अनश्व रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व (लेखांक पहिला) – रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

संघ ह्या विषयावर आतापर्यंत पुरोगाम्यांनी केलेले विश्लेषण अपुरे व सदोष आहे, त्यात आत्मटीकेचा अभाव आहे, असे वाटल्यामुळे मी नुकतीच ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात संघ ह्या विषयावर तीन लेखांची मालिका लिहिली. त्यातील हा पहिला लेख. त्यावर चर्चा व्हावी, ही अपेक्षा आहे.
– रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

नमोयुगाचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसात कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे.सरकारी कचेऱ्या, बाजार – कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नमो सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिन्हे दिसत आहेत.निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे नमो आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते. (आता नमो हेच गांधींचे खरे वारसदार असल्याचा साक्षात्कार होऊन कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातील आणखी काही उंदीर, तसेच काही काही भाबडे(?) सर्वोदयी भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.) ह्या सर्व घडामोडींमुळे पुरोगामी मंडळीनी हुश्श केले आहे.

नाही म्हणायला टमाट्याच्या भावाने गाठलेली शंभरी, स्मृती इराणीबाईंची झटपट पदवी आणि परमगुरु दीनानाथ बात्रा ह्यांच्या सौजन्याने गुजराथेत सुरू असणारे मूल्यशिक्षणाचे प्रयोग ह्यांच्यामुळे पुरोगाम्यांना चघळायला नवे विषय मिळाले आहेत. त्यांच्यावरून नमो सरकारला उघडे पाडता येईल, जनमानसातील त्याची प्रतिमा मलिन होईल अशी स्वप्नेही त्यांना पडू लागली आहेत. पण ते तेवढे सोपे नाही. महागाईमुळे निर्माण होणारा क्षणिक असंतोष वगळता अश्या कोणत्याही गोष्टीमुळे जनमानस फारसे क्षुब्ध होत नाही. प्राचीन काळी भारतातील रस्त्यांवरून मोटारी (अनश्व रथ), तर आकाशातून पुष्पकादि विमाने फिरत असत ह्या गोष्टींचे हसू येण्याऐवजी त्यावर भाबडा विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या गेल्या काही दशकांत अमाप वाढली आहे. ताजमहाल हे मुळात तेजोमहालय नावाचे शिवमंदिर होते, अश्या तद्दन खोट्या कहाण्या आता जनमानसात रुजल्या आहेत. पूर्वी सारे काही आलबेल होते, सोन्याचा धूर निघत होता, स्त्रियांना स्वतंत्र व समान दर्जा होता, मुसलमानी आक्रमक आले आणि सर्व बरबादी झाली; असा इतिहासाचा सोपा (पण खोटा) अर्थ कोट्यवधींच्या मनात नमोराज्य येण्यापूर्वीच दृढमूल झाला आहे. ह्याचे श्रेय बात्रा-पुरंदरे-ओक ह्यासारख्यांच्या अथक परिश्रमाला जितके आहे, तितकेच ते भारतीय परंपरा नेमकी काय हे समजू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे.

एकीकडे भाजपचा मुकाबला राजकीय पातळीवर करू शकणारी कॉंग्रेस आजही पराभूत मनस्थितीत व अपंगावस्थेत आहे, दुसरीकडे केडरबेस असणारे, पण आपल्या राजकीय भूमिकेविषयी कायम संभ्रमावस्थेत असलेले डावे आता राजकीयदृष्ट्या कालबाह्य ठरले आहेत. कॉंग्रेसच्या भ्रष्ट व संधिसाधू राजकारणाला कंटाळलेली व एकूणच सांसदीय लोकशाहीबद्दल निराश झालेली जनता नमोंकडे तारणहार म्हणून बघते आहे. त्यासाठी त्यांनी ह्या देशातील लोकशाही परंपरा, निधर्मीवाद ह्यांना तिलांजली दिली तरी जनसामान्यांना फारसे दुःख होणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, निधर्मीवाद व मुख्य म्हणजे ह्या देशातील बहुविधता ह्या साऱ्यांचे महत्त्व जाणणारी, वंचित शोषितांच्या उत्थानासाठी आग्रही असणारी अशी जी मंडळी आहेत (ज्यांना स्थूलमानाने ‘पुरोगामी’ अशी संज्ञा आहे) ती आज व्यथित आहेत खरी; पण दुसरीकडे ती आजच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यात कमीही पडत आहेत. ह्याचे कारण त्यांची निष्क्रियता हेच आहे. गेली अनेक दशके संघ परिवाराने पद्धतशीरपणे केलेल्या कृतींना प्रतिक्रिया देणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम राहिला आहे. पुढाकार घेऊन कृती करणे, सातत्याने चालणारा कार्यक्रम राबविणे ह्यांचा त्यांना विसर पडला आहे.इ.स. १९७७च्या जनता प्रयोगाचे अपयश व त्यानंतर बाबरीविध्वंस ह्या दोन तडाख्यांमधून ते अद्याप सावरलेलेच नाहीत. पूर्वी रा. स्व. संघाचे सामर्थ्य व मर्यादा ह्यांचे योग्य विशेषण करू शकणारे मधु लिमयांसारखे विचारवंत पुरोगामी प्रवाहात होते. पण बाबरी संहारानंतरचा संघ परिवार व नमो ही दोन्ही रसायने अगदी वेगळी आहेत आणि त्यांचे यथायोग्य विश्लेषण करू शकणारी प्रयोगशाळा पुरोगाम्यांकडे नाही, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे नमोंच्या १५ ऑगस्टच्या भाषणात दाटून येणारे सात्त्विक भाव, मोहन भागवतांचे ‘हिंदुस्तानात राहणारे ते सर्व हिंदू’ असे वक्तव्य, नमो सरकारने परदेशस्थ कंपन्यांना केलेले ‘भारतात येऊन कमवा’चे आवाहन व उत्तर प्रदेशात मध्यम पट्टीत सातत्याने केल्या जाणाऱ्या दंग्यांचे सुनियोजित व्यवस्थापन अश्या एकाच वेळी घडणाऱ्या सर्व ग्लोकल हालचालींचा अन्वयार्थ लावणे त्यांना शक्य होत नाही. शंकराचार्यांनी‘साईबाबा हे देव नाहीत’ असे वक्तव्य का करावे आणि पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याची औपचारिकता का निभावू नये हे जसे त्यांना कळत नाही, तसेच त्यांचे परस्परांशी असणारे नातेही समजून घेता येत नाही, कारण संघ परिवाराबद्दल एका विशिष्ट चौकटीतच विचार करण्याची त्यांना सवय झाली आहे.

अशा परिस्थितीत, संघ परिवार व नमो ह्यांच्या उक्ती-कृतीमागील खरा कार्यकारणभाव समजून घेणे केवळ पुरोगाम्यांसाठीच नव्हे, तर सर्व विचारी नागरिकांसाठी आवश्यक आहे, कारण आपली इच्छा असो वा नसो, देशाचे वर्तमान व भविष्य ह्या दोन घटकांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इतकेच नव्हे, तर ह्या देशाच्या भूतकाळाविषयी भावी पिढ्यांना काय सांगितले जावे हे ठरविण्यातदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने प्रस्तुत लेखात हिंदुराष्ट्राचा विचार व त्याचा गांधीविचाराशी असणारा संघर्ष ह्यांचा परामर्श घेतला आहे.

‘हिंदू हा मुळात धर्मच नाही’:

ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे. रा. स्व. संघाचा जन्म १९२५ सालचा. मुस्लीम लीग १९०६ साली स्थापन झाली. हिंदुहितासाठी वेगळ्या संघटनेची गरज १९२०च्या दशकापूर्वी भासली नव्हती, कारण तत्कालीन काँग्रेसमध्ये हिंदुहिताचे प्रतिनिधित्व करणारे बरेच लोक होते. मुळात हिंदू नावाच्या अस्मितेचा जन्मच इंग्रजांच्या आगमनानंतर झाला. त्यापूर्वी ह्या देशात मराठे, राजपूत, रोहिले, जाट इ. राहत असत. हिंदू धर्म नावाची एकजिनसी गोष्टच कधी अस्तित्वात नव्हती. इस्लाम, ख्रिश्चन धर्म ह्यांप्रमाणे एक देव, एक धर्मग्रंथ, एक उपसनागृह, उपासनेची एकच पद्धत – असे काहीही हिंदू ‘धर्मा’त नव्हते. तेह्तीस प्रकारच्या (कोटी म्हणजे प्रकार) देवदेवतांची, हजारो प्रकारच्या उपासनापद्धतींची, जातिव्यवस्थेच्या जन्मजात तुरुंगात बद्ध अशी ही (नेमाडेंच्या शब्दात सांगायचे तर) ‘समृद्ध अडगळ’, तिच्या सर्वसमावेशकत्वामुळे हजारो वर्षे ह्या उपखंडात तगून होती. जातीआधारित स्वयंपूर्ण, विकेंद्रित कृषीकेंद्री ग्रामव्यवस्था हे तिचे व्यवच्छेदक लक्षण. शक, कुशाण हूणांपासून मुस्लिमांपर्यंत अनेक आक्रमक येथे आले व ह्या व्यवस्थेचा भाग होऊन गेले. मोगलांनीदेखील येथील उत्पादनव्यवस्था व उपासनापद्धती ह्यांना हात लावला नाही. ‘हिंदू’ हे नाव सिंधूपलीकडच्या लोकांनी अलीकडच्या लोकांना दिले होते, हे आपण जाणतोच. म्हणजे मुळात ही प्रादेशिक/ भौगोलिक स्थाननिदर्शक संज्ञा. स्वयंपूर्ण, आत्मलीन अशा ह्या गावगाड्याला बाह्य परिस्थितीशी काहीच घेणे देणे नव्हते. त्यामुळे राज्यकर्त्याचा धर्म कोणता, हा प्रश्न त्याला कधी पडला नाही. इथला शूद्र जातिव्यवस्थेला कंटाळून किंवा ब्राह्मण-क्षत्रिय पदाच्या लोभाने मुसलमान झाला, तरी उपासनापद्धती सोडल्यास त्याच्या आयुष्यक्रमात फारसा फरक पडत नसे. म्हणूनच हिंदू वा मुसलमान असणे ही ओळख ब्रिटीशपूर्व काळात महत्त्वाची नव्हती.ब्रिटिशांनी १८७१ मध्ये प्रथम जनगणना घेतली, तेव्हा मुसलमान, पारशी, ख्रिश्चन नसणाऱ्या समूहांना संबोधण्यासाठी ‘हिंदू’ हे नाम प्रथम वापरले गेले.

मात्र इंग्रजांच्या आगमनामुळे हे चित्र बदलले. येथील समाज पार ढवळला गेला. कारण आपल्या व्यापारी हितसंबंधांच्या रक्षणासाठी येथील स्वयंपूर्ण व विकसित उत्पादनतंत्र मोडकळीस आणणे इंग्रजांना आवश्यक होते. हे सारे करताना त्यांनी आव आणला तो मात्र एतद्देशीय जनतेच्या उद्धाराचा. इथल्या ‘रानटी’ प्रजेला सुसंस्कृत करणे ही जणू त्यांच्यावर आकाशातील देवाने सोपवलेली जबाबदारी असावी, असे त्यांनी भासविले. त्यांच्यामुळे येथील व्यवस्थेला हादरा बसला व ती अंतर्मुख होऊन विचार करण्यास बाध्य झाली. ब्रिटीश हुकुमतीने उभ्या केलेल्या प्रश्नांना स्थानिक व्यवस्थेने दिलेला प्रतिसाद स्थूलमानाने तीन प्रकारचा होता:

सुधारणावादी– आपल्या समाजात अनेक अनिष्ट, कालबाह्य रूढी-परंपरा आहेत.वैज्ञानिक विचारांचा, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा स्पर्शही आपल्याला झालेला नाही. म्हणून आपण आपल्या समाजात सुधारणा करावी अशी प्रेरणा इंग्रजी विद्या शिकलेल्या काहीजणांत जागली. बंगाल व महाराष्ट्र त्यात आघाडीवर होते. त्यामागे विविध समाजगटांच्या वेगवेगळ्या प्रेरणा होत्या. काहींच्या मनात आपल्या समाजातील सती, बालविवाह, केशवपन ह्यांसारख्या स्त्रीविरोधी रूढींविषयी चीड होती, कुणालायेथील समाजातील साचलेपणाबद्दल, जातिव्यवस्थेतील अन्यायाबद्दल संताप होता. त्याचप्रमाणे इंग्रज हे थोर, आदर्श; म्हणून आपणही ‘साहेबासारखे’ व्हावे, अशी मध्यमवर्गीय प्रेरणाही त्यामागे होती.

पुनरुज्जीवनवादी – हिंदू-मुस्लिम समाजातील उच्च वर्गाने एके काळी येथे राज्य केले होते; ते इंग्रजांनी हिरावून घेतले. एव्हढेच नव्हे तर त्यांनी आपल्या थोर संस्कृतीची अवहेलना केली. म्हणून त्यांचा पाडाव करून ह्या भूमीला गतकाळाचे वैभव प्राप्त करून देणे आपले परमकर्तव्य आहे, असे काहींना वाटले. उत्तर भारतातील पूर्वीचे नवाब-सरदार व प. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही वर्ग ह्या विचारांचा होता. ह्याच प्रेरणेची परिणती पुढे मुस्लिम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद ह्यांत झाली.

नवोन्मेषी परंपरावादी – गांधीजींनी ह्या दोन्ही प्रवाहातील उत्तम ते ग्रहण करीत वेगळाच मार्ग अनुसरला. ते स्वतःला ‘सनातनी हिंदू’ मानत होते.संस्कृती काय आहे हे आम्हाला लुटारू इंग्रजांकडून शिकण्याची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती.आपल्या परंपरांचे समर्थन करताना गांधींनी आपल्या बहुविध संचितातील नेमक्या उदारमतवादी, खुल्या परंपरा निवडल्या, किंवा जुन्या परंपरांचा अतिशय नाविन्यपूर्ण अर्थ लावला. त्यांनी वैष्णवाची, पर्यायाने हिंदू माणसाची व्याख्याच ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीड परायी जाणे रे’ अशी केल्यामुळे परधर्मीयांचा द्वेष करण्याचा हिंदू असण्याशी संबंधच उरला नाही. हिंदू परंपरेतील ‘ईश्वर हेच सत्य’ ही संकल्पना उलटी करून त्यांनी ‘सत्य हाच ईश्वर’ असे मांडल्यामुळे चिकित्सेचा, सत्यशोधाचा, अनेकविध पर्यायांचा मार्ग खुला झाला. आम्हाला आमच्या समाजात सुधारणा करायची आहे, पण ती इंग्रजांसारखे होण्यासाठी नाही, तर आत्मोद्धारासाठी, आमचा समाज उन्नत करण्यासाठी, अशी त्यांची धारणा होती. इंग्रज आमच्यावर राज्य करू शकतात, ह्याचे कारण त्यांचे शस्त्रबळ किंवा तंत्रज्ञान-विज्ञानावरील त्यांची पकड हे नसून आमची गुलाम मनोवृत्तीच आहे.ती त्यजली, तर त्यांना आमच्यावर राज्य करणे अशक्य होईल असे त्यांनी मांडले. तसे करताना त्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला नाही की देवळे, तीर्थस्थळे ह्यांचे महात्म्य वाढविले नाही.परंपरांचा अभिमान बाळगताना त्यांनी दाखविलेला मूल्यविवेक आणि जुन्या परंपरांना नवा अर्थ देण्याची त्यांची नवोन्मेषी (इनोव्हेटिव) वृत्ती ह्यामुळे ते पुनरुज्जीवनवाद्यांपासून वेगळे ठरतात.

टिळक युगाच्या अस्तानंतर व गांधीयुगाच्या प्रारंभानंतर पुनरुज्जीवनवादी हिंदूंना येणाऱ्या बदलांची चाहूल लागली. वर उल्लेखिल्याप्रमाणे गांधीनी स्वतःला परंपराप्रिय सनातनी हिंदू घोषित केल्यामुळे पुनरुज्जीवनवादी हिंदूंचा सारा राजकीय अवकाश त्यांनी व्यापला. शिवाय ‘जात’ हा शब्दही न उच्चारता त्यांच्या ग्रामोद्योगाला चालना देण्याच्या, स्थानिक भाषेत कॉंग्रेसचा व्यवहार चालविण्याच्या आग्रहामुळे, पक्षाचे नेतृत्व उच्चवर्गीय – उच्चजातीय सुशिक्षितांकडून उत्पादक जातींकडे (आजच्या भाषेत ओबीसींकडे) सरकले. कॉंग्रेस खऱ्या अर्थाने ‘तेल्या-तांबोळ्यांची’ झाली.कॉंग्रेसमधील मदनमोहन मालवीयांसारख्या परंपरानिष्ठ नेत्यांनाही पक्षाचे बदलते रूप व गांधीचे नेतृत्व स्वीकारावे लागले. त्यामुळे टिळकांच्या मृत्यूनंतर लौकरच पुनरुज्जीवनवादी हिंदू नेतृत्वाला, ‘कॉंग्रेस आता आपल्या हितसंबंधांचे रक्षण करू शकणार नाही’ अशी जाणीव झाली. त्याचाच परिणाम म्हणून त्यानंतर अवघ्या पाच वर्षात रा. स्व. संघाची स्थापना झाली. तेव्हापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या २२ वर्षांत संघाने कधीही स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेतला नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार एके काळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते, पण संघस्थापनेनंतर त्यांचा चळवळीशी संबंध संपला.हिंदुराष्ट्रवादाचे प्रणेते स्वा. सावरकर सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात सक्रिय होते. त्यासाठी त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची सजा झाली व त्यात अपार कष्ट सहन करावे लागले. परंतु, त्यांच्या मुक्ततेची पूर्वअटच त्यांनी स्वातंत्र्य-चळवळीपासून दूर राहणे ही असल्यामुळे, सुटकेनंतर त्यांचाही त्याच्याशी संबंध संपला.

गांधींच्या उदयामुळे आंदोलनाचे सशस्त्र पर्व संपुष्टात आले व व्यापक प्रमाणावर अहिंसक चळवळ सुरू झाली. गांधींचा सर्वधर्मसमभाव, इतिहासाचा अन्वयार्थ व भविष्याचा वेध घेण्याची त्यांची दृष्टी सावरकरांच्या जीवनदृष्टीच्या पूर्णतया विरोधात होती. म्हणून सावरकर व हिंदू महासभा गांधीप्रणीत स्वातंत्र्यसंग्रामापासून केवळ दूरच राहून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचा विरोधच केला. असे करताना त्यांनी अन्य मार्गाने स्वातंत्र्यासाठी आंदोलन छेडलेही नाही. देशासाठी बलिदान करणारे किंवा अनन्वित छळ सहन करणारे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्यातील बहुसंख्य लोक हे स्वातंत्र्यासोबतच समतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे, म्हणजेच साम्यवादी-समाजवादी विचारांचे होते, ज्यांचा हिंदू राष्ट्रवादाशी संबंध नव्हता. आज संघ परिवार ज्या भगतसिंग- सुखदेव-राजगुरू किंवा नेताजी सुभाषचंद्रांवर अन्याय झाल्याचे भासवीत आहेव त्यासाठी गांधी-नेहरू व काँग्रेसवर आगपाखड करीत आहे, त्या थोर क्रांतिकारकांच्या कार्याशी व विचारधारेशी संघ-परिवाराचा किंवा हिंदू राष्ट्रवादाचा काहीएक संबंध नव्हता; असलाच तर विरोध होता व तो जगजाहीर होता, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघाच्या, किंबहुना हिंदुराष्ट्रवाद्यांच्या गांधीविरोधाची व काँग्रेसविरोधाची पाळेमुळे अशा रीतीने इतिहासात दडली आहेत.

गोडसे व गांधी यांच्यामधील फरक

हा फरक समजून घेण्यापूर्वी आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याचा परामर्श घ्यायला हवा. तो म्हणजे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांत नेमका फरक तो काय? तो लक्षात न घेतल्यामुळे अनेकदा संघीय मंडळी सर्वोदयाच्या व्यासपीठावर किंवा गांधीवादी संस्थांमध्ये मानाने मिरवताना दिसतात.अनेकदा तर अश्या संस्था संघाने गिळंकृत करेपर्यंत भाबड्या (!) गांधीवाद्यांना त्याची खबरबात लागत नाही. ह्या वैचारिक गोंधळामुळे समाजवादी-साम्यवादी-आंबेडकरवादी-स्त्रीमुक्तिवादी इ. सर्व पुरोगामी मंडळी गांधींचा प्रचंड राग करतात. एक वेळ (किंवा अनेकदा) ती संघाला जवळ करतील, पण गांधी त्यांच्यासाठी ‘अस्पृश्य’ असतात. कारण पुनरुज्जीवनवादी (हिंदूराष्ट्रवादी) व गांधी दोघेही परंपरांचा अभिमान बाळगताना आपल्याला दिसतात. अनेकदा त्यांची भाषाही सारखी असते. हिंदू धर्माची थोरवी दोघेही गातात, त्यामुळे‘निधर्मी’ मंडळींचा व जनसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो, किंवा त्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात ठेवले जाते. म्हणूनच गांधी व गोडसे ह्यांतील नेमका फरक समजून घेणे आवश्यक आहे.

हिंदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण आपल्याला ललामभूत वाटणारी परंपरा कोणती, ह्याविषयीच्या त्यांच्या धारणा व त्यानुसार त्यांच्या विचार व कार्याच्या दिशा परस्परविरोधी होत्या.हिंदुधर्माचे आकारहीन, अघळपघळ रूप, त्यातील बहुविधता, नव्याचा स्वीकार करण्यातील सहजता, थोडक्यात त्यातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांना हा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. गांधींसाठी हिंदू ही केवळ उपासनापद्धती नसून ती एक जीवनप्रणाली होती. अशी जीवनप्रणाली जी पूर्णपणे खुली आहे; जीत आचारविचाराचे बंधन नाही. ते धर्माचा संबंध एकीकडे कर्तव्याशी लावतात, तर दुसरीकडे नीतिमूल्यांशी. ते राजकारणात धर्म आला पाहिजे असे सांगतात, तेव्हा त्यामागे भ्रष्ट राजकारणात मूल्यांची प्रतिष्ठापना केली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांसाठी हिंदू धर्म ही एक उपासनापद्धतीच आहे. सावरकर जेव्हा ‘हिंदू’च्या व्याख्येत ‘हा देश ही ज्याची मातृभू, पितृभू व पुण्यभू आहे’ असा उल्लेख करतात, तेव्हा त्यांना येथील धर्मांतरित मुस्लिम व ख्रिश्चन हिंदू नाहीत, पण हिंदू धर्माविरुद्ध बंड करणारे जैन व बौद्ध मात्र हिंदू धर्माचाच एक भाग आहेत असे म्हणायचे असते. (त्याच वेळी हिंदू-बौद्ध संघर्ष हे त्यांच्या दृष्टीने भारतीय इतिहासातील एक सोनेरी पानही आहे.) सावरकर व संघपरिवार ह्यांना हिंदू धर्माचे राजकारण करायचे आहे. त्यांना गांधींच्या अर्थाने राजकारणात ‘धर्म’ आणायचा नाही. त्यांच्या दृष्टीने ‘शठं प्रति शाठयम्’, म्हणजे ‘खटाशी असावे महाखट’ हेच योग्य आहे.

मुख्य म्हणजे इंग्रज भारतावर राज्य का करू शकतात व ते उलथवून लावण्यासाठी आपण काय करायला हवे, ह्याविषयीचे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांचे विचार परस्परविरोधी आहेत. देश दुबळा झाल्यामुळे तो गुलाम झाला असे दोघांनाही वाटते. पण सावरकर वगैरे मंडळींना वाटते की शक्ती म्हणजे शस्त्राची ताकद. आपल्या समाजातील क्षात्रवृत्ती लोप पावली, आपण स्त्रैण झालो. इंग्रज मात्र शारीरिक दृष्ट्या बळकट आहे. तो नवतंत्रज्ञानावर आधारलेल्या शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. म्हणूनच ते ‘भारताचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण’ (अर्थात स्त्रैण हिंदूंचे पौरुषीकरण) ह्यावर भर देतात. हिंदुत्वाच्या विचारात शारीरिक शक्ती व मर्दानगी ह्या बाबी केंद्रस्थानी आहेत. (साध्वी ऋतंभरा, बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया इ.ची वक्तव्ये आठवावीत.) म्हणूनच रा. स्व. संघ ह्या ‘वीरांच्या’ संघटनेत स्त्रियांना प्रवेश नाही. राष्ट्र सेविका समिती किंवा दुर्गा वाहिनी ह्यांची भूमिका दुय्यम व परिवार प्रमुख ठरवील त्याप्रमाणे असते. एरवी वीर पुरुषांभोवती पंचारती ओवाळणे व मुलांवर धार्मिक संस्कार करणे हेच स्त्रियांचे काम. बाबरी मशिदीच्या आंदोलनाच्या निमित्ताने संघ परिवाराने शांत, सौम्य आदर्शपुरुष असलेल्या रामाचा ‘मेक ओव्हर’ करून त्याची ‘युयुत्सु, धनुर्धर’ प्रतिमा लोकप्रिय केली. त्यासोबतच रामासोबत असणारे त्याचे पंचायतन त्यांनी मोडीत काढले. बजरंगाला निदान वेगळी सेना (दल) तरी मिळाले, पण सीतामाईला मात्र पुन्हा भूमिगतच व्हावे लागले. पूर्वी उत्तर भारतात लोक एकमेकाला भेटल्यावर ‘जय सियाराम’ असे अभिवादन करीत. बाबरीप्रकरणाने त्यांना ‘सिया’ गाळून फक्त‘जय श्रीराम’ म्हणायला शिकविले. …..हिंदुराष्ट्रात स्त्रियांचे स्थान काय असेल ह्यावर आणखी बोलण्याची गरज नाही.

ह्याउलट गांधींचा भर आत्मशक्ती, मनाची शक्ती जागविण्यावर आहे.कारण त्यांच्या मते शक्ती म्हणजे मनाची शक्ती, मनोनिग्रह. भारतीय लोक आपली आत्मशक्ती विसरले. त्यांना मिळालेला सत्य, अहिंसेचा वारसा विसरले. त्यांनी स्वतःच गुलामगिरी स्वीकारली, म्हणून ते गुलाम झाले. त्यांनी जर आत्मभान, आत्मशक्ती जागवली, तर इंग्रज येथे राहूच शकणार नाहीत. केवळ शस्त्रांच्या आधारे, मूठभर इंग्रजांना हजारो मैल दूर असणाऱ्या खंडप्राय प्रदेशातील कोट्यवधी लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे, असे ते म्हणत. ही आत्मशक्ती केवळ इंग्रजांना हाकलण्यासाठीच नव्हे, तर स्वराज्यात रामराज्य स्थापण्यासाठी देखील आवश्यक आहे, असेही त्यांचे सांगणे होते. स्त्रियांमध्ये मनाचा कणखरपणा अधिक असतो, म्हणूनच गांधींच्या अहिंसक लढ्यात स्त्रियांना मानाचे स्थान होते.

हिंदुराष्ट्रवादाचा मुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. परधर्मीयांनी हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले, असे सांगून हिंदूंमधील द्वेषाग्नी सतत प्रज्वलित ठेवणे ही त्यांची रणनीती आहे. त्याचबरोबर गतेतिहासाचे सुरम्य चित्रण करून त्या गौरवशाली भूतकाळाकडे परत जाण्याची प्रेरणा तेवत ठेवणे हादेखील त्याच रणनीतीचा भाग आहे. भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून इतिहासाची मोडतोड त्यामुळेच तर त्यांना करावी लागते! ताजमहाल सुंदर आहे ना, मग तो हिंदूंचाच असला पाहिजे व स्त्रीविरोधी रूढी असल्या तर त्या मुसलमानांमुळेच असल्या पाहिजेत, ही कसरतही त्यासाठीच. जगभरातील धर्माधारित राष्ट्रवाद्यांची हीच गोची आहे. पाकिस्तानात जो इतिहास शिकविला जातो, तीम्हणजे बात्राप्रणीत इतिहासाची ‘मुस्लिम’ आवृत्ती. गांधींच्या दृष्टीने‘हिंदू’ हा संप्रदाय नसल्यामुळे, त्यांना इतिहासाची मोडतोड करण्याची गरज भासत नाही. त्यांचा राम रहीमसोबत व ईश्वर अल्लासोबत सुखाने नांदू शकतो.

(क्रमशः)

ईमेल: ravindrarup@gmail.com