अरविंद आणि आर के लक्ष्मणचा कॉमन मन

आर. के. लक्ष्मणचा कॉमन मॅन
कार्टून च्या चौकटीतून
उडी मारून जाताना मी पाहिला

भेटला थेट केजरीवाल सोबत मेट्रो तून उतरताना
रामलीला च्या गर्दीत बघितला मी झाडू घेवून नाचताना
पटेल चौकात रस्त्यावर झोपलेला
आणि मंत्रालयात राखी बिर्ला शेजारी बसलेला मी पाहिला
कॉमन मॅन ही बघत होता पहिल्यांदाच स्वत: ला सरकार होताना

लक्ष्मन सोबत कार्टून च्या चौकटी तून त्याने बघितलं होत खूप सारं
त्याने मोजले होते अम्माचे शेकडो जोडे …
सुखराम च्या बाथरूम मधील नोटांची बंडले

बघितले होते विज्ञानाचे उलटे नियम
साखर कोळसा रस्ता यांचे सत्तेच्या प्रयोगशाळेत नोटां मध्ये रुपांतर होताना

बघितले होते गणिताचे उलटे नियम
संपत्तीचे गुणाकार पाच वर्षात होताना

ऐकली होती उलटी भाषा
लाचारी पासून मग्रुरी पर्यंत बदलत जाताना

निवडणुकीत तो झेंडे नाचवत होता
जाहिरनाम्यांचे स्वप्नभंग पचवत होता
निवडणुकीतली दारू रिचवत होता
५०० च्या नोटे वरच्या गांधी ला स्मरून मतदान करत
उरलेली ५ वर्षे कार्टून च्या चौकटीतून रोज निमुटपणे बघत होता
लक्ष्मन ने दिलेल्या चष्म्यातून
कायद्याच्या राज्याच्या विरलेला कोट घालून ……

१९७७ ला रामलीला वर तो असाच नाचला होता
गुवाहाटीला तो हत्तीवर बसून मोहन्तो सोबत असाच नाचला होता
व्ही पी सिंगांची फार टोपी घालून अस्साच नाचला होता
पुन्हा पुन्हा निराश होत….

अरविंद
तुझ्यासोबत कॉमन मन आज पुन्हा नाचला आहे
स्वप्नांचा पाढा पुन्हा तुझ्या डोळ्यात वाचला आहे
कार्टून च्या चौकटीतून तू त्याला पेपरच्या हेड लाइन वर बसवलेस
फक्त पुन्हा त्याला निराश करू नकोस….
तू “लक्ष्मन रेषा” ओलांडलीस की
तो पुन्हा आर के लक्ष्मन च्या तावडीत सापडेल
त्याला हेडलाईन वरून पुन्हा
कार्टून च्या इवल्याशा चौकटीत ढकलू नकोस अरविंद
त्याला हेडलाईन वरच कायम ठेव…

– हेरंब कुलकर्णी

herambrk@rediffmail.com
9270947971