जगावे कसे ? – डॉ. प्रदीप पाटकर

‘रोलर कोस्टर’ मध्ये स्वतःला उभे आडवे वाकडे तिकडे सुसाट घुसळून काढले कि काही माणसे परब्रह्म सापडल्यासारखे आनंदित होतात. किंचाळ्या, हर्षोन्माद, मनोरंजक (?) भीती याच्या आवर्तनात सापडले कि, सर्व थांबल्यावर उतरताना विलक्षण आनंद – ज्यात सुटकेचा आनंदही अंतर्भूत असतो – व जीवनार्थ सापडल्याची कृतार्थता असते. जीवनही रोलर कोस्टरसारखे जगणे म्हणजे खरे जगणे असे कित्येक वर्षे कित्येकाना वाटत आले आहे. थ्रील, अॅडवेंचर, धाडस, धसमुसळेपणा, अतिभव्य अतिदिव्य घटनाक्रम, श्वास घ्यायलाही फुरसत नसण्याइतकी धावपळ या साऱ्याला जीवन समजावे इतकी मुल्यांची घुसळण आपली आपण करून घेतली आहे. आपण जगतो का, कशासाठी, आपल्याला नेमके काय हवे आहे, या प्रश्नांना आजवर उत्तरे सापडली नाहीत. आताच्या स्पर्धेत माणसे इतरांचा पाय ओढून, जमल्यास त्याचा गळा दाबून पुढे सरकण्याची धडपड करतात. शेजाऱ्याला मागे टाकायचे आहे, पुढच्याच्या पायात पाय घालायचा आहे, काही तरी जिंकायचे आहे, एवढेच ध्यानात ठेउन माणसे पळत आहेत.

दुःख म्हणजे नेमके काय ? आपण जगतो आहोत ते सुख आहे कि दुःख आहे? दुःख असल्यास त्याला आपली स्वतःची मानसिकता, स्वतःचे अविवेकी दृष्टीकोन, स्वतःचे पारंपारिक अज्ञान कितपत कारणीभूत आहे ? दुःखाची आपण समजतो आहोत तीच खरी कारणे आहेत का? दुःखावर आपण करीत असेलेले उपाय योग्य आहेत काय ? सुख म्हणजे नेमके काय ? ई॰ अनेक प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्यासाठी थोडे थांबावे लागते, परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो. इतरांच्या दडपणांना बळी न पडता शाश्वत नीतिमूल्यांचा आधार घेण्याचे धैर्य दाखवावे लागते. प्रसंगी त्या त्या निर्णयाची किंमत त्वरित चुकवावी लागते ! गर्दीत धावत राहिल्याने ना जमीन दिसत, ना आकाश. थकलेल्या तनमनाकडे लक्ष देता येत नाही. सुख हवे असेल तर थोडे थांबून आजवरच्या जगण्याचा आढावा घ्यावा लागेल, उराशी जपलेल्या कल्पना तपासून पहाव्या लागतील. किती किंमत मोजून प्रत्यक्षात काय मिळते आहे, भविष्यात की मिळेल त्याचा अंदाज घ्यावा लागेल.

आपले मानसिक स्वास्थ्य आपणच राखावे लागते. आपल्या अस्वस्थतेला आपण खुद्द मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. इतरावर, परिस्थितील प्रतिकूलतेवर, दैवावर आपल्या मनस्तापाचे खापर फोडण्याने उत्तरे सापडत नाहीत. बऱ्याचदा परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली येऊ शकत नाही, पण चडफडणे हा त्यावरचा उपाय नसतो. डोके तापवून आपली ताकद तेवढी कमी होत जाते. प्रतिकूल घटनांमध्ये परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करणे, त्यातील दुःखाचा संयत अनुभव घेणे यापलीकडे काही करता येत नाही. मात्र दुःखाची दाट काळी छाया पुढील जीवनावर पडून जीवन दुःखी होत जाणे आपल्याला थोडेफार कमी करता यायला हवे. प्रतिकूलतेत प्रक्षुब्ध होऊन चालत नाही, अस्वस्थता टाळता येत नाही, पण स्वतःस व इतरास जमेल तेवढे सावरता येते, हे निश्चीत.

बऱ्याचदा मनःस्ताप सुखाची शाल पांघरून घरी येतो. तात्पुरत्या सुखावर ताबडतोब उडी मारून ते हस्तगत करण्याचे तंत्र आपण वर्षानुवर्ष घोटविलेले असते, ते अश्या वेळी आचरणात आणले जाते. माणसे परिणामाची क्षिती न बाळगता तात्पुरत्या सुखावर झडप घालतात. अनेकदा ‘मोह’ आहे हे माहित असूनही आपला पाय घसरतो. बऱ्याचदा वास्तविकता ध्यानात न घेता अपेक्षा वाढतात, त्या आग्रह बनतात, त्यांना अनेक महत्वकांक्षांची पिल्ले होतात. नवी व जुनी गोष्ट आकर्षक वाटली तरी ती उपयुक्त आहे कि नाही हे तपासावे लागते. वर्षाला १०० नवे उपाय, नवे देव, नवे बुवा, महाराज, नवे अंध विश्वास, नवे अतिरेक, नवा विवेक जन्म घेत असतात. अनेक जुन्या कल्पना नव्या वेष्टनात गुंडाळून समोर आणल्या जातात, पण त्यांची कालसापेक्षता, ज्ञानसापेक्षता तपासून पाहून त्या स्वीकाराव्या वा सोडून द्याव्या लागतात. जुने ते सदैव सोने असते तर बदलांची आवश्यकता भासली नसती. नव्या जुन्या कडे संशयी मुद्रेने पाहू नये, पण चिकित्सक मुद्रेने जरूर पहावे.

काही गोष्टींचा अतिरेकही मानसिक अस्वस्थता वाढवतो. अन्न पैसा प्रतिष्ठा हे तेल – साखर – मिठासारखे संयत प्रमाणात, चवीपुरते व पोषणापुरते घ्यावे लागते. त्यांचा अति हव्यास जीवनात मनस्ताप आणतो. इतरापेक्षा उंच होण्याच्या नादात पाय जमिनीवरून सुटण्याचा धोका असतो. साधारणतः सहा बाय चार जागा, गोळाभर अन्न, शुद्ध पाणी व जगण्यापुरता श्वास एवढे मात्र झोपडी ते राजमहाल कुठेही पाठ सोडत नाही. उंचावर पोहोचावे तेवढे खाली पडल्यास काय ही भीती वाढत जाते. आकाशातून किमान गरजांसाठी प्रत्येक पक्ष्याला जमिनीवर यावेच लागते. वेगाने घाटमाथ्यावर जाताने घाईघाईने वळणे जवळ घेतल्यास ती तुम्हाला मार्गावरून खाली दरीत फेकून देऊ शकतात. मोठेपणाच्या पिसाऱ्यातली अणकुचीदार टोके टोचत रहातात. याचा अर्थ मोठे होऊच नये असा नाही. वास्तवाशी जोडून रहात आनंद निर्माण करणे, ते सर्वाना वाटणे व स्वत:ही त्याचा संयत अनुभव घेणे या प्रयत्नात माणूस मोठा होतो पण दुःखी होत नाही.

मनःस्वास्थ्यासाठी महत्वाकांक्षा, आदर्श, भौतिक सुख या साऱ्यांशी तोडून घेउन सामान्यपणे जगावे असे नाही. मात्र महत्वाकांक्षा मनात रुजविण्याआधी स्वसामर्थ्याची नीट ओळख करून घ्यावी. ध्येय निश्चीत करताना त्याचा सर्वांगीण परीणाम ध्यानात घ्यावा. आदर्शांवर आंधळी भक्ती ठेउन चालणार नाही. भौतिक सुख नाकारू नये, पण त्यातील ताण समजून घ्यावा. ताण तणाव टाळता येणार नाही, पण तो सुसह्य करणे शक्य आहे.

मनःस्वास्थ्यावरील उपाय या विषयाला आजच्या जगात जबरदस्त बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे त्यावर अनेक प्रभावी (!) उपाय अस्तित्वात आले आहेत. बुद्धी वाढविण्याची औषधे अजून सापडली नाहीत तरीही मंदबुद्धी मुलांच्या पालकांना तशी औषधे विकण्याचा धंदा जगभर जोरात चालू आहे. मनःशांती मिळवून देणारे शेकडो झटपट उपाय, तंत्रे, यंत्रे अंधश्रद्ध ग्राहकांना भरदार जाहिरातीने विकली जात आहेत. दाढी-मिशी वाढवून बुवा व मोठमोठे गंध, भस्म लावून माता जगभरात गल्लोगल्ली त्रस्त अस्वस्थांची दिशाभुल करीत फिरत आहेत.

‘जुने ते प्रत्येक चांगले’ असा प्रचार करीत, नव्या शैली बाबत मनात अपराधी भावना जागृत करीत नव्या बाटलीत जुनी ‘आसवे’, अपूर्ण व्यायाम पद्धती विकणे चालू आहे. घरात मांडी ठोकून रोज १० मिनिटे बसल्याने तेवढ्यापुरते शांत वाटले तरी, रोजच्या धकाधकीच्या व्यवहारात आपण जोपर्यंत मन शांत ठेऊ शकत नाही तोपर्यंत काही खरे नाही. पण मेडीटेशन मागचा विवेकी विचार समजून न घेता, नुसते रोज १० मिनिटे मन शांत केल्याने राग कमी होईल, स्मरणशक्ती वाढेल, मनःस्वास्थ्य मिळेल इथपासून ते स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात मंगल घडेल, जगात भ्रातृभाव व शांती वाढेल, युद्धे टळतील, इथपर्यंत काय वाट्टेल ते होईल, असे खोटे दावे केले जात आहेत. ध्यानाने थोडावेळ शांत वाटेल, शरीराची धडधड व धडपड थोडी मंदावेल हे खरे असले तरी भौतीकतेतील अडचणींवर विवेकी उत्तरे शोधल्याशिवाय मनातले दृष्टीकोन लवचिक, वास्तववादी व संयमीत विचारसरणीची जोड देउन सुधारल्याशिवाय मनःस्वास्थ्य साधणे शक्य नाही.

‘मला टेन्शन येते’ यापेक्षा ‘मी स्वःतला टेन्शन आणतो’ हे वाक्य सत्याच्या अधिक जवळचे आहे. नुसते ‘बरे वाटण्याचे’ उपाय करण्यापेक्षा ‘बरे होण्याचे’ उपाय केले पाहिजेत. जीवनमान व मनःस्थिती सुधारली पाहिजे हे पटायला १ मिनिट पुरेसे आहे. तसे वेळापत्रकही अर्ध्या तासात बनविता येते. पण ते पाळले जाते २ दिवस. स्वत:स अस्वस्थ करण्याची, स्वत:स आळशी – मट्ठ बनविण्याची प्रॅक्टिस गेली कित्येक वर्षे न चुकता जवळ जवळ रोज केलेली असते.

जुन्या, पारंपारिक, दमनकारी विचारांचे व क्रोध, मोह, दंभ, मत्सरादि भावनांचे राज्य अनेक वर्षे मनावर चालत आल्यामुळे त्यात काही चूक आहे असे वाटतही नसते. माणसे स्वार्थाला, रागाला, अहंकाराला अस्मिता समजून जपत राहतात. मनःशांती सहजपणे, कमीत कमी प्रयत्नाने, व गरजेपेक्षा खूप अधिक मिळावी म्हणून माणसे प्रतिष्ठा, यश, संपत्ती आदी मृगजळामागे श्वास संपेपर्यंत धावत राहतात. रोगांना टाळण्यासाठी रोज व्यायाम करावा, सकस अन्न खावे, तंबाखू-दारू सारखी उत्तेजक द्रव्ये दूर ठेवावी, आवडीच्या गोष्टींचा अतिरेक टाळावा, निरोगी आनंद मिळेल असे जगावे, हे खरे असले तरी त्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक असतात. व्यायामासाठी अंथरुणातून बाहेर यावे लागते. भजी, सामोसे, फरसाण, रबडी, ई॰ आरोग्यशत्रुना जिभेपासून दूर ठेवावे लागते. चहा कमी करावा लागतो, व्यायाम करावा लागतो. जीवनातल्या अपेक्षांविषयी दूरदृष्टी, सदसदविवेकबुद्धी, मनोनिग्रह वापरावे लागतात.पारंपारिक, घातक शोषक विचारांची गुलामगिरी सोडावी लागते.

क्षणिक आनंद थोडका घेण्याऐवजी आपण आसक्तीत बुडतो. विवेकाचा आवाज क्षीण असतो, नीट कान देउन ऐकावा लागतो. अविवेकाच्या लाउडस्पीकर वरून काम क्रोधादी षड्रीपुंची गाणी दणादण कानावर आदळत असतात. आपल्या नकळत आपण तोल जाईपर्यंत त्या गाण्यावर डोलत राहतो. जिभेचे राज्य बुद्धीवर व जाहिरातींचे राज्य शहाणपणावर वर्षानुवर्षे मात करीत राहते.

श्वासोच्छ्वास सुधारणे, निश्चलतेचा सराव करणे, नियमित व्यायाम करणे, विविध सर्जक छंद जोपासणे, आपले सामर्थ्य व मर्यादा जाणून घेउन कार्याची दिशा व व्याप्ती ठरविणे, या साऱ्याबरोबरच स्वतःसह इतरांच्याही सुखाचा विचार करणे महत्वाचे आहे.साथींचे रोग टाळायचे असतील तर सामाजिक आरोग्यात आपला हिस्सा उचलणे महत्वाचे आहे.

आपल्या मुलावर घरात शिस्त, संस्कार करीत राहिले तरी जोवर समाजातील गुन्हेगारीविरुद्ध, शोषणाविरुद्ध, ढासळणाऱ्या नीतिमत्ते विरुध्द आपण आवाज उठवून संघर्ष करीत नाही तोपर्यंत आपली मुले गुन्हेगारी, हिंसा, भ्रष्टाचार यापासून वाचु शकणार नाहीत. सिनेमादि माध्यमातून काय वाट्टेल ते हिडीस,हिंसक,अनैतिक विकणाऱ्या लेखक/दिग्दर्शक/अभिनेत्यांना, भ्रष्ट बेबंद राज्यकर्त्यांना या देशाचे कायदेकानू तोडून, टॅक्सेस चुकवून अति श्रीमंत होत ‘विश्वासाचा’ दावा करणाऱ्या उद्योगपतींना, मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूना डोक्यावर घेणे आपणच थांबविले पाहिजे. व्यापारी जागतिकीकरणात सामान्यांचे भवितव्य धोक्यात येत असेल तर संघटीत होऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे.

आपल्यापुरते जगणे आकर्षक,आरामदायी वाटले तरी अंतिमत: तसे वागणे यशदायी,सुखदायी ठरत नाही.समाज सुधारला नाही तर एकट्याने सुखी,समाधानी,सुरक्षित जगता येत नाही,हे साधे सत्य समजणे व ते स्वीकारणे बहुतेकाना जमत नाही.मग भ्रामक सुखाचे मृगजळ शोधत माणसे दुख्खी होत जगतात.

हातात हात जोडून विवेकी मूल्यांची रुजवण करीत स्वतःसह साऱ्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करीत राहावे लागतात. ” यात अनुभवाला येणारी अस्वस्थता सर्जक असते, यात सहन करावी लागणारी अशांती मनाची ताकद वाढवीत असते “.

मनुष्यत्वाचे खरे समाधान, खरी मनःशांती स्वतःसाठी व इतरांसाठी स्वतःचे योगदान देण्यानेच मिळत असते.

  • डॉ. प्रदीप प. पाटकर

patkar.pradeep@gmail.com