मुलांनो, म्हणा जयतु हिंदुराष्ट्रम

बरं का मुलांनो, एकदा स्वामी विवेकानंद एका व्याख्यानात म्हणाले, ‘आपण नेहमी भारतीय वस्त्रे परिधान केली पाहिजेत.’ यावेळी त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती, मात्र पायात परदेशी बूट होते. एका ब्रिटिश महिलेने याबाबत विवेकानंदांना विचारलं. शांतपणे तिचं ऐकून घेऊन आणि त्यावर हसून ते उत्तरले, ‘आमच्या लेखी परदेशी माणसांची जागा पायातच आहे.’ या बाणेदार उत्तराने ती महिला निरुत्तरच झाली! बोलूनचालून ती ब्रिटिश महिला म्हणजे कच्ची भाकरीच! कसं म्हणता? मग ऐका. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन एकदा रात्रीच्या जेवणासाठी गेले होते. तिथे एक ब्रिटिश नागरिक आला होता. तो तोर्यातच म्हणाला, ‘आम्ही देवाचे सर्वात लाडके आहोत.’ यावर राधाकृष्णन हसून (पाश्चिमात्यांच्या अज्ञानावर भारतीय विचारवंत हसणार नाहीत तर काय?) म्हणाले, एक दिवस देवाला भाकरी बनवाव्याशा वाटल्या. त्याने बनवलेली पहिली भाकरी थोडी कच्ची राहिली तेव्हा ब्रिटिश जन्मले, दुसरी करपून काळी पडली तेव्हा आफ्रिकन जन्मले आणि मग तिसरी भाकरी मात्र देवाने अतिशय काळजीपूर्वक बनवली, तेव्हा कोण जन्मले असणार?…अगदी बरोबर…तेव्हा भारतीय जन्मले.

मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा तेजोमय इतिहास आम्हाला याआधी कोणीच कसा सांगितला नाही? त्याचं कारण आपल्या देशातील वर्षानुवर्षं सत्तेत असलेला राजकीय पक्ष (लक्षात आलं ना?) आणि अनेक भोंगळ लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे लोक, त्यांनी हे सत्य तुमच्यापर्यंत पोचूच दिलं नाही. पण आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे भारताच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. वाजपेयी सरकारच्या काळातही आपल्या मुरली मनोहर जोशींनी असा प्रयत्न करून पाहिला होता, पण काही नतद्रष्टांमुळे तो बारगळला. शिवाय तेव्हा आपल्याला आघाडीही सांभाळायची होती. आता मात्र आपण स्वबळावर सत्तेत आहोत. त्यामुळे आपल्याला कोणाची पर्वाच करायची आवश्यकता नाही. कोणी काही म्हटलं तर छपन्न इंची छाती असलेले आपले मोदी अंकल बघून घेतील.

या बदलाची सुरुवात आपलं सर्वात प्रगत राज्य गुजरातमधून झाली आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनेक देदीप्यमान गोष्टी तिथे शालेय अभ्यासक्रमात पूरक वाचन म्हणून समाविष्टही झाल्या आहेत. तसं तर आपल्या रा.स्व.संघप्रणित विद्याभारतीच्या शेकडो शाळांमधून आपण कट्टर हिंदुत्ववाद्यांची फौज तयार करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून चालवलेलाच आहे. आता सरकारी यंत्रणेचा वापर करून आपलं ध्येय साध्य करता येणार आहे. तुम्ही लहान आहात, पण तरीही विद्याभारतीचं तत्त्वज्ञान ईश्वर हे विश्वाचं अंतिम सत्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तसं ते न ठेवल्याने नरेंद्र दाभोलकरांचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहेच. त्यांचे मारेकरी न सापडणं हीदेखील ईश्वरेच्छाच होय. एका नरेंद्राला देवाने अशी शिक्षा दिली तर दुसर्या नरेंद्राने हे लक्षात ठेवून त्यानुसार वर्तन केल्याने तो देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला!

हिंदुत्वाप्रति वचनबद्ध पिढी घडवणं हा आपला प्रमुख उद्देश आहे. पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या मते, हिंदुंचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन करून वृद्धिंगत करणं हा शिक्षणाचा प्रमुख हेतू असला पाहिजे. मधू वाणी नावाच्या समाजवादी जंतुच्या मते हा दृष्टिकोन हिटलरच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाशी मिळताजुळता आहे. त्यानुसार आर्यांचं श्रेष्ठत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबावं म्हणून ज्यू धर्मियांचा उल्लेख जगण्याचा हक्क नसलेले शूद्र आणि जर्मनांचे गुलाम असा केला होता. मात्र, अशा जंतुंचं बोलणं आपण कानाआड टाकलं पाहिजे. याबाबत मोदी अंकलचं उदाहरण लक्षात ठेवा. अनेक जंतू गुजरात दंगलीचा विषय खोदून खोदून काढत असतात. पण अंकल ज्या स्थितप्रज्ञतेने त्याकडे दुर्लक्ष करतात, तो आदर्श आपण ठेवला पाहिजे.

गुजरातपासून सुरू झालेल्या या शिक्षणक्रांतिचे जनक आहेत पूजनीय दीनानाथ बात्राजी. आपल्याकडे फक्त जनक असतात, जननी नाही. कारण रा.स्व. संघ ही फक्त पुरुषांची संघटना आहे. स्त्रियांसाठी सेविका समिती आहे कारण स्त्रियांनी फक्त सेवा करायची असते, असं आपण मानतो. बात्राजी साधारणपणे अडवाणीजींच्याच वयाचे, पण अडवाणीजींप्रमाणे त्यांना वानप्रस्थ न दाखवण्यात मोदी अंकल आणि शहा अंकलनी किती दूरदृष्टी दाखवली आहे हे त्यांच्या पुस्तकांमधील संशोधन पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. बात्राजींच्या मूलगामी संशोधनाचे हे पाहा काही नमुने ः स्टेम सेलचं तंत्रज्ञान भारतात पूर्वीपासूनच होतं. गांधारीला मूलबाळ नसल्याने तिने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गर्भातून मांसाचा गोळा बाहेर काढला. एका महर्षिनी तो थंड टाकीत औषधांमध्ये ठेवून नंतर त्या मांसाचे शंभर तुकडे केले. वेगवेगळ्या शंभर पेट्यांमध्ये दोन वर्षं ते तुपात ठेवल्यावर त्यातून शंभर कौरवांचा जन्म झाला.

महाभारतातील युद्धाचं वर्णन राजवाड्यात बसून संजयने करणं हे टिव्हीचं प्राचीन रूपच होय.राजा दिलीप आणि त्याच्या राणीने मूलबाळ नसल्याने गायींची सेवा केली. त्याचं फळ मिळून त्यांना मुलंबाळं झाली. वैदिक काळातही अश्वरथ नावाने मोटार उपलब्ध होती.आपण किती प्रगत होतो, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पाश्चिमात्यांच्या नादी लागून आपण सारं गमावलं. हा वारसा पुढे चालवण्याची जबाबादारी मुलांनो आता तुमची आहे.

या अफाट संशोधनामुळे केवळ इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञांनीच नव्हे तर संस्कृत आणि प्राच्यविद्येच्या अभ्यासकांनीही स्वतःच्या तोंडात फडाफडा मारून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामागे हे शोधून काढण्यातील त्यांचं अपयश तर कारणीभूत आहेच, शिवाय लोकांना आता काय उत्तर द्यायचं हा यक्षप्रश्नही त्यांच्यासमोर आहे. यापुढे सर्व सरकारी अधिकार्यांप्रमाणेच सर्व अभ्यासक-संशोधकांनीही थेट मोदी अंकलना रिपोर्टिंग करावं असा फतवा (सॉरी, आदेश) निघणार असल्याची कुणकूण त्यांच्यापर्यंत पोचली असल्यानेही ते हबकले आहेत. त्यामागचं दुसरंतिसरं कारण काहीही नसून मोदींच्या नैतिक तेजापुढे आपला निभाव कसा लागणार याबद्दलची धास्ती हेच आहे.

मुलांनो, पूजनीय बात्राजींचं कर्तृत्व केवळ एवढंच नसून हिंदू धर्माची आणि रा.स्व.संघाची निंदानालस्ती करणार्या अनेक पुस्तकांवर त्यांनी न्यायालयीन लढाई लढून बंदी आणली आहे. मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण हद्दपार करण्याचं श्रेयही त्यांचंच! पुस्तकांवर बंदी आणणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच असल्याची ओरड ढोंगी लोकशाहीवादी करतीलच. पण त्यांना धूप घालण्याचं कारण नाही. मोदी अंकलचं संदेशपत्रही पुस्तकांमध्ये समाविष्ट असल्याने, मुळात फारसे विरोधी आवाज उठणार नाहीत. बदनामी करणार्या पुस्तकांमधील आरोपांचं तर्कशुद्ध खंडन वगैरे करणं हे तर संघाच्या परंपरेच्या विरुद्धच आहे. मुलांनो, जिथे आपणच अडचणीत सापडू, अशा वाटेला न जाणंच मुत्सद्दीपणाचं नाही का? आपल्याला सोयीचं होते तेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचा ओरडा केलेलाच आहे. २०१२ मध्ये प्रवीण तोगडियांसह १६ जणांचं ट्विटर खातं ब्लॉक करणार्या संपुआ सरकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाल्याचा आणि लोकसभा निवडणुकीच्यावेळी मे २०१४ मध्ये दूरदर्शनने मुलाखतीतला भाग वगळल्याने, आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपलं जाणं हा लोकशाहीवरील कलंक होता अशा शब्दांत मोदी अंकलनी संताप व्यक्त केला होताच की! त्यामुळे, पुस्तकांवर बंदी आणली जात असताना मोदींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य का आठवत नाही किंवा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’वर बंदी आल्यास संघीयांची काय भूमिका असेल? यासारखे उर्मट प्रश्न विचारणार्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे. गोसेवा करून मुलं होत होती तर गांधारीला इतकी सव्यापसव्य करण्याची काय गरज होती? किंवा वैदिक काळातील मोटारी नंतर कशा गायब झाल्या? असले प्रश्न विचारणारे कोणी निघालेच, तर त्यांची गाठ या हिंदुत्वाचं बाळकडू घेतलेल्या प्रखर राष्ट्रवाद्यांशी आहे, हे नक्की. भारताचं हे तालिबानीकरण आहे असा आक्षेप घेणार्यांनी तालिबान्यांचा मुलींच्या शिक्षणाला जसा विरोध आहे, तसा संघाचा नाही, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात, मुलीने शिकल्यावर मात्र समानतेची अपेक्षा करू नये, तर आदर्श माता बनून हिंदुराष्ट्रासाठी चांगले सैनिक तयार करावेत. मूलबाळ झाल्याशिवाय स्त्रिच्या आयुष्याला पूर्णत्व नाही, ही स्त्रिला केवळ मातेच्या भूमिकेत आणि कुटुंबाच्या चौकटीतच पाहणारी आमची मानसिकताही असल्याचा आरोप कोणी केला, तरी आपण त्याची पर्वा करता कामा नये.

बात्राजींच्या आणि विद्याभारतीच्या अभ्यासक्रमातील भाग विज्ञानविरोधी, घटनाविरोधी आणि विद्वेषपूर्ण असल्याचा शोध लावला जाईल. देशातील बहुसांस्कृतिकता आणि धर्मांतर्गत विषमता जाणिवपूर्वक दुर्लक्षून हिंदू ही एकजिनसी ओळख म्हणून ठसवणं हिंदुत्वाच्या राजकारणासाठी फायद्याची असल्याने, हे केलं जात आहे, असा आक्षेपही कोणी घेतील. स्मृती इराणींनी देशाच्या शैक्षणिक आराखड्यात बदल केले जाणार नाहीत, असं राज्यसभेत आश्वासन दिलेलं असतानाही, संसदेला विश्वासात न घेताच हे सारं पुढे का रेटलं गेलं? बात्रांच्या पुस्तकांमध्ये संघाच्या संकल्पनेतील अखंड भारताचा नकाशा दर्शवला असून शेजारी राष्ट्रं भारताचाच भाग आहेत! शेजारील राष्ट्रप्रमुखांना शपथविधीला बोलावणार्या मोदींना हे मान्य आहे का? असल्यास आंतरराष्ट्रीय मंचावर ते याचा खुलासा कसा करणार आहेत? असे प्रश्न विघ्नसंतोषी लोक उपस्थित करतीलच. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आपण हिंदुराष्ट्रनिर्मितीचं काम सुरू ठेवलं पाहिजे. त्यासाठी पुन्हा मोदी अंकल हे दीपस्तंभासारखे मानले पाहिजेत. जशोदाबेनशी झालेला विवाह, लोकसभा निवडणुकीत खर्च केलेले हजारो कोटी रुपये, बलात्काराचा आरोप असलेल्या खासदाराचा मंत्रिमंडळातील समावेश, गुन्हेगारीचा आरोप असलेले सर्वाधिक खासदार भाजपचे असणं, अशा अनेक मुद्यांबद्दल चर्चा होऊनही मोदींनी त्याला कवडीचीही किंमत न देता मौनच बाळगलं. श्रेष्ठ नैतिक मूल्यांचा आणि शुद्ध चारित्र्याचा उद्घोष करणार्या पक्षाच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना या अग्निदिव्यातून जावंच लागणार.

अर्थात, नतद्रष्टांनी कितीही आरोप केले तरी त्यांच्या तर्कशुद्ध मुद्यांवर सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करायला आपल्या अनेक यंत्रणा कार्यरत आहेतच. आपल्या विरोधात कोणी बोलल्यास-लिहिल्यास वाचकांच्या पत्रात पत्रांचा पाऊस पाडणार्यांपासून ते आपलीच तळी उचलून धरणार्या पत्रकारांपर्यंत आपण माणसं पेरली आहेत. वेगवेगळ्या अफवा पसरवण्या-अपप्रचार करण्यापासून ते न्यायालयांमार्फत पुस्तकांवर बंदी आणण्यापर्यंत आणि नाटक-सिनेमादी कलाप्रकारांवर सेन्सॉरशिप लादण्यापासून ते आपल्या विरोधातल्या पत्रकारांची गच्छंती करण्यापर्यंत विरोधी आवाज दाबून टाकण्याची आपली मोठी परंपरा आहे. त्यामुळे भंपक लोकशाहीवाद्यांच्या नाकावर टिच्चून आपण लवकरच भारताचं हिंदुराष्ट्र करणार आहोत.

म्हणा मुलांनो, जयतु हिंदुराष्ट्रम!

मिलिंद चव्हाण

(सौजन्यः कलमनामा, १४ सप्टेंबर २०१४)