कोर्टः चाकोरीबद्धतेचा अन्याय …The Banality of Injustice

भालचंद्र नेमाडेंची कोसला ‘ प्रकाशित झाल्यावर पु.ल . देशपांडेंची प्रतिक्रया अशी होती की ‘ इंग्रजीत ‘he has caught us napping ‘ असा वाक्प्रचार आहे.. या तरुण लेखकाने आम्हाला (मराठीतील प्रस्थापित लेखकांना ) असेच डुलक्या घेताना पकडले आहे. ” नेमाडेंचे वय तेंव्हा २७ -२८ असावे. कोर्ट या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे वय फक्त २८ वर्षे आहे. आणि त्याने देखील , कदाचित , भारतातील अनेक दिग्दर्शकांना असेच डुलकी घेताना पकडले असावे.
‘कोर्ट ‘ या चित्रपटाचा वेग अतिशय संथ आहे किंवा या चित्रपटात क्यामेरा अनेक ठिकाणी नुसता लावून ठेवला आहे असा जो आक्षेप घेण्यात येतो . अर्थात प्रेक्षक जर असा आक्षेप घेत असतील तर ते दिग्दर्शकाचे मोठे अपयश आहे असे म्हणता येईल. पण दुसरी शक्यता अशी नाही का की प्रेक्षक म्हणून आपण कुठे तरी कमी पडतो? अनेकदां असे होते की एखादी कलाकृती पहिल्यांदा आपल्याला आवडत नाही . पण नंतर विचार करताना आणि किंवा कोणाशी बोलताना काही अर्थ , काही सौंदर्यस्थळे लक्षात येतात. पण मग ती कलाकृती आपल्याला आवडायला लागते. कोर्ट या चित्रपटाने झपाटलेल्या गेलेल्या लोकांमधील मी आहे. आणि या चित्रपटाबद्दल हा चित्रपट न आवडलेल्या लोकांच्या आक्षेपाला माझा प्रतिसाद त्यंना चित्रपटाबद्दल पुनर्विचार करायला लावेल अश्या आशेने खालील मुद्दे मांडत आहे .
चित्रपटावरील आक्षेप चित्रपटाच्या वेगाबद्दल जसा आहे तसाच तो न्यायाधीश आणि सरकारी वकील यांचे कोर्टाबाहेरील जीवन दाखवण्याबद्दल द्खील आहे.
खरे तर चित्रपटाचे नाव हे चित्रपटाच्या आशयाला पूर्ण न्याय देत नाही. चित्रपट न्यायव्यवस्थेवर टिप्पणी (कमेंट) कर्तोच. पण तो त्याच्या कितीतरी पलीकडे जातो. कोर्टाचे निर्णय वेळेवर न लागणे ।तरखान्वर तारखा पडत राहणे ही तर खूप आहेत. मुद्दा त्या व्यवस्थेतीलच नव्हे तर एकंदरच आजच्या काळातील सर्वांच्या मानसिकतेचा आहे . या चित्रपटातील न्यायाधीश भ्रष्ट नाही , पोलिसदेखील भ्रष्ट नाही , सरकारी वकील देखील आपले काम प्रामाणिकपणे करणारी आहे. पण तरीही आपल्याकडून प्रचंड मोठा अन्याय घडतोय याचे त्यांना भानदेखील नाही. आणि याचे कारण त्या सर्वांच्या ‘साचेबद्ध’ जगण्यात आहे. न्यायाधीशाला किंवा सरकारी वकिलाला असा प्रश्नच पडत नाही की आपल्या समोर उभा केलेला आरोपी कांबळे याची लोकांमध्ये जावून शाहिरी करण्याची प्रेरणा काय आहे . करण आपण आणि आपल्याजवळचे नातेवाईक यांच्या पलीकडे जावून व्यापक सामजिक आणि राजकीय जाणीव हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असणे म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही. आरोपीवर ज्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा आरोप ठेवण्यात आला आहे त्या सफाई कामगाराला कोणतीही सुरक्षा उपकरणे दिलेली नाहीत आणि गटारीतील दुर्गंधी सहन करण्यासाठी त्याला दारू पिण्यावाचून गत्यंतर नाही या गोष्टी त्यांना अस्वस्थ करत नाहीत कारण न्यायाधीश आणि सरकारी वकील या व्यक्ती आणि पोलिसदेखील कमालीचे साचेबद्ध आयुष्य जगतायेत. न्यायाधीश आणि सरकारी वकिलीणबाईंचे कोर्टाबाहेरील आयुष्य सिनेमात दाखवले नसते तर सिनेमाचा गाभाच हरवला असता. आपल्या समाजाबद्दल व्यापक सामजिक -राजकीय भान नसलेली व्यक्ती ही व्यक्ती म्हणून वाईट नसते. दुष्ट नसते . पण ती खूप मर्यादित असते. आणि अश्या व्यक्ती केवढा प्रचंड अन्याय करत असतात.
सरकारी वकील ही खरे तर स्वतःच अत्यंत विषम सामाजिक व्यवस्थेचा बळी आहे. पहाटे लवकर उठून घरातील सर्वांसाठी स्वैपाक करून मुंबईच्या लोकलने कोर्टाला जाणारी ही बाई संध्याकाळी पुन्हा गर्दीच्या लोकल ने परत येते पुन्हा स्वैपाक करते , टी.व्हि पहात बसलेल्या नवऱ्याला आणि मुलांना ते बसलेल्या ठिकाणी वाढते आणि मग नंतर स्वतः जेवते आणि नंतर उशिरापर्यंत कोर्टाचे काम करते यात तिला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवदेखील नाही. आणि तशीच ती शाहीर कांबळेवर होत असलेल्या अन्यायाबद्दल देखील नाही. त्या अन्यायात ती ‘नेकीने ‘ सहभागी होते. ‘नेकीने’ म्हणजे आपण आपले कर्त्यव्य करतोय या भावनेने. अश्या ‘नेकीने’ जगणाऱ्या पण कमालीच्या आत्मकेंद्री असलेल्या आपल्या सर्वांसमोर दिग्दर्शकाने धरलेला आरसा म्हणजे ‘कोर्ट’ हा चित्रपट.
सिनेमाचा वेग हा यापेक्षा थोडा जरी जास्त असता तर त्याची परिणामकारकता हरवली असती. एका प्रचंड मोठ्या अन्यायाबद्दल हे सर्व अवस्था आणि आपली मानसिकता किती तटस्थ आणि थंड आहे याचा अतिशय त्रासदायक अनुभव चित्रपटाचा वेग आणि क्यामेरा आपल्याला देतो.
Hannah Arendt या अमेरिकन तत्वद्न्य स्त्रीने लाखो ज्यूंची कत्तल केलेल्या आइश्मन या नाझी अधिकाऱ्यावर जेरुसलेम मध्ये चालवलेल्या खटल्याचे रिपोर्टिंग केले होते. जास्तीत जास्त ज्यूंना कमीत कमी वेळात , अत्यंत कार्यक्षमतेने मारण्यासाठी उभारलेल्या ऑश्वित्झ या कॉन्संट्रेशन क्याम्पचा प्रमुख होता. या सबंध खटल्यात Hanah Arendt ला हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे आइश्मनचा थंडपणा . आपण आपल्याला नेमून दिलेले काम करतोय. आपण आपले कर्त्यव्य करतोय. यापलीकडे त्याची कोणतीच संवेदनशीलता नाही. त्याला कोणतेच प्रश्न पडत नाहीत . त्याला ज्यू लोकांबद्दल प्रचंड द्वेष आहे म्हणून तो ते क्रूर काम करत नाहीये. एका अर्थाने तो अत्यंत ‘नेकीने’ आपले काम करतोय.नियमानुसार. अत्यंत तटस्थपणे. हाना आरेन्द्तने आपल्या या खटल्यावरील पुस्तकाला नाव दिलेय ‘आइशमन इन जेरुसलेम ‘ आणि त्याचे उपशिर्षक आहे ‘The banality of evil .
कोर्ट या सिनेमाचा आशय कदाचित ‘The banality of Injustice ‘ या शीर्षकाने व्यक्त होवू शकेल. म्हणजे ‘चाकोरीबद्धतेच अन्याय ‘.
चैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाने केवळ मराठीच नाही तर कदाचित भारतीय चित्रपट प्रचंड उंचीवर नेला आहे. ती उंची पेलण्याचे आव्हान प्रेक्षक म्हणून आपल्या सर्वांपुढे आता आहे.


– मिलिंद मुरुगकर