सूफीवाद : डॉ. अलीम वकील यांची मांडणी आणि नव्या मांडणीची अनिवार्यता

श्रीनिवास हेमाडे

–१–

डॉ. वकील यांच्या “सूफी संप्रदायाचे अंतरंग” आणि “एका पथावरील दोन पंथ”  या दोन पुस्तकांमधून एक महत्वाचा विचार मराठीत आला. मराठीतून मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या नकाशात डॉ. वकीलांच्या यांच्या मांडणीची मुख्यतः ज्ञानशास्त्रीय मौलिकता अधोरेखित करणे आणि ती अधिक काटेकोर होण्यासाठी पुढील लेखनाची आवश्यकता अधोरेखित करणे आहे, हा हेतू या लेखनामागे आहे.

डॉ. वकील यांनी भक्ति आणि सूफी चळवळीचा तुलनात्मक अभ्यास अतिशय चांगला केला आहे.  निष्कर्षात त्यांनी काही मूलभूत प्रश्नही उपस्थित केले असून पुढील चर्चेची आणि अभ्यासाची दिशाही त्यांनी एक प्रकारे सुस्पष्टपणे सुचित केली आहे.  त्यांचा हा अभ्यास आणखी एका अंगाने पुढे जाऊ शकतो.

पहिले म्हणजे, निरीश्वरवादी इस्लाम अशी संकल्पना शक्य नाही. पण ईश्वर स्वीकारून केवळ धर्म म्हणून इस्लामचे पुढे येणे हे नुकसानकारक ठरले आहे. अस्सल वस्तुमीमांसाशास्त्रीय, म्हणजे सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय मांडणी पुढे येणे, तिची सांगड मानवतावादी, नैतिक तत्त्वांशी घालून सांस्कृतिक अंगाने इस्लामी नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र मांडणे शक्य आहे. तसा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने झाला आहे. मराठीत मात्र हे चित्र अभावाने दिसते. ती उणीव वकील यांच्या ग्रंथांनी भरून काढली आहे. या मांडणीचा संवाद इतर धर्मियांशी होण्याचा मार्गही उपलब्ध होण्याचा वैचारिक व भौतिक अवकाश आला पाहिजे. संवादाचा एक मार्ग म्हणून, एक अवकाश म्हणून या ग्रंथाकडे पाहिले पाहिजे. दुसरे म्हणजे, आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाची रचना करताना “भारतीय इस्लाम” चा त्यात समावेश होणे नितांत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सूफी तत्त्वज्ञानाची काटेकोर तत्त्वज्ञानात्मक मांडणी केली गेली पाहिजे. त्यामुळे या पुस्तकाची रचना काहीशी तांत्रिक होईल, हे खरे आहे. पण त्याला पर्याय नाही. त्याचे कारण इथे एक माझा स्वार्थ मला स्पष्ट केला पाहिजे. तो असा या पुस्तकांनी मराठी सारस्वताला मोलाचे योगदान दिले आहे, हे मान्य केले तरी मराठी तत्त्वज्ञानाच्या सारस्वतात त्याला अवकाश लाभला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि जागतिक सूफी तत्त्वज्ञान आणि भक्ति तत्त्वज्ञान यांच्या दालनातही ती दाखल झाली पाहिजे. म्हणजे तिचे इंग्रजी भाषांतर झाले पाहिजे. कदाचित ते पूर्ण नवेच पुस्तक असेल. अशा तुलनात्मक तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची जागतिक स्तरावर नितांत निकड आहे. इस्लामविषयक अनेक परिप्रेक्ष्यातून इंग्रजीतून तत्त्वज्ञानात्मक साहित्य निर्माण होत आहे. त्यात भारतीय सूफी व भक्ती यांचा समावेश नाही. ती उणीव डॉ. वकील यांच्या इंग्लिश आवृत्तीने भरून निघेल.

–२—

वैदिक हिंदू तात्त्विक परंपरेत पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे पक्ष आहेत. त्यांची नावेच बरेच काही स्पष्ट करतात. एक पूर्वपक्ष आणि दुसरा उत्तरपक्ष आहे.

पूर्वमीमांसा हे वेदांचे प्रामाण्य आणि आत्म्याचे अमरत्व मानणारे मुख्य दर्शन आहे. त्याच्या मते वेदांचे मुख्यतः दोनच विषय आहेत : धार्मिक कर्म आणि धार्मिक तत्त्वज्ञान. वेदाचे पूर्व आणि उत्तर म्हणजे अखेरचा भाग, असे दोन भाग करण्यात येतात. धार्मिक कर्म हा विषय वेदांच्या ज्या पूर्व भागामध्ये प्रतिपादिला आहे त्याची मीमांसा या दर्शनात केली आहे, म्हणून यास पूर्वमीमांसा म्हणतात आणि वेदांच्या उत्तर भागात तत्त्वज्ञान आहे. पूर्व भाग फार मोठा आहे आणि उत्तर भाग छोटा आहे. या छोट्या भागास वेदान्त किंवा उपनिषद म्हणतात. वेदान्ताची मीमांसा म्हणजे उत्तरमीमांसा होय. पूर्वमीमांसेला ‘मीमांसा’ म्हणण्याची पद्धत आहे.

मीमांसेनुसार ब्रह्म, ईश्वर, जीव, लोक-परलोक किंवा अन्य काहीही ज्ञानवस्तू घेतल्या तरी त्यांचा उद्देश ज्ञान देणे हा नाही तर केवळ त्याच्याशी जोडले गेलेले इष्ट असे कर्म करणे, म्हणजे यज्ञ करणे हेच आहे. याच मताचा शंकराचार्यांनी विरोध केला. आणि निखळ मोक्षप्रधान वेदान्त मांडला.

पाणिनीच्या व्याकरणानुसार ‘मीमांसा म्हणजे पूजित विचार’ होय. येथे पूजित म्हणजे तर्कशुद्ध विचार. वेद आणि वेदान्त यांतील धार्मिक कर्म आणि धार्मिक तत्त्वज्ञान या विषयी असलेली विधाने वेदांमध्ये सर्वत्र विखुरलेली असल्याने त्यांची सुसंगत मांडणी करण्याच्या बाबतीत संभ्रम उत्पन्न होतो. त्यांच्यात सुसंगती स्थापन करण्यासाठी वेदवाक्यांची मीमांसा वेदकालाच्या अखेरच्या कालखंडात सुरू झाली व वेदोत्तरकाली पूर्ण झाली. या प्रक्रियेत अनेक सिद्धांत निर्माण झाले. त्यांची सिद्धांतांची विषयवारीने मांडणी करून जे शास्त्र तयार झाले, त्यास ‘मीमांसाशास्त्र’ म्हणतात. तात्पर्य, वेदांच्या अर्थनिर्णयाचे शास्त्र म्हणजे मीमांसा होय. वेदांतील शब्दांचे, वाक्यांचे आणि प्रकरणांचे अर्थ कसे करावेत यांसंबंधाचे नियमांना  ‘न्याय’ म्हणतात. मीमांसेला आधुनिक पाश्चात्य दृष्टीकोनातून ‘धार्मिक भाषेचे तत्त्वज्ञान’ म्हणता येईल.

वेदवाक्यांचे विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद असे अर्थदृष्ट्या पाच विभाग होतात. वेद्वाक्यांचा अर्थ या पाचही भागांचा एकत्र विचार करूनच ठरतो. कारण प्रत्येक वेदवाक्याला अर्थ असतो. यात साधन आणि इष्ट असे साध्य (प्रयोजन) या दोघांचाही अंतर्भाव होतो. वेद जे जे सांगतो ते ते सप्रयोजन असते. माणसांची प्रवृत्ती किंवा निवृत्ती ही काहीतरी प्रयोजनाशिवाय होऊ शकत नाही. नुसते प्रयोजन सांगितले आणि त्या प्रयोजनाचे साधन सांगितले नाही, तरी माणूस वेदांचे अध्ययन करण्यास प्रवृत्त होणार नाही.

‘वेद प्रमाण आहे’ याचा अर्थ “वेदात जे जे सांगितले आहे ते अनधिगत व अबाधित सत्य आहे”. त्या सत्यात प्रयोजनाचाही अंतर्भाव होतो. हे सत्य केवळ वेदानेच निश्चितपणे समजते. विधी ते अर्थवाद हेच त्याचे निकष आहेत. म्हणून एक- समग्र वेद हा ‘अज्ञातज्ञापक’ आहे.  दोन- इतर कोणत्याही प्रमाणाने म्हणजे मानवी बुद्धीने हा अर्थ समजत नाही. म्हणजे वेद जे जे सांगतो ते इतर कोणत्याही प्रमाणाने म्हणजे मानवी बुद्धीने चुकीचे ठरत नाही. म्हणून ‘वेद अबाधित’ आहे.

प्रत्येक वेदवाक्य प्रमाण आहे, याचा अर्थ ते सत्य, नित्य आणि अबाधित आहे. आत्मा, पुनर्जन्म, कर्मफळ, स्वर्ग-नरक आणि वर्णव्यवस्था याच कारणामुळे अबाधित, सत्य आणि नित्य ठरते. हे सारे सिद्धान्त म्हणजे वेद वाक्ये आहेत. पूर्वमीमांसक किंवा पूर्वमीमांसा दर्शन मुख्यत्वे वेदमान्यता, वेदप्रामाण्य, विधी अर्थवाद मानणारे असतात. ते वेदान्त्यांप्रमाणे अद्वैतवादी नाही किंवा सांख्यांप्रमाणे पुरुष व प्रकृती असे दोनच मुख्य पदार्थ मानणारे नाही. पूर्वमीमांसेमध्ये वस्तुतः धार्मिक वाक्यमीमांसा हाच मुख्य विषय आहे.

उपनिषदे म्हणजेच वेदांत किंवा उत्तरमीमांसा किंवा श्रुती. वेद-वाङ्मयातील शेवटचा भाग म्हणून याला वेदांत असे म्हटले जाते. “अहं ब्रह्मास्मि” ही अंतिम घोषणा या तत्त्वज्ञानाची.

पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा यांच्यात प्रचंड वैचारिक संघर्ष होत राहिला. सैद्धान्तिक स्तरावर अद्वैत वेदान्त विजयी झाला. तोच ‘शांकरदिग्विजय’ होय. पण व्यवहारात मात्र पूर्व मीमांसा विजयी राहिली. लोक कर्मकांडे, पुनर्जन्म, पापपुण्य इत्यादीत अडकून राहिले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की पूर्वमीमांसा हा वेदाचा भाग आहे आणि उत्तरमीमांसाही वेदाचा भाग आहे. एकात कर्मकांड आणि केवळ सनातन वैदिक (आजचा हिंदू ) धर्म आहे तर दुसऱ्यात मुक्ती, मोक्ष आहे. म्हणजे एका अर्थाने हा परंपरा आणि आधुनिकता हाच संघर्ष होता. शंकराचार्य हे तत्कालिन आधुनिक तत्त्ववेत्ते होते. त्यांना कर्मकांडातून निर्गुण-निराकाराकडे यावयाचे होते. पुढे त्यांना निर्गुण- निराकार कडून सगुण-साकार या भूमिकेकडे यावे लागले. वस्तुतः त्यांच्या अद्वैत वेदान्ताच्या मांडणीत ईश्वर संकल्पनेला जागाच नाही. उलट ईश्वर ही अद्वैत वेदान्त व्यवस्थेत अडगळ आहे (समृद्ध असली तरी!). ईश्वराला त्यांना नाईलाजाने जागा द्यावी लागली. (जॉर्ज केंटर आणि डेव्हिड हिलबर्टच्या हॉटेल ऑफ इन्फिनिटी सारखी. या हॉटेलमध्ये साऱ्या खोल्या भरलेल्या असतात, पण खोल्या अगणित असतात. पण नवीन गिऱ्हाईक आले की पहिल्या खोलीतील गिऱ्हाईकला दुसऱ्या खोलीत ढकलायचे आणि नवीन गिऱ्हाईकाला पहिली खोली द्यायची. झाली जागा ! असे प्रत्येक वेळी करायचे. म्हणजे किती की लोक येईनात, प्रत्येकाला रूम मिळेल.) त्यामुळे त्यांना अनेक सगुण भजने, स्तोत्रे लिहावी लागली. त्यात वारकऱ्यांचा पांडुरंगही आहे. ते ‘पांडुरंगाकाष्टकं’ होय.  असो, म्हणजे नसो !

पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा यांच्यात उत्तरमीमांसेचा म्हणजे अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानाचा भारतीय तात्त्विक, सैद्धान्तिक  जीवनावर आणि संकृतीवर प्रभाव बलशाली ठरला. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अद्वैत वेदान्त अशीच मांडणी अकराव्या शतकापासून जोमदार ठरली. विवेकानंद, डॉ. राधाकृष्णन सारख्या (तत्कालिन आधुनिक) तत्त्ववेत्त्यानीही जगापुढे हीच मांडणी नेली. (या मांडणीला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बरीच आव्हाने देऊन ती मोडकळीस आणली गेली, पण हे विषयांतर नको.) विशेषतः महाराष्ट्रातील भक्ती परंपरा वेदान्त प्रभाव प्रकट करते. या वेदान्ताच्या प्रभावाखालीच मुख्यत्वे करून सारी भक्ती परंपरा विकसित झाली.

–३—

डॉ. वकील यांनी सुस्पष्टपणे दाखविले आहेच. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेबरोबरच उत्तर भारतातील भक्ती परंपरेचाचाही विस्तृत आढावा घेऊन डॉ. वकील यांनी इस्लामचा आशयच प्रामुख्याने उत्तर भारतातील भक्ती परंपरेत कसा व्यक्त होतो, ते दाखविले आहे. तिथे विशिष्टाद्वैत प्रभावी आहे, असे म्हणता येईल. डॉ. वकील यांच्या मांडणीत दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक- महाराष्ट्रीय व उत्तर भारतीय भक्ती परंपरेने ब्राह्मणी वर्चस्वाला शाह दिला. दोन – दोघांनी एकेश्वरवादी भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रीय एकेश्वरवाद विठ्ठलकेंद्रित होता तर उत्तर भारतीय एकेश्वरवाद इस्लामी होता. महाराष्ट्रीय एकेश्वरवाद विठ्ठलकेंद्रित असला तरी वारकरी मंडळींनी तो सर्वेश्वरवादात विकसित केला, हे डॉ. वकील यांचे निरीक्षण आव्हानातीत आहे.

आता, माझा मुद्दा असा आहे की, भक्ती परंपरा कोणतीही असली तरी संत मंडळी आणि मांदियाळी यांना सामाजिकदृष्ट्या त्रास, हालअपेष्टा, उपेक्षा यांना सामोरे जावे लागले ते राज्यकर्त्यांकडून नव्हे तर सनातनी ब्राह्मणांकडूनच.  महाराष्ट्रात ज्ञानेश्वर व्हाया एकनाथ ते चोखामेळा आणि पुढे. एवढेच नव्हेतर अद्वैताची नेटकी मांडणी करणाऱ्या आदि शंकराचार्यांनाही या सनातनी ब्राह्मणांकडूनच बहिष्कार भोगावा लागला.

हे ब्राह्मण कोण होते ? यांचा तात्त्विक दर्जा काय होता ? किंवा असतो. हे सनातनी ब्राह्मण म्हणजे पूर्वमीमांसक असतात.  पूर्वमीमांसेला भक्ती संप्रदायाने विरोध केला. आणि वेदान्ताला पाठींबा दिला. म्हणून तर ज्ञानेश्वर ते तुकडोजी पर्यंत प्रत्येक हिंदू संताने वारकरी संप्रदाय अंगिकारला. संताना वाळीत टाकणारे, दंड देणारे कोण होते ?  ते पूर्वमीमांसक ब्राह्मण होते. एका अर्थाने वेदान्ती, उत्तरमीमांसक वारकरी संप्रदायाचा संघर्ष कर्मकांडी पूर्वमीमांसकांशी झाला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरांचे शुद्धीकरण ते पानसरे-दाभोलकर खून प्रकरण पूर्वमीमांसकांची वैदिक श्रद्धा आहे ! श्रद्धेला बुद्धी हे औषध नसते. खुद्द शंकराचार्यांनांदेखील वाळीत पडण्याचे भोग भोगावे लागले (आता, ते त्यांच्या कोणत्या पूर्वजन्माचे फल होते, ते अज्ञात आहे.) पण वैदिक तत्त्वज्ञानाची अतिशय काटेकोर, तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्या खुद्द शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या आदिगुरूला वाळीत टाकण्याचे (मूर्ख) धाडस पूर्व मीमांसक कोणत्या बळावर करू धजतात ?

आता डॉ. वकील भक्ती आणि सूफी असा पट मांडत असतील तर त्यांच्या या पटात सूफिंचा संघर्ष कुणाशी झाला ? असा प्रश्न उपस्थित केला तर एक उत्तर असे देता येईल की कर्मठ इस्लाम विरुद्ध अस्सल एकेश्वरवादी सूफी यांचा संघर्ष झाला. इस्लामेतरावर प्रभाव टाकणारे सूफिंचे बळ कोणते ? त्याची मांडणी डॉ. वकील यांनी केली आहेच.

मग आता, एकेश्वरवादी सूफी तत्त्वज्ञान हे जणू अद्वैत वेदान्ती म्हणजे इस्लामची उत्तरमीमांसा असेल; तर इस्लाममधील पूर्वमीमांसा कोणती ?

सूफी  ज्ञानशास्त्रानुसार सत्यज्ञान हे अंतिम ज्ञान मानले आहे. उतम गुरु हे त्या ज्ञानाचे साधन आहे. ते असीम आहे. ग्रंथ वाचनाने ते लाभत नाही.अल्लाहच्या कृपेने त्याचा अल्पांश लाभतो. ज्यांना हा लाभ झाला असेल त्यांच्यात संवाद होऊ शकतो.त्यांनी ज्ञानाचे दोन प्रकार केले : बाह्य – इल्मे जाहिर आणि आंतरिक – इल्मे बातिन. म्हणून ज्ञानवंताचेही दोन प्रकार बनले  सूफी –  आंतरिक आणि उलेमा – बाह्य.

मूळ सूफी मतानुसार, दोन्ही ज्ञाने श्रेष्ठच आहेत. तथापि  आंतरिक ज्ञान हे श्रेष्ठ आणि बाह्य ज्ञान हे त्यापेक्षा कमी श्रेष्ठ आहे. शरियत हे बाह्य ज्ञान आहे तर हकीकत हे आंतरिक ज्ञान आहे. शरियत ही अल्लाहची प्रार्थना आहे तर हकीकत हे अल्लाहचे साक्षात दर्शन आहे. हकीकतीस ‘मुशाहिदा’ म्हंटले आहे. प्रार्थना पैगंबर महम्मद यांच्यामार्फत करता येते तर हकीकत साधक आणि अल्लाह यांच्यात साक्षात संवाद असतो.

आता, या दोन्ही ज्ञानाचा परस्पर संबंध कोणता आहे ? तर या दोन्ही ज्ञानाच्या परस्पर संबंधाबाबत वेगवेळी मते आहेत. (१) आंतरिक ज्ञान (हकीकत) बाह्य ज्ञानापासून (शरियत) वेगळे नाही. (२) शरियत आणि हकीकत यात मोठे अंतर आहे. (हुजविरी यांचे मत ) (३) हकीकत शरियतशी जोडले गेले आहे (अबू तालिब मक्की यांचे मत) (४) हकीकत शरियतचा भाग आहे (मौलाना थानवी यांचे मत)

या ज्ञानाचे अर्थविवरण निश्चित कसे होते? सूफी सत्ता शास्त्रानुसार कुराणातील आयतींचा अर्थ ज्ञानाच्या दोन प्रकारांनुसार भिन्न तऱ्हेचा होतो. काही आयतींचा अर्थ आंतरिक दृष्टीने पाहाता, तसा अर्थ लावणाऱ्याला  ‘काफिर’ म्हंटले जाऊ शकते, इतका वेगळा निष्पन्न होऊ शकतो.

या ज्ञानाचे अधिकारी खरे कोण ? तर मूळ  सूफी मते, सूफी हेच ज्ञानाचे (म्हणजे ‘हकीकत’चे) अधिकारी आहेत. ते स्वतःला अल्लाहचे मित्र मानतात. त्यांना ‘वली’ म्हणतात. उलेमांच्या मते, मुहंमद पैगंबर हेच या ज्ञानाचे जगातील पहिले अधिकारी आहेत. सूफी मते, ते म्हणजे ‘वली’ हे मुहंमद पैगंबर यांच्यापेक्षा अल्लाहला निकटवर्ती आहेत.

आता, या मुद्द्याबाबत सूफी आणि उलेमा यांच्यात परस्परविरोधी, तीही टोकाची मते आहेत. त्या पुष्ट्यर्थ ते विविध दावे आणि पुरावे देतात. हा एकमेव मुद्दा मतभेदाचा आहे. उलेमांच्या मते, मुहंमद पैगंबर यांच्यापेक्षा इतर कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही; मूळ पैगाम केवळ त्यानांच मिळाला आहे; तर सूफी मते, अल्लाह आणि भक्त यांच्यात मध्यस्ताची गरज नाही. अल्लाहचे ध्यान करताना सूफी भक्ताचे भान हरपते. त्या स्थितीत त्यांच्या तोंडून त्यांची (ती) अनुभूती व्यक्त होते. या अनुभूतीला ‘शताहात ‘ म्हणतात.

इथून सूफिंचेच दोन प्रकार दिसून येतात. पहिले, केवळ अल्लाहला मानणारे आणि दुसरे अल्लाह आणि शरियत मानणारे म्हणून मुहंमद पैगंबर यांना मानणारे. पहिले सूफी ‘केवल अल्लाहवादी’ आहेत तर दुसरे सूफी ‘अल्लाह आणि शरियतवादी’ आहेत. या दोन भूमिकांमुळे या दोघांमध्ये अनेक वाग्युद्धे झडली. त्यातून पहिल्या प्रकारच्या अनेक सूफिंचा छळही झाला. दुसरे सूफी अधिक बलवान झाले. म्हणजे मुळात शरियतवादी जे होते त्यांना दुसऱ्या प्रकारच्या सूफिंचा तात्त्विक आधार मिळाला.

‘शताहात’ अवस्थेत सूफी शरियतमुक्त होतो, तशी अनुभूती सूफी साधकास त्यांना येते. असे सूफी स्वतःला प्रेषितापेक्षा श्रेष्ठ समजतात. किंबहुना ते स्वतःला ‘अल्लाह’ समजतात. साहजिकच कुराणाला ते दुय्यम मानतात. “अनल हक” चा उद्घोष करणारे सूफी हसन बिन मन्सूर हल्लाज हे या ‘शताहात’ अवस्थेतच तसा उद्घोष करू शकले. ‘शरीयत मुक्ति’ काही विधी करून साधता येते, असे हल्लाज सांगतात.  ( नमाज, रमजानचे रोजे, जकात आणि हज) या अवस्थेत ‘अल्लाह’ शी साक्षात संवाद असल्याने ही एका तऱ्हेची निद्रीतावस्था असते. तिला सूफी “जमाउल जमआ” म्हणतात. ती परमावस्थेला पोहोचली की “अल्लाह आणि मी एकच” अशी स्थिती होते ती “अद्वैतावस्था” होय. तिला “इत्तेहाद” म्हणतात.

“अनल हक” ही अंतिम साद असेल तर सूफी भक्ती परंपरेने स्वतःहून वेगळा भिन्न ‘अल्लाह’ ही सद्वस्तू मान्य करून भक्तीसाठी संप्रदाय निर्माण करण्याची तडजोड का केली असेल ? इस्लामचा प्रसार करताना इतर धर्मीय परंपरेतील ‘अशीच समांतर सद्वस्तू’ त्यांना मान्य करणे म्हणूनच सोयीचे आणि सोयरिकीचे वाटले यात शंका नाही. इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीत सूफिंना जणू त्यांचाच धर्म सापडला. पण त्यांना स्वधर्मातील पूर्वमीमांसक ही चांगलेच ज्ञात होते.

–४–

डॉ. वकील हे दाखवून देतात की सूफी ही उदात्त मानवी प्रवृत्ती आहे. जगातील सर्व महत्वाच्या धर्मामध्ये सूफी प्रवृत्ती असते. केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध जैन, ख्रिश्चन धर्मामध्येही सूफी आहेत. इस्लाम महत्वाचा जागतिक धर्म होण्यामागे सूफी आहेत. म्हणून तर सर्व धर्मात सूफी आढळतात. पण सर्व धर्मात वेदान्ती आढळत नाहीत. कारण ज्या रीतीने सूफिंनी धर्माची सीमा ओलांडून इतर धर्माशी नाळ जोडली त्या रीतीने वेदान्ताने वैदिक धर्माची सीमा ओलांडली नाही. परिणामी वेदान्त भारतातच राहिला. बौद्ध धर्मात सूफी प्रवृत्ती उदयास येऊन तो धर्मही जागतिक बनला, हे वेदान्ताचे अपयश मानले पाहिजे आणि सूफिंचे यश.

______________________________

  • श्रीनिवास हेमाडे , सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ४२२ ६०५, अहमदनगर