मूल्यांशी प्रामाणिक ‘नागरिक’

नुकताच मराठी चित्रपट “नागरिक” पाहिला. ब-याच दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. सामाजिक, राजकीय विषयावर आधारित व मराठीतील दमदार कलाकार घेऊन बनवलेला एक चांगला चित्रपट असे याचे वर्णन करता येईल. राजकारणावर मराठीत आजवर अनेक चित्रपट आले आहेत पण जब्बार पटेलांनी दिलेला “सामना” आजही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांत गणला जातो. “नागरीक” मध्ये हेच सूत्र आहे व त्याची हाताळणी अतिशय समर्थपणे केलेली आढळते. “नागरिक” ला देखील २०१५ च्या “महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार” व “प्रभात पुरस्कार” मधील अनेक सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळाली आहेत.

खरेतर राजकारणावर आधारित कथासूत्र निवडताना प्रचलित राजकारणी व त्यांचे राजकारण येणे अपरिहार्य बनते. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. याला कारण म्हणजे सत्ता कोणाचीही असो राजकारणातील घृणास्पद प्रकार तसेच राहणार. “नागरिक” सामाजिक राजकारणातील सर्वच प्रश्नांना स्पर्श करतो व तरीही यात कुठेही विस्कळीत पणा नाही. राजकारणातील घसरलेली मूल्ये व अत्यंत निर्लज्यपणे त्याचे केले जाणारे समर्थन यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला आहे. चित्रपट समिक्षा काही माझा प्रांत नाही त्यामुळे विश्लेषण वगैरे करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही.

दिग्दर्शक जयप्रद देसाई यांचा हा पहिलाच चित्रपट. एक उत्कृष्ट चित्रपट दिल्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन. खरे तर लघुपटांच्या दुनियेतला हा एक अतिशय गुणी व जाणकार दिग्दर्शक. याचे लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजले गेले आहेत व त्यांना महत्वाचे पुरस्कार पण प्राप्त झाले आहेत. आमचा वाशीतला फिल्म क्लब चा प्रमुख आधारस्तंभ जयप्रदच होता. विविध विषयांवर आधारीत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांचे, अनेक देशांतील कलात्मक असे चित्रपट तो आणत असे व चित्रपट पाहून झाल्यावर त्यावर चर्चा घडत असे. त्यानेच आम्हाला चित्रपट कसा पहावा ही दृष्टि दिली. चांगला चित्रपट कसा असतो व प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकाला काय अपेक्षित असते, ते तो दाखवून देत असे. या माध्यमावरचे त्याचे प्रेम व मुख्यत्वेकरून त्याची या विषयातली जाण याची चुणुक आम्ही तेव्हाच पाहिली होती. त्यावेळी त्याने वेगवेगळया दिगदर्शकांची, छायाचित्रकारांच्या चित्रणाची शैली समजावून दिली होती आणि आता त्याचा चित्रपट पाहताना ते आठवले व चित्रपटाचा छान आस्वाद घेता आला.

“नागरिक” हा एक पूर्णपणे वास्तववादी चित्रपट आहे व सुरुवाती पासून अखेरपर्यंत तो वास्तववादापासून फारकत घेत नाही हे त्याचे वैशिष्ट्य. प्रेक्षकानुनय करण्यासाठी इथे उगाचच गाणी नाहीत, उत्तान आयटेम गर्लस् किंवा त्यांचे छचोर नाच नाहीत, नायिकाच नाही व सिनेमँटिक लिबर्टीच्या गोंडस नावाखाली बेडसीन पण नाहीत. एक अत्यंत प्रामाणिक व आपल्या तत्वांशी व मूल्यांशी तडजोड करण्याचे नाकारणारा पत्रकार शाम जगदाळे हा या चित्रपटाचा केंद्रबिंदु. आपल्या आसपासच्या दुनियेत सहज आढळून येईल असाच सर्वसामान्य माणूस असलेला हा पत्रकार. रोजच्या जगण्याची त्याची मध्यमवर्गीय धडपड पण आपल्या पाहण्यातलीच. तो काही कोणी सर्वगुणसंपन्न नायकही नाही पण आसपासच्या जगातील अप्रामाणिकपणा, दांभिकता, खोटारडेपणा, आपल्या फायद्यासाठी सामान्य माणसाचा सहजपणे गळा कापणारे राजकारणी व त्यांच्या घृणास्पद कारवायांचा त्याला राग आहे. या सर्वांविरुद्ध तो आपल्या “नागरीक” या वृत्तपत्रीय स्तंभातून हल्ला चढवीत असतो. अनेक प्रस्थापितांच्या हितसंबंधाना धक्का पोहोचवल्याने त्याला आपल्या नोकरीवर पण पाणी सोडावे लागते तरीही कोणत्याही परिस्थितीत तो तत्वांशी तडजोड करायला तयार होत नाही. या सर्वांवर त्याच्याकडे तयार उत्तरे नसतील पण म्हणून या सर्व दांभिक व कारस्थानी राजकारणी लोकांना शरण जाऊन आपला लढा थांबवण्याची त्याची तयारी नाही. पडद्यावर दिसणारे व घडणारे प्रसंग तर आपल्या रोजच्या आसपासच्या आयुष्यात घडणारेच आहेत, नवीन तर काहीच नाही. राजकारणी मंडळी, बिल्डर्स व त्यांची गलिच्छ कारस्थाने, समाजात बोकाळलेली बुवाबाजी पण आपण रोजच्या जगण्यात पाहतो अगदी तश्शीच. जणू काही आपण अपेक्षा केल्याप्रमाणेच ही पात्रे वागतात व वास्तवातील राजकारण्यांचीच आठवण करून देतात.

पण मग हेच वास्तव आपण इतक्या सहजपणे स्वीकारलेले आहे हे अधिकच भयावह नाही का?

आपणापैकी ब-याच जणांना या सर्वांची चीड येते व आपल्या सदसदविवेक बुद्धिला या गोष्टी पटतही नसतात पण याकडे आपण सारेच असहाय्यपणे पहात असतो व जणूकाही यात कधीच बदल घडणार नाही असे गृहित धरलेले असते. यातील पत्रकार या भ्रष्ट व्यवस्थेविरूद्ध आपल्यापरीने लढतो. अशा लढ्यांमध्ये संपूर्ण यश वगैरे कधी नसतेच कारण एक भ्रष्ट राजकारणी बाजूला झाला तर दुसरा तसाच त्याची जागा घ्यायला तयार असतोच पण म्हणून लढा थांबवायचा नसतो कारण कुठेतरी हळूहळूू का होईना पण प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडण्याची शक्यता असते व हेच आश्वासक असते. जसे वाईटाची जागा घेण्यास दुसरा तयार असतो तसेच चांगल्या माणसांची जागा घेणारे दुसरे तयार होणे आवश्यक असते. हा पत्रकार काही दाक्षिणात्य चित्रपटांतल्या नायकांप्रमाणे सुपरहिरो नाही जो भ्रष्टाचारी नेत्याला फरफटत भर चौकात आणून मारझोड वगैरे करतो. जे कधीच घडणे शक्य नाही, पण घडावे असे भाबड्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मनापासून वाटते ते दाखवणारा चित्रपट अशा प्रेक्षकांच्या पसंतीस येतो. बॉक्स ऑफिस वर असे चित्रपट मग गल्ला जमवतात पण मग आपण सरळसरळ वास्तवाकडे पाठ फिरवत असतो व सत्य नाकारतो. शाम जगदाळेने दाखवलेली जिद्द व अवघड परिस्थितीत देखील मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती यापासून सामान्य माणसांना स्फूर्ति मिळावी किंवा त्यांनी शाम मध्ये आपल्याला पहावे असे तर नाही?

प्रतिभावान दिगदर्शक अशा विषयावरील चित्रपटात वास्तवाशी फारकत घेत नाही व कटू असले तरी सत्याचीच मांडणी करतो, जे जयप्रदने अतिशय सुरेख रित्या सादर केले आहे असे मला वाटते. त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर चांगला दिगदर्शक सादरीकरणात जाणकार प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो, सरळ उत्तरे न देता त्यांच्या बुद्ध्यांकाला आव्हान देतो तर गल्लाभरू दिगदर्शक मात्र प्रेक्षकाच्या कानाला धरून प्रत्येक प्रसंग अगदीच सरधोपट पणे मांडत असतो व जणू काही प्रेक्षकांची समज कमी आहे असेच गृहित धरतो.

बाकी यातील कलाकारांविषयी काय लिहीणार म्हणा? अतिशय सशक्त व खंद्या कलाकारांची फळी यात आहे. श्रीराम लागू, सचिन खेडेकर, दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, निना कुलकर्णी, मिलिंद सोमण इ. नावे घेतली तरी लक्षात यावे. अखेरपर्यंत चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो हेच त्याचे यश.

पुढील यशस्वी वाटचालीसाठी जयप्रदला मन:पूर्वक शुभेच्छा.

– नितीन तावडे