टीबी इथला संपत नाही…

समिधा खंडारे…सायन रुग्णालयाची एमबीबीएसची विद्यार्थिनी. इंटर्नशीपला असताना तिला ताप आला आणि नंतर काही दिवसांतच अशक्तपणाही आला. मेडिकलची विद्यार्थी असल्याने लगेचच हॉस्पिटलमध्ये तिच्या तपासण्या करण्यात आल्या. उपचारही सुरु झाले. तपासात काही विशेष आढळलं नाही. थोड्या दिवसांत तिचा तापही कमी आला. परंतू तिला काही दिवसांनी श्वसनाचा त्रास होऊ लागला. नेहमीसारखा ताप असेल, असं म्हणून समिधाने तिचं रुटीन पुन्हा सुरु केलं. पण काही दिवसांनी बसल्याजागी श्वास घेणं त्रासदायक होऊ लागलं. पुन्हा चाचण्या केल्या, तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात आणि मेंदूत टीबी झाल्याचं निष्पन्न झालं. तिच्यावर तात्काळ टीबीचे उपचार सुरु केले गेले. आठ दिवसांतच तिची तब्बेत सुधारु लागली. पण महिनाभर उपचार घेतल्यावर तिला पुन्हा ताप, उलट्या सुरु झाल्या. सारखी चक्कर येऊ लागली. तिची गंभीर परिस्थिती बघून तिला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तपासण्याचं आणखी एक सत्र सुरु झालं. त्यातून लक्षात आलं की, टीबीमुळे तिच्या मेंदूचा रक्त पुरवठा कमी होत चालला आहे. त्यामुळे मेंदूतील काही भाग निकामी झाला आहे. तिचे आईवडील आणि डॉक्टरांनी खूप प्रयत्न करुनही समिधा वाचू शकली नाही. डॉक्टर होऊन इतरांना जीवनदान देण्याचं स्वप्न बघणाऱ्या 24 वर्षाच्या तरुण समिधाला टीबीच्या राक्षसाने अवघ्या सहा महिन्यात गिळंकृत केले.
***
एखादा आजार डॉक्टरांनाच व्हायला लागतो तेव्हा त्या रोगाबद्दलची भिती अजून गडद व्हायला लागते. आज टीबीबद्दल तसंच झालं आहे. ‘टीबी झाल्यावर जास्त काळ खोकला असतो, वजन कमी होतं, ताप येतो. पण औषध घेतली की टीबी बरा होतो’ , एवढीच या रोगाची मला तोंडओळख होती. हा आजार जर इतका साधा असेल तर गेली कित्येक दशकं तो आपल्या देशात कसा काय पाय रोवून आहे, हा प्रश्न मला सतत डाचत होता. त्यातच ओळखीच्या बऱ्याच डॉक्टर मित्रांना टीबी झाल्याच कानावर येऊ लागलं तशी माझी अस्वस्थता आणखी वाढली. पण समिधा दगावली हे कळलं तेव्हा मात्र या अस्वस्थतेचा कडेलोट झाला. केवळ विचार करत बसणं सोडून मी माझ्या समाधानासाठी टीबीशोध सुरु केला. खरचं हा रोग इतका गंभीर आहे का, हे जाणून घेण्यासाठी आकडेवारी तपासून पाहिली. भारतात 2012 मध्ये सरकारच्या रिव्हाईज्ड नॅशनल टुयबरक्युलॉसिस कंट्रोल प्रोगॅम अंर्तगत टीबीचा उपचार घेणाऱ्याची संख्या 14 लाख 67 हजार 585 होती तर 2013 मध्ये ती 14 लाख 16 हजार 14 इतकी होती. महाराष्ट्रात हीच आकडेवारी 2012, 2013 मध्ये अनुक्रमे 1 लाख 36 हजार 45 आणि 1 लाख 37 हजार 237 आहे. देशात मृतांचा आकडा 2012 मध्ये 2 लाख 70 हजार आणि 2013 मध्ये 2 लाख 40 हजार आहे. ही आकडेवारी फक्त सरकारी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची आहे. भारतासारख्या देशात जिथे 70 ते 80 टक्के लोक खाजगी आरोग्यसुविधांना प्राधान्य देतात तिथे ही आकडेवारी अर्धवट सत्य मांडतेय. मुंबईत तर टीबीमुळे दररोज तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे. आपल्याकडे टीबीचा आजार दरवर्षी लाखो जणांचे बळी घेतोय आणि याची आपल्याला पुसटशी कल्पनाही नाही.
टीबी- Tuberculosis म्हणजे क्षयरोग. या रोगाचे जंतू हवेतून वेगाने पसरतात. त्यामुळे हा रोग कमालीचा हा संसर्गजन्य आहे. इतर संसर्गजन्य रोगामध्ये पेशंट खोकला की बाहेर पडणारे जंतू जमिनीवर पडतात. नंतर जमीन साफ केली केली ते मरतात. मात्र टीबीमध्ये तसं होत नाही. खोकल्यावर बाहेर पडणारे टीबीचे जंतू हवेतच राहतात आणि सगळीकडे पसरु लागतात. यामुळे इतर रोगांच्या तुलनेत हा रोग अधिक प्रमाणात पसरतो. मुंबईत महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्वच हॉस्पिटलमध्ये टीबीवर उपचार केले जातात. पण फक्त टीबीच्या रुग्णांसाठीच हॉस्पिटल शिवडी येथे आहे. आपल्या समाजात टीबीबाबत एक भिती आहे. त्यामुळेच मी या टीबी हॉस्पिटलमध्ये जाण्याबाबत माझ्या घरचे फारच साशंक होते. त्यांची कशीबशी समजूत घालून अखेर मी टीबी हॉस्पिटलमध्ये गेले. या हॉस्पिटलचं नाव आहे ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल (जीटीबी). जीटीबी हॉस्पिटल हे आशियातल्या टीबीच्या मोठ्या हॉस्पिटलपैकी एक आहे.1200 बेड्सची सुविधा असलेल हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येतं. इथल्या काही इमारतींची डागडुजीचं काम सुरु असताना मला दिसलं. अधिक चौकशी केल्यावर समजलं, हे हॉस्पिटल 1940 च्या दशकात बांधले गेले आहे. मुंबईतील माझगाव डॉकच्या इमारतीच्या दुर्घटनेनंतर इथल्याही इमारतींच्या डागडुजीचं काम सुरु करण्यात आलं आहे. हॉस्पिटलचा कॅम्पस तसा बराच मोठा आणि हवेशीर आहे. मला वाटलं इथं सगळेच मास्क घालून फिरत असतील. आपणही काळजी घ्यायला हवी म्हणून आत शिरताच मी नाकाला रुमाल बांधला. पण एक-दोघांशिवाय मला कुणीच मास्क घातलेल दिसलं नाही. अगदी हॉस्पिटलचे कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर यांच्यामध्येही काहीजणच मास्क घालून वावरत होते. हॉस्पिटलच्या आवारात पेशंट खोकताना, थुंकताना, नातेवाईकांशी बोलताना विशेष काळजी घेताना दिसत नव्हते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला मास्क न घालण्याबाबत विचारलं पण फार समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत. वॉर्डमध्ये वावरताना कर्मचारी थोडी काळजी घेतात. पण वॉर्डमध्ये पेशंटला भेटायला येणारे नातेवाईक मात्र मास्क न घालताच फिरताना दिसत होते. माझ्यासाठी हे चित्र फारच धक्कादायक होतं. हे पाहून लोकांमध्ये टीबीबाबत अज्ञान आहे, भिती आहे की निष्काळजीपणा याचा मला उलगडा होत नव्हता.
झपाट्याने पसरणाऱ्या टीबीची लागण इथल्या डॉक्टरांसोबतच, नर्सेस आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनाही झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. 2005 पासून टीबीच्या आजाराने इथल्या 38 कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. 2013 च्या आकडेवारीनुसार, या हॉस्पिटलमध्ये 40 चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी, पाच नर्सेस आणि एक डॉक्टर टीबीचा उपचार घेत आहेत. संपूर्ण दिवस टीबीच्या जंतूच्या सान्निध्यात राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांमध्ये एमडीआर टीबीही मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचंही समोर आलं आहे. जुलै 2013 मध्ये एमडीआर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 12 होती तर डिसेंबर 2013 पर्यत ती 23 वर पोहचली आहे. टीबीविरोधात लढण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं गरजेच आहे. यासाठी महानगरपालिकेनं सकस आहाराची योजनाही सुरु केली आहे. पण इथल्या एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत 12-15 ग्रॅम प्रोटीन आणि 350-400 ग्रॅम कॅलरीज दिल्या जातील असं सांगितलं गेलं. पण प्रत्यक्ष या सकस आहारासाठी पालिका प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दहा रुपये देते. आता दहा रुपयांत सकस आहार कसा मिळणार? कर्मचाऱ्याच्या या प्रश्नाने मला वास्तव परिस्थिती दाखवून दिली. टीबी असलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य स्थिती गंभीर असतानाही त्यांना हॉस्पिटलध्ये काम कराव लागतं. अशा परिस्थितीतही पालिका टीबीच्या रुग्णासांठी अधिक काळाची सुट्टी देत नाही. वार्षिक सुट्ट्या संपल्याने कुटुंबासाठी कर्मचाऱ्याला नोकरी करणं भाग असतं, अशी तक्रारही इथल्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायली मिळाली. पालिकेकडून दुर्लक्षित असलेल्या टीबी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे अशा अनेक प्रश्नांची गाथाच म्युनिसिपल मजदूर युनिअनचे सेक्रेटरी प्रदीप नारकर यांनी माझ्यासमोर मांडली. ते म्हणतात, “ हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी आवश्यक फिनाईल, सोडियम हायपोक्लोराईड यासारख्या किमान वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात. आपल्या आरोग्याच्या काळजी खातर मग बऱ्याचदा कामगार, नर्स, डॉक्टर्स एकत्र पैसे काढून साधनं आणतात आणि साफसफाई केली जाते. टीबीच्या पेशंटचे कपडे, बेडशीट हे आधी बॉईलरमध्ये घालून त्यांच निर्जंतुकीकरण केलं जातं आणि मग ते बाहेर धुवायला दिले जातात. पण या हॉस्पिटलमधील बॉयलर गेली सहा वर्षे बंद अवस्थेतच आहे. कोणत्या तांत्रिक कारणाने नव्हे तर एका चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती अभावी तो बंद आहे. आता हे कपडे निर्जंतुकीकरणासाठी कस्तुरबा हॉस्पिटलला पाठविले जातात. पण यामुळे पेशंटचे कपडे, बेडशीट हे आठ दिवसातून बदलले जातात. खरतरं ते दिवसाआड बदलणं गरजेच आहे. आत्तापर्यत बेसिनच्या नळाखाली धुवून पेशंटच्या थुंकींच्या सॅपल्सची विल्हेवाट लावण्याची पद्धत इथल्या हॉस्पिटलमध्ये होती. पण माध्यमांमधून हा विषय उचलून धरल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून सोडियम हायपोक्लोराईड वापरुन थुंकींच्या सॅपल्सची विल्हेवाट लावली जातेय.” मास्कबाबतच्या प्रश्नाचाही उलगडा मला त्यांच्याकडून झाला. कर्मचाऱ्यांना टीबीपासून रक्षण करण्याकरिता एन 95 नावाचे मास्क दिले जातात. पण हे मास्क थोडे महाग असल्याने आठवड्याला दोनच पुरविले जातात. दिवसभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या तोंडाचा मास्क घामाने भिजून जातो. घामाचा मास्क पुढचे दोन दिवस वापरणं अशक्य होतं. मग नाईलाजाने तो फेकला जातो आणि मास्क न लावताच कर्मचारी काम करतो. समिधा खंडारेसारख्या डॉक्टरांचा मृत्यू झाल्यावर या प्रश्नाची गंभीरता सर्वाना जाणवते. पण या पेशंटच्या सतत संपर्कात असलेल्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांबाबत कुणीच बोलत नाही, असा खेदही नारकर व्यक्त करतात.
पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या 2015-16 वर्षाकरिताच्या अर्थसंकल्पात टीबी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागासाठी एक कोटी तर स्वच्छतेसाठी 13 कोटीची तरतूद केली आहे. स्वच्छेतेच्या कामासाठी खाजगी संस्था नेमणार असल्याचंही जाहीर केलयं. त्यामुळे किमान आतातरी कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातले पाच-पन्नास रुपये काढून हॉस्पिटलची साफसफाई करावी लागणार नाही असा दिलासा पालिकेनं अर्थसंकल्पात दिला आहे, असं म्हणावं लागेल. समिधासाऱख्या डॉक्टरांना टीबीची लागण होण्याची ही अशीच काही कारण मला आढळून आली. अस्वच्छ होस्टेल, सकस आहाराची कमतरता, 12-14 तास काम, अर्धवट झोप, वॉर्डमध्ये वावरताना घेतलेली अपुरी काळजी यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये वावरणाऱ्या टीबीच्या जंतूना हे आयतेच शिकार म्हणून मिळतात. यावर आता पालिकेने काही पावलं उचलली आहेत. सकस आहाराची किंमत वाढवून 50 रुपये, टीबीची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची सुट्टी अशा काही योजना आखण्यात आल्या आहेत. पण या योजना अजूनतरी कागदावरच आहेत. त्यामुळे या योजना प्रत्यक्षात येईपर्यत स्वतःच स्वतःची काळजी घेण्याशिवाय हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडे सध्यातरी दुसरा पर्याय नाही, असा एकंदरीत चित्र मला जाणवलं.
टीबीचा जंतू हा माणसासोबत सर्वात अधिक काळ टिकलेला आहे. तो इतका जुना आहे की, याचा डीएनए अंदाजे इ.स.पूर्व 1550 ते इ.स.पूर्व 1080 काळात इजिप्तमधल्या एका ममीच्या मणक्यामध्ये आढळला आहे. टीबीच्या जंतूत असं काय विशेष आहे की इतक्या वर्षात माणूस त्यांचा संहार करु शकला नाही? हे जाणून घेण्यासाठी मी मुंबईच्या टीबी हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.ललित आनंदे यांची भेट घेतली. टीबीच्या जंतूंच नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलोसिस . टीबीच्या जंतूला डॉ. आनंदे ‘शहेनशहा’ म्हणतात. ते सांगतात, “या जंतूच्या शरीरावर तेलकट आवरण (लिपिड कोटिंग) असतं. या आवरणामुळे हा जंतू स्वतःच संरक्षण करतो आणि औषधांना निकामी करतो. आमची किलर मशीन अॅन्टिबायोटिक्स या जंतूला मारु शकत नाहीत. त्यामुळेच या जंतूंसाठी शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे अॅन्टिबायोटिक्स शोधून काढावे लागले. अशाप्रकारचं पहिलं औषध 1950 च्या काळात वापरल गेलं. आत्ताच्या घडीला जगभरात टीबी विरोधात 13 अॅन्टिबायोटिक्स उपलब्ध आहेत. इतर आजारात जंतू मारण्यासाठी एका अॅन्टिबायोटिकचा वापर केला जातो. पण टीबीचा जंतू हा इतका ताकदवान आहे की त्याला मारण्याकरिता एका वेळेला चार-पाच अॅन्टिबायोटिक्स वापरावी लागतात असं का? तर आपण औषधांचा मारा करु लागलो की हा जंतू त्याचा प्रतिकार करायलाही तयार होतो. त्यामुळे कोणतं औषध त्यावर कसा मारा करतयं, हे त्याला कळू नये यासाठी ही चार-पाच औषध एकत्र घ्यावी लागतात. शिवाय हा जंतू एका दिवसात काही मरत नाही. त्यामुळे कमीतकमी सहा महिने ही औषधे घ्यावी लागतात.”
एमडीआर टीबीचं नवं अक्राळ विक्राळ रुप?
समिधाला झालेला टीबी हा एमडीआर टीबी होता, असं काही डॉक्टर मित्रांकडून मला समजलं होतं. एमडीआरटीबी काय प्रकार आहे? सहा महिने औषध घेतल्यावर बरा झाला, इतकं साधं प्रकरण आता टीबीबाबत राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात टीबीने अक्राळविक्राळ रुप धारण केलयं. टीबीच्या या प्रकाराला मेडिकलच्या भाषेत ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ म्हटलं जातं. म्हणजे काय तर, टीबीचे जंतू आता इतके हुशार झालेत की ते या सगळ्या औषधांना निकामी करायला शिकलेत. डॉ. आनंदे हे ही गुंतागुंत समजावून सांगतात, “ड्रग रेझिस्टंट टीबी तयार झाल्याचं 2012 मध्ये मान्य करण्यात आलं. पण खरतरं आम्ही 1995 पासूनच टीबीचं हे बदलत रुप पाहत होतो. त्याआधी टीबीच्या आजाराबद्दल आणि पेशंट कसाकसा बरा होत जाईल, याबद्दल आम्हा डॉक्टरांचे काही ठोकताळे होते. औषधं नियमितपणे, पूर्ण काळ घेतली की पेशंट बरा होणार हे माहित होतं. ताप पंधरा दिवसात जाणार, खोकला दोन महिन्यात बरा होणार याची कल्पना होती. थुंकीची टेस्ट निगेटीव्ह यायला किमान दोन महिने लागणार आहेत, हे माहिती झालं होतं. टीबी हॉस्पिटलमध्ये देशभरातून लोक उपचारासाठी येत असतात. त्यामुळे आम्हाला इथे विविध प्रकारच्या केसेस बघायला मिळतं. 1995 मध्ये इथे वेगळं चित्र दिसायला लागलं. दिलेल्या औषधांना पेशंट प्रतिसाद देत नाही, असं दिसून यायला लागलं. 2001 मध्ये मध्ये बाजारात नवी औषध आली होती. त्यांना ही काही पेशंट प्रतिसाद देईनासे झाले. काही पेशंटवर कधी दोन औषध तर काहींवर चार औषध काम करत नाहीत असं आढळायला लागलं. पुढे टीबीच्या या नव्या रुपांना एमडीआर (मल्टिड्रग रेझिस्टंट ), एस्कडीआर (एक्सट्रीमली ड्रग रेझिस्टंट) अशी विविध नाव दिली गेली. 1997 मध्ये आम्ही आमचा डॉक्टर मित्र या एमडीआर टीबीमुळे गमावला’. हे सांगताना डॉ. आनंदे यांचा चेहरा पाहवत नाही. जगात उपलब्ध असलेली तेराच्या तेरा औषधं पचवणारे टीबीचे काही जंतू आता तयार होत आहेत. म्हणजेच टीडीआर (टोटल ड्रग रेझिस्टंट) टीबी उद्याला येतोय, अशी कुणकुण या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना लागली आहे. त्यामुळे एक मोठा धोका आता उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे.
टीबीच्या रोगाची एमडीआर, एक्सडीआरसारखी भयानक रुपं मानवनिर्मित असल्याच काही तज्ज्ञांच मत आहे. या संदर्भात मी सायन रुग्णालयाच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. नि.तु. आवाड यांना भेटायला गेले. त्यांच म्हणणं होतं, ‘’टीबीच्या रोगावर उपचार करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक नियमावली तयार केली आहे. पण विविध पॅथींचे डॉक्टर या नियमावलीप्रमाणे उपचार करत नाहीत. काही खाजगी डॉक्टर सहा महिन्यांचा औषधांचा कोर्स दोन महिन्यातच पूर्ण करुन टाकतात. टीबीमध्ये पेशंटने औषधाचा कोर्स पूर्ण करणं फार गरजेचे आहे. साध्या टीबीच्या पेशंटने अर्धवट उपचार सोडल्यास त्याला एमडीआर टीबी होण्याची शक्यता वाढते. सगळेच खाजगी डॉक्टर असा हलगर्जीपणा करतात असं नव्हे. पण योग्यरितीने उपचार देणाऱ्या खाजगी डॉक्टरांची संख्या कमी आहे, असंही दुर्दैवाने सांगाव लागतं.”
अर्थात आता पहिल्याच फटक्यात एमडीआर झालेले पेशंट आढळून येत आहेत. समिधाही याचच एक उदाहरण आहे. एमडीआरच्या उपचारांची पद्धतही खूप वेदनादायक आहे. जवळपास 15 हजार गोळ्या आणि 200 इंजेक्शन्सचा दोन वर्षाचा कोर्स घेताना पेशंटची जगण्याची इच्छाच निघून जाते. जिथे पेशंट साध्या टीबीचा सहा महिन्याचा कोर्स करताना वैतागतो तिथे दोन वर्ष पेशंटचा फोलोअप करण अवघड जातं. टीबीची औषध अतिशय स्ट्राँग असतात. त्यामुळे पेशंटला ताप येणे, उलटी होणे, भूक कमी होणे यासारखे परिणाम दिसू लागतात. एमडीआरच्या उपचारामध्ये या परिणामांच प्रमाण कित्येक पटीने अधिक असतं. दुसरं असं की तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एक टीबीचा पेशंट वर्षाला दहा जणांना टीबीचा आजार देण्याची शक्यता असते. त्यामुळे एमडीआर टीबी पेशंटची वाढती संख्या एमडीआरचं साम्राज्य पसरवण्यात हातभार लावत आहेत, असं म्हणावं लागेल. आकडेवारीनुसार, देशात 2012 मध्ये एमडीआरचे 17 हजार 373 तर 2013 मध्ये 23 हजार 289 पेशंट आढळून आले आहेत. टीबीची माहिती मिळवताना मला या रोगांचा अजून एक धोका कळून आला. आपल्याला एचआय़व्ही या नावाची सुद्धा भिती वाटते. पण आता एचआयव्हीच्या पेशंटला टीबी होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. तसंच डायबेटिस म्हणजे मधुमेहाच्या पेशंटला ही टीबी होण्याचे प्रमाण वाढत आहे. या दोन्ही आजारांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने टीबीचे जंतू या पेशंटवर जणू हल्लाबोल करतात. एचआयव्ही आणि मधुमेहासोबतच त्यांना टीबीचे उपचार देणं हेही एक अवघड काम होऊन बसतं. दोन्ही औषध खाताना पेशंट वैतागून जातो आणि नियमितता नसेल तर उपचार अयशस्वी ठरण्याची शक्यता वाढते. “मधुमेहाच्या पेशंट्सपैकी सुमारे 10- 11 टक्के लोकांना टीबीची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. भविष्यातला धोका मोठा आहे” , असं डॉ. आवाड सांगतात. आपल्यातर घराघरात मधुमेहाचा पेशंट आहे. त्यामुळे डॉ. आवाडाचं वाक्य ऐकून टीबी आपल्या घरापर्यत पोहचलाय, असंच मला वाटायला लागलं.
टीबीच्या मुळाशी
मुंबई हे शहर टीबीला पोसण्यासाठी अगदी अनुकूल आहे. बैगनवाडी, गोवंडी, मानखुर्द, धारावी यासाऱख्या छोट्याश्या भागांतील झोपडपट्ट्यांची गर्दी, दहा बाय दहाच्या घरात राहणारी आठ-दहा माणसं, आजूबाजूला असणारा कचरा, सांडपाणी, अपुरा आहार, कामाचे तास आणि ताण यामुळे टीबीच्या जंतूना तर इथे मोकाटच रान मिळाल आहे.
केंद्र सरकारने वीस वर्षापूर्वी टीबीविरोधात रिव्हाईज्ड नॅशनल टुयबरक्युलॉसिस कंट्रोल प्रोगॅम (आरएनटीसीपी) हाती घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात डायरेक्ट ऑब्झर्व्हर ट्रीटमेंट शॉर्टकोर्स (डीओटीएस-डॉट्स) सेंटर्स उभारण्यात आले. यात प्रत्येक पेशंट एक दिवसाआड सेंटरवर येतो आणि हेल्थ वर्करच्या उपस्थितीत त्याला औषध खायला दिली जातात. ही डॉट्स सेंटर्स अजूनही सुरु आहेत आणि त्यांचा उपयोगही होत आहे. पण त्यातही काही अडथळे आहेत. या डॉट्स सेंटर्सच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी एका डॉट्स सेंटर कार्यकर्त्याला भेटले. नाव न सांगण्याच्या बोलीवर त्याने सांगितले की, “जेव्हा पेशंट दोन महिने औषध घेऊन मध्येच उपचार थांबवितो, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अशावेळी खरतरं हेल्थ वर्करने त्याच्या घरी जाऊन फोलोअप करणं अपेक्षित आहे. पण एका हेल्थवर्करकडे सुमारे 30-35 पेशंट असतात. त्यामुळे त्याचा घरापर्यतचा फोलोअप ठेवणं हेल्थवर्करला शक्य होतचं असं नाही. काही ठिकाणी विशेषतः जिथे डॉट्स सेंटर सामाजिक संस्था चालवितात तिथे हा फोलोअप योग्यरितीने ठेवला जातो. पण सगळीकडे तसं घडत नाही.” पेशंटला फक्त गोळ्या देणं हे या हेल्थवर्कर्सचं काम नसतं. तर त्याबरोबरच त्याच्या घरची परिस्थिती, आजूबाजूचं वातावरण, त्याच्या सवयी आणि कुटुंबाशी असलेला सलोखा याबाबतही जाणून घेणं गरजेच असतं. याचा फायदा त्या पेशंटचा फोलोअप ठेवण्यासाठीही होतो आणि त्या पेशंटच्या आसपास कोणालाही टीबीची लागण झाली असेल तर त्याबद्दल सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होऊ शकतं. पण पालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेंटर्समध्ये इतकी काळजी घेतली जात नाही. दुसरा मुद्दा म्हणजे सामाजिक संस्थामार्फत चालविल्या जाणाऱ्या डॉट्स सेंटरमध्ये पेशंटना सकस आहार दिला जातो. त्यामुळेही तिथे पेशंट नियमितपणे येतात. असा उपक्रम पालिकेच्या सेंटरवर राबवला तर त्याचा उपयोग होऊ शकतो, असंही डॉट्स सेंटरचा कार्यकर्ता सांगतो.
महानगरपालिकेने आता डॉट्स सेंटरवर सुपदेशक नेमण्याचा प्रयोग सुरु केला आहे. उद्देश असा की, समुपदेशक पेशंटला औषधांचा कोर्स पूर्ण करण्याची आठवण करत राहील. पण तरीही पालिकेच्या सेंटर्सबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा आणखीही एक आक्षेप आहे. आज टीबीच्या परिणामकारक औषधोपचारांसाठी रोज औषध देण्याची पद्धत जगभरात रुढ आहे. पण पालिकेच्या सेंटर्सवर मात्र एक दिवसाआड औषध दिली जातात. त्यामुळे टीबी बरा व्हायला वेळ लागतो आणि त्याहूनही धोकादायक म्हणजे, आधी म्हटल्याप्रमाणे अशा रुग्णांना एमडीआर टीबी होण्याची शक्यता वाढते. याबद्दल माहिती घेण्यासाठी मी या कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांच्याकडे गेले. महानगरपालिका टीबीविरोधात जागरुरपणे काम करतेय, असं मानलं तरी पालिकेचे प्रयत्न आणि अंमलबजावणी यात काही त्रुटी असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. त्याकडे मी डॉ. खेतरपाल यांच लक्ष वेधते. त्या म्हणतात, “रोज औषध देणं गरजेच आहे पण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात रोजच्या रोज औषधांच वाटप होणं शक्य नाही. त्यामुऴे या निर्णयाबाबत अजूनही सरकार विचार करत आहे.” टीबी बरा होण्यासाठी रोज नियमितपणे औषध घेण्याची गरज असेल तर सरकार असा काय वेगळा निर्णय घेणार याचा मला उलगडा होईना. टीबीसंदर्भात पालिकेसोबत काम करणाऱ्या एक सामाजिक संस्थेकडे चौकशी केली. त्यांच्या मते ‘टीबीचे पेशंट बरे करण्यात आम्हाला 80-90 टक्के यश मिळतं आहे’ हा पालिकेचा दावा केवळ कागदोपत्रीच खरा आहे. प्रजा फाऊंडेशननेही आपल्या आकडेवारीतून पालिकेने दाखविलेला फुगवटा उघडकीस आणला आहे. 2013 साली पालिकेच्या टीबी कंट्रोल युनिटकडे टीबीमुळे निधन पावलेल्यांची आकडेवारी आहे 1393. पण त्याच वर्षी पालिकेच्या सामाजिक आरोग्य विभागाने 7127 लोकांच्या मृत्यू दाखल्यावर ‘टीबी’ हे कारण लिहिले आहे. यात कोण खरं आणि कोण खोट?
मेट्रो सिटीत पसरणारा लेटंट टीबी
टीबी हा आता पूर्वीसारखा गरिबांचा आजार राहिलेला नाही. उच्च वर्गातही टीबीचे पेशंट आढळून येत आहेत. याची ठोस आकडेवारी जरी उपलब्ध नसली तरी शहरात जिथे सर्व स्तरातील लोक एकाच ठिकाणी काम करत आहेत तिथे टीबी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीत तर प्रत्येकाच्या शरीरात टीबीचे जंतू आहेत, डॉ. आनंदे यांच हे वाक्य ऐकून मला धक्काच बसला. याला मेडिकल भाषेत ‘ लेटंट टीबी’ म्हणतात. म्हणजेच तुमच्या आमच्या सर्वांच्याच शरीरात टीबीचे जंतू आहेत. पण आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्याचं फावलेलं नाही. आपली प्रतिकारशक्ती कमी झाली, तर कधीही या जंतूंचा आपल्यावर हल्ला होऊ शकतो. याचा अर्थ, आपली रोगप्रतिकारक शक्तीच आता आपल्याला या टीबीपासून वाचवू शकते. डॉ. आनंदे यांनी रोग प्रतिकारशक्तीच महत्त्व टीबीच्या पेशंटना समजावून सांगण्यासाठी ‘मे आय हेल्प यू’ नावाच अभियान सुरु केलंय. अंडी किंवा डाळी, दूध, लिंबू (विटामिन सी), फळ, सूर्यप्रकाश किंवा विटामिन डी हे पंचसूत्र आपण रोज घेतली तर रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते, हा साधा उपाय ते सांगतात. पण ज्यांची दिवसाची कमाई 50 रुपये असते, त्यांच्यासाठी हा उपाय साधा आहे का, हा प्रश्न माझ्यातल्या मुंबईकराला पडला.
संशोधनाकडे होणारे दुर्लक्ष
मुंबईतली टीबीची ही परिस्थिती पाहिल्यानंतर मनात प्रश्न उभा राहिला, आपण पोलिओ घालवला, एड्सशी यशस्वी लढाई करतोय. मग टीबीसारख्या रोगाविरोधात आपल्या संशोधकांनी हार मानली आहे का? याच उत्तर सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिल. ते सांगतात, ‘टीबी हा गरीब वस्तींमध्ये फोफावणारा आजार आहे. यासाठी मिळणारी औषधही सरकारच्या कार्यक्रमात मोफत दिली जातात. त्यामुळे फार्मा कंपन्याना यात अधिक फायदा मिळत नाही. जिथे पैसा नाही तिथे संशोधनासाठी भांडवल कोण गुंतवणार? बाजारात एक नवीन औषध यायला किमान 10-15 वर्षे लागतात. केंद्र सरकार आता फास्टट्रॅक पद्धतीने काही नवीन औषध आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरीही संशोधनासाठी सरकारकडून फार्मा कंपन्यांवर दबाव आणणं गरजेच आहे. त्यांना त्यांच्या एकूण औषधांच्या काही टक्के टीबीच्या औषधांवर काम करण्याची सक्ती केली पाहिजे. तसंच बऱ्याचदा जुन्या स्वस्त आणि परिणामकारक औषधांऐवजी कमी काळातच नवी महागडी औषध आणली जातात. त्यावर काही निर्बध घातले पाहिजेत.”
टीबीच्या लशी वरही संशोधन होण गरजेच आहे. लस हा प्रभावी उपाय असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं, तज्ज्ञांच म्हणणं आहे. दुसरीकडे, टीबीवरील औषधांच्या संशोधनावर केंद्रसरकारने 2011-12 मध्ये 3837 लाख, 2012-13 मध्ये 4571 लाख तर 2013-14 मध्ये 5103 लाख रुपयांच बजेट तयार केल होतं. बजेटचे आकडे तर वाढतायतं पण मग त्याचा परिणाम का दिसत नाहीत?
समाजातील टीबीच्या आजाराची गंभीरता आपल्याला अजूनही तितकीशी जाणवून येत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, भारत हा टीबीची राजधानी आहे. भारतात दरवर्षी टीबीमुळे सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू टीबीने होतोय हे भीषण वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे . मुख्य म्हणजे टीबीचा आजार हा 16-45 वयोगटात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याचाच अर्थ या रोगाने आपल्या तरुण पिढीला पोखरायला सुरुवात केली आहे. या रोगाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनामुळे मला टीबी आहे, हे सांगायलाही कोणी धजावत नाही. रोज बसमधून, ट्रेनमधून प्रवास करताना, ऑफिसमध्ये आपल्या आजूबाजूला कितीतरी पटीने टीबीचे पेशंट वावरत आहेत. टीबी पसरण्यास कोण जबाबदार आहे? समाज, टीबीचा पेशंट, डॉक्टर की स्वतः टीबी. आपल्यातला लेटंट टीबी कधी अॅक्टीव्ह होईल, हे सांगता येत नाही. समिधासारखी परिस्थिती आपल्यावरही ओढावू शकते, या भितीच्या सावटाखाली आपण रोज जगत आहोत. हे सावट कधी संपेल याचं उत्तर मात्र सध्या कुणाकडेच नाही.

शैलजा तिवले
Shailaja486@gmail.com

(साभारः युनिक फिचर्स, एप्रिल 2015)