पुरुषप्रधान मानसिकतेचे ‘आधुनिक’ तर्कट

‘पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचे काय,’ हा प्रश्‍न अलीकडे उच्चरवात विचारला जाऊ लागला आहे. समानतेचा विचार स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही अधिक चांगल्या ‘माणूस’पणाकडे नेणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
– मिलिंद चव्हाण

स्त्रियांना समान हक्क देण्याच्या मुद्द्यावरील चर्चेत, ‘पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचे काय,’ असा प्रश्न विचारला जाण्याचा अनुभव अलीकडे अनेकदा येतो; तर काही व्यक्ती त्याही पुढे जाऊन ‘पुरुष हक्कां’ची भाषा करताना दिसतात. नुकताच ‘पुरुष हक्क दिन’ही साजरा झाला! समाजाची मानसिकता पुरुषप्रधान असल्याने या भाषेची स्वीकारार्हता वाढत जाण्याचा धोका आहे. त्यामुळेच या प्रश्‍नातली गुंतागुंत आणि सामाजिक न्यायाचा विचार नीट समजावून घेतला पाहिजे.

स्त्री चळवळीने पितृसत्तेमुळे स्त्रियांचे कसे शोषण होते, याबद्दल विवेचन केले आहे. पितृसत्तेत स्त्रियांचे स्थान पुरुषांच्या तुलनेत कनिष्ठ असते व कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषप्रधान विचारांचे वर्चस्व असते. संपत्तीचा वारसा पित्याकडून पुत्राकडे जातो. या व्यवस्थेत घरकाम ही स्त्रियांची प्रमुख जबाबदारी मानली जाते, तर घराबाहेर जाऊन कमाई करणे ही पुरुषांची. स्त्रियांच्या घरकामाला कोणताही मोबदला नसतो; पण त्याच कामाचा मोबदला मिळू लागल्यास पुरुष ते काम करायला तयार होतो. आचारी, शेफ, वेटर, टेलर या रूपात दिसणारे पुरुष ही त्याचीच उदाहरणे. स्त्रीने घराबाहेर जाऊन काम करायचे वा नाही, हेही नवरा व सासरच्यांच्या मर्जीवर अवलंबून असते. शरीर आणि गर्भाशय तिचे असले तरी मुले किती व केव्हा जन्माला घालायची, याचा निर्णय तिच्या हातात नसतो. मुलगा जन्माला घालणे महत्त्वाचे मानले जाते आणि लिंगनिदान करून मुलगी असल्यास गर्भपात केला जातो. स्त्रीची लैंगिक ‘शुद्धता’ तिच्या जीवापेक्षा अधिक मोलाची मानून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पदर, घुंघट, बुरखा ही साधने वापरली जातात. पुरुषांवर मात्र असे बंधन नसते. लैंगिकतेवरील हे नियंत्रण जातिव्यवस्था टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जातीबाह्य जोडीदार निवडणाऱ्या मुलींशी संबंध तोडून टाकण्यापासून ते तिला आणि तिच्या जोडीदारालाही संपवण्यापर्यंत मजल जाते.

सोनई, खर्डा इ. ठिकाणी झालेल्या दलित तरुणांच्या हत्येमागे पितृसत्ता आणि जातवास्तवातून निर्माण होणारी ‘इभ्रती’ची संकल्पनाच कारणीभूत असल्याचे दिसते. मात्र, यातील कळीचा मुद्दा असतो संपत्तीचा! घर, जमीन, शेत, मुले आणि ती स्त्री, हे सारे पुरुषाच्या नावावर असते. संपत्तीवरील वर्चस्वासाठीच ही रचना पद्धतशीरपणे निर्माण केली गेली.माहेरच्या संपत्तीवर हक्क सांगितल्यावर स्त्रीचे भावाशी आणि माहेरशीही नाते तुटणे, लग्न ठरवताना हुंडा हा महत्त्वाचा मुद्दा असणे, या साऱ्याच बाबी पितृसत्तेचे संपत्तीशी किती जवळचे नाते आहे, याच्या निदर्शक आहेत. ज्या स्त्रिया व्यवस्थेने लादलेली बंधने निमूटपणे मान्य करतात त्यांचा गौरव होतो, तर व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या स्त्रिया-मुलींवर हिंसा. त्याबरोबरच स्त्रियांनी व्यवस्थेविरुद्ध बंड करू नये, म्हणून त्यांच्यात फूटही पाडली जाते. उदा. सुवासिनींनी पाहुण्यांना ओवाळणे; मात्र विधवेचे दर्शनही अशुभ मानणे इत्यादी. म्हणजेच स्त्रीचा मान, ती पितृसत्तेचे हित किती सांभाळते, यावर अवलंबून असतो. स्त्रीवादी कार्यकर्त्या मनीषा गुप्ते यांच्या मते, ‘लोखंडाच्या साखळ्या स्त्रिया तोडून टाकतील म्हणून सोन्याच्या साखळ्यांनी त्यांना ही व्यवस्था जखडून ठेवते!’

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारतात २००४ मध्ये स्त्रियांविरुद्धचे नोंदवले गेलेले एकूण गुन्हे १ लाख ४३ हजार ५२६ होते; तर २०१३ मध्ये ते ३ लाख ९ हजार ५४६ म्हणजे दुपटीहून अधिक झाले. विशेष म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरोधात अनेक कायदे असूनही हे सारे घडत आहे. पुरुषप्रधानतेमुळे स्त्रिया अशा भरडल्या जात असताना, व्यवस्थेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले पुरुषही पूर्ण स्वतंत्र नसतात. कमावता, संरक्षक, कठोर अशा भूमिका त्यांना कराव्याच लागतात. पण पुरुषत्वाचे मुखवटे बाजूला सारू पाहणाऱ्या, घरकामाची जबाबदारी घेणाऱ्या, स्त्रियांचा संपत्तीतील हक्क मान्य करणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परंतु विषमतारूपी सागरातला कळशीभर पाण्याचा रंग बदलला म्हणून पूर्ण व्यवस्थाच बदलली असे होत नाही.

पुरुषांवरील प्रत्यक्ष हिंसेचा विचार केल्यास त्यातील एकूण हिंसेपैकी अल्प हिंसा पितृसत्तेमुळे होते. उदा. ‘पुरुषी’ नसलेल्या पुरुषांवरील हिंसा. मात्र, जात, वर्ग, धर्म, राष्ट्र या नावावर होणाऱ्या राजकारणात व हिंसाचारात पुरुष मोठ्या प्रमाणात बळी जातात. पुन्हा त्या-त्या गटातील स्त्रिया या हिंसेच्या अधिक बळी ठरतात. उदा. दलित, आदिवासी वा अल्पसंख्य स्त्रियांवर होणारी शारीरिक व लैंगिक हिंसा. म्हणजेच स्त्रियांवर जात, वर्ग, धर्म, राष्ट्र या नावावर तसेच पितृसत्तेमुळेही मोठ्या प्रमाणात हिंसा होते. या सगळ्याच राजकारणाचा संबंध सत्ता-संपत्तीशी असतो.

स्त्रियांना एक गट म्हणून दुय्यम स्थान देणाऱ्या या व्यवस्थेमुळे स्त्रियांवर हिंसा होते, हे लक्षात घेऊन त्याविरोधात कायदे केले गेले आहेत. त्याच्या अंमलबजावणीत असंख्य अडचणी आहेत. मात्र, बायका नवऱ्याला छळत असल्याची मूठभर उदाहरणे घेऊन, त्याचे सामान्यीकरण करणे हे आधुनिकतेत लपेटलेल्या परंपरावादी मानसिकतेचे निदर्शक आहे. स्त्रियांना आत्मभान येऊ लागल्याने, खरी गरज पुरुषांनी स्वत:ची मानसिकता बदलण्याची आहे. सुनांना जाळले वा सती केले गेले, तेव्हा ‘कुटुंब वाचवा’ अशी घोषणा दिली गेली नव्हती, कारण पुरुष सहजपणे दुसरे लग्न करू शकत होता आणि करतो. पितृसत्ता, जात, भांडवलशाही, धर्म, यांमधून निर्माण झालेली ही गुंतागुंत समजून न घेता, ‘पुरुष हक्कां’ची भाषा केली जात आहे. ती केवळ पुरुषप्रधान नसून जातीयवादी आणि बहुसंख्याकवादीही आहे; पर्यायाने समानतेच्या आणि लोकशाहीच्याही विरोधी आहे. ही भाषा करणाऱ्यांना मूठभर पुरुषांच्या हक्कांबद्दलच कणव असल्याचे दिसते. समानतेचा विचार पुरुषांविरोधातला नसून पुरुषप्रधानतेच्या विरोधात व स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही अधिक चांगल्या ‘माणूस’पणाकडे नेणारा आहे, हे समजून घ्यायला हवे.
—————————–
लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत

(साभार- सकाळ, २६ नोव्हेंबर २०१४)