या ८० मधील तरुणाईच्या मनात विद्रोहाचे बीज पेरण्याचा. हे लिहिले नाही तर कसे कळेल समाजाला की किती जणांना पँथरने प्रेरणा दिली! या पँथरचे साहित्य असे स्फ़ुल्लिंग पेटवतच राहील आणि एका सम्यक विश्व निर्मितीचा ध्यास आपल्या सर्वांना लागेल याची खात्री देऊया या क्रांतिकारी कवीला!

‘सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निर्वाणाकडे-निर्वाणम्-शांतम्…’ नामदेव ढसाळ

-लता प्रतिभा मधुकर
latapm@gmail.com
………………………………………………………………………………………..