गारपिटीने गारठलेला बळीराजा – २०१४

२५ फेब्रुवारी २०१४ पासून सुरु झालेल्या गारपिटीने महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात, अर्ध्या महाराष्ट्रात लाखो एकरावरील, तयार उभ्या जिरायती बागायती पिकांना मातीत गाडले, हाहाकार माजवला. गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्षे, आंबे, उस, कापूस हेच काय, बाभळीला ही आडवे केले. गेल्या दोन वर्षातल्या कोरड्या व ओल्या दुष्काळानंतर या वर्षी तरारलेले हातातोंडाशी आलेले पीक काही तासात मातीमोल झाले. शेतकऱ्याने छातीत टिकवून ठेवलेला शेवटचा श्वास एक दीर्घ उसासा ठरला. शेतात सर्वनाशाखेरीज पहाण्यासारखे काहीच दिसेना. अनेक चिमण्या, पोपट, पक्षी प्राणी या टेनिस बॉलपेक्षा मोठ्या गारांच्या संतत धारेचे बळी ठरले. गुरे ढोरे माणसे जखमी झाली. घरे, माळवदं तुटली, मोडली. बीड, उस्मानाबाद येथे बर्फाच्छादित हिमाचल वाटावा इतकी गारपीट झाली. काही ठिकाणी तर जवळजवळ दीड फूट बर्फ साचले. या बर्फाने गारवा देण्याऐवजी जिवंत जग आणि जीवनेच्छा मृतवत थंडगार केल्या. हे भयानक वास्तव लक्षात आल्यानंतर काही घरातील कर्त्या माणसाना प्रथम काही दिवस बधीरता, मग अस्वस्थता नंतर वैफल्य, हतबलता आली. जीवनेच्छा ग्रासून टाकणाऱ्या या निराशेने काहीना स्वनाशाकडे प्रवृत्त केले. एकेका जिल्ह्यातून आत्महत्यांच्या बातम्या येऊ लागल्या. ही गारपीट साधी नव्हती. माणसे, प्राणी पक्षी साऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बळी घेणारी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणावी इतपत भयंकर तिचे स्वरूप आहे. केवळ संवेदनशील माणसांचीच मने हादरावीत असे नव्हे तर निवडणुकीत मश्गुल साऱ्या महाराष्ट्राने तातडीने लक्ष द्यावे अशी ही घटना आहे. याचे दूरगामी परिणाम आपणा सर्वांच्या जीवनावर होणार आहेत.
तातडीने आत्महत्याग्रस्त कुटुंबाना वैद्यकीय व मानसिक प्रथमोपचार मिळावेत हा विचार मनाशी बाळगून मी अविनाश पाटील, डॉ हमीद दाभोलकर, माधव बावगे, आदी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पुढील कामाची आखणी केली.त्या नुसार दि. २३ मार्च २०१४ ला लातूर तर दि.३० मार्चला बीड येथे, डॉ.दिनेश व वर्षा पाटील, डॉ हमीद दाभोलकर, डॉ.मिलिंद पोतदार, डॉ.मोगले, डॉ. बागलाने या सर्व मानसोपचार तज्ञांना घेऊन,डॉ.अशोक बोलडे, मी स्वत: व म अनिस ने सर्व इच्छुक कार्यकर्त्यांना विपत्तीचे मानसिक परिणाम, त्या वरील उपचार,आवश्यक तितके प्राथमिक समुपदेशन समजून देणारे एकेक दिवसाचे प्रशिक्षण दिले. अशा आवश्यक प्राथमिक मानसिक आधाराचे प्रशिक्षण देऊन समाजात जागोजागी मानस मित्र तयार करावेत हा विचार व त्या विषयक योजना गेली काही वर्षे मी सर्वत्र मांडीत आहे.म अनिस ने या बाबतीत पुढाकार घेऊन चाळीसगाव येथे जळगाव चे मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक उपचार केंद्र सुरु केले आहे व ते उत्तम काम करीत आहे.
म अनिस रायगड शाखेच्या आम्हा कार्यकर्त्यानी १९९३च्या लातूर भूकंपानंतर सास्तुर व जवळच्या ४ गावात प्राथमिक वैद्यकीय व मानसिक उपचारांचे प्रभावी कार्य एकूण ८ महिने केले होते. याच पद्धतीने रायगड येथील १९८९ व २००५ सालातील पुरावेळी आम्ही काम केले होते. या वेळी प्रबोध दळवी पनवेल, सत्यवान ठाकूर उरण, निलेश घरत अलिबाग, अदिती खानोलकर-म्हापणकर कुडाळ ही अनुभवी, तर पनवेलचे तरुण तडफदार प्रसाद शहा, आरती नाईक, मनोहर तांडेल सर हे कार्यकर्ते केवळ ३ दिवसांच्या पूर्व सूचनेवर ५ दिवसांच्या बीड उस्मानाबाद दौऱ्यावर यायला सज्ज झाले. पूर्व तयारीला उल्हास ठाकूर, महेंद्र नाईक, यांची मदत झाली. याच दौऱ्यात वाहन चालक रवी यांचीही मदत झाली. प्रसिद्ध लेखिका लीला शहा यांनी अनुसया कुंभार, डॉ.धोंडे, स्वप्नील गायकर, डॉ.प्रमोद गांगुर्डे, एस बागी, सौ उमाळकर या डोंबिवलीतील संवेदनशील व्यक्तींकडून एका दिवसात आर्थिक मदत जमवली. म अनिस च्या बीड उस्मानाबाद, तुळजापूर, कळम, आंबेजोगाई येथील अनेक कार्यकर्त्यांनी (प्रा.सविता शेटे, विजय घेवारे, डॉ.अनंत चव्हाण, माणिक मुंढे, प्रा .डी एच थोरात सर, राजेसाहेब कीरदत्त, नीलकंठ जिरगे, संतराम कराड, चंद्रकांत उलेकर, भाग्यश्री वाघमारे, शीतल वाघमारे, देविदास वडगावकर, बालाजी तांबे, बाळकृष्ण शिंदे, रवी केसकर, प्रमोद चरखा, उत्तरेश्वर बिराजदार व अंबा लॉज चे अनंत लोंढे) रहाण्या जेवण्याची, प्रवासाची आखणी, स्थानिक मदतिची व्यवस्था केली. इतर अनेक मोठ्या मानवतावादी थोर मंडळीनी आपआपल्या परीने या कामात हातभार उचलला. म अनिस राज्य प्रधान सचिव माधव बावगे व शंकर बावगे तर कार सहित संपूर्ण दौऱ्यात सोबत राहिले. (आणखी अनेक माणसांची मदत झाली, त्यांचा नामोल्लेख येथे चुकून राहिला असल्यास त्यांनी उदार मनाने मला क्षमा करावी).
मानसमित्र पथकाने नेमके काय केले :
{crisis resolution home treatment च्या धर्तीवर}
दि. २ व ३ मार्च बीड, व दि. ३ – ४ मार्च उस्मानाबाद जिल्ह्यात आत्महत्या घडलेल्या एकूण १४ घरातील कुटुंबियाना आम्ही घरी जाऊन भेटलो. जमेल तसा धीर दिला, सांत्वन केले, पुढील अडचणी विचारून त्या वर शक्य तेथे उपाय सुचविले. त्यातील मानसिक ताण तणावाने त्रस्त मंडळीना तपासून औषधे दिली. काही तक्त्यांच्या मदतीने ताणमापन केले. काळजीपूर्वक विषयाचे गांभीर्य लक्षात घेउन, आत्महत्येचे विचार मनात घोळत आहेत कि काय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. काही शारीरिक आजारांवर उपचार केले. पुढील follow up बाबत स्थानिक पातळीवर सूचना दिल्या, १० ते २० दिवसात जरुरी प्रमाणे कुणा डॉक्टरना कुठे भेटायचे, कुणी सोबत जायचे ते ठरवून दिले. गावातील सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक, सामाजिक जाणीवा ठेऊन मदत करणारी सुजाण माणसे या सर्वाना आम्ही सोबत घेऊन आमच्या भेटीमागचे प्रयोजन नीट समजून दिले. विपत्ती नंतरचे शरीरा मनावरील परिणाम समजून सांगत हेल्प लाईन्स, डॉक्टरांचे फोन नंबर्स देणारी माहिती पत्रके घरोघरी, चावडी-नाक्यावर – रस्त्यांवर वाटली. सामुदायिक वाचनासाठी विस्तृत टिपणे दिली. आपापली काळजी घ्या, इतर तणाव ग्रस्त व्यक्तींवर लक्ष ठेवा, जमेल ती मदत करा, एकट्या निराधार हताश माणसाना भेटत रहा, आम्हीही संपर्क ठेऊ असे सांगत जड अंत:करणाने, एकेका घराचा, गावाचा निरोप घेतला.
काय दिसले ? मनात काय घडले असावे?
शिवराम, (नावे बदललेली आहेत याची नोंद घ्यावी) तरुण शेतकरी. झपाटल्यासारखे, प्रचंड मेहनत घेऊन उभाराला आणलेले पीक. गेल्या दोन वर्षात कोरड्या व नंतर ओल्या दुष्काळाच्या जबरदस्त तडाख्यातून कुटुंब टिकवून शेती करत राहिला. या वर्षी सारी भर होऊन जाईल असा संदेश जणू तरारल्या पिकाने दिला होता. आता आधीचे बँकेचे आणि खाजगी दोन्ही कर्जे थोडी थोडी फेडता येतील. बहिणीचा कुंकवाचा साखरपुड्याचा कार्यक्रम दोन दिवसावर आलाय.त्यासाठी पण थोडे कर्ज काढले होते. घरी आपणच कर्ते. मातारा मातारीला आता हात पाय हलविता येईनातसे झालेत. आन मग अचानक पहाटे जोरदार गारपीट झाली. घर तुटले. दोन दिवस शेतात जाऊन मातीवर आडवे झोपलेले पीक पहात राहिलो. आकाश कोसळले, मेहनतीची माती झाली. काय वाचवता आले नाही. खायला चार दाने मातीमोल पिकातून मिळले नाही. विचार करून डोक्याचा भुगा झालेला. निस्त्या मुंग्या डोक्यात, अंगात. काय करावं? कुणाला सांगावं? घरी बायकोला काय सांगायचं? का ताप द्यावा मातारा मातारीला? शेतीच हे असच व्हायचं असल तर शेतकऱ्यानं करावं तरी काय? तिरिमिरी आली पण तिचा उपयोग काय? घरी समारंभ हाय. बहिणीचा संसार तर उभा कराय पायजे! सकाळी घरी सामान भरलं. विचार पाठ सोडेनात. सर्व पाव्हणे घरी येतील. विचारतील. येव्हडी मेहनत केली आपण कर्ते पुरुष मनून, पण आखरीला अपयशी ठरलो. काय सुचेना!उठलो, शेताकडे गेलो, विहिरीपाशी दोरखंड होत. अचानक डोळ्यासमोर दुसर काय दिसना, ताण सहन होईना….
किसनराव वय ३५. श्रीहरी वय ३५. गणपत वय २७. बाळाराम वय ३२. राजा वय २८ स्वत:स जाळून घेतले. महादेव वय २३, रमेश वय ४० विहिरीत उडी घेऊन आत्महत्या तेही पोहता येत असून? लक्ष्मीबाई वय ५५. अशा बिकट परिस्थितीत कर्ती मंडळी हवालदिल झाली असताना आनखी आपला भर किती टाकावा? आयुष्यात फक्त हाल अपेष्टा गरिबी अपयश असलं तर आपल्या जिम्म्यातून घराला मोकळ करावे, जगण्याच आता लयीच ओझं झालं, असे वाटले असेल? आईने स्वताला ५५व्या वर्षी जाळून घेतलं.त्यांचे पती आता अजून सुन्न आहेत.बोलत नाहीत,खातपीत नाहीत.सारखे डोळे टिपत बसतात.आपल्या पत्नीवर अशी पाळी यावी याचे अतीव दुक्ख,त्यातून न्यूनगंड, कोप निसर्गाचा पण स्वत:च्या मनात अपराध गंड ! बधिरता ओसरली,दिनक्रम सुरु झाला कि ते सावरतील कि या दुक्खात झिजत रहातील?
आशा जिवंत ठेवणारी माणसेही भेटली. कृष्णा वय १५,घरात आत्महत्या घडल्याचे कळल्यावर देखील धीर करून १० चा राहिलेला पेपर देऊन आली. घरच्या मंडळी पैकी ज्याना तपासले त्याना औषधे नीट वेळेवर देण्याची जबाबदारी तिने स्वत:हून उचलली. घरात दुक्ख असताना, तरुण मुलगा गेला असताना, सोनबा, वय ६५ म्हणाले,’ मी या कामात काय मदत करू शकतो ते सांगा’. गावातील सरपंच, पोलिस पाटील, शिक्षक, तरुण मंडळी, काही स्त्रिया, अशा कितीकांनी स्वत:हून जमेल ते काम करण्याची तयारी दर्शविली. अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांनी या मदतकार्यात सहभाग घेत, महत्वाच्या सूचना दिल्या. म अनिस शक्य त्या ताकदीने, संवेदनशीलतेने कामात उतरली.
ही सारी माणसे उद्याच्या विवेकी समाजाची आशास्थाने आहेत !!
कामाचा तपशील संक्षिप्त स्वरूपात पुढील प्रमाणे:
भेटी दिलेली गावे पुढील प्रमाणे :
बीड : १)राजेवाडी, तालुका माजलगाव. २)देव दहिफळ ता.धारूर. ३)सोनी मोहा, ता.धारूर.
अंबाजोगाई : ४) पठान मांडवा ५)नाग पिंपरी ६) चंदन सावर गाव ता.केज ७) हिंगणी
तुळजापूर : ८)पिंपळा खुर्द ९) दिंडे गाव, १०) कसई,
उस्मानाबाद : ११) देव शिंगा १२) आळणी १३) शिंघोली ता. कळम १४) देवळाली
आत्महत्या केलेल्यांची माहिती :
पुरुष १२, स्त्रिया २
वय २०-३५: ६, वय ३५-५० : ५, वय ५० च्या वर – ३
अवलंबिलेली पध्दत : गळफास लाऊन- ६, जाळून घेउन – ३, विषप्राशन – ३, विहिरीत उडी घेउन – २.
तपासलेले शारीरिक व मानसिक ताण तणाव ग्रस्त – ९२
आढळलेली मनोसामाजिक कारणे :
नष्ट झालेली शेती पाहून मनाला बसलेला तीव्र धक्का, असफल झालेले प्रयत्न, अचानक उदभवलेली असह्य प्रतिकूल परिस्थिती, कुटुंबातील एकमेव कर्ता जबाबदार असणे, सोबत मदतीचे हात नसणे, भविष्याबाबत हताशा, कर्जफेडीची चिंता, स्वतःस अपयशी ठरवून त्याने आलेला न्यूनगंड व अपराधगंड. या कारणासोबत काही व्यक्तीनिष्ठ घटक उदा॰ व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, आजवरचे अनुभव व अन्य परीस्थीतीजन्य घटकही कारण ठरू शकतात. कारणांचा सर्वांगीण दृष्टीने अभ्यास या दौऱ्यात शक्य नव्हता.
अचानक उद्भवणारा ताणतणाव (acute stress disorder) :
विपत्ती नंतर साधारणतः पहिला आठवडा ते पहिला महिना या काळात तीव्र चिंता, घबराट, व ताणतणावाची लक्षणे उद्भवतात. तीव्र शोकाची अवस्था, अंदाजे दीड महिन्यात कमी न झाल्यास तिचे रुपांतर दीर्घ कालीन चिंता – औदासिन्य वा ताणतणावाची अवस्था यात होते म्हणून शक्य त्या त्वरेने त्रस्त व्यक्तीस प्राथमिक मानसोपचार देणे अत्यंत महत्वाचे असते.
मनाची बधिरावस्था, शारीरिक व मानसिक अस्वस्थता, लक्ष न लागणे, विचारांची गर्दी होणे, घडलेल्या घटनेबाबत तेचते विचार परत परत येत रहाणे, निराश विचार येणे, अथवा काहीच न सुचणे, सतत रडू येणे, निद्रानाश, भूक मंदावणे, धडधड होणे, थरथर होणे, अंग दुखी, डोके दुखी, पाठदुखी, अगोदर असलेले आजार अधिक तीव्र होणे, अति आम्लता, पोटात भीतीचा गोळा उठणे, दिनक्रम टाळण्याकडे कल वाढणे, स्मरण व एकाग्रता यात अडथळा येणे, एकटे रहावेसे वाटणे, रोजच्या सवईत लक्षणीय बदल होणे, व्यसने वाढणे, चिडचिड वाढणे ई. वेळीच उपचार न झाल्यास या माणसाना ६ महिन्यात विपत्त्योत्तर ताण तणावाचा (post traumatic stress disorder)त्रास सुरु होऊ शकतो.
तीव्र चिंतेच्या व विषादाच्या सर्वच अवस्थामध्ये आत्महत्येची शक्यता लक्षात घ्यावी लागते. घडलेल्या आत्महत्यां,च्या तुलनेत आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बरीच जास्त असते. बऱ्याचदा to be or not to be जगावे कि मरावे या द्विधा मनस्थितीतच एकाएकी आत्महत्येचा निर्णय घेतला जातो. तीव्र निराशा, वस्तुनिष्ठ विवेकी विचारांना वाव देत नाही, पर्यायाचा शोध घेउ देत नाही. ताणापासून त्वरित कायमची सुटका हवीशी वाटते. निराधार दुर्बल एकट्या व्यसन ग्रस्त वा विषाद ग्रस्त व्यक्तीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण अधिक आढळते. आत्महत्येचा प्रयत्न करणारयांमध्ये तरुण व पुरुष यांचे प्रमाण जास्त आढळते.
आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल ?
· गंभीर अवस्थेतील व्यक्तीस त्वरित वैद्यकीय व तद्नंतर मानसिक उपचार करणे.

· शक्य त्या त्वरेने समुपदेशन सुरु करणे

· त्या व्यक्तीशी त्वरित व दीर्घकाळ संपर्क ठेवणे

· प्रश्न सोडविण्यासाठी / पर्याय शोधण्यासाठी / पुनर्वसनासाठी मदत करणे

· त्या व्यक्तीला कुटुंबीय , मित्र मंडळी व सामाजिक संस्थांचा भावनिक आधार व मदत मिळवून देणे.

· मनोसामाजिक उपचारांइतकेच औषधोपचार महत्त्वाचे व परिणामकारक आहेत.

मनावरील औषधांविषयी कृपया खालील गोष्टी लक्षात ठेवा :
· ही औषधे योग्य प्रमाणात, योग्य काळ घेणे परिणामकारक असते

· त्यांचा शरीरावर वा मनावर वाईट परिणाम होत नाही. ती सुरक्षित असतात

· ह्या औषधांची सवय लागत नाही

· उपचार मध्येच सोडू नयेत

· विद्युतउपचार पद्धतीने तीव्र विषाद लौकर आटोक्यात आणणे शक्य होते. योग्य तज्ञाच्या देखरेखीखाली हे उपचार सुरक्षित असतात.

एका घरातील मृताच्या लहान भावाने मला सांगितले, ‘डॉक्टर, तुमी सर्वे लवकर आले असते तर दादा वाचला असता’. त्याचे ते उद्गार किती मोठे सत्य सांगून गेले! आज मागे राहिलेले कित्येक गारपीटग्रस्त आपणासारख्या मानस मित्रांच्या भेटीची वाट पाहत आहेत. या पुढेही मदत पोहोचली नाही, ताण दीर्घकाळ टिकला तर यातील किती जणांची जीवनेच्छा टिकून राहील ते सांगता येणे कठीण आहे. महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेला आणि महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्षमतेला हे आवाहन आहे.

– डॉ प्रदीप परशुराम पाटकर
patkar.pradeep@gmail.com
Tel: 022 – 2745 3623