रोहितची स्मृती ताजी ठेवत कन्हैया, आम्ही तुझ्या सोबत आहोत

रोहित वेमुलाच्या विवेकाला हादरवणाऱ्या आत्महत्येने सरकारपासून हैद्राबाद विद्यापीठापर्यंतच्या जातजमातवादी शक्तींचा पुरता पर्दाफाश झाला. आपल्या संविधानातील सामाजिक न्यायाची पूर्तता म्हणून स्वतंत्र भारताने शिष्यवृत्ती, वसतिगृह यासारखे आधार उभे केले. त्यामुळेच प्रतिकूल स्थितीतून आलेल्या दलित-आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आले. अन्यथा, ही स्फुल्लिंगे त्यांच्या त्यांच्या गावांतच विरुन गेली असती. तथापि, अलिकडच्या सरकारांनी काही बाबतीत धोरणांत व बरीचशी अंमलबजावणीत ढिलाई सुरु केली आहे. अधिकारी पातळीवरील जातीयवादी मानसिकता यात भर घालत असते. परिणामी, रोहितसारख्या विद्यार्थ्यांची फेलोशिप कित्येक महिने रोखली जाऊन त्यांची आर्थिक नाकेबंदी केली जाते. मारहाणीसारखे खोटे आळ लावून वसतिगृहातून बाहेर काढून त्यांना बेजार केले जाते. अशा वातावरणात रोहितची आत्महत्या होते. त्याने लिहिलेले भावपूर्ण पत्र आपल्या माणूसपणाला गदगदवून सोडते. कमीअधिक फरकाने बहुतेक विद्यापीठांत दलित-मागास विद्यार्थ्यांच्या वाट्याला हीच वेदना येत असते. रोहितच्या आत्महत्येने या सार्वत्रिक व्यथेला आवाज फुटला. तिच्या आरोळ्या देशातील संवेदनशील मंडळींना खाडकन जागे करणाऱ्या ठरल्या. हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाला न्याय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरु झाले. त्यास पाठिंबा देण्यासाठी देशातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच अन्य प्रागतिक शक्तींनी आंदोलने सुरु केली. यातून योग्य मार्ग काढण्याच्या ऐवजी रोहित दलित नाही, त्याच्या आत्महत्येनंतर रोहितच्या जवळच्यांनी डॉक्टरांना त्याला लवकर तपासू दिले नाही असे दिशाभूल करणारे आरोप सरकारकडून होऊ लागले.

रोहितच्या आत्महत्येच्या पूर्वीच एफटीआय विद्याथ्यार्थ्यांचा संप, पेरियार आंबेडकर स्टडी सर्कलवरच्या बंदी या घटना घडून गेल्या होत्या. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन हे या घटनाक्रमांतील एक दुवा आहे. रोहितला न्याय या मागणीबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी देण्यासाठीची चालढकल व त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण, देशातील जातजमातवादी शक्तींचे चाळे, त्यांना वेसण घालण्यात कमी पडणारे सरकार, सरकारमधीलच काही व्यक्तींकडून होणाऱ्या घटनाविरोधी कारवाया, देशातील गोरगरिबांना, शेतकऱ्यांना हवालदिल करणारी शासकीय बेफिकीरी या जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित मागण्या या आंदोलनात करण्यात येत होत्या. मनुवादापासून, गरीब-कष्टकऱ्यांच्या अवहेलनेपासून, स्त्रिया-तृतीयपंथीयांबाबत होणाऱ्या विषमतेपासून आझादी मागणारा, उत्तम राजकीय समज व पाचपोच असलेला कन्हैया हा लोकप्रिय विद्यार्थी नेता सरकारमधील प्रतिगाम्यांच्या डोळ्यांत खुपतच होता. त्यात अफजलगुरुच्या फाशीचा स्मृतिदिन साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने केलेला कार्यक्रम व तेथील देशविरोधी घोषणा यांचे निमित्त साधून कन्हैयाला त्यात गोवविले गेले व देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केले गेले. प्रत्यक्षात देशद्रोहाचा आरोप ज्याच्या आधारे ठेवण्यात आला होता, ती फिल्मच खोडसाळ होती, असे नंतर कळले. न्यायालयाच्या आवरात त्याच्यावर वकिलांनी केलेला हल्ला, नेहरु विद्यापीठालाच देशविरोधी कारवायांचा अड्डा म्हणणे या नंतरच्या घटना आपल्याला ठाऊकच आहेत.

जामिनावर सुटलेला कन्हैया ज्या समजाने व खोलीने आपल्या संघर्षाची मांडणी करत आहे व सहकारी विद्यार्थ्यांचा तसेच देशभरच्या प्रागतिक शक्तींचा त्याला जो पाठिंबा मिळत आहे, तो आम्हाला स्वागतार्ह वाटतो. ‘अफजल नव्हे, तर रोहित माझा हिरो’ ही त्याची निःसंदिग्ध ग्वाही, मनुवादाला विरोध, कष्टकरी, स्त्रियांच्या प्रश्नांवरचे त्याचे आवाहन, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचे रहस्य व्यक्तिमहात्म्यात नसून सामाजिक गतिशास्त्रात असल्याचे भान त्याने नोंदवणे हे आम्हाला आश्वासक वाटते. घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत एखाद्याने मांडलेले म्हणणे आपल्याला न पटणारे, निषेधार्ह असू शकते. तसे नोंदवण्याचा आपल्यालाही अधिकार आहे. पण ज्यांची भूमिका आपल्याला अमान्य असेल अशांना देशद्रोही ठरवणे, ही घटनेची पायमल्ली आहे. या पार्श्वभूमीवर दलित-स्त्रिया-कष्टकऱ्यांच्या न्यायासाठीच्या लढ्याबरोबरच भारतदेशाची सेक्युलर वीण व एकूणच संविधानाचा चबुतरा शाबूत राखण्यासाठीच्या लढ्यात कन्हैयासारख्या तरुणांची आज नितांत गरज आहे. यासाठीच रोहितची स्मृती ताजी ठेवत आमचा कन्हैयाला पाठिंबा आहे. कन्हैया, आम्ही तुझ्या सोबत आहोत.

नीला लिमये, भारती शर्मा, सुनीती हुंडीवाले, अश्विनी रानडे, सुरेश सावंत, भीम रास्कर, विजय दळवी, मिलिंद रानडे,

दादाराव पटेकर, वृषाली मगदूम, अजित मगदूम