अंधारातून प्रकाशमान ताऱ्यांकडे…

(रोहित वेमुलाने आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्राचा प्रज्ञा दया पवार यांनी केलेला हा अनुवाद त्यांच्या फेसबुक वॉलवरुन घेतला आहे.)

अंधारातून प्रकाशमान ताऱ्यांकडे…

शुभ सकाळ,
तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेन. रागावू नका. मला माहीत आहे, तुमच्यातल्या काहींना माझी चिंता होती, प्रेम होतं माझ्यावर, आणि मला चांगली वागणूकही दिलीय. माझी कुणाबद्दलच काही तक्रार नाही. खरं सांगायचं तर माझी माझ्याबद्दलच तक्रार होती. माझा आत्मा आणि माझं शरीर यात अंतर पडू लागल्याचं मला जाणवू लागलं होतं. दैत्यवत झालो होतो मी. लेखक व्हावं हे माझं कायमच स्वप्न होतं. विज्ञान-लेखक, कार्ल सेगनसारखा. अखेरीस आज हे शेवटचं पत्र मी लिहू शकतोय.
मला विज्ञान आवडायचं. ग्रहतारे आवडायचे. निसर्ग आवडायचा. आणि मी माणसांवरही प्रेम करायचो. मी हे विसरून गेलो होतो की, माणसं निसर्गापासून फारच पूर्वी तुटलेली आहेत. आपल्या भावना आपल्या स्वतःच्या राहिलेल्या नाहीत. आपलं प्रेम बनावटी आहे. आपले विचार गंजलेले आहेत. आपल्यातली सर्जनशीलता कृत्रिम कलेचा आधार घेऊन उभी राहात आहे. वेदना सहन करण्याची तयारी ठेवल्याशिवाय प्रेम करणं शक्यच राहिलेलं नाही.
माणसाचं मूल्य हे त्याच्या तातडीच्या ओळखीवर आणि जवळपासच्या शक्यतांवर ठरतं. मतदार म्हणून. आकडा म्हणून. वस्तू म्हणून. एक मन असलेली व्यक्ती म्हणून, ग्रहतार्‍यांच्या धुळीतून निर्माण झालेली एक देदीप्यमान वस्तू म्हणून माणसाचा विचार केलाच जात नाही. कुठल्याही क्षेत्रात, अभ्यासात, रस्त्यावर, राजकारणात आणि मरताना नि जगतानाही.
खरं तर अशा प्रकारचं पत्र मी पहिल्यांदाच लिहितो आहे. शेवटचं पण पहिल्यांदा लिहिलेलं पत्र. जर माझ्या लिहिण्याचा अर्थ लागत नसेल तर मला माफ करा.
कदाचित मी आजवर कायमच जग समजून घेण्यात चूक केली असेल. प्रेम, वेदना, आयुष्य, मरण, काहीच समजलं नसेल मला. तातडी कसलीच नव्हती, पण मी सतत धावत होतो. आयुष्य सुरू करण्यासाठी अनावर. सारखं. काही लोकांसाठी आयुष्य हाच शाप ठरतो. माझा जन्म एक जीवघेणा अपघात होता. मी माझ्या बालपणाच्या एकाकीपणातून कधी बाहेरच पडू शकलो नाही. माझ्याच भूतकाळातलं एक नावडतं मूल होतो मी.
या क्षणी मला कसलीच वेदना नाहीय. मी दुःखी नाहीय. रिकामा आहे मात्र मी. माझी मला तमा वाटेनाशी झालीय. केविलवाणं आहे हे सगळं. आणि म्हणून मी हे करू धजतोय.
लोक मला कदाचित भेकड म्हणतील. स्वार्थी म्हणतील. मी गेल्यावर मला मूर्खही ठरवतील. मला कोण काय म्हणेल याची अजिबात पर्वा नाही. मृत्यूनंतरच्या जगण्याच्या भाकडकथांवर माझा विश्‍वास नाही. भूतांवर नाही, प्रेतात्म्यांवर नाही. जर काही असलंच तर, मला तार्‍यांच्या दिशेने जाता येईल. तिथल्या जगांबद्दल जाणून घेता येईल.
तुम्ही माझं हे पत्र वाचत आहात, जर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल तर एवढं करा की, माझी सात महिन्यांची फेलोशीप आलेली नाही. एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये. हे पैसे माझ्या घरच्यांना मिळतील असं बघा. फक्त त्यातले 40,000 मला रामजीला द्यायचे आहेत. खरं तर त्याने ते कधीच मागितले नाहीत मला. पण कृपया त्याचे पैसे द्या.
माझे अंत्यविधी शांततेने आणि साधेपणाने पार पाडा. मी आलो आणि निघून गेलो एवढाच भाव ठेवा. माझ्यासाठी आसवं ढाळू नका. जिवंतपणापेक्षा मला मरण्यात अधिक आनंद मिळतो आहे हे लक्षात ठेवा.
अंधारातून प्रकाशमान तार्‍यांकडे.
भावा उमा, तुझ्या खोलीत मी हे करतोय, मला माफ कर.
माझ्या संघटनेतील मित्रांनो, मी तुमची निराशा करतो आहे, मला माफ करा. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंत. सर्वांचं भवितव्य चांगलं असेल अशी माझी भावना आहे.
अखेरीस एकदाच,
जय भीम
रोहित वेमुला
काही औपचारिक बाबी लिहायच्या राहून गेल्या.
माझ्या आत्महत्येला कुणीच जबाबदार नाहीय.
यासाठी कुणीही मला भरीला घातलेलं नाहीय, ना शब्दांनी ना कृतींनी.
हा माझा निर्णय आहे आणि केवळ मीच याला जबाबदार आहे.
मी गेल्यावर माझ्या मित्रांना अथवा माझ्या शत्रूंना त्रास देऊ नका